चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ. भाग-१३

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग-१३


“ही डायरी काव्याने एकाच दिवसात लिहून पूर्ण केलीय. मग या तारखा अश्या वेगवेगळ्या का टाकल्या असाव्यात?” अक्षरांचे निरीक्षण करत ती जराश्या मोठ्यानेच स्वतःला म्हणाली.


“व्हॉट? मम्मा तू काय बोलते आहेस?” त्याचवेळी दारात उभ्या असलेल्या अमृताने धक्का लागल्यागत विचारले.


काव्याच्या बॅगमधून कुड्यांचा बॉक्स घेऊन ती वैदेहीकडेच आली होती आणि त्यापासून अनभिज्ञ पाठमोरी असलेली वैदेही डायरीचे सत्य जाणून घेण्यात व्यस्त झाली होती.


“मम्मा?” हातातील बॉक्स बेडवर ठेवत अमृता वैदेहीकडे पाहत होती.


“अमृता, तुला मी म्हणाले होते ना की काहीतरी गडबड आहे म्हणून? खरंच अगं. या डायरीत खरंच गडबड आहे. ही अक्षरं काव्याची असली तरी लिहून घेणारे कुणी वेगळेच आहे. नाहीतर वेगवेगळ्या तारखा टाकून एकाच दिवसात एवढी सारी पानं ती का लिहिल?” वैदेही अमृताचा हात हाती घेत म्हणाली.


“तुला खरंच असं वाटतं? अर्जुन आणि काव्या यांच्यात तसं काहीच नव्हतं का?”


“कदाचित नसावं. राहिला प्रश्न मला वाटण्याचा तर अमृता मी तुला म्हणाले होते ना की डायरी म्हणजे एखाद्याच्या अंतर्मनाचा आरसा असतो आणि आरसा कधी खोटं बोलत नाही म्हणून. ही डायरी मला खरं तेच सांगू पाहतेय. ते जाऊ दे, तू इतक्यात कशी आलीस? सुमनताईंना चहा ठेवायला सांगू का?” अमृताच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत तिने विचारले.


“नाही गं मम्मा, नको. मला एक काम होतं म्हणून मी आलेय. तुला आठवतं? मागच्या वर्षी माझ्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये तुझा एक हार घातला होता. तो जरा देतेस का?”


अमृता, कुठला हार तो मला आठवत नाहीये. एक काम कर ना कपाट उघडेच आहे तूच बघून घे.”


वैदेहीने असे म्हणताच पडत्या फळाची आज्ञा मानून अमृता कपाटातील सगळे दागिने हुडकू लागली आणि काही वेळातच तिला हवा असलेला हार मिळाला.


“मम्मा, हा हिऱ्यांचा नेकलेस..”


“या कुड्यांना मॅच होतोय ना?” अमृताचे अर्धवट वाक्य वैदेहीने पुरे केले.


“मम्मा? म्हणजे?” अमृताचा आवाज कंप पावत होता.


“म्हणजे तुला वाटतंय तेच.” डोळ्यातील पाणी डोळ्यात हेलकावत वैदेही म्हणाली.


“हे बघ, हे वाच. अर्थात तुझ्यात हिंमत असेल तर.” एक आवंढा गिळून काव्याची दुसरी डायरी अमृताच्या हातात दिली.

तेच पान, जे पहिल्यांदा तिच्या नजरेखाली आले होते त्यावरच अमृताची नजर खिळली.


“..त्यांची ती पहिली नजर.. आणि क्षणात गारद झालेले मी. स्त्रिया चाळीशीत अधिक मोहक दिसतात म्हणे; पण मग पुरुष? त्यांचं हँडसम दिसण्याचं वय कुठलं? कदाचित पन्नाशी. यस! म्हणूनच तर या पन्नाशीत देखील हे इतके जबरदस्त दिसत आहेत. काय त्यांची ती स्टाईल आणि काय त्यांचा तो स्वॅग. अहाहा! द ग्रेट बिझनेसमन मिस्टर राजीव अधिकारी.. बस नाम ही काफी हैं।” वाचताना अमृताला भोवळ येतेय की काय असे वाटत होते. डोके गरगरू लागले तसे ती मटकन बेडवर बसली.


“मम्मा, काव्या आणि डॅड? शी! मला कल्पनाही करवत नाहीये. पहिल्या डायरीत अर्जुनबद्दल लिहिलेले जसे खोटं होते तसे हेदेखील खोटं असेल गं.” तिच्या डोळ्यातून धारा बरसू लागल्या होत्या.


“कदाचित खोटं असतं तर मलाही आनंदच झाला असता; पण दुर्दैवाने तसे नाहीये.”


