चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -४

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा.
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.

भाग -४

दोन वर्षांपूर्वी राजीवच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या तिचे ते हक्काने सांगणे आणि आजचे जरासे बावरून विचारणे. दोन्ही वेगळ्या बाबी असल्या तरी शब्द एकच होता, तो म्हणजे अमु.. तिच्या काव्याने तिला घातलेली साद!

________

“डॉक्टर मधुर, खूप आशेने मी तुमच्याकडे आलेय. प्लीज, मला सांगा ना, काव्याच्या बाबतीत आपण काहीच नाही का करू शकत?” मधुरकडे अपेक्षेने पाहत अमृता विचारत होती.


“सी, मिस अमृता तुमच्या काव्याची केस फार काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. उलट साधी सरळ स्टोरी आहे. कुणीतरी तिच्यावर शारीरिक अत्याचार केलाय, त्यात ती प्रेग्नन्ट झाली. कदाचित तिला ते मूल हवं होतं; पण तिच्या पार्टनरला ते नको असेल म्हणून तिचा गर्भपात करण्यात आला. ती मात्र आपण आई झालोय असं समजून एका काल्पनिक जगात वावरतेय. द्याट्स इट.” लॅपटॉपवर सफाईदारपणे बोटे चालवत मधुर तिच्याकडे न बघता बोलत होता.


“द्याट्स इट? डॉक्टर, एवढं सिम्पल आहे हे? अहो तिच्या आयुष्याचा खेळ झालाय आणि तुम्हाला हे फक्त द्याट्स इट वाटतंय?” तिच्या डोळ्यात राग जमा झाला होता.


“मिस अमृता, डॉक्टर शशांक माझे गुरु आहेत. मी अजूनही इतका मोठा नाहीये की त्यांच्याकडची केस स्वतःकडे घेऊन तिला क्युअर करण्याचे चॅलेंज घेऊ शकेल.” त्याची नजर अजुनही लॅपटॉपवर खिळली होती.


“ते तुम्ही लॅपटॉप बाजूला करून माझ्याशी बोलणार का? पुण्याहून इथे नाशिकमध्ये मी आलेय. तब्बल पाच-साडेपाच तास ड्रायव्हिंग केलीये. मानसिक संतुलन बिघडलेल्या त्या मुलीला कसे आणले असेल माझे मला माहित आणि त्याचे फलित काय? तर तुम्ही मला सरळ सरळ इग्नोर करता आहात?” टेबलवर मुठी आपटत ती म्हणाली.


“अरे केवढा हा राग? मला तर वाटतं तुमच्या मैत्रिणीपेक्षा तुम्हाला ट्रीटमेंटची जास्त गरज आहे. राग अगदी नाकावर घेऊन फिरता वाटतं.” लॅपटॉपवर पुन्हा काहीतरी टाईप करत तो हसून म्हणाला.


“डॉक्टर इट्स नॉट फनी.”


“खरंच हे फनी नाहीये; पण काय ना आयुष्यात थोडा विनोद आवश्यक असतो. काय तो सारखा राग आणि चिडचिडपणा कॅरी करत बसायचा ना? आणि एक सांगू का? माझं बोलणं फनी नसलं तरी तुमच्या नाकाचा शेंडा रागाने इतका लाल झालाय ना की त्यामुळे तुम्ही अधिक फनी दिसत आहात.” हातातील लॅपटॉप बाजूला सारत तिच्या नाकावर डोळे रोखत तो म्हणाला.


“डॉक्टर तुम्ही ना ठार वेडे आहात. मी उगाच तुमच्यावर आशा ठेवून इथे आलेय असं वाटतंय.”


“आता वेड्यांचा डॉक्टर म्हटल्यावर तसे राहायलाच हवे ना? बरं, ते विसरा. डॉक्टर शशांक सरांनी मला मेल केलाय. मी आत्ता काव्याबद्दल जे काही बोललो ते त्यांनी मला जे सांगितलंय त्यावरूनच बोललोय. अकॉर्डिंग टू हिम, की काव्याची केस अशीच साधी आणि सरळ आहे. त्यामुळे मला यात लक्ष घालण्याची गरज नाही हे मी तुम्हाला पटवून द्यावे आणि काव्याला परत त्यांच्याकडील उपचारासाठी परत पाठवावे.” लॅपटॉपची स्क्रीन तिच्याकडे वळवत तो म्हणाला.


