चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -९
भाग -९
“राजीव, शांत व्हा. आपण काही करू शकत नाही; पण देव सगळं बघतोय हो. असं बोलायला नको पण म्हणूनच तर त्याने काव्याची ही अवस्था करून ठेवली. पापाची भागीदार म्हणून वेड्यागत अवस्था झालीये की तिची. देव त्याच्या निकालात कधी चुकत नसतो.” अमृताच्या केसातून हात फिरवत वैदेही म्हणाली.
अमृता मात्र अजूनही टिपं गाळत होती. देवाच्या दरबारातील अजब न्याय अजूनपर्यंत तिला कळला नव्हता.
_________
“रेवाताई, काव्याची कंडिशन काय म्हणतेय?” डॉक्टर मधुर नर्स रेवाला विचारत होता.
“सर, ती इथे आल्यापासून पूर्वीपेक्षा बरीच सुधारणा होत आहे. म्हणजे बघा ना, सुरुवातीचे दोन तीन दिवस किती हिंसकपणे ती वागायची. कोणी साधं बोलायचं म्हटलं तरी अंगावर धावून यायची. आता मात्र तिच्यातील हिंसक वृत्ती बऱ्याच अंशी कमी झालीये.” रेवा म्हणाली.
“हम्म.”
“आणखी एक वाटतंय सर.” त्याच्याकडे पाहत रेवा.
“काय?”
“तिच्याशी जे घडलं ते नक्कीच तिच्या मनाविरुद्ध नव्हतं. म्हणजे तिचे ज्याच्याशी शारीरिक संबंध आलेत ते तिच्या मर्जीनेच आलेत.”
“आणि तुम्ही हा निष्कर्ष कशावरून काढलात?”
“सर तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी तिचे निरीक्षण करतेय की. त्यावरूनच सांगतेय. काल तुम्ही तिच्या डोक्यावरून हात फिरवलात तेव्हा तिने तो शांतपणे काढून घेतला. जर तिच्यावर जबरदस्ती झाली असती तर तिने कुठलाही पुरुषी स्पर्श सहन केला नसता. अगदी तिच्या डॉक्टरांचा देखील. पण तिला याही अवस्थेत चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जाण आहे.” रेवा तिचे मत देत म्हणाली.
“करेक्ट. मलाही तेच वाटतंय की जे घडले ते तिच्या मर्जीने घडलेय. मात्र कहानीत एक वेगळाच ट्विस्ट आलाय.” तो खुर्चीला डोके रेलून म्हणाला.
“कसला ट्विस्ट?” रेवाने प्रश्न केला.
“अमृता, जी काव्याला इथे उपचारासाठी घेऊन आली, तिचे म्हणणे आहे की काव्या आणि अर्जुनचे म्हणजे अमृताच्या बॉयफ्रेंडचे संबंध होते आणि हे जे काही घडलंय तो त्याचाच परिणाम आहे.”
“काय?”
“आश्चर्य वाटलं?”
“नाही. उलट शॉक बसला सर. काव्या आपल्याच मैत्रिणीशी असं वागणार नाही याची मला खात्री आहे. किती साधी आणि सरळ मुलगी आहे हो ती?” रेवा ठामपणे म्हणाली.
“रेवाताई, असं आपण कुणावर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवू शकत नाही बरं का. मिस अमृता जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आल्या तेव्हा काव्या त्यांची बेस्टी, जीव की प्राण होती आणि आता ती तिला तिची सगळ्यात मोठी दुष्मन समजतेय.”
“सर मला काय वाटतं माहितीये का? सरळ पोलिसात हे प्रकरण दिले ना तरच खऱ्या खोट्याचा छडा लावता येईल.”
“रेवाताई, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात हो. त्यांच्याकडे काय, पोलिसही त्यांच्या खिशात असतात. आपण आपल्या प्रोफेशनशी प्रामाणिक राहायचं आणि आपलं काम चोख करायचं. काय?” तिच्याकडे बघून तो भुवई उडवत म्हणाला.
“यस, यू आर राईट डॉक्टर.”
