चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -१०
भाग -१०
“मम्मा, तू म्हणतेस तसंच असेल गं. मी लवकरच यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेन. आय प्रॉमिस!”
“गुड गर्ल.”
वैदेहीने तिला उरलेले सूप दिले आणि त्यानंतर गोळी खायला दिली. थोड्याच वेळात गोळीच्या अंमलाने अमृताचा डोळा लागला. ती झोपल्याचे बघून तिथून परत जायला निघताना तिला अमृताच्या उशाशी काहीतरी चमकताना दिसले आणि तिची व्हीलचेअर तिथेच थांबली.
_________
“काव्या, तू यांना ओळखतेस?” काही फोटोकॉपीज काव्याच्या बेडवर ठेवत मधुर विचारत होता.
“हे सगळं काय आहे डॉक्टर?” तिच्या डोळ्यात जरासे पाणी दाटले.
“तू यांना ओळखतेस?” त्याने तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले.
“डॉक्टर मी आता बरी झाले आहे का? तसे असेल तर मग मला इथून जायला हवे.” ती खाली बघत म्हणाली.
“हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हे. तू यांना ओळखतेस का?” त्याचा पुन्हा प्रश्न.
“हं. हे माझे बाबा आहेत.” डोळ्यातील पाणी अडवत ती उत्तरली.
“बाबा?”
“हम्म. आता नाहीयेत ते.”
“ओह! आय एम सॉरी आणि यांना ओळखतेस?”
“माझी आई आहे. रागावलीय ती माझ्यावर.”
“का?”
“तिच्या इच्छेविरुद्ध मी शिकायला बाहेर पडले ना. म्हणून.” खिन्नपणे ती.
“म्हणजे?”
“म्हणजे तिला वाटायचं की मी शिक्षिका वगैरे व्हावं; पण बाबांचं स्वप्न होतं म्हणून मी इंजिनिअरिंगकडे वळले.”
“गुड. म्हणजे तुला सारं काही नीट आठवायला लागलं तर. ग्रेट. काव्या, तुझी अशीच प्रगती राहील ना तर लवकरच तू इथून जाऊ शकशील.” मधुर हसून म्हणाला.
“बरं मला सांग, हिला ओळखतेस का?” सहज विचारावे तसे त्याने अमृताचा फोटो समोर केला.
“नाही. ही कोण आहे?” तिने त्याच्याकडे पाहत त्यालाच उलट विचारले.
“अरे, हिला ओळखत नाहीस होय? बरं याला तरी ओळखत असशील की? काय नाव बरं? अम्म.. अर्जुन. हेच नाव आहे ना गं?” अमृताचा फोटो बाजूला ठेवून त्याने दुसरा फोटो समोर केला.
दोन वर्षांपूर्वीच्या राजीवच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तो फोटो होता. अर्जुन आणि राजीवचा एकत्र असलेला. त्या फोटोवर नजर जाताच काव्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
“मी यातील कुणालाच ओळखत नाही. माझं.. माझं डोकं दुखतंय. प्लीज मला आराम करू द्या.” अचानक ती हायपर झाली.
“ओके, रिलॅक्स, रिलॅक्स. रेवाताई, हिला मेडिसिन द्या. काव्या, तू आराम कर हं. तुझ्या आईबाबांना ओळखलंस तेव्हा वाटलं की तुला सारं आठवायला लागलंय. म्हणजे तू इथून लवकर परत जाऊ शकशील. पण सॉरी, तुला अजून ट्रीटमेंटची गरज आहे. जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाहीस तोपर्यंत तुला इथेच राहावं लागेल.”
“मी प्रत्येकाला ओळखू शकत नाहीये यात माझा काय दोष?” ती रडकुंडीला आली.
“तुझा दोष नाही गं; पण ही अमृता आहे ना, तिचा खूप जीव आहे तुझ्यावर. एकदम बेस्टी समजायची ती तुला आणि तूच..”
“मी? मी काय केलं?” तिने नजर बाजूला करत विचारले?
“ते तुलाच माहित. मात्र ती सध्या आजारी आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची ट्रीटमेंट कुणाकडे चालू आहे ठाऊक आहे?”
