चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -८

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग-८


“शशांक, माझ्या मुलीला काही झाले ना तर मग मी कुणालाच सोडणार नाही. ती काव्या, तो कुठलासा डॉक्टर मधुर आणि.. आणि तू सुद्धा. शशांक, अमृता माझा जीव आहे. ती बरी व्हायला हवी, कळतंय ना?” राजीव रागाने डॉक्टर शशांकचे कॉलर पकडून बोलत होता.


“राजीव, धीर धर अरे. मी एकदा तिला बघतो ना. बोलेल रे ती.” डॉक्टर शशांक समजावणीच्या सुरात बोलत असले तरी अमृताच्या आजाराचे कारण त्यांनाही कळत नव्हते.


“शशांक, मला अमृता बरी व्हायला हवी. कुठल्याही किमतीवर.” राजीवची नुसती चिडचिड होत होती.


“राजीव, शांत हो ना. ते तिच्यासाठीच इथे आले आहेत ना?” व्हिलचेअर समोर सरकवत वैदेही पुढे येत म्हणाली.


“वैदू, अमृताला असं बघून मला पॅनिक व्हायला होतंय गं. ती कॉलेजच्या नावाखाली कुठे जातेय याची तुला साधी माहिती देखील नसते. अशी गं कशी आई तू?” तो तिच्यावरच भडकला.


“राजीव..”


“सॉरी अगं. मला असं नव्हतं म्हणायचं; पण काय करू? मी अमृताला असं नाही बघू शकत. माझा श्वास आहे गं ती.” त्याच्या आवाजातील थरथर तिला स्पष्ट जाणवत होती.


“राजीव, मला सुद्धा तिची अवस्था बघवत नाहीये; पण डॉक्टरांवर आपल्याला विश्वास ठेवायला हवाय ना? हम्म?” त्याच्या हातावर तिने हात ठेवला तसे त्यानेही दुसऱ्या हाताने तिचा हात घट्ट पकडला.


“तिच्यासाठी एवढी डॉक्टरांची फौज मी उभी केलीय. आता शशांकवर सारी भिस्त आहे गं; पण जर त्याच्याने काही झाले नाही तर?”


त्याचा कंठ दाटून आल्याने पुढचे शब्द बाहेर उमटलेच नाही. मात्र त्याची व्यथा उमजून लेकीसाठी झुरणाऱ्या वैदेहीच्या डोळ्यातील थेंब त्याच्या हातावर सांडले. हसती खेळती अमृता अशी अचानक आजारी पडल्याची सल तिलाही टोचत होती.


“हॅलो मिस अमृता, आर यू हिअरिंग मी? माझा आवाज येतोय ना?” डॉक्टर शशांक अमृताच्या खोलीत येताच मधुर त्यांच्याशी व्हिडीओ कॉलने कनेक्ट झाला होता. तिला नेमके काय झालेय हे त्यालाही जाणून घ्यायचे होते.

मधुरच्या आवाजाने तिचे डोळे किलकिलले.


“अमृता मॅडम, इकडे बघा तरी. मी मधुर. काव्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होतात हे आठवतेय ना?” मधुर तिला साद घालत म्हणाला.


“मधुर, काव्याचा उल्लेख करायचा नाही हे तुला सांगितलं होतं ना? मग काय हे? राजीवच्या कानावर तिचे नाव जरी पडले ना तरी अनर्थ होईल.” शशांक मधुरवर ओरडत होता की त्याचवेळी अमृताच्या ओठांची हळूवार होणारी हालचाल त्याला जाणवली.


“अमृता?”


“काव्या.. काव्या.” ती अस्पष्टशी बरळत होती.


“अमृता मॅडम, काव्या ठीक आहे; पण तुम्ही तुमची काय अवस्था करून घेतलीत?” शशांककडे दुर्लक्ष करत मधुरने पुन्हा काव्याचे नाव घेतले.


“काव्या.. अर्जुन.. अर्जुन आणि काव्या.” तिचा पुसट स्वर कानावर येत होता.