“चला, ओपीडीचे पेशंट पाठवा. एका पेशंटमुळे दुसऱ्यांना वाऱ्यावर नाही सोडता यायचे.” त्याने इशारा केला त्यासरशी रेवा सिस्टर बाहेर गेल्या.
“..काव्या आपल्याच मैत्रिणीशी असं वागू शकणार नाही.” ओपिडी आटोपल्यावरही मधुरच्या कानात रेवा सिस्टरचे शब्द फिरत होते.
‘खरंच काव्या अशी वागली असेल का? या आठवड्याभरात जेवढं तिला ओळखायला लागलो त्यावरून ती पोरगी एकदम पापभिरू वाटली. मग दिड-दोन वर्षांच्या सहवासात अमृताला तिचा स्वभाव कळला असेलच की आणि तरीही तिने सरळ सरळ आरोप केला म्हणजे नक्कीच काहीतरी पाणी मुरते आहे. पण कुठे? आणि नेमका हा अर्जुन काय प्रकरण आहे? तो अजूनपर्यंत समोर का आला नाही? की तोच दोन्ही मैत्रिणींच्या भावनांशी एकाचवेळी खेळत होता?’ मधुर स्वतःच प्रश्नांच्या कोंडीत अडकत होता.
_________
“अर्जुन. अर्जुनच म्हणालीस ना? कधी बोलली नव्हतीस गं त्याच्याबद्दल. म्हणजे तो तुला आवडतो हे कधीच सांगितलं नव्हतंस. अमृता, आई म्हणून मी एवढी परकी झाले होते का गं?” आजही वैदेही अमृताच्या उशाशी बसून तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होती.
“मम्मा, तसं नाही गं. मी ना त्याच्याबद्दल खूप सिरीयस होते. तो देखील तेवढाच सिरीयस आहे असं वाटायचं. इतक्यात आपलं नातं एक्सप्लोर करायचं नाही असं तो म्हणायचा. डॅडच्या इमेजला धक्का लागू नये म्हणून तो आमचं नातं इतक्यात पुढे आणायला नाही म्हणतोय असेच मला वाटत आले होते गं. मात्र त्याने माझ्याच पाठीत खंजीर खुपसला.” अमृता परत रडायला लागली.
“आय एम सॉरी, मला माफ कर अमृता. मी तुझ्या भावनांना समजून घ्यायला कमी पडले गं.”
“नाही गं मम्मा. मी तुम्हाला काही सांगितलं नाही हे माझं चुकलं. आता नको गं त्याचा विचार. त्रास होतोय मला.”
“नाही बोलणार गं काही; पण मला सारखा एक प्रश्न पडतोय गं. जर खरंच त्या मुलाचं आणि काव्याचे तसे काही होते तर मग तो अचानक कुठे गायब झालाय? आणि तुम्हा दोघात देखील इतक्यात काहीच संवाद वगैरे नाहीये का?”
“तो इथे नाहीये अगं. सात महिन्यापूर्वी तो वर्षभरासाठी जर्मनीला गेलाय. तिथून परत येईपर्यंत काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही असे आम्ही ठरवले होते. आता कळतंय ते सगळं खोटं होतं. ती शीतल, काव्याची रूममेट म्हणत होती की त्याच्या श्रीमंतीला काव्या भाळली. तेव्हा ते खोटं वाटलं. मात्र आता पटलं गं की ती खरं तेच सांगत होती.”
“अमृता, बाळा आणखी काही आहे का जे मला ठाऊक नाहीये?” तिच्या डोळ्यातील पाणी पुसत वैदेहीने ममतेने विचारले.
“मम्मा, कसं सांगू? काव्याने त्याच्याकडून कितीतरी महागडे गिफ्ट्स उकळलेत गं. कित्येक ब्रँडेड वस्तू, दागिने, साड्या.. काय काय सांगू? अर्जुन आणि मी एकमेकांना आजवर काहीच गिफ्ट केलं नाही गं. जोपर्यंत स्वतः कमवत नाही तोपर्यंत नो गिफ्ट्स असे तोच मला म्हणायचा आणि काव्याला त्याने एवढं काही दिलं. लिटरली ते दोघं मला चिट करत राहिले याचा मला फार त्रास होतोय गं मम्मा. विचार करून वेड लागेल मला.”
