चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -५

वाचा एका चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.

भाग -५

काव्या वेडी नाहीये हेच तर तिला इतक्या दिवसांपासून ऐकायचे होते आणि आज खुद्द डॉक्टर मधुर स्वतः तिला हे सांगत होता. डोळ्यातील अश्रू पुसत ती हॉस्पिटलबाहेर निघाली होती. डोळ्यात अश्रू असले तरी मनात एक आनंद होता.

आनंद.. काहीतरी गवसल्याचा.


काव्याला पुण्याहून नाशिकला घेऊन येणे म्हणजे किती दिव्य होते हे तिला आठवले. बाहेर लॉंग ड्राइव्हला जायचे म्हणून आधी उत्साहित असलेली ती आणि मग त्यानंतर पुन्हा बाळाच्या काळजीने हायपर झालेली ती. अमृताने मात्र बऱ्यापैकी मॅनेज केले होते. बाळालाही आपण सोबत नेतोय हे पटवून दिले होते. सोबत किती तरी खेळण्या आणल्या होत्या. प्रवासाला निघताना ऐनवेळी तिने काव्याला चॉकलेट देखील खाऊ घातले.


“चॉकलेट? माझ्यासाठी?” चॉकलेट बघून एखाद्या लहान मुलासारखी ती एकदम खुश झाली होती.


“हम्म. तुला आवडतं ना? म्हणून आणलं.”


“अमु, थँक यू गं. तू ना खरंच खूप खूप भारी आहेस.” बोलता बोलता तिने गटकन चॉकलेट तोंडात टाकले आणि मग काही वेळाने झोपूनही गेली.


झोपलेला तिचा तो निरागस चेहरा बघून अमृताला गलबलून आले होते. प्रवासात तिने काही त्रास देऊ नये म्हणून डॉक्टर मधुरच्या सांगण्यावरून तिने चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून लगेच झोपी गेली होती. जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या आवारात होती.


हॉस्पिटल बघून तिने केलेली नाटकं, तिचा आरडाओरडा, अमृताशी केलेली धुसपूस. डॉक्टर मधुरला तर तिने फक्त डोळ्याच्या कोनातूनच पाहिले होते. त्याने तिच्याकडे बघून स्मित केले तेव्हा तिचा निर्वीकार असलेला चेहरा आणि मग त्याने नर्सला इशारा करताच त्यांच्यासोबत तिचे निघून जाणे. जाताना तिने एकदा अमृताकडे रागाने पाहिले होते, नंतर पुन्हा शांत.


आता डॉक्टर मधुरच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना अमृताला हे सारे आठवून वाईट वाटत होते.


‘काव्या सॉरी गं. तू बरी व्हावीस म्हणून हा सारा खटाटोप, सारा अट्टहास करावा लागला. तू वेडी नाहीयेस असे स्वतः डॉक्टर बोललेत गं. लवकरच सगळ्यांना ते पटेल.’ डोळ्यातील पाणी पुसून ती कारमध्ये बसली.


“..मग आता मी पुढे काय करू?” पुण्याला परत निघालेल्या तिला थोड्यावेळापूर्वी डॉक्टर मधुरशी झालेले बोलणे आठवत होते.


“ते मी काय सांगू? माझं काम आहे काव्याला ट्रीट करणं. मी ते पार पाडेन. बाकी जे काही सत्य वगैरे शोधायचं आहे ते तुमचं तुम्ही करा.” त्याचे ते उत्तर.


“..सुरुवात करायची झाली तर तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा किंवा मग जो पॉईंट तुम्ही शेवटाला सोडून आला आहात त्या पॉईंट्पासून सुरुवात करा.” त्याचे शब्द तिला आठवले आणि तिने अचानक जोरात ब्रेक दाबला.


‘मी जिथे आहे तिथून सुरुवात करायची की जो पॉईंट शेवटी सुटलाय तिथून सुरवात करायची?’ कार बाजूला घेत ती विचार करत होती.


‘शेवटी सुटलेला पॉईंट म्हणजे काय? मुळात शेवट कशाला समजायचे? काव्या वेड्यागत वागायला लागली तो पॉईंट म्हणजे तिच्या सामान्य असण्याचा शेवट आणि तोच पॉईंट म्हणजे ती जिथे आहे त्याची सुरुवात!’ डोक्याला जोर देत ती स्वतःशी बोलत होती.


‘ओह, डॉक्टर किती किचकट वाटतंय हो हे? एखाद्या चक्रव्यूहासारखं खोल खोल आत अडकल्यासारखं. जेवढा विचार करावा तेवढे ते अधिक गुंतवत जातंय. यातून मी काव्याला नीट बाहेर काढू शकेन ना?’ जड झालेले डोके गच्च पकडून ती कारला टेकून उभी राहिली तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली.


“हॅलो डॅड..”


“अमृता, तुला काय झालंय आणि काव्या कुठे आहे?”


“डॅड, मी बरी आहे.”


“मग अशी रस्त्यावर मध्येच कार उभी का केलीहेस?” पलीकडून राजीवचा भारदस्त आवाज आला तसे अमृता रस्त्याच्या आजूबाजूला पाहू लागली.


“डॅड, तुम्ही माझ्यावर पाळत ठेवली आहे? यू आर जस्ट इम्पॉसिबल.” दुरवर उभी दिसलेली कार बघून तिने डोक्याला हात मारून घेतला. डॉक्टर शशांककडून काव्याला घेऊन निघाली तेव्हाही ती कार तिच्या मागावर होती हे तिला आठवले.