“मम्मा..”


“असो, दे ती डायरी. पुढे लिहिलेले तुझ्याच्याने वाचले नाही जाणार.” तिच्या हातून डायरी घेण्याचा प्रयत्न करत वैदेही.


“नाही गं. मला आता पूर्णपणे कळायलाच हवं.” डायरीवरची पकड घट्ट करत अमृताने पुढचे पान उलटले.


“त्यांचा तो स्पर्श.. एक वेगळीच नजाकत, वेगळीच जादू होती त्या स्पर्शात. यापूर्वी कित्येकदा आम्ही एकत्र आलेलो पण आजचं एकत्र येणं खूप स्पेशल होतं. आमच्या नात्याला आज वर्ष पुरं झालंय त्याचा तो सोहळा आणि त्यासाठी गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेल्या या हिऱ्याच्या कुड्या आणि बिंदी. नेकलेस मीच अव्हेरला. म्हटलं, तुमच्या बायकोला तो ठेवून घ्या. तसेही बिचाऱ्या दिवसभर व्हीलचेअरवर असतात. बसल्याबसल्या गळ्यात घातलेला हार तरी न्याहाळत बसतील.


असो, आज मी किती आनंदी होते. अंगावर ल्यालेली त्यांच्या आवडत्या लाल रंगाची डिझायनर साडी आणि हे हिऱ्याचे दागिने.. माझी मलाच दृष्ट लागते की काय असे वाटत होते. मात्र त्यांच्या नजरेत नजर जाताच मी हे विसरून गेले. मी माझी उरलेच कुठे होते? केव्हाच त्यांच्या मिठीत विरघळून गेले होते.”

वाचता वाचता अमृताचा श्वास कोंडल्यासारखा होऊन छाती जड आली होती.


“अमृताऽऽ”


“मम्मा, हे सारं खोटं आहे गं. डॅड.. डॅड असं कधीच वागणार नाहीत. त्यांचा काव्यावर जीव होता कारण ते तिला मुलीसारखं मानत होते गं. ते तुझ्याशी कधीच प्रतरणा करणार नाहीत. मी काय म्हणतेय ते कळतंय ना गं तुला?” डायरी बाजूला ठेवून अमृताने वैदेहीचे हात घट्ट पकडले.


“अमृता, सत्य समोर असताना खोटं कसं स्वीकारायचं गं? हा हिऱ्यांचा सेट, तिच्या बॅगमध्ये असलेल्या डिझायनर साड्या, महागडे गिफ्ट्स, ब्रँडेड वस्तू.. राजीवची चॉईस माझ्याशिवाय आणखी कोण चांगलं ओळखू शकतं?” वैदेहीच्या डोळ्यातील अश्रू अमृताच्या हातावर विसावले.


“नो मम्मा, ती मुलगी आपल्याला फसवतेय. डॅडना बदनाम करायला ती मुद्दाम असं वागतेय. डॅड असं कधीच करणार नाहीत हे मला ठाऊक आहे गं. त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे.” अमृता तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


“आणि त्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही हे केवळ त्याच्या मनाला ठाऊक आहे.”


“मम्मा, हे काव्याने आखलेले चक्रव्यूह आहे गं. तिने आपल्याला यात अडकवलंय.”


“अमृता, तिने अडकवलंय की नाही ते ठाऊक नाही; पण हे चक्रव्यूह म्हणजे आपल्या आयुष्याची काळी बाजू आहे हे तुला कळतंय का? द डार्क साईड ऑफ अवर लाईफ.” तिचा स्फूट हुंदका बाहेर पडला.


तिने दोन्ही डायऱ्या जवळजवळ ठेवल्या. ‘चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.’ दोघांचे मिळून एक नवेच नाव तयार झाले होते. आयुष्याची ही काळी बाजू अश्या रीतीने समोर येईल असे तिने स्वप्नात तरी कुठे कल्पले होते?


“मम्मा, काव्या आणि अर्जुन दोघं मिळून आपल्याला डॅडविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही होऊ शकते ना गं?” अमृता आशेने वैदेहीकडे पाहत म्हणाली.


“अमृता, तुला अजूनही असंच वाटतंय?” वैदेहीने तिलाच उलट प्रश्न केला.


“मम्मा, काव्या माझी मैत्रीण होती अगं.” डोक्यावर हात ठेवून अमृता हुंदके देऊ लागली.