“श्श! असं नाही बोलायचं बाळा. तू शांत हो बघू. तुला आवडतं म्हणून मी खास तुझ्यासाठी सूप आणलंय. हे पिऊन घे.”
“नको मम्मा. प्लीज.”
“प्लीज? माझ्यासाठी?” वैदेहीने भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले तसे अमृताने तिला मिठी मारली.
“सॉरी मम्मा. मी फार त्रास देतेय ना गं?”
“अहं. एका आईला आपल्या बाळाचा कधीतरी त्रास होईल का?” तिच्या ओठाजवळ चमचा नेत वैदेही मंद हसली.
वैदेही हसली मात्र अमृताच्या नजरेसमोर कावेरीचा चेहरा झळकून गेला. वैदेहीच्या डोळ्यात तिच्या लेकीबद्दल दिसणारे ओतप्रोत प्रेम आणि कावेरीच्या डोळ्यात काव्याबद्दल असणारा शुष्क भाव. दोघांची तिला तुलनाच करता येत नव्हती. वैदेही एक आई होती., कावेरीही आईच आणि काव्या? ती सुद्धा कल्पनेच्या जगात वावरणारी आईच.
काव्याची आठवण झाली आणि तिला अंतरात खोलवर टोचल्यासारखे झाले. डोळ्यातून बाहेर पडणारे थेंब चमच्यातील सुपमध्ये मिसळले गेले तेही तिला कळले नाही.
“अमृता, घडलेल्या गोष्टी बदलवणं आपल्या हाती नसतं गं बाळा. मात्र त्याचा आपण किती त्रास करून घ्यायचा हे मात्र आपल्याला ठरवता आले पाहिजे ना?” तिला सूप भरवत वैदेही म्हणाली.
“म्हणजे? ते गं कसं शक्य आहे? माझ्या भावनांना मी कसे आवरू शकते?”
“प्रयत्न केला तर सारंच शक्य आहे गं राणी. आपला ऍक्सीडेन्ट झाला तेव्हा तू छोटीशी होतीस गं. माझे अपंग शरीर पूर्णपणे निकामी झाले होते. माझ्या पिल्लाला माझी गरज असताना मी अशी बेडरीडन होते तेव्हा मला किती त्रास झाला हे माझं मलाच माहित. पण मग मात्र मी हळूहळू पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात केली. राजीवचे प्रेम माझ्यासोबत होतेच, सोबतीला मी स्वतःलाही बळ दिलं.
जे घडलं ते वाईट होतं; पण मी तुझ्यासाठी जिवंत होते गं अमृता. तुला आईविना पोरके नव्हते करायचे. म्हणून मग मी स्वतःला बळ देत राहिले. तुझ्या बाळलिलेत रमत राहिले. देवाने मला आयुष्यभराचे अपंगत्व बहाल केले असले तरी माझ्या लेकीच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरवले नाही याचे आभार मानत राहिले.”
“मम्मा.” अमृताचा कंठ दाटून आला होता.
“मोरल ऑफ द स्टोरी इज की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं कारण पुढे आणखी वाईट घडण्यापासून ते आपल्याला वाचवत असतं. मी अपंग झाले असले तरी देवाने मला जिवंत ठेवले. तुला पोरके करायचे नव्हते म्हणून त्याची ती योजना असावी. आताही तसेच घडले असेल. नात्यात आणखी पूढे गेल्यावर अर्जुनचे रूप समोर येण्यापूर्वीच त्या विधात्याने तुला सावध करायला ही योजना आखली असावी असा आपण विचार करायचा का?” तिचे डोळे पुसत वैदेहीने विचारले.
“मम्मा, तू म्हणतेस तसंच असेल गं. मी लवकरच यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेन. आय प्रॉमिस!”
“गुड गर्ल.”
वैदेहीने तिला उरलेले सूप दिले आणि त्यानंतर गोळी खायला दिली. थोड्याच वेळात गोळीच्या अंमलाने अमृताचा डोळा लागला. ती झोपल्याचे बघून तिथून परत जायला निघताना तिला अमृताच्या उशाशी काहीतरी चमकताना दिसले आणि तिची व्हीलचेअर तिथेच थांबली.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा