चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -१४

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग-१४

“अमुऽऽ” काव्या धावतच अमृताजवळ येऊन उभी राहिली. तिला त्या अवस्थेत बघून तिचे डोळे भरून आले आणि तिचा हुंदका बाहेर पडला. तिच्या छातीवर डोके ठेवून ती रडायला लागली होती.

“परत तीच कहाणी,
परत डोळ्यात पाणी.
दरवेळी त्याच वाटा,
दरवेळी त्याच ठेचा.
रक्ताळलेल्या मनाला
आणिक किती टोचाव्यात काचा?” तिचे मन वेदनेने आक्रन्दून गेले होते


“अमुऽऽ आय एम सॉरी. का केलंस यार असं?” गलबलून आलेल्या तिच्या ओठातून कसेबसे शब्द बाहेर पडत होते.

‘सपाकऽऽ’
तेवढ्यात एका आवाजासरशी एक जोरदार थप्पड तिच्या गालावर पडली.

“माझ्या मुलीपासून दूर राहायचं. तिला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली?” तिच्या गालावर पाचही बोटे उमटवत वैदेही डोळ्यात अंगार घेऊन विचारत होती.

“आँटी, माझं एकदा ऐकून तर घ्या.”

“काय ऐकून घेऊ? तू प्रेग्नन्ट होतीस आणि त्याला जबाबदार राजीव होता हे ऐकून घेऊ?”

“आँटी?”

“तुझ्या पोटातील बाळ राजीवचेच होते ना?” तिच्या दोन्ही खांद्याना पकडून हलवत वैदेही म्हणाली.

“बोल ना.” काव्याने खाली मान करताच ती जोरात गरजली.

“अं? हो..” डोळे गच्च मिटून घेत तिने हुंकार भरला.

“मम्मा.. ती खोटं बोलतेय. डॅड असं नाही करणार.” काव्याच्या स्पर्शाने हळूहळू शुद्धीत येत असलेली अमृता तिच्या ग्लानीत बडबडत होती.


__________


“डॉक्टर मधुर, स्वतःला काय हिरो समजतोस काय? त्या दिडदमडीच्या पोरीला इथे घेऊन यायची काय गरज होती? आणले ते आणलेस, वर माझ्याशीच हुज्जत घालून तिला अमृताला भेटायला आत सोडलेस? कोण? समजतोस कोण तू स्वतःला? तिला बघून अमृताला काही झाले ना तर तिचे काय करायचे ते मी करेनच; पण तुलाही सोडणार नाही.” राजीव रागाने मधुरचे कॉलर पकडत म्हणाला.


“अमृताला बरे होण्यासाठी काव्याचे इथे येणे आवश्यक होते हे तुम्हालाही ठाऊक आहे आणि प्लीज हे असे कॉलर वगैरे पकडून आपल्या सभ्यतेची रेषा नका ओलांडू.” त्याच्या हातून कॉलर सोडवून घेत मधुर म्हणाला.


“राजीव काय करतोस? हे हॉस्पिटल आहे अरे.” डॉक्टर शशांकदेखील मध्ये पडले.


“सिस्टरऽऽ” तेवढ्यात अमृताच्या खोलीतून बेल वाजण्याचा आणि पाठोपाठ वैदेहीच्या ओरडण्याचा आवाज आला.


“वैदू, काय झाले?” तिच्या आवाजाने राजीव लगेच आत गेला आणि त्याच्या मागे नर्सदेखील धावत गेली.


“सिस्टर, अमृताला शुद्ध येतेय. प्लीज डॉक्टरांना बोलवा.” वैदेही नर्सकडे पाहत म्हणाली.


“डॅ-ड.. डॅ-ड..” जड आवाजात अमृता एकेक शब्द उच्चारत होती.


“हो बाळा, मी इथेच आहे.” तिच्या माथ्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत राजीव म्हणाला.


“खबरदार तिला स्पर्श करशील तर.” वैदेहीने त्याचा हात तसाच झिडकारून लावला.


“काय सुरु आहे इथे? पेशंटची कंडिशन नाजूक आहे आणि अश्या अवस्थेत इथे गर्दी का करताय? डॉक्टर शशांक तुम्हीतरी सांगा ना.” डॉक्टर आत येत म्हणाले.


