चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग-७

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा.
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -७

काय काय नव्हते तिथे? अलीबाबाची गुहाच जणू. तिने कधी विचारही केला नसेल अश्या अनेक वस्तू त्या कपाटात होत्या. एक मोत्यांचा सेट, उंची उंची सुगंधी द्रव्ये, दोन तीन डिझायनर साड्या. ड्रेस, सॅन्डल्स.. अमृताचे डोकेच ठणकायला लागले.


“काव्या ही कुठली तुझी बाजू? माझ्या समोर तुझी बाजू कधी आलीच नव्हती गं.” गरगरणाऱ्या डोक्याला हात लावत ती बेडवर बसली आणि त्याच वेळी कपाटातील अस्त्याव्यस्त वस्तूमधून एक डायरी खाली पडली.

________

“हाय काव्या हाऊ आर यू? फिलिंग बेटर ना?” डॉक्टर मधुरच्या प्रेमळ आवाजाने काव्याने भिरभिरत्या नजरेने त्याच्याकडे पाहिले.


“हेय, रिलॅक्स रिलॅक्स. मी तुला कसलाच त्रास देणार नाहीये. एक्सरसाईज करायचा वेळ झालाय ना? मग तू एकटीच इथे का थांबलीस?” तिच्या केसावरून हलकेच हात फिरवत मधुर स्मित करत म्हणाला.


“मी काव्या आहे ना?” त्याच्या हात काढून घेत तिने विचारले.


“हो.”


“मग तुम्ही कोण आहात?” तिचे डोळे विस्फारले.


“मी डॉक्टर मधुर. तुझा डॉक्टर.”


“माझे डॉक्टर?”


“हम्म.”


“डॉक्टर? पण मला काय झालंय?”


“काही नाही. तू तर एकदम नॉर्मल आहेस. फक्त कधी कधी काही गोष्टींचा ताण घेतेस आणि मग त्याचा तुला त्रास होतो.”


“म्हणजे वेडी आहे का मी?” त्याच्यावर डोळे रोखत तिने विचारले.


“छे, तू वेडी का असशील? बरं तुझं बाळ कुठे आहे? दिसत नाहीये ते?” त्याने मुद्दाम तिला छेडत विचारले.


“बाळ? मला बाळ देखील आहे? मग मला कसं ठाऊक नाही?” तिच्या डोळ्यात आश्चर्यसहित प्रश्न होते.


“अगं तुझं नाही. मला त्या रेवाताईच्या बाळाबद्दल बोलायचं होतं. रेवाताई आपली काव्या शहाणी आहे बरं. तिला आता ग्लासभर दूध द्या आणि मग थोडं फिरायला घेऊन जा. काव्या, या जे सांगतात ते ऐकायचं हं.”

त्याने तिथल्या रेवा सिस्टरकडे विषय वळवला आणि इशाऱ्याने दुधातून औषध द्यायला सांगुन केबिनमध्ये निघून आला.


“रेवाताई, मी खरंच वेडी नाहीये ना?” मधुर निघून गेल्यावर काव्या तिला विचारत होती.


“नाही गं. तू तर शहाणी आहेस. डॉक्टर बोललेत ना?” तिच्या हाती दुधाचा ग्लास सोपवत नर्स म्हणाली.


“मग मी इथे कशी आले? मला का आठवत नाही.”


“अमृता नावाची तुझी मैत्रीण तुला इथे सोडून गेलीये.
त्यावेळी तुला जरा बरं नव्हतं ना म्हणून.


“कोण अमृता? ती मला इथे का घेऊन आली आणि मग माझी मैत्रीण आहे तर मला भेटायला का येत नाहीये?” काव्याचे प्रश्न संपता संपत नव्हते.


“लवकरच तुला घेऊन सुद्धा जाईल की.” दुधाचा ग्लास तिच्या ओठाला लावत रेवा म्हणाली.


