चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -११

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा.
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -११


त्यात दागिने वगैरे नव्हतेच तर तिथे होती एक डायरी. अमृताने पूर्वी दाखवल्यापेक्षा निराळी असलेली एक वेगळीच डायरी. कुतूहलाने वैदेहीने त्याचे मुखपृष्ठ उलटले आतल्या पानावर जे लिहिले होते ते बघून मात्र तिला धडकीच भरली.

‘चक्रव्यूह!’

त्या शब्दाने तिचे डोके गरगर फिरायला लागले होते.


‘ती पहिली नजर.. आणि क्षणात गारद झालेले मी. स्त्रिया चाळीशीत अधिक मोहक दिसतात म्हणे; पण मग पुरुष? त्यांचं हँडसम दिसण्याचं वय कुठलं? कदाचित पन्नाशी. यस! म्हणूनच तर या पन्नाशीत देखील हे इतके जबरदस्त दिसत आहेत. काय त्यांची ती स्टाईल आणि काय त्यांचा तो स्वॅग. अहाहा! द ग्रेट बिझनेसमन मिस्टर राजीव अधिकारी.. बस नाम ही काफी हैं।’

वैदेहीने डायरीचे मधले पान उघडले आणि त्यात राजीवबद्दल लिहिलेले वाचून तिच्या हृदयाची धडधड वाढीला लागली. डायरी पटकन बंद करून ती जोरजोराने तोंडाने श्वास घ्यायला लागली. तिचे हातपाय गार पडू लागले होते. पुढे आणखी काय लिहिलेय हे वाचायचे त्राणदेखील तिच्यात उरले नव्हते.


“मम्मा..”

अमृताच्या ओठांच्या हालचालींकडे लक्ष जाताच वैदेहीने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला.


“तू अजूनही इथेच आहेस?” पेंगुळलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत अमृता विचारत होती.


“हं. ते तू झोपली होतीस ना म्हणून थांबले होते.” जे सुचेल ते वैदेही म्हणाली.


“मम्मा, आय एम ओके अगं. नको त्रास करून घेऊस. तू तुझा आराम कर बघू.” उठून बसत अमृता.


“हो. मी निघतेच आहे. तुला काही खायला पाठवू का?”


“नको अगं. मी जरा वेळ पडते. मग सोबतच चहा घेवूया. चालेल ना?” आता बरे असल्याचे दाखवत अमृता म्हणाली.


“ठीक आहे.” म्हणत वैदेहीने तिची व्हिलचेअर दरवाज्याच्या दिशेने फिरवली.


“मम्माऽऽ”


“हं?” अचानक आलेल्या अमृताच्या हाकेने ती जराशी गडबडली आणि त्या गडबडीत तिच्या पदराखाली लपवलेली डायरी खाली पडली.


“मम्मा, हे काय आहे? ही डायरी?” खाली पडलेली डायरी उचलत अमृताने विचारले.


“अमृता अगं ती..” वैदेही काही बोलू पाहत होती तोच अमृता डायरीचे पान पलटायला लागली.


“चक्रव्यूह? काव्याचे अक्षर? मम्मा ही काव्याची डायरी आहे? पण मग मला कशी दिसली नाही?” तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.


“अमु.. माझी बेस्ट फ्रेंड! आजच झालेली मैत्री आणि आजच झालेली बेस्टी. देवाने आजवरचे दिलेले सर्वात सुंदर गिफ्ट! आणि ते भेटावे तरी कुठे? तर गिफ्ट काउंटरवर. भारीच ना?” दुसऱ्याच पानावर अमृता आणि आणि काव्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा लिहिला होता. जे वाचताक्षणी अमृताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.


“बघितलेस मम्मा, काव्या मला माझी बेस्टी मानायची. मग ती अशी कशी वागू शकली गं? की हे बेस्टी वगैरे सगळं नाटक होतं?” ती मुसमुसत म्हणाली.


“डायरी म्हणजे एखाद्याच्या अंतर्मनाचा आरसा असतो गं. आरसा कसे खोटं बोलेल?” वैदेही स्वतःशी बोलल्यागत उत्तरली.


“म्हणजे मग तिच्यात आणि अर्जुनमध्ये झाले ते देखील खरेच आहे ना? तिनेच ते सारे त्या डायरीत लिहून ठेवलंय ना गं?” तिचा हुंदका दाटला.


