Login

चाफा बोलेना! (भाग-२)

A small incidence between husband and wife.

जलद लेखन  ( कथामालिका)

चाफा बोलेना!

(भाग -२)

कथा पुढे-

निनाद उठून आला होता आणि निशीच्या मागे उभे होता.

तिला कल्पना नव्हती.

"अगं आईऽ  आम्ही दोघं  सांगतो ना तुला. . पदार्थ मस्त झालाय की, भारीच झालंय किंवा काहितरी कमी जास्त आहे. . चांगलं आहे ना ते किरकिर नाही करत दीपक मामासारखी!" इशिता पुन्हा आईशी लाडात बोलली.

" नाही गं ईशू! दीपकची किरकिर वाटते  ऐकताना पण बोलणारा  माणूस मोकळा राहतो बोलून. . तो साठवत नाही मनात. . पण हे तर सगळ्या जगाचा ताण स्वतःवर घेतात. . अरे  बोलून रागवायचं कधीतरी . . दोन शब्द बोलायचे ना.  . .यांचा रागच  असा की ते बोलतच नाहित . . दोन दोन दिवस! मला नाही राहवत. . . ते नाही बोलले की सतत  काहीतरी चुकलं की काय असं वाटतं . . मग ते खूप शिकलेले. . मोठ्या पोस्टवर. . तर दडपण येतं गं मला!" ती मनातून बोलत होती अन पटकन खांद्यावर हात ठेवलेला जाणवला. . वळून पाहिलं तर निनाद!

निशी खुप वरमली.

" कशाला त्रास करून घेतेस. . मी असाच आहे थोडा अबोल. अगं तू बोलतेस ना म्हणून घर भरलेलं असतं. तू स्वयंपाक खूप उत्तमच  करतेस. त्यामुळे काय म्हणणार ? मला स्तुती करता येत नाही अन अन्नाला नावे ठेवता येत नाहित. मला साधा चहा धड जमत नाही. . मग तिखट मीठ कमी पडलं किंवा विसरलं तर काय त्यात, तुला का नाव ठेवीन मी! घालून खायचं. . तुझ्या मागे किती धावपळ असते सकाळी? हे घर अाहे ना हॉटेल नाही. . झालं का समाधान!  आणि हो मला पटतं तुझं सगळं म्हणून  तर मी शांत असतो. . एखादी गोष्ट नाही पटली तर मी शांत असतो कारण तुला दुखवायचं नसतं!"

आता मात्र निशी खूप वरमली. इतकं स्पष्ट  मुलांसमोर कधीच बोलणं झालं नव्हतं.

उल्हास ही खुश झाला व म्हणाला. . "बाबा यू आर रियली ग्रेट. . आईला किती छान सपोर्ट करता तुम्ही. . यू आर अमेझिंग कपल. . चला मातोश्री  नाश्ता द्या आता. . तुमचा चाफा बोलला!"

" हा हा हा" मोठ्यांदा सगळेच हसले. . .

"उल्हास चाफा काय रे?" बाबांनी विचारलं. .

"अहो ती मराठी भावगीतं खूप ऐकते ना तिला चाफा बोलेना चाफा चालेना गाणं फार आवडतं म्हणून म्हणालो तसं. . !"

"चल रे तुझं आपलं काहीतरीच . . !" निशी अक्षरशः  लाजली व आनंदात किचनमधे गेली.

निशी शिकलेली असली तरीही पदवी झाली की लग्न झालं होतं त्यामुळे ती घरातच गुंतुन पडली.
लग्नानंतर २ वर्षातच उल्हासचा जन्म झाला आणि मग नोकरी किंवा करियर असं कधी लक्षातच आलं नाही. नवरोबा व्यवस्थित सेटल होते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या  सुद्धा कधी गरज भासली नाही.
मुळात निशीचा स्वभावही काटकसरी. . त्यामुळे स्वतःच्या गरजाही तिने वाढवल्या नाहीत.
कॉलनीतल्या सो कॉल्ड हौशी बायकांशीही तिने कधी  जास्त मैत्री केली नाही. त्यामुळे भिशी , किटि ,शॉपिंग  किंवा आऊटिंग हा खर्चही नाही.

पण आताशा मात्र तिला संवादाची गरज वाटू लागली होती. 

निनाद  खूपच शांत , संयमी व समजून घेणारा. . त्यामुळे मनमोकळं घडघड बोलणं असं नाहिच कधी! हो ला हो किंवा जुजबी बोलणं. . पेपर, टिवी किंवा शब्दकोडी  यातच  तो विरंगुळा शोधायचा.

निशीला स्वयंपाकघर खूप प्रिय!

मग  सगळं घरच नीटनेटकं ठेवणं अन नवीन नवीन  काहीतरी करणं यात गुंगुन जायची! वाचनाची विशेष आवड नव्हती. 

दोघांत अबोला नसला तरीही संवादही विशेष नव्हता. निरोप देणे. जेवायला येणार की नाही सांगणे , निशीच्या दहा वाक्यांनंतर एखादा होकार किंवा नकार देणे.

देहबोलीतून , स्पर्शातून , नजरेतून  उल्हासचे बाबा बोलायचे.

तिला आताशा या वयात कळत होतं की तिच्या स्वतःच्या  बाबांना  काय त्रास झाला असेल? तिचे बाबा खूप खेळकर आणि बोलके पण आई खूप सौम्य शांत व मितभाषी ! ते नेहमी तक्रार करायचे.


क्रमशः 

लेखिका  -©® स्वाती बालूरकर, सखी

0

🎭 Series Post

View all