चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -३
“मला कुठलंच स्पष्टीकरण नकोय. आता माझी मैत्रीण झालीहेस ना? मग यावेच लागेल.”
“पण..”
“प्लीज?”
“ओके.”
तिच्याकडून हिरवी झेंडी मिळाली आणि अमृताने तिला एक घट्ट मिठी मारली. ती मिठी, ती पहिली मिठी.. त्यांच्या नव्या नात्याच्या मुहूर्तमेढीच्या सुरुवातीची.
_______
_______
‘अमृता व्हिला’
वॉचमनने बंगल्याचे गेट उघडताच आठवणीच्या उमाळ्यांना बाजूला ठेवत अमृताने कार आत वळवली.
“अमृताऽऽ”
“मम्मा? सॉरी तू इथे आहेस हे लक्षातच आलं नाही अगं.” आपल्याच तंद्रित खोलीत जात असलेल्या तिला वैदेहीने हाक दिली तशी ती थबकली.
“अमृता, सारं काही ठीक आहे ना बाळा? काव्याच्या तब्येतीत काही सुधारणा आहे ना?” वैदेहीच्या प्रश्नाने अमृताच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झाले.
“नाही, ती आहे तशीच आहे म्हणून तुझी लाडकी लेक तिला दुसऱ्याच डॉक्टरांकडे घेऊन जातेय.” अमृताच्या उत्तरापूर्वी राजीव आत येत म्हणाला.
“डॅड?”
“हम्म, खरं तर तुझा निर्णय मला आताही आवडलेला नाहीये पण केवळ तुझ्यासाठी मी तयार झालोय.”
“ओह डॅड, रिअली? आय एम सो हॅपी. लव्ह यू डॅड.” अमृताने धावतच राजीवला मिठी मारली तसे त्याने तिच्या केसावरून हात फिरवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
“अमृता, माझ्या काळजाचा तुकडा आहेस गं तू. तुला विरोध करणं मला कधीच नाही जमणार. तू म्हणतेस तर उद्याच आपण काव्याला नाशिकला घेऊन जाऊयात.” त्याच्या हळव्या स्वराने तिला रडूच कोसळले.
“डॅड, थँक यू. तुम्ही हो म्हणालात हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही नका काळजी करू. मी एकटीने हॅन्डल करेन. मी आलेच माझे आवरून.”
त्याला परत एक मिठी मारून अमृता धावतच तिच्या खोलीत पळाली. आतापर्यंत मनात साचलेले मळभ कुठल्या कुठे गायब झाले होते. मनात नुसत्या आनंदलहरी वाहू लागल्या होत्या.
“काव्या, ऐकतेस ना? डॅड हो बोललेत अगं. मी त्यांची लेक असले तरी त्यांची तुझ्यावर पण लेकीसारखीच माया आहे हे ठाऊक आहे मला. तू ना लवकरच बरी होशील. आय प्रॉमिस.” बेडरूममधील भिंतीला टांगलेल्या फ्रेममधील फोटोकडे बघून ती आनंदाने बोलत होती.
“तुम्हा दोघा बापलेकीचं काय गुळपीठ चाललंय, मला कळेल?” आपली व्हीलचेअर पुढे सरकावत वैदेहीने राजीवकडे प्रश्नार्थक पाहिले.
“..वैदू अमृताचाvकाव्यावर खूप जीव आहे गं. मग कितीही रागावलो असलो तरी तिच्यासाठी मला होकार द्यावा लागलाय.” हॉस्पिटलमधील किस्सा तिला सांगत राजीव म्हणाला.
“राजीव, तुमच्या या स्वभावामुळेच मला तुमच्या आणखी प्रेमात पडायला होतं हो. तुम्ही एक उत्कृष्ट बिझनेसमन आहातच; पण एक आदर्श पती आहात आणि वडील म्हणून तर जगातील सर्वात बेस्ट आहात.” तिने राजीवचा हात हाती घेतला तसे त्याने तिच्या हाताचे चुंबन घेऊन तिच्या गळ्यात दोन्ही हात गुंफले.
“वैदू, या सर्वासाठी तू जबाबदार आहेस. तू कायम माझ्या सोबत आहेस म्हणून मी या साऱ्या भूमिका व्यवस्थित रित्या पार पाडू शकतो ना? यू आर माय बॅकबोन, ज्यामुळे मी कायम ताठपणे उभा राहू शकलोय.”
“बॅकबोन..कणा?” तो म्हणाला तशी वैदेही खिन्न हसली.
“राजीव, अरे माझा स्वतःचा कणा मोडून इतकी वर्ष झालीत. आपली अमृता आठ वर्षांची असताना झालेल्या अपघातात माझ्या हाती ही व्हीलचेअर आली ती कायमची रे. मी स्वतःच स्वतःचा तोल सांभाळू शकण्यास असमर्थ आहे तर तुला कसे ताठ उभे ठेवू? तू जे आहेस ते तुझ्यामुळे. उलट थँक्स की मी जशी आहे तसे स्विकारून आपला संसार आनंदाने करतो आहेस. एखादा असता तर..”
“ए वैदू, आता असं बोलून तू मला चिडायला भाग पाडू नकोस हं. त्या अपघातात जर तुझ्याऐवजी मला काही झालं असतं तर तू मला सोडून गेली असतीस होय? माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि आहे आणि ते कायम राहिल कळलं ना? आय एम सॉरी, तुला त्रास होईल असं मला नव्हतं बोलायचं पण इट्स फॅक्ट की तुझ्याशिवाय हा राजीव अपूर्ण आहे गं. तू आहेस म्हणून मी आहे.” तिच्या गालावर त्याने ओठ टेकवले.
“आणि तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही दोघं जगातील सगळ्यात बेस्ट बेस्ट पेरेंट्स आहात.” आपल्या खोलीतून आनंदाने बाहेर येत अमृताने दोघांना मिठी मारली.
“हो, म्हणून मग त्या शशांकपुढे माझ्याशी भांडत होतीस होय ना?” लटक्या रागाने राजीव म्हणाला.
“डॅड, सॉरी ना. जरा चुकलंच माझं. पण माझा हेतू चुकीचा नव्हता ना? बाय द वे, हे बघा डॉक्टर मधुरशी अपॉइंटमेंट फिक्स झालीये. मी परवाच काव्याला घेऊन जाईल.” ती खुश होत त्याला मोबाईल दाखवत म्हणाली.
“एकटीने?”
“ऑफकॉर्स! तसाही तिच्यामुळे तुमच्या ऑफिसच्या कामात आजदेखील खंड पडला. असे वारंवार होणे बरे नाही ना? तेव्हा मी एकटीनेच जातेय अँड डोन्ट वरी, ती सध्या मला नीटसे ओळखत नसली तरी मनातल्या कोपऱ्यात मी नक्कीच आहे. तेव्हा ती मला काही त्रास वगैरे देणार नाही.”
“या वेड्या लोकांचं काही खरं नसतं गं. घडीला एक तर घडीला दुसरं असतं. आज ती तुला तिची शत्रू समजत होती, उद्या जाऊन मलाही म्हणेल तेव्हा सांभाळून रहा.”
“डॅड, काहीही काय बोलताय? ती वेडी नाहीये. थोडं मानसिक संतुलन ढासळलंय असे डॉक्टर मधुर म्हणत होते. राहिला प्रश्न तो तुमच्याबद्दल चुकीचं बोलण्याचा तर तसे बोलणारे आजवर तरी मला कोणी भेटलेले नाहीये आणि जर चुकून कोणी बोललेच ना तर ही अमृता ऐकणाऱ्यातील नाहीये हं. त्याची जीभ हासडून हातात ठेवेल ती.” ती उसळून म्हणाली.
