चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -६

वाचा एका चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -६


कॉलेजचे केवळ निमित्त होते. ती कार घेऊन दुसरीकडेच निघाली होती. पुणे शहरापासून दूर.. एका दुसऱ्याच ठिकाणी. कदाचित तिला त्यातून काही हाती लागेल अशी आस होती किंवा नाहीही फायदा होणार नाही याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र या क्षणी आता मनात एक सकारात्मक विचार घेऊन निघाली होती.


“काकू, आत येऊ?”

दारात उभ्या असलेल्या अमृताच्या प्रश्नाने आत बसलेल्या एका चाळीशीतील स्त्रीने तिच्याकडे खिन्नपणे पाहिले. ती स्त्री म्हणजे काव्याची आई होती, कावेरी. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला म्हणून अमृता पुण्यापासून पन्नास किलोमीटर लांब असलेल्या या छोट्याश्या खेडेगावात येऊन पोहचली होती.


“अमृता? अमृताच ना तू? तू इथे का आलीहेस?” तिला न्याहाळत असलेल्या तिने थकलेल्या आवाजात विचारले.


“हो काकू. मी अमृताच. मला थोडं बोलायचं होतं.. काव्याबद्दल.”


“कोण काव्या? अश्या कोणत्याच व्यक्तीला मी ओळखत नाही.”


“काकू अहो, मुलगी आहे ती तुमची.”


“ज्या दिवशी तिने आमच्या तोंडाला काळं फासलं ना त्याच दिवशी ती आम्हाला मेलीये. तिचा नि आमचा काहीच संबंध उरला नाहीये.” कावेरी निग्रहाने म्हणाली.


“काकू, अहो अश्या चुका होतात कधी कधी. पण म्हणून..”


“अमृता तू मोठ्या घरची मुलगी आहेस. शहरात वाढलेली आहेस. अश्या गोष्टी तुमच्यासाठी चुका वाटत असतील गं; पण आमच्यासारख्या खेड्यात राहणाऱ्यांना स्वतःचं चारित्र्य खूप मोलाचं असतं. काव्याचे बाबा गेले तेव्हापासून माझ्या लेकरांना घेऊन मी कशी जगतेय माझे मला माहित आणि ही पोरगी असं करून बसली. खरंच सांगते अगं, आता तिच्याशी आमचा काहीएक संबंध नाहीये.”


“पण जर तिच्यावर कुणी जबरदस्ती वगैरे केली असेल तर? काकू ही शक्यता नाकारता येत नाही ना हो?” अमृता कळकळीने म्हणाली.


“माझ्यासमोर तू तिचं वकीलपत्र घेऊ नकोस गं आणि जर एवढाच कळवळा असेल ना तर एक कर, तिच्यासाठी या घराचा उंबरठा कधीच झीजवू नकोस.” कावेरीने हात जोडले तशी अमृता एक पाऊल मागे सरली.


“तुला सांगू? आमच्यासारख्या गरिबाला आमची इज्जत प्यारी असते गं. या पोरीने तीच घालवली. आता ती जिती आहे की मेली त्याच्याशी मला काहीच फरक पडणार नाहीये. तिची काळजी करत बसले तर मग माझ्या लहान चिल्यापिल्यांकडे कोण बघणार?”


कावेरीच्या प्रश्नाने निरुत्तर झालेली अमृता परत जायला म्हणून वळली. तिला वाटले तिचे डॅड काय नि काव्याची आई काय, श्रीमंत असो की गरीब प्रत्येकाला स्वतःची प्रतिष्ठा तेवढी जपायची आहे.


“अमृता तू स्वतःला तिची मैत्रीण म्हणवून घेतेस ना?” कावेरीच्या आवाजाने तिचे पाऊल तिथेच थांबले.


“तिच्या होस्टेलवरून सारखे फोन येत आहेत. एकदा तिथे जाऊन तिचे काय सामान आहे त्याची विल्हेवाट लावशील? माझ्याने नाही होणार ते.” अजूनही कावेरी शुष्कपणे बोलत होती.


