चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -१

वाचा एका चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ!

भाग एक.


आँऽऽ आईऽऽ”

एकाएकी तिच्या पोटात कळा सुरु झाल्या आणि वेदनेने ती कळवळली.


अचानक काय होतेय याचा तिला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यापुढे पसरलेला गडद अंधार अधिकच गडद होऊ लागला. कसेतरी बेडवरून उठण्याच्या प्रयत्न करत असतानाच चादरीवरच्या रक्ताने तिचे हात माखले.


“आई गंऽऽ”

त्यासरशी तिने एक किंकाळी फोडली आणि त्याचवेळी डोळ्यापुढे आलेल्या अंधारीने तोल जाऊन ती खाली कोसळली.


सहा महिन्यानंतर..


“काव्याऽऽ, काव्या ऐक ना गं मी आलेय. तुझी अमु.” अमृता काव्याचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


“श्शऽऽ हळू. माझं बाळ आत्ताच झोपी गेलंय. तुझ्या आवाजाने ते उठेल ना.” तिच्याकडे एक ओझरता कटाक्ष टाकून हळूवार बोलत काव्याने ओठावर बोट ठेवला आणि दुसऱ्या हाताने ती मांडीला गोंजारू लागली.


“काव्याऽऽ”


“बघताहेस ना? किती गोड दिसतोय. लबाड झोपेतच हसतोय.” काव्या अजूनही मांडीला थोपटत आपल्याच तंद्रित हळू आवाजात बोलत होती.


“काव्या, अगं..”


“ए, किती वेळा सांगितलय की जोराने बोलू नकोस. बघ, आता माझं बाळ उठलाय ना? किती रडतोय ते तुला ऐकू येतंय ना?” काव्याने शेजारी झुकलेल्या अमृताचा गळा जोरात आवळला.


“काव्या काय करतेस? मी.. मी.” ती पुढे काही बोलू शकली नाही. कारण काव्याच्या हाताची पकड आणखी घट्ट होत होती.


“काव्या, सोड त्यांना.” तिथल्या दोन नर्स मिळून काव्याला अमृतापासून वेगळे करत म्हणाल्या.


“बघितलं ना? माझं बाळ हिच्यामुळे रडतंय.” ती रडवेली झाली होती.


“कुठे रडतंय? शांतच झोपलंय की. जा, तूदेखील तुझ्या बाळासोबत थोडावेळ आराम कर.” नर्स तिला तिच्या बेडवर घेऊन जात म्हणाल्या.


“पुन्हा माझ्या बाळाला त्रास दिलास ना तर मी तुला सोडणार नाही.” जाता जाता डोळ्यात अंगार घेऊन काव्याने अमृताकडे पाहिले.


तिची ती भेदक नजर, विस्कटलेले केस, अंगावरच्या ओढणीचे सुटलेले भान.. अमृताच्या डोळ्यात टचकन पाणी आले. सहा महिन्यांपासून मनोरुग्णांच्या या प्रायव्हेट इस्पितळामध्ये आश्रयाला असलेल्या काव्याला भेटायला ती आली होती आणि काव्याने तिलाच झुगारून लावले होते.


“मॅडम,तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तिला भेटायला नका येत जाऊ. तुम्ही आलात की ती खूप हायपर होते आणि मग नॉर्मल होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. गोळ्या, इंजेक्शनं देऊन तरी किती द्यायची ना?” ड्युटीवर असलेल्या मुख्य परिचारिका अमृताकडे येत म्हणाल्या.


“सिस्टर, ती माझी मैत्रीण आहे हो. तिला अश्या अवस्थेत मी एकटी कशी सोडू?” रडवेली झालेली अमृता डोळे पुसत म्हणाली.


“खरंच तुमची कमाल आहे. आजमितीला सहा महिने उलटलेत, तिचे एकही नातेवाईक तिला भेटायला आले नाही. तुम्ही मात्र दर महिन्याला येता, वरून तिच्या उपचाराचे संपूर्ण पैसेही देता. तुमची मैत्री फार वेगळी आहे.”


“हम्म. जगावेगळी मैत्री आहे खरी. कुठून ही अनोळखी गाठ बांधल्या गेली ठाऊक नाही; पण एवढं मात्र खरं की मैत्रीची ही गाठ कधीच तुटणार नाही. बाय द वे, मला आज डॉक्टर शशांकना भेटायचे होते. ते आहेत ना?”


“हो. ते केबिनमध्ये आहेत. तुम्ही जाऊ शकता.” केबिनकडे बोट दाखवत त्या उत्तरल्या.


“मे आय कम इन?” केबिनचे दार अर्धवट उघडून अमृताने एक स्मित करत विचारले.


“अमृता? यस डिअर, प्लीज कम.”


“थँक यू.” हलकेच हसून ती आत आली.