आत्ताआत्ता कुठे तिने काव्या आणि अर्जुनचे नाते स्वीकारले होते तर आता भलतेच काहीतरी बाहेर आले होते. तिचे लाडके डॅड, ज्यांच्याबद्दल ती एक अपशब्दही कधी ऐकून घ्यायला तयार नव्हती त्याचे असे काव्याशी असलेले संबंध तिला अजूनही पचायला जड जात होते.


“मैत्रीण?” वैदेही मंदशी हसली.


“तुझ्याच मैत्रिणीने बघ काय लिहिलेय.” डायरीचे पुढचे पान उघडत ती म्हणाली.


“अमृता.. गोड आहे; पण भोळी आहे जराशी. भोळी काय? कंप्लिट मूर्ख आहे ती. तिला तिच्या डॅडबद्दल केवढा अभिमान आहे? माझे डॅड, यवं नि माझे डॅड त्यवं. सारखी त्यांच्याबद्दल सांगत असते. तिचे डॅड माझे शुगर डॅड आहेत हे कळल्यावर तिला काय वाटेल?

शुगर डॅड! किती गोड शब्द आहे नाही? अगदी राजीवसारखाच. त्यांनी माझ्या आर्थिक गरजा पूर्ण करायच्या आणि मी त्यांच्या शारीरिक गरजा शमवायच्या एवढं सोपं आहे हे. पण आताश्या मला त्यांच्या बद्दल ओढ वाटू लागलीये. माझ्या पोटात वाढणाऱ्या अंकुरामुळे हे वाटत असेल का? द ग्रेट राजीव अधिकारी माझ्या बाळाचे डॅड.. नुसत्या विचारानेच अंगावर कसा शहारा येतोय!”


“केवळ अशक्य..” डायरी खाली फेकत अमृताने चेहरा झाकून घेतला. तिचा श्वास गुदमरायला लागला होता.


“अमृताऽऽ”


“मम्मा, हे शुगर डॅड वगैरे काय आहे? माझे डॅड तसे नाहीत गं.” तिचे हुंदके थांबता थांबत नव्हते.


“हे तर आपल्याला राजीव किंवा काव्या दोघेच सांगू शकतील.” तिचे डोळे पुसत वैदेही म्हणाली.


“मी.. मी डॅडना कॉल करू का? करतेच.” मोबाईल हातात घेत अमृता म्हणाली.


“नाही गं मम्मा, डॅड असे करूच शकत नाही. काव्याने खोटं लिहिलेय गं. आय हेट हर. आय हेट हर.” हातातील मोबाईल फेकून देत ती तिच्या खोलीकडे पळत गेली.


“अमृताऽऽ” वैदेही हताशपणे दाराकडे पाहत होती.


तिला बसलेला धक्का तिलाच सहन होत नव्हता त्यात अमृताला कसे सावरायचे हे तिला कळत नव्हते. डोळ्यातील अश्रू पुसत ती खोलीतील पसारा आवरण्याचा प्रयत्न करू लागली.

________

हॉस्पिटलमधील बेडवर निपचित पडलेल्या अमृताचा हात हातात घेतलेल्या वैदेही कालचा प्रसंग आठवून डोळे पुसत होती. काल तिच्या खोलीतून गेलेल्या अमृताचे तिच्या खोलीत पळत जाणे आणि त्यानंतर तिचे बाहेर न येणे हे ही तिला आठवले.


चहासाठी म्हणून सुमनताईला तिने अमृताला बोलवायला पाठवले होते आणि अमृताच्या खोलीत गेलेली सुमनताई ओरडतच बाहेर आली. अमृताच्या तोंडातून फेस बाहेर येत होता आणि बाजूला डॉक्टर शशांकने दिलेल्या गोळ्यांची रिकामी बाटली पडून होती. तिने तातडीने राजीवला फोन करून अमृताला ॲडमिट करून घेतले आणि आज सकाळीच मधुरला कॉल करून काव्याला इकडे घेऊन येण्याची विनवणी केली.


“अमुऽऽ”

कानावर आवाज येताच वैदेहीने मागे वळून पाहिले. बघितले तर दारात काव्या उभी होती.


“अमुऽऽ” काव्या धावतच अमृताजवळ येऊन उभी राहिली. तिला त्या अवस्थेत बघून तिचे डोळे भरून आले आणि तिचा हुंदका बाहेर पडला. तिच्या छातीवर डोके ठेवून ती रडायला लागली होती.

“परत तीच कहाणी,
परत डोळ्यात पाणी.
दरवेळी त्याच वाटा,
दरवेळी त्याच ठेचा.
रक्ताळलेल्या मनाला
आणिक किती टोचाव्यात काचा?” तिचे मन वेदनेने आक्रन्दून गेले होते.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________

🎭 Series Post

View all