अमृताने तिच्याकडे वळून पाहिले. त्या कोरड्या डोळ्यात बरेच काही भाव होते जे फारसे तिला कळत नव्हते. एक मात्र कळलं होतं की त्यांच्या मनात आता काव्याबद्दल जराही माया उरली नव्हती.


‘माया खरंच अशी असते का? झटक्यात कुणावर बसणारी आणि झटक्यात उडून जाणारी?’ कारमध्ये बसून पुण्याकडे परत निघालेल्या अमृताच्या डोक्यात प्रश्नांचा पिंगा सुरु झाला होता.


‘जर हे प्रेम आणि ही माया असेल तर मग काव्याला तिच्या जन्मालाही न आलेल्या बाळाबद्दल वाटतेय ते काय आहे? ती कुठली माया?’


विचाराने तिच्या मनाची चिडचिड व्हायला लागली होती. पुण्यात पोहचेपर्यंत चित्त थाऱ्यावर उरले नव्हते. सारखी मनात कावेरी डोकावून जात होती, तर कधी राजीव आणि मग मांडीवर निजलेल्या बाळाचा भास होणाऱ्या काव्याचा निरागस चेहरा.


‘काव्या, ज्या नराधमामुळे तुझी ही अवस्था झालीये ना तो एकदा मला भेटूच देत, नाही त्याची वाट लावली ना तर मीही अमृता राजीव म्हणून नाव लावणार नाही.’ डोळे पुसत तिने कारचा वेग वाढवला.


पुढच्या तासाभरात ती व्हीआयटी कॉलेजच्या गर्ल्स होस्टेलमध्ये पोहचली होती.


“काव्या देसाई? फायनल इयर स्टुडन्ट?” वसतीगृहातील व्यवस्थापिका बाई अमृताला आपादमस्तक न्याहाळत विचारत होत्या.


“हो तीच. तिचेच सामान घ्यायला मी आलेय.”


“आम्ही तिच्या घरी कितीदा कॉल्स केलेत पण काहीच उपयोग झाला नाही. तिला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते इथल्या मॅनेजमेंटला सांगायला हवे ना? कित्येक विद्यार्थी इथे वेटिंग लिस्ट वर असतात आणि ही मुलगी?”


“मॅम, काही मेडिकल इश्यूमुळे ती कॉलेज कंटिन्यू करू शकणार नाहीये त्यामुळेच.मी तिचे सामान घ्यायला आलेय. इतक्या दिवसांचे जे चार्जेस असतील ते मी पेड करून सर्व हिशोब क्लिअर करून घेतेय.” तिने पैश्यांचे नाव घेतले तसे मॅडम सजग झाल्या आणि अकाउंटला पैसे जमा होताच त्यांनी अमृताला काव्याच्या खोलीत जायची परवानगी दिली.


“हाय तू अमृता ना?” काव्याची रूममेट असलेली शीतल अमृताला बघून म्हणाली.


“हो पण तू मला कशी ओळखतेस?” अमृताला आश्चर्य वाटले.


“कम ऑन यार. कॉलेजव्यतिरिक्त तू एकच तर काव्याची बेस्टी होतीस. तिच्या तोंडात सतत तुझं नाव असायचं त्यामुळे मी सहज ओळखलं. बाय द वे तिला काय झालंय ते तुला ठाऊक आहे का? अचानक कुठे गायब झालीये ती?”


“नाही गं, फारसं काही ठाऊक नाहीये. ती आजारी आहे एवढंच कळलंय. तिच्या आईने तिचे सामान घेऊन यायला सांगितले म्हणून मी आलेय.” काव्याचे कपाट उघडत ती म्हणाली. सध्यातरी तिला तिच्याबद्दल कुठेच काही वाच्यता करायची नव्हती.


“बरं तू तुझं काम कर. मी कॉलेजला निघतेय.” शीतल तिची बॅग घेत म्हणाली आणि अमृता काव्याच्या कपाटातील एकेका ड्रेसवरून हात फिरवू लागली.


“एक मिनिट शीतल, हे सगळे ड्रेसेस काव्याचेच आहेत ना?” ते महागडे आणि ब्रँडेड कपडे बघून क्षणभर अमृताला विश्वासच बसला नाही.


“हो तिचेच तर आहेत. तिचा बॉयफ्रेंड खूप श्रीमंत होता त्यामुळे सतत काही ना काही महागडे गिफ्ट्स तो तिला द्यायचा.” पायात सॅन्डल सरकावत शीतल उत्तरली.


“बॉयफ्रेंड?”


“हो. तुला माहिती नाही?” अमृताच्या प्रश्नावर तिने आश्चर्याने विचारले.


“तू भेटलीहेस त्याला?”


“नाही पण त्याचे जाम कौतुक ऐकलेय. पण तुला सांगू का? ही मोठया बापाची औलाद अशीच असतात. त्यांना काय पैसा फेकला की नवी मुलगी सहज भेटते.”


“तिचा बॉयफ्रेंड तसा होता?” अमृताच्या चेहऱ्यावरची आश्चर्यची रेघ जराही हलली नव्हती.


“आय डोन्ट नो. म्हणजे काव्या तरी कधी असं बोलली नाही. म्हणजे फारसं काही सांगायची नाही ती. पण जेव्हा काही सांगायची तेव्हा ते कौतुकच असायचं. बाकी काय खरं नि काय खोटं ते देवाला ठाऊक. बाय द वे, मला लेट होतंय, सो मी निघतेय. बाय.” हातातील मोबाईलमधील वेळ बघत jशीतल घाईने खोलीबाहेर गेली.


‘श्रीमंत बॉयफ्रेंड?’ अमृता विचारात पडली होती.


काव्या प्रेमात आहे हे अधेमध्ये तिलाही जाणवले होते; पण म्हणून शीतल म्हणते तसा कुणी श्रीमंत बॉयफ्रेंड असावा असे कधी वाटले नव्हते. काव्या म्हणजे साधी सरळ मुलगी. कसला फार हव्यास नसलेली. तिच्याच भाषेत सांगायचं तर एका लायकीत राहणारी. मग स्वतःची लायकी जाणून असताना ती का कुण्या श्रीमंत मुलाला बॉयफ्रेंड बनवेल?


“कदाचित आपल्या पैश्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी? आजकाल असे सर्रासपणे चालतात की.” तिचे मन तिला उत्तर देत म्हणाले.


“छे, काव्या तश्या प्रकारची मुलगी नाहीये, नव्हतीच कधी.”


“पण मग हे महागडे ड्रेसेस, या ब्रँडेड घड्याळी, सॅन्डल्स.. हे सगळं तर हेच इंडिकेट करतंय.” दुसऱ्या मनाची पहिल्यावर कुरघोडी.


“तिचे त्याच्यावर प्रेम असेल आणि कदाचित त्याचेही.”


“हे कसले प्रेम? प्रेग्नन्ट आहे समजताच तिचा गर्भपात घडवून तो कुठे गायब झालाय?” पहिल्या मनाचे प्रश्न संपता संपत नव्हते. ती मात्र वेड्यासारखी कपाटातील एकेक वस्तू हुडकत होती.


काय काय नव्हते तिथे? अलीबाबाची गुहाच जणू. तिने कधी विचारही केला नसेल अश्या अनेक वस्तू त्या कपाटात होत्या. एक मोत्यांचा सेट, उंची उंची सुगंधी द्रव्ये, दोन तीन डिझायनर साड्या. ड्रेस, सॅन्डल्स.. अमृताचे डोकेच ठणकायला लागले.


“काव्या ही कुठली तुझी बाजू? माझ्या समोर तुझी बाजू कधी आलीच नव्हती गं.” गरगरणाऱ्या डोक्याला हात लावत ती बेडवर बसली आणि त्याच वेळी कपाटातील अस्त्याव्यस्त वस्तूमधून एक डायरी खाली पडली.

त्या डायरीमध्ये काही सापडेल का? कळण्यासाठी वाचा पुढचा भाग.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________

🎭 Series Post

View all