केबिनमध्ये बसलेला मधुर लॅपटॉप मध्ये रेवा सिस्टर आणि काव्याचे संभाषण बघत होता. काव्या अमृताबद्दल जे बोलली तो प्रश्न खरे तर त्यालाही छळत होता. काव्याला इथे येऊन आज चार दिवस झाले होते आणि या दिवसात अमृताने चौकशीचा साधा कॉल देखील केला नव्हता.


एका बाजूला अमृताच्या वागण्याचे आश्चर्य आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर शशांकची उपचारपद्धती दोन्हीही मधुरला कोड्यात टाकत होते. डॉक्टर शशांकच्या उपचाराची सुरुवातच चुकीच्या पद्धतीने झालीय हे मधुरला वाटत होते; पण त्यांच्यासारखे सिनिअर डॉक्टर अशी चूक का करतील हे त्याला उमगत नव्हते. त्यांना फोन करून विचारावे का हे वाटत असतानाच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.

‘डॉक्टर शशांक कॉलिंग.’

मोबाईलवर शशांकचे नाव दिसताचा मधुरने लगेच कॉल रिसिव्ह केला.


“गुडमॉर्निंग सर..”


“मधुर काय चालवलंस हे?” त्याच्या गुडमॉर्निंगला प्रतिसाद न देता काहीश्या रागाने त्यांनी विचारले.


“सर, तुम्ही काय बोलताय ते मला काही कळले नाही.”


“अमृता.. अमृता राजीव अधिकारी. ओळखतोस ना हिला?” शशांकच्या स्वरात जरब होती.


“सर हा कसला प्रश्न? काव्याला तीच तर माझ्याकडे घेऊन आली होती ना?”


“ओह म्हणजे आठवते तर? तिच्याशी नेमकं काय डिस्कस केलंस?”


“सर, मी तिला काहीच बोललो नाही; पण तुम्ही विचारताय तर सांगतो की काव्याला सुरु असलेली ट्रीटमेंट चुकीची आहे हे मला कळलंय आणि याचे कारण मला समजायला हवे असे वाटतंय.” मधुर स्पष्टपणे म्हणाला.


“मधुर तू यात न पडलेले बरे असेल. या मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत. खुद्द राजीव अधिकारीने त्या काव्याला माझ्याकडे सोपवलेय. आता तू तिला तुझ्यापरीने हॅन्डल करण्याचा नाद सोडून दे आणि तिला इकडे पाठवून दे.”


सर, याचा अर्थ राजीव अधिकारी या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत असा तर नाही ना?”


“मधुर काही काय बोलतोस? तुला सत्य जाणून घ्यायचे आहे ना? मग ऐक. अरे, त्या काव्याने कुठेतरी तोंड काळे केले आणि मग दिवस गेल्याचे लक्षात येताच तिने राजीवची मदत मागितली. त्याला मुलीसारखी आहे रे ती. तिच्या संदर्भात तो माझ्याकडे आला आणि मित्र म्हणून मीही त्याला मदत करायचे ठरवले.


सगळे ठीक झाले असताना या मुलीला अचानक तिच्या बाळाचा पुळका आला आणि ती वेड्यागत वागू लागली. आता जर तिचे वेड बाहेर आले तर त्यांची आणि अमृताची बदनामी होऊ नये म्हणून तिच्यावर उपचार करण्यासाठी त्याने मला विनवले आणि मित्र म्हणून मी पुन्हा त्याच्या बाजूने उभा राहिलो. बस्स, एवढंच.”


“पण सर, हे चुकीचे आहे ना? त्यांच्या इमेजसाठी म्हणून तुम्ही काव्याला आयुष्यभर वेडी ठरवणार आहात काय?”


“मधुर, बी प्रॅक्टिकल मॅन. अरे, त्या काव्याला तिच्या घरच्यांनी सुद्धा नाकारले तेव्हा राजीव मदतीला धावून आला. ती जिवंत आहे ते केवळ त्याच्यामुळे. वेडी तर वेडी, डॉक्टर म्हणून तिचा जीव सुरक्षित ठेवण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे.”