त्याच्या प्रश्नावर तिने नजर वर केली.
“द ग्रेट सायकोलॉजिस्ट, डॉक्टर शशांक चिटणीस. तू ओळखत असशील ना त्यांना?” तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
“तेच डॉक्टर, ज्यांच्या चुकीच्या ट्रीटमेंटपासून वाचवायला म्हणून अमृता तुला माझ्याकडे घेऊन आली आणि आता स्वतःच तिला त्यांची ट्रीटमेंट घ्यावी लागतेय. असो, तुला नाही कळणार. कारण काय घडलंय हेच तुला आठवत नाहीये. तू आराम कर.” एक उसासा टाकून मधुर बाहेर जायला वळला.
“चक्रव्यूह.” तो वळला आणि काव्या स्वतःशी बोलावे तसे बरळली.
“काय म्हणालीस?” त्याने मागे फिरून तिच्याकडे पाहिले.
“चक्रव्यूह.. या चक्रव्यूहात कोण कसे अडकेल काहीच ठाऊक नाहीये. यू नो डॉक्टर? महाभारतातील अभिमन्यू? त्याला चक्रव्यूहात जायचं ठाऊक होतं; पण बाहेर कसं पडायचं तेच माहिती नव्हतं. आताही या चक्रव्यूहात अडकणाऱ्यांची हीच गत झालीये. बाहेर निघण्याचा मार्ग कुणालाच सापडला नाहीये.” कुठेतरी दूर शून्यात बघत काव्या बोलत होती.
“काय बोलते आहेस? कसले चक्रव्यूह?”
“मी वेडी आहे ना म्हणून हे बोलतेय. तुम्हा शहाण्या माणसांना नाही कळणार. कधीच नाही कळणार.” बेडवर असलेल्या अर्जुन आणि राजीवच्या फोटोचे तुकडे करत ते मधुरच्या अंगावर फेकून ती अचानक ओरडायला लागली.
तिच्या ओरडण्याने रेवा सिस्टर आणि तिचे सहकारी आत येऊन काव्याला आवरायला लागले. क्षणभर काय घडतेय हेच मधुरला कळले नाही. जवळपास आठ दिवसांनी ती अशी पूर्वीसारखी वागायला लागली होती.
“सिस्टर, इंजेक्शन लावा. क्विक.” स्वतःला सावरत मधुरने रेवाला ऑर्डर दिली आणि डोके गच्च पकडून तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.
हातपाय झाडायला लागलेली काव्या इंजेक्शन देताच पाच मिनिटात शांत झाली आणि काही वेळातच डोळे मिटून ती झोपी गेली. मधुर लॅपटॉपच्या स्क्रीनवर तिलाच बघत होता.
तिच्या वागण्याचा काय अर्थ घ्यावा हेच त्याला कळत नव्हते. इतका हुशार असलेला, केवळ चेहरा बघून पेशंटचा वेडेपणा किती खोलात आहे हे ओळखणारा एक निष्णात डॉक्टर काव्याला अजून नीट समजू शकलाय की नाही या कोड्यात तो स्वतः पडला होता.
राहून राहून अमृताचा निस्तेज चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. काव्यासाठी कळकळीने त्याच्याशी बोलणारी ती स्वतः मात्र पुरती खचून गेली होती आणि त्याचा आरोप सरळसरळ काव्यावर येत होता.
“हे कसलं चक्रव्यूह? आणि यात नेमकं कोण अडकलंय? की अडकवल्या गेलंय?” त्याने स्वतःला कालपासून पडणाऱ्या प्रश्नाला पुन्हा आठवून पाहिले.
सतत मागे लागलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी म्हणूनच मधुरने वैदेहीकडून अमृताच्या मोबाईलमधून फोटो मागवून घेतले होते. त्याचा काही उपयोग होईल असे त्याला वाटले होते पण आता त्यालाच या चक्रव्यूहात फसल्यासारखे वाटत होते.
________
गोळ्यांच्या अंमलाने अमृता गाढ झोपी गेली. तिला झोपलेले बघून वैदेही बाहेर जायला निघाली त्याचवेळी तिला अमृताच्या उशाशी काहीतरी चमकताना दिसले तसे व्हीलचेअर घेऊन ती परत तिच्या डोक्याजवळ येऊन पोहचली.
