Login

चाहूल लागे त्या जीवानां

एक हृदयस्पर्शी बालकथा
*चाहूल*


मी हातात चाकू घेवून मेणबत्त्या वर फुंकर मरणार इतक्यात बाबां म्हणाले. केक कापल्यावर कुणीही कुणाच्या तो चेहऱ्यावर लावायचा नाही!. कारण केक हा खाण्यासाठी असतो!. तोंडावर फासण्यासाठी नाही. समजल?

बाबांच्या या आदेशावर आम्ही सर्वच मुलांनी हो! म्हणुन माना डोलावल्या.


"हेप्पी बर्थ डे टू युsss... हेप्पी बर्थ डे टू यु sss...हेप्पी बर्थ डे टू मीरा..sss! हेप्पीबर्थ डे टू युssss!!"

मी मीरा आज माझा बारावा वाढदिवस. आजचा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस. कारण आज माझ्या वाढदिवसाला माझे बहूतेक सगळेच मित्र मैत्रिणी हजर होते. सगळ्यांनी माझ्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. कोणी छान छान गोष्टीच पुस्तक, कुणी बाहुली तर कुणी चोलेट्स आणली होती....

सगळ्या मित्रांची गिफ्ट मिळाली पण अजुन बाबांचे गिफ्ट बाकी होत. तसं माझे बाबा म्हणजे
" माझे हिरो "

"ते मला खुपच लाड करतात.माझा प्रत्येक हट्ट पुरवतात. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला बाबा छान छान गोष्टींची पुस्तके भेट म्हणून देतात.. या वेळेस ते मला कोणती पुस्तके देतील याचा विचार मी करत असतानाच बाबांनी माझ्या हातात एक बॉक्स दिला."

बाबा! काय आहे बॉक्स मध्ये?

मीरा, तुच उघडुन बघ!

तसा मी फार अधीरतेने बॉक्स उघडला .. पाहते तर काय? बॉक्स मध्ये छानशी छोटी दुर्बिण होती. ती दुर्बिण पाहून माझा आनंद अंतराळात मावेना. मला इतका आनंद झाला की,मी त्याचे शब्दात वर्णने काय करू?

कारण बाबांमुळेच मला ग्रह ताऱ्यांची प्रचंड आवड निर्माण झाली होती.. आणि ती आवड ओळखूनच बाबांनी मला दुर्बिण दिली ..

गिफ्ट पाहून सर्वच मुलांनी टाळ्या वाजवून
माझ अभिनंदन केले. त्या अदभुत गिफ्ट मुळे मी अगदी भारावून गेले.मी आनंदाने बाबांना मिठी मारली.

"चला,..तर मग दुर्बिणीचे उदघाटन करु या!" बाबांच्या या वाक्यावर आम्ही सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवत उडया मारल्या.

आम्ही सर्व मुलं बाबांसोबत आमच्या गच्चीवर आलो. बाबा स्वतः खगोलअभ्यासक असल्यामुळे त्यांना दुर्बिण किंव्हा आकाशदर्शन याची चांगली माहिती होती.

बाबांनी माझ्या दुर्बिणीतून आम्हांला चंद्र दाखवला. "कसला स्पष्ट दिसत होता चंदामामा!. त्यावरील खड्डे देखिल स्पष्ट दिसत होते." आम्ही सर्वच मुलांनी त्या अदभुत चंद्रदर्शनाचा आनंद घेतला.

रात्री झोपताना वाढदिवसाचे चित्रच डोळ्यांसमोर येत होते. मी मनातल्या मनात पुन्हा एकदा बाबांचे आभार मानले.


सकाळी उठल्या-उठल्या पक्ष्यांचा मोठा किलबिलाट कानांवर आला. मी आईला हाक मारली तेव्हा समजले बाबा गच्चीवर आहेत. मी गच्चीवर धाव घेतली.

"काय झाल बाबा? तुम्ही काय पाहताय?"

अग, त्या झाडावर बघ पक्षी किती ओरड्तात!

काय झाल असेल बाबा?

अग, काही नाही साप निघाला असेल!

बाबा, तुम्हांला कस माहिती?

"मीरा! साप,मांजर किंव्हा इतर काही धोका दिसला तर पक्षी अस ओरडतात जेणेकरून ती धोक्याची सुचना ऐकून इतर पक्षी येतील आणि सगळे एकत्र जमले की, सापाला पळवून लावतील!" बाबांनी अधिक खुलासा केला.

मीरा, तु एक काम कर तुझी दुर्बिण घेवून ये!

"वा! बाबा काय मस्त आइडिया आहे!... आणते लगेचच!"

मीरा तीची दुर्बिण घेवून आली. बाबांनी दुर्बिणीतून पाहिले तर काय?.. एक भला मोठा धामण जातीचा साप त्या झाडाच्या फांद्यावर होता. त्याला ते पक्षी आरडा ओरडा करून चोच मारण्याचा प्रयत्न करत होते. बाबांनी ते दृश्य दुर्बिणीतून मीरालाही दाखवले. तस मीरा बराच वेळ अगदी मन लावून ते दृश्य पाहत होती.

"बाबा! ते पक्षी बिचाऱ्या त्या सापाला चोच का मारतात?"

"मीरा, तो साप बिचारा वैगरे काही नाही हं! तो तर त्या पक्ष्यांचा शत्रु आहे!"

शत्रु म्हणजे? मीराने निरागसपणे विचारले.

"अग, तो त्यांची अंडी किंव्हा लहान पिल्ल खावुन फस्त करतो म्हणून शत्रु!"

"अस, मग ठीक आहे! मिळू दे त्या सापाला त्याच्या पापाची शिक्षा! " मीरा रागात म्हणाली.

एव्हाना त्या सापाला फांदीवरून खाली पडण्यात ते पक्षी यशस्वी झाले होते.

"बाबा! बाबा!! ते पहा काय दिसतंय.त्या झाडाच्या ढोलीत ना पिल्ल आहेत!"मीरा दुर्बिणीतून पाहत अतिशय आनंदाने ओरडली.

अरे, वा! किती आहेत ग पिल्ल?

तीन आहेत बाबा!

मीरा, तु बघत बस मला काम आहे.!अस सांगुन बाबा खाली गेले.

आज तर मीरा साठी मेजवानी होती. हातात दुर्बिण समोरच्या झाडावर घरट त्यात तीन पिल्ल.. मीरा बराच वेळ त्यांच निरिक्षण करत होती. पिलांचे मम्मी - पापा चोचीत किडे घेवून यायचे त्यांना पाहून ती तिन्ही पिल्ल चोच उघडून आवाज करायची.. मग त्यांचे मम्मी-पापा त्यांना चोचीने भारवायचे ..किती तरी वेळ दुर्बिणीतून तो नजारा पाहुन तीच मन भरत नव्हते... ते पाहताना मात्र एक बाब तिच्या लक्षात आली की, त्यांचे मम्मी- पापा त्या तीन पैकी दोनच पिलांना भरवतात ऐका पिलाला एकदाही चारा देत नाही. हे तिच्या बालमनाला खटकले ..तिने परत एकदा खात्री करून पाहीली तर पुन्हा तेच.. तिसरं पिल्लू उपाशीच राहायच.. मीरा हे सगळं पाहुन फार बेचैन झाली.असं का बर करत असतील त्याचे मम्मी पापा? तिच्या बाल मनाला तो भावनिक प्रश्न पडला. उत्तर शोधण्यासाठी तीने खाली नेहमीप्रमाणे बाबांकडे धाव घेतली.

"बाबा,बाबा! सांगु, ती... ती.. तीन पिल्ल आहेत ना,त्यांतील एक पिल्लू आहे ना!....त्याला ना.. त्याचे मम्मी- पापा खायलाच देत नाही!"

मीराच्या या प्रश्नावर बाबा बरेच गंभीर झाले.

काय झाल बाबा? सांगा ना!