“डॉक्टर शशांक द ग्रेट सायकॅट्रिस्ट्स असं वागू शकतात? सर हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे.” मधुर हताशपणे म्हणाला.


“मधुर, मी डॉक्टर असलो तरी शेवटी माणूसच आहे. काय योग्य नि काय अयोग्य याची जाणीव मला आहे. तू फक्त अमृताला प्रॉमिस केलंस तसं काव्याला माझ्याकडे सोपवून दे.” डॉक्टर शशांक बोलत होते.


“ओके. तुम्ही म्हणाल तसे. अमृतामॅडम तिला घ्यायला आल्या की मी तिला पाठवेन.” तो शक्य तितक्या शांतपणे म्हणाला.


“अमृता तिला घ्यायला येऊ शकणार नाही.” शशांक कठोरपणे म्हणाले.


“का पण?”


“हा प्रश्न तू मला न विचारलेला बरं असेल मधुर. कारण त्याचं उत्तर मलाच तुझ्याकडून हवंय. तिच्याशी नेमकं तू काय बोललास की पुण्याला परत आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती आजारी पडलीय. तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नाहीये. राजीवने तिच्यासाठी डॉक्टरांची एक अख्खी टीम कामाला लावलीय. तिची कंडिशन बघून शॉक थेरपी द्यावी लागेल असं मला वाटायला लागलंय.”


“व्हॉट?” शशांकचे बोलणे ऐकून मधुर क्षणभर उडालाच.


“तुला एवढं आश्चर्य का वाटतंय? मला सांग, यात तुझा काही हात तर नाहीये ना? तू तिच्या डोक्यात काही उलटसुलट भरवलं नाहीस ना?”


“नाही सर मी असं का वागेन?”


मधुर शशांकला पटवून देत होता पण त्यालाच काही कळत नव्हते. आत्ताआत्ताच तर तो अमृताच्या इथे काव्याला भेटायला न येण्याविषयी मनात काय काय विचार करायला लागला होता आणि आता त्यालाच तिच्याबद्दल काहीतरी वेगळी माहिती मिळत होती.


‘काव्या आणि अमृता.. काय चाललंय या दोघींच्या आयुष्यात? काव्यासाठी निग्रहाने लढणारी ही कणखर मुलगी स्वतः कशी आजारी पडू शकते? आणि डॉक्टर शशांक तिला शॉक देण्याबद्दल बोलत आहेत? एवढं सिरीयस काय घडलं असेल?’ तो स्वतःशी विचार करत केबिनमध्ये अस्वस्थपणे येरझारा घालत होता.


“..सत्य जाणून घ्यायची सुरुवात करायची झाली तर तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा किंवा मग जो पॉईंट तुम्ही शेवटाला सोडून आला आहात त्या पॉईंट्पासून सुरुवात करा.” अमृताला बोललेले त्याचेच शब्द त्याला आठवले आणि डोक्यात एक चमक उठली.


‘काव्याच्या बाबतीतील सत्य तर अमृताला कळले नसेल ना? पण मग ते सत्य एवढे डेंजर आहे का की त्यामुळे तिची ही अवस्था व्हावी?’ विचार करून मधुरचे डोके ठणकायला लागले होते.

________


“शशांक, माझ्या मुलीला काही झाले ना तर मग मी कुणालाच सोडणार नाही. ती काव्या, तो कुठलासा डॉक्टर मधुर आणि.. आणि तू सुद्धा. शशांक, अमृता माझा जीव आहे. ती बरी व्हायला हवी, कळतंय ना?” राजीव रागाने डॉक्टर शशांकचे कॉलर पकडून बोलत होता.


“राजीव, धीर धर अरे. मी एकदा तिला बघतो ना. बोलेल रे ती.” डॉक्टर शशांक समजावणीच्या सुरात बोलत असले तरी अमृताच्या आजाराचे कारण त्यांनाही कळत नव्हते.

काय झालेय अमृताला? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all