अस्सल हिऱ्याच्या दोन कुड्या उशीजवळ चमकत होत्या त्या तिने आश्चर्याने हाती घेतल्या. चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते. त्या कुड्या ओळखीच्या वाटत होत्या. आश्चर्याने त्यांना न्याहाळत तिने हळूच अमृताचे कपाट उघडले. त्या कुड्यांबरोबर त्याचा नेकलेस मिळतो का हे तिला बघायचे होते. उगाच. मनात शंकेचे एक काहूर माजल्यागत झाले होते.
अमृताच्या सामानात तर तिला काहीच दिसले नाही. कदाचित कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले असेल असे समजून तिने नाईलाजाने ते बंद करायला घेतले तर खालच्या कप्प्यात असलेल्या एका मोठ्या बॅगवर तिची नजर गेली.
‘काव्या.’
त्या बॉगेवर नाव लिहिले होते. ते नाव वाचून कुतूहलाने तिने कसेबसे बॅग बाहेर काढली आणि मोठया प्रयत्नाने चैन उघडल्या. बॅगेतील असलेले सामान बघून तिचे डोळे विस्फारले. सुंदर सुंदर ड्रेसेस, महागड्या साडया, घड्याळे, चपला.. अमृताने सांगितल्याप्रमाणे डोळे दिपवणाऱ्या बऱ्याच गोष्टी तिथे होत्या. काव्याची परिस्थिती बघता हे सगळे तिने खरेदी केलेले असू शकेल यावर तिचा विश्वास बसणे शक्य नव्हते.
बॅगेच्या तळाशी तीन-चार ज्वेलरी बॉक्स होते ते तिने उघडून पाहिले. अस्सल सोन्याचे दोन सेट आणि आणि एक हिऱ्याची बिंदिया असलेला बॉक्स होता. तिने हातातील त्या दोन कुड्या बिंदिया शेजारी ठेवल्या आणि त्या कुड्या याच बॉक्समधील असल्याची तिला खात्री पटली.
‘या कुड्या आणि ही बिंदिया. मग इथला नेकलेस कुठे गेला?’ तिच्या मनात शंका दाटून आली.
‘हे सगळे महागडे गिफ्ट्स अर्जुनने काव्याला गिफ्ट केलेत असं अमृता म्हणते. पण खरंच तो एवढा श्रीमंत आहे का? मान्य आहे की त्याचे वडीलदेखील बिझनेस क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहेत; पण तरी ते त्याला असा पैसा उधळू देतील? खरं तर राजीवजवळ देखील इतकी संपत्ती असताना अमृताला उगाच उधळपट्टी करू देत नाहीत, अर्जुनचे वडील सुद्धा तसेच असतील की आणि मुळात मी जितक्यांदा अर्जुनला भेटलेय, तो तर एकदम साधा भोळा मुलगा वाटला होता. मग हे सगळं काय आहे? हा त्याचा खोटेपणा की त्याच्या स्वभावाचा खरा पैलू? काहीच कळेना झालंय.’
विचारात हरवलेल्या वैदेहीने कुड्या आणि बिंदिया बॉक्समध्ये परत ठेवत सगळ्या वस्तू बॅगेत कोंबायला सुरुवात केली त्याचवेळी तिच्या हाताला पुन्हा एक बॉक्स लागला. दागिन्यांच्या इतर बॉक्सपेक्षा जरासा मोठा आणि काहीसा जड असा तो बॉक्स होता. आता यात पुन्हा काय ठेवले आहे हे जाणून घ्यायला तिने तो उघडला आणि तिच्या भालप्रदेशावर एक गडद लकीर उमटली.
त्यात दागिने वगैरे नव्हतेच तर तिथे होती एक डायरी. अमृताने पूर्वी दाखवल्यापेक्षा निराळी असलेली एक वेगळीच डायरी. कुतूहलाने वैदेहीने त्याचे मुखपृष्ठ उलटले आतल्या पानावर जे लिहिले होते ते बघून मात्र तिला धडकीच भरली.
‘चक्रव्यूह!’
त्या शब्दाने तिचे डोके गरगर फिरायला लागले होते.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा