चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -१५

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा.
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग-१५

“हम्म. मला माहिती आहे; पण काव्या जे आहे ते तुलाच स्पष्ट करून सांगायचे आहे.” एकटे पडलेल्या काव्याच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवत मधुर म्हणाला.


“हो. ही माझी लढाई होती, ती मलाच लढावी लागेल. अमु, वैदेही आँटी, डॉक्टर शशांक तुम्हाला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे ना? तर ऐका.. मिस्टर राजीव अधिकारी आणि मी रिलेशनमध्ये होतो. गेली अडीच वर्ष हे संबंध सुरु आहेत. ही इज माय शुगर डॅड!” एक दीर्घ श्वास घेत तिने तिची नजर राजीववर स्थिरावली.


“राजीव? ही काय बोलतेय? शुगर डॅड? माझा विश्वासच बसत नाहीये.” राजीवकडे पाहत शशांक आश्चर्याने म्हणाला.


“ए, तुला लाज कशी वाटत नाही गं? त्या अर्जुनसोबत गुलछर्रे उडवलेस आणि आता माझं नाव समोर करतेस? नीच मुली, माझ्याशी नाव जोडायची तुझी लायकी तरी आहे का? राजीव अधिकारी आहे मी. अमृता इंडस्ट्रिजचा मालक..”


“माहितीये मला.” तिच्यावर त्याने उचललेला हात घट्ट पकडत काव्या त्याचे वाक्य तोडत म्हणाली.


“राजीव अधिकारी.. द ग्रेट राजीव अधिकारी! अमृता इंडस्ट्रिजचे मालक, सर्वेसर्वा. करोडोंची संपत्तीचे ओनर. एक दिलदार व्यक्तिमत्व. कुणालाही मदत करण्यास कायम तत्पर असणारे, स्वतःच्या अब्रूला जपणारे राजीव अधिकारी.” त्याचा हात खाली घेऊन शर्टवरच्या रेघा नीट करत ती पुढे बोलू लागली.


“ही तुमची ओळख साऱ्या जगाला ठाऊक आहे. तुमच्या या स्वच्छ, शुभ्र सदऱ्यासारखीच स्वच्छ प्रतिमा तुम्ही उभी केलीत; मात्र त्या प्रतिमेपलीकडचा तुमचा काळा चेहरा जगापुढे कधी येऊच दिला नाहीत, तोच आज सर्वांना मी दाखवणार आहे आणि हो, त्यासाठी माझ्या लायकीची गरज नाही. कारण तुम्ही जे केलेत ना त्याची लायकी याहीपेक्षा खालच्या पातळीची आहे.” ती चेहऱ्यावर स्थिर भाव ठेवत म्हणाली.


“काय बोलतेय ही मुलगी? हिला कोणीतरी आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. मधुर, तू हिला इथे आणलेस ना? ताबडतोब घेऊन जा इथून. माझी मुलगी, माझी बायको आणि माझ्या मित्रासमोर असे काही बोलायला काहीच कसं वाटत नाही? अमृताला त्रास होईल याचीही काळजी वाटत नाहीये का?” राजीव रागात म्हणाला.


“अमृताची काळजी तू करू नकोस. या खोलीत दोन-दोन डॉक्टर्स असताना कसली आली काळजी? आणि काही झालं तरी आपण हॉस्पिटलमध्येच आहोत. अन् काय रे? असले चीप चाळे करताना तुला आमच्याबद्दल काही वाटले नाही आणि आता ती सांगतेय ते ऐकून घ्यायला का त्रास होतोय?” वैदेही त्याच्याकडे पाहत म्हणाली.


“वैदू, तू सुद्धा? तुलाही माझ्यावर संशय येतोय? एक मिनिट.. अमृता, बेटा तुलाही तुझी मैत्रीण म्हणावणारी मुलगी जे बोलतेय ते खरं वाटतंय?” त्याच्या प्रश्नाने अमृताच्या ओठातून हुंदका बाहेर पडला.


“बघितलंस? तुझ्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नाहीये आणि मुख्य म्हणजे मला काही प्रूव्ह देखील करायचे नाहीये. आता निघ इथून आणि माझ्या मुलीला आराम करु दे.”


“माझ्याकडे पुरावे आहेत. एक, दोन नाही तर खूप सारे. जे तुमच्या चेहऱ्यावरचा हा साळसूदपणाचा मुखवटा क्षणात बाजूला सारून खरा चेहरा समोर आणेल. बाहेर मीडियाला बोलावून हे सगळं मी सांगावं असं तुम्हाला वाटतं का?” तिच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता.


“मला ब्लॅकमेल करते आहेस? शशांक अरे, तू तरी काही बोल ना. पोलीस.. पोलिसांना फोन कर आणि हिला इथून घेऊन जायला सांग. शशांकऽऽ” तो डॉक्टर शशांकवर गरजला.


“मी सुन्न झालोय राजीव. कोण बरोबर नि कोण चूक मलाच ठरवता येत नाहीये.” डॉक्टर शशांक डोक्याला हात लावत म्हणाले.


“पोलिसांना कॉल करण्याची तसदी तुम्ही घेऊ नका. त्यांना आम्ही सोबत घेऊन आलोय. हॉस्पिटलबाहेर त्यांची गाडी उभी आहे.” काव्या शांतपणे म्हणाली.


“काव्या, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे सांग ना. माझा जीव गुदमरतोय.” अमृता.


“काय सांगायचं म्हणतेस? ती काहीही सांगेल आणि..”


“राजीव, ती डायरी आम्ही दोघींनी वाचलीय. तिला दिलेले गिफ्ट्सही बघितलेय. हा हिऱ्यांचा सेट ज्यातील हार माझ्याकडे आणि कानातले तिच्याकडे होते हे तरी तूच दिलेले आहेस हे मान्य करशील ना?” त्याचे वाक्य मध्येच थांबवत वैदेहीने हिऱ्यांच्या कुड्याचा बॉक्स त्याच्यासमोर दाखवताच काही न सुचून तो गप्प बसला.


“तुझं शांत असणं यातच सगळं काही क्लिअर आहे; पण तरी मला एकदा तुमच्या दोघांच्या तोंडून नक्की काय आहे ते ऐकायचे आहे. तू ना सही; पण काव्या तू तरी सांगशील ना?” वैदेही.


“हे मला सांगायचे होते; पण ते अश्यारीतीने समोर येऊ द्यायचे नव्हते. आय एम सॉरी अमु. माझ्यामुळे तुला हे सफर करावे लागले. तुला वाटतं तशी नाहीये गं मी. केवळ पैश्याच्या हव्यास्यापोटी मी असे वागले असेल असं तुला वाटतं का? या दोन वर्षात तू मला एवढंच ओळखलंस?” अमृताजवळ येत काव्या मृदू स्वरात म्हणाली तसे अमृताने नजर बाजूला फिरवली.


“प्रस्तावना नकोय. मला फक्त सत्य ऐकायचं आहे. तू माझ्याशी मैत्री केवळ स्वार्थापोटी केलीस ना?” तिच्या डोळ्यातील ओहोळ वाहायला लागला.


“नाही. ती मैत्री एक अपघात होता. योगायोगाने झालेली मैत्री होती ती; पण बिलीव्ह मी, तुझ्यासारखी मैत्रीण आजवर मला कधीच मिळाली नाही, मिळणारही नाही.” काव्या डोळे पुसत उत्तरली.


“राजीवला पहिल्यांदा त्याच्या बड्डे पार्टीमध्येच भेटलीस ना? की..” वैदेहीने डायरेक्ट मुद्द्यात हात घातला.


“नाही. मी त्यांना त्यापूर्वीच भेटले होते. त्यांच्या त्या पार्टीपूर्वीपासूनच आम्ही रिलेशन मध्ये होतो.” ती म्हणाली तसे अमृताने घृणापूर्ण नजरेने तिच्याकडे पाहिले.

“त्या आधी किती वर्षांपासून?” कापऱ्या आवाजात वैदेहीने विचारले.


“त्या आधी त्यांना प्रत्यक्षात भेटण्यापूर्वीपासूनच मी त्यांना भेटले होते. माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून.”


“आता ही काहीही स्टोरी बनवेल आणि तुम्ही ती खरी मानाल?” ती म्हणाली तशी राजीवची कुणकुण सुरु झाली.