“डॉक्टर मधुर, काव्याने चिट केलंय माझ्यासोबत. माझ्याच बॉयफ्रेंड तिने.. शीऽऽ मला बोलायलाही लाज वाटतेय.” क्षीण आवाजात का होईना ती बोलू लागली होती. सांगताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.


“मिस अमृता?”


“अमृता?” मधुरबरोबर डॉक्टर शशांकदेखील आश्चर्यचकित झाले होते.


“यस अंकल. अर्जुन.. माझा बॉयफ्रेंड. आम्ही दोघं एकत्र होतो. डॅडना याबाबत काहीच ठाऊक नव्हतं; पण काव्या? तिला तर माझ्याबाबतीत सारे काही माहिती होते आणि तरीही तिने मला फसवलं. माझ्याशी मैत्री करून तिने माझ्याच प्रेमाला स्वतःकडे खेचून घेतले.” तिचा हुंदका बाहेर पडला.


“म्हणजे काव्याच्या अवस्थेला कारणीभूत असलेला मुलगा अर्जुन होता?” राजीव अचानक आत येत म्हणाला.


“मिस अमृता इज इट ट्रू?” मोबाईलमधून मधुरचा आवाज ऐकताच राजीवने शशांककडे प्रश्नार्थक पाहिले.


“राजीव, मीट माय स्टुडन्ट, डॉक्टर मधुर आणि मधुर हे मिस्टर राजीव अधिकारी. अमृताचे डॅड. राजीव आपल्या अमृताला यानेच बोलते केलेय.” शशांकला ओळख करून देण्यावाचून पर्याय उरला नव्हता.


“हॅलो सर. ग्लॅड टू मीट यू.” राजीवकडे बघून मधुरने एक स्मित केले.


“सेम हिअर यंग मॅन. मला एक सांग, तू डॉक्टर आहेस की जादूगार? माझ्या मुलीवर कसली जादूची कांडी फिरवलीस की ती आज बोलायला लागली? तीन दिवसापासून तिने तोंडातून एक शब्दही काढला नव्हता. मी तुझा खूप आभारी आहे. माझ्या अमृताला बरे केल्याबद्दल तू जे म्हणशील ते द्यायला तयार आहे. माझी अर्धी संपत्ती मागितलीस ना तरीही मी देईन.” राजीव मधुरकडे बघून हात जोडत म्हणाला.


“सर, अहो असं काही नाही. मी माझं काम तेवढं केलंय.” तो हलकेच हसला.


“नाही मधुर, तू खरंच देवासमान चालून आलास आणि अमृताला बरे केलेस. खरंच तू मागशील ते तुला देईन. या राजीव अधिकारीचा हा शब्द आहे.” राजीव ठामपणे म्हणाला.


“खरंच मी मागेल ते तुम्ही द्याल?”


“शंभर टक्के खरं.”


“मग काव्याच्या पुढच्या उपचाराची जबाबदारी मला घेऊ द्या. शशांकसरांऐवजी मी तिला बघेन. अर्थात अमृता मॅडमची समंती असेल तरच.” तो त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला.


राजीवला मधुरच्या धीटपणाचा तसा राग आला; पण मग त्याने अमृताकडे पाहिले. तिचे डोळे अजूनही वाहत होते.


“अमृता, बाळा तू ठीक आहेस ना?”


“डॅड, काव्याने मला चिट केलेय हो. माझी जिवाभावाची मैत्रीण होती ती. मी तिला कधीच माफ करणार नाही.” तिचा हुंदका दाटून आला.


“अमृता..”


“ती मला इथे नकोय. कधीच नकोय. डॉक्टर मधुर तुम्ही काव्याला बरे करा अथवा नका करू; पण प्लीज तिला माझ्या आयुष्यात परत पाठवू नका. मी तुम्हाला विनंती करतेय.” बोलता बोलता तिने खरंच तिचे हात जोडले.


तिची अवस्था बघून राजीव आणि शशांकसह मधुरचेही डोळे पाणावले. जीने आपल्या मैत्रिणीसाठी वडिलांच्या विरोधात जाऊन पुणे गाठले होते तिच्याबद्दल आज तिच्या डोळ्यात केवळ राग दिसत होता.


“ओके. ठीक आहे. तुम्ही काळजी घ्या.” मधुरने कॉल डिसकनेक्ट केला.


“अमृता, हा अर्जुन कोण आहे हे मला कळायला हवं. मी त्याला इतक्या सहज सोडणार नाही.” राजीवच्या मुठी आवळल्या होत्या.


“डॅड, आता तोही नको आणि तिही नकोय. माझ्या आयुष्यात कोणीच नकोय. प्लीज. तुम्हाला माझी शपथ आहे, त्याला तुम्ही काहीही करणार नाहीत.” डोळे पुसत ती म्हणाली.


“अमृता, बेटा हे सगळं कशावरून खरं असेल? म्हणजे तुझ्यावर आमचा विश्वास आहे गं; पण तुला हे कसं कळलं?” वैदेही तिच्या बेडजवळ येत म्हणाली.


“मम्मा, आय एम सॉरी. मी तुला कॉलेजच्या नाव सांगून बाहेर पडले त्या दिवशी काव्याच्या होस्टेलवर गेले होते आणि तिथेच मला सगळं कळलं गं.” बेडखाली असलेली डायरी वैदेहीच्या हाती सोपवत ती उत्तरली.


“ बरं बाळा आता तू आराम कर.” तिच्या डोक्यातून वैदेहीने हात फिरवला तसे तिच्या कुशीत तोंड लपवून अमृता रडायला लागली.


“मम्मा, माझे त्याच्यावर खूप प्रेम होते गं. तेवढेच प्रेम काव्यावर देखील होते. कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच होते. तिने जर का एका शब्दाने त्याला मागितले असते तरी मी त्याला सोडले असते गं. पण त्या दोघांनी माझ्याशी प्रतारणा केलीय. या डायरीत तिने सगळं लिहिलेय गं. मी तिला कशी माफ करू?” तिचे रडू थांबत नव्हते.


राजीवने तिच्या हातातील ती डायरी घेतली. डायरीवरचे अक्षर काव्याचे होते हे त्याने बरोबर ओळखले. अर्जुनबद्दल बरेच काही लिहिण्यात आले होते. त्याच्याबद्दल तिला वाटणारे आकर्षण, त्याच्या मनात तिच्याबद्दल निर्माण झालेली ओढ आणि मग दोघांचे एकत्र येणे. सारे काही वाचून त्याने रागाने मुठ आवळली आणि जोरात भिंतीवर आपटली.


“राजीव, काय करतोस?” डॉक्टर शशांक त्याला मागे खेचत म्हणाले.


“शशांक, अरे सापाच्या पिल्ल्याला मी जवळ केले रे. त्या काव्याची आपण मदत केली आणि ती? तिने माझ्याच मुलीच्या आयुष्यात घाण कालवली. हा राजीव अधिकारी पहिल्यांदा माणसं ओळखायला चुकला रे. मनात आणलं ना तर आत्ता तो अर्जुन आणि काव्या दोघांचाही मी कडेलोट करू शकतो; पण अमृताच्या शपथेमुळे मला गप्प बसावं लागतंय. हरलो रे मी. माझ्या मुलीसाठी मी काहीच करू शकत नाही या जणीवेनेच पुरता हरलोय मी.” त्याची हतबलता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


“राजीव, शांत व्हा. आपण काही करू शकत नाही; पण देव सगळं बघतोय हो. असं बोलायला नको पण म्हणूनच तर त्याने काव्याची ही अवस्था करून ठेवली. पापाची भागीदार म्हणून वेड्यागत अवस्था झालीये की तिची. देव त्याच्या निकालात कधी चुकत नसतो.” अमृताच्या केसातून हात फिरवत वैदेही म्हणाली.


अमृता मात्र अजूनही टिपं गाळत होती. देवाच्या दरबारातील अजब न्याय अजूनपर्यंत तिला कळला नव्हता.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________

🎭 Series Post

View all