“मधुर, काव्या चला आपण बाहेर थांबू या.” शशांक डोळ्यांनी खुणावत म्हणाले.


“नाही, काव्या इथेच थांबेल. राजीव तू बाहेर गेलास तरी चालेल.” खोलीबाहेर जायला निघालेल्या काव्याला अडवत वैदेही म्हणाली.


“शशांक, बघितलंस वैदुसाठी ती वेडी मुलगी जवळची वाटायला लागली.” बाहेर येत भिंतीवर मूठ आपटत राजीव म्हणाला.


“काव्या इज ॲब्सुलुटली फाईन. ती वेडी नाहीये.” मधुर मध्येच बोलला.


“तू तर गप्पच राहायचं, कळलं ना?” राजीव त्याच्यावर धावून जात म्हणाला.


“राजीव, शांत हो. काव्या आली आणि तिच्या येण्याने अमृता शुद्धीवर आली हे आपल्याला नाकारता येणार नाहीये. अमृताला जरा बरं वाटू दे त्यानंतर काव्याचे काय करायचे ते बघता येईल आणि मधुर तू आता गेलास तरी बरं होईल. हा राजीवच्या फॅमिलीचा प्रश्न आहे तेव्हा तू इंटरफिअर करू नकोस.” शशांकने राजीवला शांत करत मधुरला दम भरत म्हटले.


“सॉरी सर. पण जोवर काव्या इथे आहे मला जाता येणार नाही. मी तिला माझ्या रिस्कवर घेऊन आलोय त्यामुळे तिला एकटं सोडून जाणं माझ्या तत्वात बसत नाही.” मधुर नम्रपणे उत्तरला.


“मधुर, तू एक डॉक्टर आहेस. असं प्रत्येक पेशन्टशी वैयक्तिकपणे जोडल्या गेलास तर कसं होईल? आपले प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगवेगळे असतात हे विसरू नकोस.”

“शशांक सर, मी काव्याच्या प्रेमात वगैरे पडलोय असं नाहीये. माझ्या प्रोफेशनल इथिक्सनुसारच मी वागतो आहे. काव्याला सोबत घेतल्याखेरीज मी इथून जाणार नाही.” बाहेरच्या बाकावर फतकल मांडून बसत तो मंद हसला.

________


“अमृता बरं वाटतंय ना?” डॉक्टर तिला चेक करत विचारत होते. उत्तरादाखल तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले.

“नाऊ एव्हरीथिंग इज ओके. काळजीचे काही कारण नाहीये. खरं तर तू तुझ्या मम्माला काळजीने पार हैराण करून टाकलं होतंस. यापुढे असं वागायचं नाही बाळा.” तिच्याकडे बघून ते स्मित करत म्हणाले.


“बाय द वे, ही कोण?” काव्याकडे लक्ष जाताच त्यांनी विचारले.


“मैत्रीण आहे.” वैदेहीचे अडखळत उत्तर.


“बेस्टी आहोत आम्ही. कितीही काही झालं तरी एकमेकांची साथ कधीच सोडत नाही.” अमृताच्या डोक्यावरून बोटे फिरवत काव्या म्हणाली.


“ग्रेट! खरी मैत्री अशीच असते. तू आलीस नि बघ अमृता शुद्धीवर आली. तुमच्या पक्क्या मैत्रीचा दाखलाच आहे हा. अमृता यू आर लकी वन की तुला अशी बेस्टी मिळाली. बरं, मॅडम हिला काही खायला प्यायला देऊ शकता. फक्त सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार करून तिला त्रास होईल असं वागू नका. आराम करू द्या.” डॉक्टर वैदेहीला समजावत बाहेर निघून गेले.


“काव्या..” आपला हात हळूवारपणे वर नेत अमृताने माथ्यावर असलेला काव्याचा हात पकडला.


“का वागलीस असं?” त्याही अवस्थेत तिच्या डोळ्यातील धूमसणारा राग स्पष्ट जाणवत होता.