मीरा! तु परत बघ ...उद्या देतील कदाचित त्याला खायला! बाबा काहीश्या जड आवाजात म्हणाले.

पण बाबांच्या या उत्तराने मीरा मात्र फार खुश झाली. कारण तिला माहिती होत बाबांनी संगितले म्हणजे उद्या नक्की त्या पिलाला खायला मिळेल.


मीरा दुसऱ्या दिवशीही सकळीच दुर्बिण घेवून वर गेली. बाबा वरती व्यायाम करतच होते.


"बाबा! तुम्ही बोलले होते आज त्या पिलाला खायला मिळेल.. पण आज देखिल त्याच्या मम्मी- पापाने त्याला भरवले नाही!" मीरा अतिशय भाऊकतेणे म्हणाली .

"तु उद्या परत बघ! मी उद्या सांगेन! मीराला समजवत बाबा म्हणाले."

ठीक आहे बाबा! तिने नाराजीने मान हलवली.पण उद्या नक्की सांगा हं!

मीरा परत पुढल्या दिवशी सकाळीच गच्चीवर गेली. आज तरी त्या पिलाला खायला मिळेल या आशेने दुर्बिणीतून पाहु लागली... पण आज त्या ढोलीत तीन ऐवजी तिला दोनच पिले दिसली...तिसरं पिल्लू दिसल नाही म्हणुन ती फार-फार बेचैन झाली..तिच्या डोळ्यांत आपसूक पाणी आले.

"बाबा! आज तर दोनच पिले आहेत. तिसरं पिल्लू कुठे गेल?" तिने रडत रडत विचारले.

मीरा ते देवाघरी गेल! बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाले.

"देवाघरी गेल? बाबा! अस कस देवाघरी गेल? आणि हे तुम्हांला कस माहीत?" मीराने रडवेल्या आवाजात प्रश्नांचा भडिमार केला.

"मीरा,रडू नकोस ...अग! त्या पिलाच्या मम्मी- पापानां माहीत होत की, आपल हे पिल्लु देवाघरी जाणार आहे! म्हणून ते त्याला चारा भरवत नव्हते!"

"बाबा,अस कस त्यांना माहीत? ते मम्मी- पापा काय डॉक्टर आहेत?" मीरा ने डोळे पुसत विचारले.

मीरा, ते मम्मी-पापा डॉक्टर नाही! पण प्राण्यांना किंव्हा पक्ष्यांना निसर्गाने सहाव इंद्रिय दिल आहे. त्याला इंग्रजी मधे "सिक्स सेन्स" अस म्हणतात.

ते काय असत बाबा?

अग, सहावे इंद्रिय म्हणजे त्यांना पुढे होणाऱ्या घटनांची चाहूल लागते... उदा: भूकंप येणार असेल तर त्यांना या संकटाची पूर्व कल्पना येते!

बाबा खरच?

"हो ग! अगदी खर!! त्यांना पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल लागते!"

"मीरा, एकदा प्राणी संग्रहालययात ऐका हरणाला पिल्लू झाल.पण ते हरीण तिच्या पिलाला अजिबात जवळ घेत नव्हत... तेथील कर्मचाऱ्यांना काय करावे काही समजत नव्हते...एक दोन तासानंतर ते पिल्लू देवाघरी गेल.त्या पिलाची जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा समजल की, त्या पीलच्या हृदयात भोक आहे. आणि ते जास्त काळ जगु शकले नसते. त्या हरणाला समजले होते.. हे पिल्लू जगणार नाही म्हणून ती पिल्लाला जवळ घेत नव्हती....म्हणजेच प्राणी- पक्ष्यांना आधिच समजते असा त्याचा अर्थ होतो! समजल? "

बिचारी मीरा तसा तिला बाबांवर पुर्ण विश्वास होता. तरिही तिच्या लहान बालमनाला बाबांची ही गोष्ट अजिबात पटली नाही...

...ती पुन्हा पुन्हा दुर्बिणीतून आशेने ते तिसरं पिल्लू शोधत राहीली...

फोटो सौजन्य: इंटरनेट