“व्हॉट? आणि उत्तरादाखल तुम्ही त्यांना होकाराचा मेल देखील पाठवलाय?” मेल चेक करत ती उद्गारली.


“यस त्यांचा आदेश मला पाळायलाच हवा. तसेही तुम्ही माझ्याकडे केवळ सेकंड ओपिनियनसाठी आला होतात. तर मी माझं मत देताना म्हणेन की डॉक्टर शशांक इज राईट पर्सन टू ट्रीट काव्या. त्यांचे मेंटल असायलमेंट हेच तिच्यासाठी योग्य ठिकाण आहे.” लॅपटॉप परत स्वतःकडे वळवत तो म्हणाला.


“मी किती मूर्ख आहे ना? इकडे मी काव्या बरी कशी होईल म्हणून दिवसरात्र विचार करत असते आणि तुम्ही डॉक्टर्स ती वेडी आहे हे ठरवून मोकळे होत आहात. माझंच चुकलं, मला तिला इथे घेऊन यायला नको होतं. थँक यू व्हेरी मच फॉर युअर ओपिनियन.” टेबलवरील क्लच हातात घेऊन ती उठत म्हणाली.


“मिस अमृता, ऍक्च्युली यू आर राईट. तुम्ही इथे यायला नको होतं. कारण शशांक सरांच्या ट्रीटमेंटमध्ये ढवळाढवळ केलेली त्यांना कधीच चालत नाही; पण हो, मी एक सल्ला तेवढा देऊ शकतो.” ती केबिनच्या दारापाशी पोहचली तसा मधुर खुर्चीवरून उठत म्हणाला.


“सल्ला?” ती त्याच्याकडे गरर्कन वळत म्हणाली.


“तुमची मैत्रीण बरी व्हावी असे तुम्हाला का वाटते?” त्याचा प्रश्न.


“मला तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला सजा मिळवून द्यायची आहे म्हणून. ती बरी झाली तरच मला सत्य काय आहे ते कळू शकेल ना?” त्याच्याकडे बघत अमृता म्हणाली.


“आय रिअली ॲप्रिशिएट यू; पण मला हे कळत नाही की सत्य शोधायला ती बरी होईपर्यंत वेळ का वाया घालवत आहात?”


“म्हणजे?”


“म्हणजे जर का ती दोनेक वर्ष तिच्या मेंटल कंडिशन मधून बाहेर पडलीच नाही तर तुम्ही सत्य शोधणारच नाहीत का?”


“डॉक्टर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?”


“मला हे म्हणायचंय की जे सत्य तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे ते तुम्ही स्वतः शोधून काढा. सुरुवात करायची झाली तर तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा किंवा मग जो पॉईंट तुम्ही शेवटाला सोडून आला आहात त्या पॉईंट्पासून सुरुवात करा. काय माहित, जे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहात ते सापडेपर्यंत तुमची मैत्रीण बरीसुद्धा होईल.” त्याच्या ओठावर एक गूढ स्मित होते.


“काय? खरंच तुम्हाला असं वाटतं की काव्या बरी होईल? पण तुम्हीच तर म्हणालात ना की ती वेडी आहे आणि तिची खरी जागा म्हणजे मेंटल असायलमेंट आहे.” ती त्याच्याकडे अविश्वासाने पाहत म्हणाली.


“ते मी तुम्हाला शशांक सरांचं मत सांगितलं होतं. अकॉर्डिंग टू माय ऑब्झर्वेशन काव्याला जबर मानसिक धक्का बसलेला आहे मात्र ती त्यातून बरी होऊ शकते.”


“डॉक्टर तुम्ही खरंच बोलताय ना? मग इतका वेळ तुम्ही जे फिरवून फिरवून बोलत होतात ते काय होतं? आणि ती बरी होणार नाही असं शशांक अंकल सारखं का म्हणतात?”


“कदाचित तुमच्या वडिलांमुळे.”


“काय? यात डॅडचा काय संबंध? तुम्ही त्यांना मध्ये का आणताय?” ती चिडली.


“अरे, तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहात. मला एवढंच म्हणायचं आहे की काव्या आणि तुम्ही बेस्ट फ्रेंड्स आहात आणि तिचे सत्य बाहेर येऊन जर तिची बदनामी झाली तर तुमची सुद्धा होईल आणि पर्यायाने तुमच्या डॅडचीही. जे त्यांच्या बिझनेसच्या दृष्टीने हितावह नक्कीच नसेल. ह्या अँगलने कधी विचार करून पाहिलाय?” तिच्या डोळ्यात आरपार बघत त्याने विचारले तसे गोंधळून तिने पापण्यांची उघडझाप केली.