“अमु.”


“प्लीज, मम्मा अमु म्हणू नकोस गं. काव्या मला तेच म्हणायची.”


“सॉरी बाळा. चुकून तो शब्द निघाला. एक ऐकशील? मला ती दुसरी डायरी देशील?” मनात एक विचार करून
वैदेहीने विचारले.


“ती तर डॅडकडे आहे. पण मम्मा ही डायरी तुझ्याकडे कशी?” अमृताने विचारलेल्या प्रश्नावर वैदेही खोटे बोलू शकली नाही आणि तिने उत्तरादाखल काव्याचे सामान बघितल्याचे सांगितले.


“या डायरीत आणखी काय लिहिले आहे ते मी वाचू शकते?” भरल्या डोळ्यांनी तिने विचारले.


“अमृता, बाळा तुला त्रास होईल अगं.” वैदेहीचे शब्द जड झाले होते.


“मिस्टर राजीव अधिकारी! अमु एवढ्या मोठ्या प्रस्थाची मुलगी आहे हे मला ठाऊकच नव्हतं. त्यांच्या वाढदिवसाला तिने मला हक्काने आमंत्रित केलं आणि मग मला जावच लागलं. ‘अमृता व्हिला’ म्हणजे केवढा मोठा बंगला आहे. तिथल्या चमचमत्या झगमगाटात मला अगदी हरवल्यासारखं झालं होतं.


त्या श्रीमंत वातावरणात साध्याशा ड्रेसवर असलेली मी अगदी अवघडून गेले होते. मात्र अमुने स्वतःहून तिच्या मम्मा आणि डॅडना माझी ओळख करून दिली. केवढे श्रीमंत लोक; पण त्यांचे पाय अगदी जमिनीवर आहेत. राजीव अंकलना बघून माहित नाही का पण डोळ्यात पाणी आले. त्यांना बघून मला बाबा आठवलेत का?”


अमृता वाचत होती आणि वैदेही तिचे शब्द ऐकत होती.
थोड्या वेळापूर्वी तिने मधले पान उलटले तेव्हा काव्याने राजीवच्या भारदस्त व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली होती ते वाचून तिच्या मनात एक वेगळीच शंका दाटली होती, आता मात्र तिलाच स्वतःच्या विचाराची लाज वाटली.


“आणि हा कोण? हँडसम हंक? त्याला बघून अमु किती एक्सायटेड झालीये? आधीच चेहऱ्यावर इतके तेज असलेली ती त्याला बघून अधिकच चमकते आहे. तिचा बॉयफ्रेंड असावा का हा?


अर्जुन! भारीच नाव आहे. अमुनेच त्याच्याशी माझी ओळख करून दिलीये. क्षणभर तो माझ्याकडे टक लावून बघतोय असं वाटत होतं. माझ्या अश्या गावंढळ दिसण्यामुळे तो तसा बघत असावा का? असो, पण अमु आणि त्याची जोडी भारी दिसतेय हं. अगदी मेड फॉर इच अदर. तिने हळूच माझ्या कानात सांगितलं की दोघे एकमेकांत इन्व्हॉल्व्ह आहेत म्हणून. देवा दोघांच्या जोडीला कायम एकत्र ठेव रे. कुणाची नजर नको लागायला.” प्रत्येक शब्दागणिक अमृताचे डोळे भरून येत होते.


“मॉम, नजर तर तिनेच लावलीय ना गं. इतकी कशी गं नीचपणाने ती वागू शकते?” आपल्याच तंद्रित वाचन ऐकत असलेल्या वैदेहीकडे अमृताने पाहिले.


“अमृता, दरवेळी दिसते तसंच असेल असं नसते ना गं बाळा? काहीतरी आहे जे आपल्या नजरेतून सुटते आहे. मला सांग, राजीवकडे असलेल्या डायरीतून अर्जुन आणि काव्याच्या नात्याविषयी जे समोर आले, त्यापूर्वी तुला कधी त्यांच्यावर संशय आला होता का?” काहीसा विचार करत वैदेहीने विचारले.


“नाही गं. मात्र आता जी परिस्थिती समोर आलीये ना त्यावरून तर सगळं तसंच दिसतंय. अर्जुनच जर्मनीला जाणं, त्याचा आणि माझा कसलाच कॉन्टॅक्ट नसणं आणि काव्याचे प्रेग्नन्ट असणं.. संशयाचा काटा एकाच ठिकाणी येऊन अडतो ना गं?”


“कदाचित आपल्या मनात संशय निर्माण झाला म्हणून सगळं एकाच ठिकाणी येऊन अडतंय. तेच हे चक्रव्यूह. हे चक्रव्यूह भेदणे गरजेचे आहे.” एक लांब श्वास घेत वैदेही म्हणाली.

“कसलं चक्रव्यूह मम्मा? मला काही कळेल असं बोल ना.”

“मी फक्त अंदाज लावतेय; पण जर ते खरे असेल आणि त्यात तू विनाकारण गोवल्या गेली असशील तर त्यातून बाहेर काढायला मला काहीतरी करावंच लागेल.” तिच्या हातातील डायरी वैदेहीने स्वतःकडे घेतली.


“मम्मा, डॅडच्या नावाला बट्टा लागेल असे आपल्याला काहीच करायचे नाहीये. तू जर अर्जुनच्या मम्मा पप्पांशी बोलायचा विचार करत असशील तर प्लीज तो विचार डोक्यातून काढून टाक. मला आता कुणाकडूनही कसलेच एक्सप्लॅनेशन नकोय.” वैदेहीचा हात घट्ट पकडत अमृता म्हणाली.


“अमृता, अगं तुला जशी तुझ्या डॅडच्या नावाची काळजी आहे तशी मलाही आहेच की. बायको आहे गं राणी मी राजीवची. त्या काळातील लव्ह मॅरेज होतं बरं का आमचं. त्याच्या नावाला काही होईल असं कसं मी काही करेन?” तिच्या हातावर स्वतःचा दुसरा हात अलगद ठेवत ती किंचितशी हसली.


“आय नो मम्मा; पण तुलाही ठाऊक आहे ना, डॅडबद्दल मी जरा जास्तच पजेसिव्ह आहे.”


“हो रे माझ्या पिल्ल्या, तुम्ही बापलेक तर कायम एका पक्षात असता. यावेळी मीही तुमच्याच पक्षात आहे असं समजा.” तिच्या हातावर ओठ टेकवत वैदेही.


“लव्ह यू मम्मा.”


“लव्ह यू बाळा. बरं आता मी माझ्या खोलीत जाते. तूही थोडावेळ आराम कर मग दोघी एकत्र चहा घेऊ. चालेल ना?”


“हम्म.” अमृताने हुंकार भरला तसे एक स्मित करून वैदेही खोलीबाहेर आली.


“आराम? कुठला आराम मम्मा? त्या काव्याने माझ्या आयुष्याची पार वाट लावून टाकली आहे.” बेडवर बसत तिने डोळे पुसले.

काव्याचे नाव येताच तिला तिच्या सामानाची आठवण झाली आणि वैदेहीने तिची बॅग पाहिली हेही आठवले. तिचा हात आपोआप उशीखाली गेला. मात्र तिथे काहीच नव्हते.


“त्या कुड्या? त्या कुड्या कुठे गेल्यात?” जरा मोठयाने बोलत तिने उशी दोनतीनदा उलटपालट केली. बेडवरची चादरदेखील झटकून काढली.


‘मम्मा? तिला तर त्या कुड्या दिसल्या नसतील ना?’

मनात विचार येताच कपाट उघडून तिने काव्याची बॅग बाहेर काढली आणि तो बॉक्स उघडला. त्यात हिऱ्याच्या त्या कुड्या आणि बिंदिया बघून तिला हायसे वाटले.


‘या तर माझ्या उशीखली होत्या म्हणजे मम्माने यांना इथे ठेवले का?’ मनात मात्र प्रश्न तसाच धगधगत होता.

_________


“काव्या तू काल कसल्या चक्रव्यूहाबद्दल बोलत होतीस?” सकाळी राऊंडला आलेला डॉक्टर मधुर आज पुन्हा काव्याला प्रश्न विचारत होता.


“चक्रव्यूह.. कोणीही भेदू शकणार नाही असे चक्रव्यूह!” ती मोठ्याने भेसूर हसली.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all