चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -१२

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग -१२

“काव्या तू काल कसल्या चक्रव्यूहाबद्दल बोलत होतीस?” सकाळी राऊंडला आलेला डॉक्टर मधुर आज पुन्हा काव्याला प्रश्न विचारत होता.


“चक्रव्यूह.. कोणीही भेदू शकणार नाही असे चक्रव्यूह!” ती मोठ्याने भेसूर हसली.


“त्यात किती लोकांना तू अडकवलंस?”


“मी का कोणाला अडकवू? ज्यांना अडकायचं ते स्वतःच अडकलेत.” तिच्या ओठावरचं हसू कायम होते.


“काव्या तू खरंच वेडी आहेस की वेडेपणाचे केवळ नाटक करते आहेस?”


“डॉक्टर मधुर तुम्ही डॉक्टर आहात, गोल्ड मेडलिस्ट आहात. मग मी वेडी आहे की नाही ते तुम्हीच ठरवा ना.” तिच्या डोळ्यात एक वेगळीच झाक दिसत होती.


“काव्या माझ्याशी गेम खेळण्याचा प्रयत्न करू नकोस. तू ज्यावेळी इथे आलीस ना तेव्हाच तुझ्याबद्दल मला कल्पना आली होती; पण केवळ तुझ्या मैत्रिणीच्या हट्टापोटी मी तुला इथे ठेवून घेतलं.”


“कोण मैत्रीण? काव्या कुणाशीही मैत्री करत नसते. कळतंय का?”


“अमृताने आज जीव द्यायचा प्रयत्न केलाय. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्यात. ओव्हरडोजमुळे ती मरणाच्या दारात झुलते आहे. ती वाचेल याचीही काही शक्यता नाही.” तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत मधुर सांगू लागला.


“तिला काही होणार नाही. अहो डॉक्टर, अमृता तुमच्या माझ्यासारखी सामान्य मुलगी नाहीये. द ग्रेट राजीव अधिकारीची मुलगी आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्या बळावर ते तिला नक्कीच वाचवतील.”


“जर का पोलीस केस झाली ना तर तू गोत्यात येशील.” मधुर.


“नाही येणार. मी बोलले ना की राजीव अधिकारी खूप ग्रेट आहेत म्हणून. त्यांच्या कृपेने काहीच होणार नाही. ना पोलीस केस होईल आणि ना ही अमृताचा जीव जाईल.” त्याच्या नजरेत पाहणे टाळत ती म्हणाली.


“केवळ पैश्याच्या जोरावर एखाद्याचा जीव वाचवता येत असता तर तुझ्या पोटातील बाळाला देखील त्यांनी वाचवले असते, बरोबर ना?” तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत तो म्हणाला.


“डॉक्टर मधुरऽऽ”


“काव्या मला काय म्हणायचं हे तुलाही कळतंय.”


“डॉक्टर प्लीज, माझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये.” ती चिडून म्हणाली.


“आय नो इट. पण काय आहे ना तू माझी पेशन्ट आहेस, त्यात वेडी आहेस. तेव्हा तो अधिकार मला आहे.” तिच्या शेजारी बसत तो म्हणाला.

“मात्र अमृताच्या लाईफमध्ये ढवळाढवळ करण्याचा तुला कुठलाच अधिकार नाहिये हे लक्षात घे.” तो.


“तिच्या आयुष्यात मी कुठे ढवळाढवळ करतेय?”


“ओह रिअली? मग काय करते आहेस? तिच्याशी मैत्रीचे नाटक, त्यानंतर अर्जुनसोबत प्रेमप्रकरण आणि मग ही प्रेग्नन्सी. हे सगळं कुठल्या शब्दात वर्णन करू शकतेस? जिने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच फसवलंस ना?”


“मी अमुला फसवलं नाहीये.” ती कापऱ्या स्वरात म्हणाली.


“मग अर्जुनचं बाळ स्वतःच्या उदरात वाढवणं काय होतं?”


“ते बाळ त्याचं नव्हतं.” तिने थरथरत्या हातांनी दोन्ही कान झाकून घेतले.


“मग कुणाचं होतं?”