“असं? बघितली हिची भाषा?” वैदेही तिचा कान पिळत म्हणाली.
“आऊच! मम्मा, खरंच अगं. डॅडशी मी कितीही भांडले, रागावले तरी ही इज माय रिअल हिरो. त्यांच्याविरुद्ध मी कधीच चुकीचं ऐकून घेणार नाही.” आपला कान सोडवत अमृता म्हणाली.
“हम्म. तुम्ही दोघं म्हणजे ना टॉम अँड जेरी आहात. तुमचं कसंय माहिती आहे का? तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.” वैदेही हसून म्हणाली तसे दोघांनीही हसून टाळ्या दिल्या.
________
“तू? तू मला कुठे घेऊन जाणार आहेस?” विस्फारलेल्या नजरेने काव्या अमृताला विचारत होती.
“लॉंग ड्राइव्ह. असं दुरवर मस्त मस्त फिरायला तुला आवडतं ना?” अमृता तिच्याकडे स्मित करून म्हणाली. डॉक्टर मधुरकडे घेऊन जायला म्हणून ती आज परत डॉक्टर शशांकच्या इस्पितळात आली होती.
“हो, आवडतं. ए, तू मला खरंच घेऊन जाणार?” काव्याच्या डोळ्यात अविश्वास होता.
“हो तर.”
“पण मी नाही येणार. “
“का?”
“माझं बाळ.. ते छोटं आहे ना? त्याला सोडून कसं येऊ?”
“त्याला कुठे सोडायचं आहे? त्यालाही आपण सोबतच घेऊन जातोय की.”
“खरंच?” ती अविश्वासाने म्हणाली.
“हम्म. हे बघ, त्याच्यासाठी मी खेळणी घेऊन आलेय आणि त्याला थंडी वाजू नये म्हणून हा मऊशार स्वेटर, कानटोपडे..” अमृता तिला एकेक वस्तू दाखवत होती.
“ए, तू किती चांगली आहेस गं. माझ्या बाळासाठी काय काय घेऊन आलीहेस. मी.. मी उगाच तुला ओरडले होते.” काव्या निरागसपणे म्हणाली.
तिचा तो भोळाभाबडा चेहरा बघून अमृताला गलबलून आले.
“ए, पण तुझा आणखी काही वेगळा डाव तर नाहीये ना? माझ्या बाळाला पळवून नेणार आहेस का तू?” क्षणात निष्पाप भासणारे काव्याच्या चेहऱ्यावरील भाव क्रूर झाले आणि तिने अमृताचा गळा आवळून धरला.
“वेडी आहेस का गं तू? तुझ्या बाळाला तुझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. खरंच अगं. शप्पथ.” तिच्या हाताची पकड रोखत अमृता म्हणाली.
“खरंच ना? आधी वचन दे.”अमृताच्या गळ्यावरचा हात बाजूला करून तिने तो तिच्या पुढे हात ठेवला.
“दिलं वचन.”अमृता म्हणाली तसे काव्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
“तू खूप खूप चांगली आहेस. ए तुझं नाव काय गं?” तिचा पुन्हा तोच निरागस स्वर.
“अमृता.”
“अम्म-मरू-ता. शी किती कठीण नाव आहे गं? मी तुला अमु म्हणू?” तिने डोळे बारीक करत विचारले तशी अमृताला एक घट्ट मिठी मारावी वाटली.
“..अमृताऽऽ यार किती मोठं नाव आहे गं तुझं? मी ना तुला अमु म्हणूनच हाक देणार, चालेल ना?”
दोन वर्षांपूर्वी राजीवच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या तिचे ते हक्काने सांगणे आणि आजचे जरासे बावरून विचारणे. दोन्ही वेगळ्या बाबी असल्या तरी शब्द एकच होता, तो म्हणजे अमु.. तिच्या काव्याने तिला घातलेली साद!
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________