“फार्मॅलिटीज नकोत. बैस अगं. मला सांग, काव्याला भेटलीस?” तिला सहज करत त्यांनी विचारले.


“होय अंकल. ॲक्च्युली मला तिच्याच संदर्भात बोलायचं आहे.”


“हम्म.”


“अंकल, ती बरी होणार ना हो?”


“अमृता, ती सध्या एका खूप मोठ्या धक्क्यात आहे त्यामुळे या घडीला मी काहीच सांगू शकत नाही.”


“अंकल, तिचे वेड दिवसेंदिवस वाढतचं चाललेय. जर असेच चालू राहिले तर ती त्यातून कधीच बाहेर पडणार नाही का?”


“हम्म, दुर्दैवाने ही शक्यता नाकारता येण्यासारखी नाहीये. तिला बसलेला धक्का खूप जबर आहे हे मात्र खरं आहे. ज्या नराधमाने तिच्याशी असे कृत्य केले असेल त्याला सजा ही व्हायलाच हवी.”


“सजा? अंकल, अहो सजा देण्यासाठी आधी ती बरी तरी व्हायला हवी. काय घडून गेलंय, कुणी केलंय हे आठवायला हवं. ती तर तिचा संपूर्ण भूतकाळ विसरलीय हो. मी तिची मैत्रीण आहे हे देखील विसरलीय.” तिचा उमाळा दाटून आला.


“अमृता बेटा, कुल डाऊन.” तिच्यापुढे त्यांनी पाण्याचा ग्लास सरकावला.


“सॉरी, रडायचं नाही असं ठरवलं तरी उगाच अश्रू दाटतात. खूप कमी दिवसात एकमेकींचा खूप लळा लागला होता आम्हाला आणि आता तीच मला तिची शत्रू समजतेय. असो, अंकल खरं तर मी तुमच्याकडे एका वेगळ्याच कारणासाठी आलेय.” डोळे पुसत ती म्हणाली.


“कसलं कारण?”


“मी काव्याला इथून घेऊन जायचं म्हणतेय.”


“व्हॉट? तुझा माझ्या उपचारांवर विश्वास नाहीये का?”


“नो अंकल, मी असं कसं म्हणेन? तुम्ही डॅडचे बेस्ट फ्रेंड आहात. माझे आवडते अंकल आहात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक निष्णात मानसिक रोगतज्ञ आहात. मी तर तिला फक्त माझ्या समाधानासाठी दुसरीकडे घेऊन जायचं म्हणतेय. जस्ट लाईक फॉर सेकंड ओपिनियन.”


“अमृता, राजीव याला कधीही अनुमती देणार नाही. त्याने म्हटले म्हणून तुझी मैत्रीण इथे, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे याची तुला जाणीव आहे ना?”


“यस अंकल, म्हणून तर मी तुमच्याशी आधी बोलायला आलेय. तुम्ही डॅडना कॉन्व्हिन्स करू शकाल याची मला खात्री आहे.”


“लेट्स सी, बाय द वे तू तिला कुठल्या डॉक्टरकडे घेऊन जाणार आहेस?”


“मी ते ऑनलाईन सर्च केलंय. डॉक्टर मधुर भट्टाचार्य. प्रेजेंटली ते नाशिकला असतात. त्यांच्याबद्दल बरंच ऐकलंय तेव्हा..” मोबाईल मधील हिस्ट्री त्यांना दाखवत ती म्हणाली तेव्हा त्यांनी तिला मध्येच थांबवले.


“वेट, वेट, वेट. काय नाव म्हणालीस? डॉक्टर मधुर भट्टाचार्य? अगं तो स्वतःच एक वेडा आहे. म्हणजे कधी कधी तसा वागतो. पण ऑन द अदर हॅन्ड, ही इज व्हेरी ब्रिलियंट.”


“तुम्ही त्यांना ओळखता?”


“माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे तो. जर काव्याला तू त्याच्याकडे घेऊन जायचा विचार करत असशील तर योग्य व्यक्तीच्या हातात तू तिची केस सोपवत आहेस असे मी म्हणेन. हां, आता प्रॉब्लेम हा उरतोय की राजीवची परवानगी कशी काढायची?”


“माझी कसली परवानगी?” डॉक्टर शशांकचे बोलणे पुरे होत नाही तोच एक भारदस्त आवाज कानी पडला.


“राजीव?”


“डॅड?”

त्या अनपेक्षित आवाजाने डॉक्टर शशांक आणि अमृता दोघेही उठून उभे झाले. दोघांच्याही चेहऱ्यावर चोरी पकडल्या गेल्याचे भाव स्पष्ट दिसत होते.


काव्याला नेमके काय झालेय? तिच्या दुसरीकडे उपचार करण्याच्या निर्णयाला राजीव मंजुरी देईल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all