“मला अमुला भेटायचं आहे.” त्याच्याकडे बघत ती म्हणाली. तिच्या डोळ्यातून एक टपोरा थेंब गालावर ओघळला होता.


“डिअर काव्या, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नव्हे.”


“ते बाळ माझं होतं, फक्त माझं.” गालावरचा थेंब टिपत ती उत्तरली.


“हां, इमोशनली बोलायला म्हणून तसे असेल; पण कुणीतरी बायॉलॉजिकल फादर असेलच ना?” एक तिरकस बाण मारत तो म्हणाला.


“त्याचं उत्तर मी केवळ अमुला देईन.” ती दृढपणे म्हणाली.


“ती मृत्यूच्या दारात आहे, बेशुद्ध आहे. ती तुझे उत्तर काय ऐकणार गं?”


“तर मग मी पोलिसांना खरे काय ते सांगेन. डॉक्टर, प्लीज हेल्प मी. मला अमुकडे घेऊन चला ना, प्लीज? हवे तर मी तुमचे पाय पकडते. या चक्रव्यूहात मला तिचा बळी नव्हता द्यायचा.” ती खाली वाकून मधुरचे पाय पकडत म्हणाली.


“मग कुणाचा बळी तुला हवा होता?” त्याच्या प्रश्नाने ती एकदम शांत झाली.

__________


“अमृताऽऽ”

वैदेहीच्या हाकेनेसुद्धा अमृतावर कसलाच परिणाम होत नव्हता. गेले चार तास ती बेशुद्धावस्थेत होती.


“वहिनी, तिला शुद्धीत यायला आणखी वेळ लागेल; पण काळजी करू नका. तिच्या जीवावरचा धोका टळला आहे.” डॉक्टर वैदेहीला समजावत होते.


“वैदू, डॉक्टर काय सांगताहेत ते ऐक ना. आपली अमृता आऊट ऑफ डेंजर आहे गं. फक्त शुद्ध यायची आहे, एवढंच.” राजीव तिच्या खांद्यावर हात ठेवला.


खरे तर या क्षणी तो स्पर्श तिला नकोसा वाटत होता; पण सगळ्यांसमोर त्याचा हात झिडकावणे तिला योग्य वाटले नाही. तसेही एक बाप म्हणून तो किती हळवा आहे हे तिला ठाऊक होते आणि म्हणूनच तिला आता अधिक खणकर व्हावे लागणार होते.


“जोपर्यंत अमृता शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुणावर ही विश्वास ठेवणार नाही.” त्याचा हात हलकेच काढून घेत वैदेही म्हणाली.


“वहिनी, अहो इथल्या डॉक्टरांवर तरी विश्वास ठेवा. खूप नावाजलेले डॉक्टर आहेत म्हणून तर आपण अमृताला इथे घेऊन आलोय ना?” तिथे उभे असलेले डॉक्टर शशांक तिच्या जवळ येत म्हणाले.


“शशांक भाऊजी, मी म्हणाले ना की आता माझा कुणावरही विश्वास नाहीये म्हणून. तुम्ही सगळे बाहेर थांबलात तरी चालेल. माझ्या लेकीजवळ मी आहे.” ती हट्टाने म्हणाली.


“वैदूऽऽ”


“राजीव, शांत हो. वाहिनींना इथे थांबू दे. आपण बाहेर जाऊया हं?” राजीवला धीर देत डॉक्टर शशांक त्याला बाहेर घेऊन आले.


“अमृता का अशी वागलीस गं? असे करताना तुला माझा जरासुद्धा विचार आला नाही का?” अमृताचा हात हाती घेत वैदेहीने एक हुंदका दिला.


काल जे घडून गेले ते सारे क्षण तिच्या नजरेसमोरून तरळत होते. अमृतासाठी सूप घेऊन गेलेली ती. दोघींचे झालेले संभाषण. त्यानंतर झोपलेली ती आणि तिच्या उशाशी दिसलेल्या कुड्यामुळे हाती लागलेले काव्याचे सामान अन् जादूची कांडी सापडावी तशी त्यात दिसलेली डायरी. नजरेखालून गेलेला एक मजकूर आणि अमृताची चाळवलेली झोप. त्यानंतर तिनेच वाचून दाखवलेली काही पाने आणि काव्याच्या कृत्याने डोळ्यात दाटलेले पाणी.


अमृताला थोडावेळ आराम करायला सांगून ती तिच्या खोलीत निघून आली होती. मधल्या पानावर आलेले राजीवचे वर्णन तिला ती डायरी पुढे वाचायला उद्युक्त करत होती. मात्र त्यापूर्वी तिला एक दुसरेच काम हातावेगळे करायचे होते ते म्हणजे काव्याने अर्जुनबद्दल लिहिलेली डायरी शोधणे.


व्हिलचेअर वरून इकडे तिकडे फिरत ती वेड्यासारखी ती डायरी शोधत होती. राजीवचे कपाट, त्याच्या पर्सनल फायली, तिचे कपाट.. सारेच तिने पालथे घातले होते. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा तिला स्वतःच्या अधुपणाची कीव आणि राग दोन्ही येत होते. ती अशी अपंग नसती तर सारे काही आवरायला किती सोपे गेले असते असे उगाच वाटून गेले.


स्वतःवरच राग काढत तिने चिडून बेडवरची उश्या खाली फेकल्या आणि त्याचवेळी उशीखाली असलेली ती डायरी देखील खाली पडली.


‘द डार्क साईड ऑफ लाईफ!’

डायरीवरचे शीर्षक वाचून वैदेहीच्या काळजात कळ उठल्यासारखी झाली.


“अर्जुन.. मोस्ट हँडसम हंक. राजीव अंकलच्या आजच्या बड्डे पार्टीत असलेला एकमेव हँडसम तरुण. अमु आणि तो एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणे. मला त्याचे काय? त्याला बघताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले यात माझी काय चूक? आणि पार्टीत संपूर्ण वेळ तो मलाच तर न्याहाळत होता. इट मिन्स ही अल्सो इंटरेस्टेड इन मी.”


हृदयावर हात ठेवून तिने संपूर्ण डायरी वाचून काढली. अर्जुन आणि काव्याचे प्रेमप्रकरण, त्यांच्या झालेल्या डेट्स, त्याने दिलेले गिफ्ट्स, अगदी तिच्या गरोदरपणाबद्दल सारेच काही तिने एकदम वर्णनात्मकपणे लिहिले होते. प्रत्येक पानावर नवी तारीख आणि प्रत्येक पानावर नवे किस्से.

वाचताना तिच्या अंगावर कधी शहारे येत होते तर कधी शिसारी. काव्याची ही नवखी बाजू तिला सहन होत नव्हती आणि आई म्हणून अमृताची अवस्था बघवत नव्हती. मात्र ती डायरी वाचताना राहून राहून कुठेतरी पाणी मुरतंय असा गंध तिला येत होता. गेल्या पंधरा वर्षापासून घरात अपंग होऊन व्हीलचेअर वर फिरत असलेली ती लग्नापूर्वी हॅन्डरायटिंग एक्सपर्टकडे कामाला होती याची आठवण झाली आणि मग पाठोपाठ सगळी गडबड तिच्या लक्षात आली.


डायरीमधील प्रत्येक पानावरची तारीख निराळी असली तरी ते लिखाण एकाच दिवशी केले असल्याचे तिला लक्षात आले आणि एक मोठाच धक्का बसला.

“ही डायरी काव्याने एकाच दिवसात लिहून पूर्ण केलीय. मग या तारखा अश्या वेगवेगळ्या का टाकल्या असाव्यात?” अक्षरांचे निरीक्षण करत ती जराश्या मोठ्यानेच स्वतःला म्हणाली.


“व्हॉट? मम्मा तू काय बोलते आहेस?” त्याचवेळी दारात उभ्या असलेल्या अमृताने धक्का लागल्यागत विचारले.


काव्याच्या बॅगमधून कुड्यांचा बॉक्स घेऊन ती वैदेहीकडेच आली होती आणि त्यापासून अनभिज्ञ पाठमोरी असलेली वैदेही डायरीचे सत्य जाणून घेण्यात व्यस्त झाली होती.


या डायरीचे नेमके रहस्य वैदेही आणि अमृताला कळेल का? अमृताने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला असेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all