“अमृता, तू कोणी साधीसुधी मुलगी नाहीयेस हे कायम लक्षात ठेव. माझी माणसं कालपासूनच तुझ्या अवतीभोवती वावरत आहेत. मला सांग काव्या तुझ्या सोबत का नाहीये?” त्याचा प्रश्न.


“डॅड ॲक्च्युली ते मीच डॉक्टर मधुरना तिला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला भाग पाडले. आपल्या शशांक अंकलसारखे काही हुशार नाहीयेत ते. जस्ट फॉर एक चेंज म्हणून तिला तिथे ठेवण्याचा मी त्यांना आग्रह केला.” शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली.


“अमृता..”


“डॅड, डोन्ट वरी. तिला आपण लवकरच शशांक अंकलकडे परत घेऊन येऊया. डॉक्टर मधुरचे म्हणणे देखील हेच पडले की शशांक अंकलच तिच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतील. माझंच चुकलं की मी तुम्हा दोघांचं ऐकलं नाही आणि इतक्या लांब आले. असो, काही दिवस तिला आता राहू देत इकडेच.” राजीवला पुढे काही बोलू न देता ती तिचे म्हणणे त्याच्यासमोर मांडून मोकळी झाली.


“हम्म. पटलं ना तुला? ठीक आहे, तू आरामात ये. थकली असशील तर मागच्या गाडीतील ड्रायव्हरला सोबत घे आणि तू आराम कर.”


“हो डॅड, तशीही मला खरंच गरज आहे. थँक यू.” ती बोलायचा अवकाश की दूर असलेली कार तिच्याजवळ येऊन थांबली आणि त्यातून एकजण उतरून तिच्याजवळ येऊन उभा राहिला.

“अमृता, हा तुझा ड्रायव्हर म्हणून तुला सोबत करेल.” पलीकडून राजीव सांगत होता.


खरं तर ती थकली होती. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्त आला होता. अश्या वेळी डोळे मिटून निवांत पडून रहावे असे तिला वाटत असताना राजीवने तिला ड्रायव्हरसाठी विचारले आणि तिनेही ते आनंदाने स्वीकारले. कारजवळ उभ्या असलेल्या त्या काळ्या ड्रेसमधील इसमाला तिने चावी देऊन टाकली आणि स्वतः मागच्या सीटवर जाऊन बसली.


“तुम्ही आणखी किती दिवस माझ्या मागावर असणार आहात?” त्याच्याशी नजरानजर होताच तिने प्रश्न केला.


“सरांची पुढची ऑर्डर येईपर्यंत.” त्याचे उत्तर.


“ओह, तुमचं नाव काय?”


“सॉरी मॅम, आमची पर्सनल माहिती सांगण्याची आम्हाला परवानगी नाहीये.” त्याचा निर्वीकार चेहरा.


“ओके, द्याट्स बेटर. मी केवळ तुमची परीक्षा घेत होते. बॉसची मुलगी म्हणून मला सगळं सांगाल असं वाटलं पण तुम्ही काही न सांगता परीक्षेत पास झालात. गुड. तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंगवर लक्ष द्या. मी जरावेळ झोपते.” डोळे मिटून घेत ती म्हणाली आणि आदेशाचे पालन करून तो सफाईदारपणे कारचे स्टीअरिंग फिरवू लागला.


अमृता डोळे मिटून असली तरी विचारांनी तिची साथ सोडली नव्हती. सत्य जाणून घ्यायला कुठून सुरुवात करायची हे कोडे सुटत नव्हते. मधुरचे शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात पिंगा घालत होते. शेवटी खूप विचाराच्या अंती ती एका निर्णयावर पोहचली आणि स्वतःचेच कौतुक वाटून तिने एक लांब श्वास सोडला.


‘पण हे काम करेल ना?’ तिचे मन तिला विचारत होते.


‘प्रयत्न करायला काय हरकत आहे? डॉक्टर मधुर तेच तर बोलले की शेवटाच्या पॉईंटपासून सुरुवात कर. तिथूनच सुरुवात करून बघुयात की. काही मार्ग तरी सापडेल.’ स्वतःला समजावत तिने तिचा निर्णय पक्का केला.

_________


“हे काय कुठे निघालीस?” दुसऱ्या दिवशी सकाळीच घराबाहेर पडणाऱ्या अमृताला वैदेहीने विचारले.


कॉलेज. आणखी कुठे?” तिने बळेच हसून कारची चावी घेतली.


“अमृता, काल नाशिकहून परतल्यापासून बघतेय, स्वतःच्या विचारात हरवल्यासारखी दिसतेस.”

“मम्मा, अगं असं काही नाहीये. प्रवासाने जरा दमले होते गं.”

“काव्या बरी होईल ना?”

“शक्यता कमी आहे अगं. डॅडशी बोलले की मी. तुमची चर्चा झाली असेलच ना? बरं आता निघते मी. यायला जरा उशीर होईल, बाय.” वैदेहीच्या प्रश्नांचा मारा थांबवत ती घाईत बाहेर निघून गेली.


कॉलेजचे केवळ निमित्त होते. ती कार घेऊन दुसरीकडेच निघाली होती. पुणे शहरापासून दूर.. एका दुसऱ्याच ठिकाणी. कदाचित तिला त्यातून काही हाती लागेल अशी आस होती किंवा नाहीही फायदा होणार नाही याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र या क्षणी आता मनात एक सकारात्मक विचार घेऊन निघाली होती.

अमृता कुठे निघाली होती? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________

🎭 Series Post

View all