“अमु, तू आधी बरी हो. आपण या विषयावर नंतर बोलूया.” काव्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


“नाही, मला आताच ऐकायचे आहे. माझे डॅड माझा अभिमान आहेत आणि तू त्याच अभिमानाला ठेचाळलंस. ज्यांच्याबद्दल मी एक शब्दही चुकीचा ऐकू शकत नाही, आज तू त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केलंस. का वागलीस अशी? माझी बेस्टी म्हणवतेस ना स्वतःला? मग का पाठीत खंजीर खूपसलंस अगं?”


“अमुऽऽ”


“मैत्रीण नाहीयेस तू माझी. तू फक्त माझा वापर केलाहेस ना? माझ्या भोळेपणाचा फायदा उचललास. कश्यासाठी तर काही पैश्यांसाठी? काव्या अगं एकदा तू मला म्हणाली असतीस ना की तुला आर्थिक गरज आहे, माझ्यासारखं शानशौकतीत जगायचं आहे तर तुझ्यापुढे पैश्यांची रास उभी केली असती गं; पण तू त्यासाठी डॅडना तुझ्या नादी लावलंस? आणि वर काय नाव दिलंस.. शुगर डॅड! एवढी नीच, इतक्या खालच्या पातळीला तू गेली असशील असं मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता गं.” तिचा श्वास खोल जायला लागला.


“तुला त्रास होतोय अमु. आपण बोलूयात ना नंतर. तू म्हणशील ते, तुला हवे असेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. फक्त आत्ता नको ना गं हे सगळं.” काव्याच्या डोळ्यातील पाणी तिच्या गालावर उतरले.


“मला आत्ताच सगळं ऐकायचंय. तुझ्यामुळे जो त्रास मला होतोय ना त्यापुढे हा शारीरिक त्रास काहीच नाहीये अगं. आणि हे डोळ्यात अश्रू वगैरे आणू नकोस. तुझ्या या मगरीच्या खोट्या अश्रुंनी मला काहीच फरक पडणार नाहीये.” तिचा हात जोराने झिडकारत ती किंचाळली.


“आऽह!” हातात सलाईनचा स्टॅंड लागून वेदेनेने काव्या कळवळली.


“अमृता, काय हा वेडेपणा चाललाय? तू थोडेसे काही खाऊन आराम कर बघू. काव्या, तुझी इथे काहीच गरज नाहीये तुझ्यामुळे तिला त्रास होतोय हे कळतंय ना?” डॉक्टर शशांक आत येत म्हणाले. राजीव आणि मधुरदेखील आत येऊन उभे राहिले.


“माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याखेरीज ती कुठेही जाणार नाही. शशांक अंकल यात तुम्हीही शामिल आहात ना? तुम्हाला ही सगळं काही ठाऊक होतं, हो ना? तुम्हीसुद्धा माझ्याशी चिट केलंत.”


“अमृता, कशाबद्दल बोलतेस? अगं काव्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल तर मला मागच्या आठवड्यात कळलं गं. बाकी ती प्रेग्नन्ट होती एवढंच मला ठाऊक होतं. तुझी मैत्रीण म्हणून मी राजीवला सहकार्य करत होतो बस, एवढंच. मला काय माहिती होतं की ही मुलगी मैत्रीच्या नावाखाली तुलाच फसवत आहे म्हणून.” शशांक शांतपणे म्हणाले.


“मी कुणालाही फसवलं नाहीये. डॉक्टर मधुर, तुम्ही तरी हे जाणता ना?”


“हम्म. मला माहिती आहे; पण काव्या जे आहे ते तुलाच स्पष्ट करून सांगायचे आहे.” एकटे पडलेल्या काव्याच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवत मधुर म्हणाला.


“हो. ही माझी लढाई होती, ती मलाच लढावी लागेल. अमु, वैदेही आँटी, डॉक्टर शशांक तुम्हाला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे ना? तर ऐका.. मिस्टर राजीव अधिकारी आणि मी रिलेशनमध्ये होतो. गेली अडीच वर्ष हे संबंध सुरु आहेत. ही इज माय शुगर डॅड!” एक दीर्घ श्वास घेत तिने तिची नजर राजीववर स्थिरावली.

काय आहे हे शुगर डॅड प्रकरण? आणि काव्या अशी का वागली? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all