“मी बसू शकते?” त्याला विचारता विचारता ती खुर्चीवर बसलीदेखील.


“पाणी.” त्याने हसून तिच्यापुढे ग्लास सरकवला.


“डॉक्टर, तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे. डॅड शशांक अंकलना हेच म्हणाले होते तेव्हा मला त्या गोष्टीचे गांभीर्य कळले नाही; पण आता जेव्हा खोलात जाऊन विचार करतेय तेव्हा हे पटतंय मला.” ती पाण्याचा घोट घेत म्हणाली.


“ओह, म्हणजे माझं काहीतरी पटलंय तर. थँक यू.” ओठांवरची स्मितरेषा रुंदावत तो.


“मग आता मी पुढे काय करू?”


“ते मी काय सांगू? माझं काम आहे काव्याला ट्रीट करणं. मी ते पार पाडेन. बाकी जे काही सत्य वगैरे शोधायचं आहे ते तुमचं तुम्ही करा.” पुन्हा त्याने त्याची नजर लॅपटॉपकडे फिरवली.


“डॉक्टर, तुम्ही काव्यावर उपचार करणार?”


“यस, आफ्टरऑल इतक्या लांबून थेट पुण्याहून साडेपाच तास ड्रायव्हिंग करून तिला तुम्ही इथवर घेऊन आलात मग मी त्यांना असेच थोडे परत पाठवणार आहे?” निर्विकार चेहऱ्याने तो.


“आणि मग शशांक अंकल?”


“त्यांना मी कळवलंय की तुमच्या लाडक्या अमृताच्या आग्रहाखातर एक ते दोन आठवड्यांसाठी काव्याला मी इथेच ठेवून घेत आहे. मात्र लाईन ऑफ ट्रीटमेंट तुमचीच सुरु असेल. डन.” बोलता बोलता डॉक्टर शशांकला पाठवलेला मेल तिला दाखवत तो उत्तरला.


“ओह डॉक्टर, यू आर सिम्पली ग्रेट, यू आर अमेझिंग, यू आर..” अमृताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.


“तुमच्या भावना पोहचल्यात बरं का. मघाशी जे वेडा वगैरे बोललात त्याचे प्रमोशन झालेय बहूतेक.” तिला मध्येच थांबवत तो म्हणाला.


“आय एम सो सॉरी डॉक्टर. चुकलंच माझं. मी तुम्हाला..”


“इट्स ओके. आता तुम्ही तुमच्या कार्यावर फोकस करा आणि मी माझ्या पेशंटवर फोकस करतो. या तुम्ही.” केबिनच्या दाराकडे लक्ष वेधत मधुर म्हणाला.


“डॉक्टर मधुर, मी काव्याला एकदा भेटू शकते?” अमृता चा स्वर हळवा झाला होता.


“तुम्ही तिला केवळ बघू शकता. सध्या तिच्या बाळाला झोपवण्यात ती बिझी आहे.” लॅपटॉपची स्क्रीन तिच्याकडे फिरवत त्याने तिला काव्याच्या खोलीतील दृश्य दाखवले.


पुन्हा तेच दृश्य.. मांडी हलवत छोट्या बाळाला झोपवण्याची काव्याची चाललेली धडपड. ते पाहून अमृताला हुंदका दाटून आला.


“मिस अमृता, रडायचं तर रडू शकता; पण लक्षात ठेवा की तुमची काव्या वेडी नाहीये. ती लवकरच यातून बाहेर पडेल.” तो म्हणाला तसे चेहरा हातात झोकून देत अमृता केबिनबाहेर पडली.


काव्या वेडी नाहीये हेच तर तिला इतक्या दिवसांपासून ऐकायचे होते आणि आज खुद्द डॉक्टर मधुर स्वतः तिला हे सांगत होता. डोळ्यातील अश्रू पुसत ती हॉस्पिटलबाहेर निघाली होती. डोळ्यात अश्रू असले तरी मनात एक आनंद होता.

आनंद.. काहीतरी गवसल्याचा.

हा आनंद असाच टिकून राहील? काव्या बरी होईल का? अमृता सत्य शोधू शकेल का? कळण्यासाठी वाचत रहा चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all