“ही कुठलीही रचलेली स्टोरी नाहीये तर ही कहाणी आहे माझ्या बाबांची. एका चक्रव्यूहात अडकवलेल्या सज्जन अन् पापभिरू माणसाची. त्या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर पडताच आलं नाही आणि शेवटी त्यांनी विषाची बाटली जवळ केली. अमु, जेव्हा मला कळलं ना की तू आत्महत्येचा प्रयत्न केला आहेस, जेव्हा मी तुला या बेडवर डोळे मिटून निपचित पडलेल्या अवस्थेत पाहिले ना तेव्हा मला माझे बाबा आठवले गं. त्यांची काही चूक नसताना जसा त्यांचा नाहक बळी गेला तसाच तुझाही बळी जातोय असं वाटलं. चक्रव्यूहाचा हा खेळ खेळताना मला कुणाचा निष्पाप बळी द्यायचा नव्हता गं.” तिने हातांच्या ओंजळीत स्वतःचा चेहरा झोकून दिला.


“खेळ?” वैदेही विस्मयाने उद्गारली.


“बघ ना वैदू, ही मुलगी आपल्या सगळ्याशी खेळ खेळली आणि तुम्ही सगळे ते खरं मानत आहात.” राजीव आपण कसे खरे आहोत ते पटवून द्यायचा प्रयत्न करत म्हणाला.


“हो खेळले मी खेळ. मिस्टर राजीव अधिकारी, मी खेळच खेळत आले होते. मला माझ्या बाबांच्या मृत्यूचा बदला हवा होता. माझ्या बाबांना ज्या चक्रव्यूहात तुम्ही अडकवलं त्याचाच धागा पकडून मीही मग एक डाव टाकायचा निर्धार केला.

माझे बाबा, आमच्या घराचा एकुलता एक आधार गमावला म्हटल्यावर माझ्याकडे आणखी गमवायला दुसरं काहीच उरलं नव्हतं. मग मांडला मी लिलाव माझ्या शरीराचा, माझ्या अब्रूचा. स्वतःच्या देहाला प्यादं बनवलं आणि टाकली उडी तुमच्या शुगर डॅडच्या खेळाच्या जाळ्यात.

दोन पैश्यांच्या बदल्यात तुम्हाला मी माझं शरीर अर्पण केलं. तुम्हाला नेहमीप्रमाणे जिंकण्याचा आनंद लुटू दिला. ते सगळं करताना स्वतःची किळस वाटायची मला. मात्र दरवेळी स्वतःची समजूत घालून नव्याने तयार होत गेले. कारण मला जिंकायचं होतं. तुमचा हा चेहरा जगापुढे आणायचा होता.”


“कसल्या असभ्य भाषेत बोलत आहेस काव्या? आणि खरंच अविश्वसनिय आहे गं हे. राजीवला मी जेवढा ओळखतो, त्यावरून तो असा असेल हेच मनाला पटत नाहीये.” असह्य होऊन डॉक्टर शशांक मध्येच म्हणाले.


“डॉक्टर शशांक आता तुमच्या सारख्या सभ्य लोकांना आणखी कुठल्या भाषेत सांगायचं? आणि राहिला ओळखण्याचा प्रश्न तर ज्या माणसाला त्यांची बायको आणि मुलगीच ओळखू शकली नाही तर तुमचं काय? मित्र असलात तरी परकेच आहात की तुम्ही.” ती छद्मी हसली.


“या सगळ्यात तुझ्या बाबांचा नि माझ्या डॅडचा काय संबंध? कसल्या बदल्याबद्दल तू बोलते आहेस?” इतकावेळ निमूटपणे ऐकत असलेली अमृता म्हणाली.


“अमु, आज सगळंच सांगणार आहे मी. कुठल्याही खोटेपणाची साथ न घेता, कुठलाही आडपडदा न ठेवता; पण तू विश्वास ठेवशील ना गं?”

अमृताचा हात हातात घेत भावूक होत काव्याने विचारले आणि नकळतपणे अमृताच्या हाताची पकड घट्ट झाली.

काय असेल काव्याच्या वडिलांचा आणि राजीवचा संबंध? ती कसल्या चक्रव्यूहाबद्दल बोलतेय वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all