चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -१६

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग-१६


“या सगळ्यात तुझ्या बाबांचा नि माझ्या डॅडचा काय संबंध? कसल्या बदल्याबद्दल तू बोलते आहेस?” इतकावेळ निमूटपणे ऐकत असलेली अमृता म्हणाली.


“अमु, आज सगळंच सांगणार आहे मी. कुठल्याही खोटेपणाची साथ न घेता, कुठलाही आडपडदा न ठेवता; पण तू विश्वास ठेवशील ना गं?”

अमृताचा हात हातात घेत भावूक होत काव्याने विचारले आणि नकळतपणे अमृताच्या हाताची पकड घट्ट झाली.


“पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावर माझं गाव. खेडेच म्हण ना हवंतर. तसे घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती; पण एकदम वाईट देखील नव्हती. एक एकराचा जमिनीचा तुकडा आणि त्यावर जगणारं आमचं कुटुंब. आई, बाबा मी आणि माझ्या पाठीवर आणखी दोन भावंड. म्हटलं तर तसं बरं चाललं होतं.


मी दहावी झाले आणि त्या वर्षी लहान भाऊ आजारी पडला. पडला तो पुन्हा उठलाच नाही. त्याच्या आजारपणात घरातील होते नव्हते सगळे सामान विकण्यात गेले. एकरभर जमीन तिही बाबानं विकली. अचानक घरावर सगळी अवकळा पसरली होती.

माझं बारावीचे वर्ष. सगळं बाजूला सारून जिद्दीने अभ्यासाला लागले. तशी हुशार होते. बाबांना वाटायचे मी इंजिनियर व्हावे. त्यांचे स्वप्न माझे कधी झाले मला कळलंच नाही. आईला वाटायचं की बारावीनंतर मी शिक्षिका होऊन घरात हातभार लावावा; पण बाबा मात्र माझ्या मागे खंबीरपणे उभे होते.


अमु, तुझे डॅड तुझा अभिमान आहे म्हणतेस ना? माझे बाबा देखील माझा अभिमान होते गं. त्यांच्या डोळ्यात मी कायम माझ्यासाठी मोठमोठी स्वप्नं पाहिली; पण त्या एका घटनेने माझ्यासाठी स्वप्नाने भरलेले डोळे कायमचे मिटल्या गेले.” बोलता बोलता तिचा आवाज कापरा झाला.


“काय झाले होते?” अमृताचा प्रश्न बाहेर पडला.


“त्यांनी मृत्यूला कवटाळले होते. शेतात पिकावर फवारणीसाठी वापरणाऱ्या विषाची बाटली त्यांनी जवळ केली.”


“का पण?”


“काहीच कळलं नाही. पोलिसांनी कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या म्हणून केस क्लोज केली. माझा विश्वास बसला नसला तरी दिसायला तसेच चित्र होते. स्वतःचा जमिनीची तुकडा विकून दुसऱ्याच्या शेतात राबणे, त्याचा योग्य मोबदला न मिळणे,सतत पैश्यांची चणचण जाणवणे यामुळे त्यांनी खरंच आत्महत्या केली असावी असे एक मन म्हणत होते. तर माझे बाबा एवढे तकलादू नाहीत असं दुसरं मन सांगत होतं.


आत्महत्येच्या दोन दिवसापूर्वीच ते पुण्यात आले होते आणि सायंकाळी त्यांनी एका मोठ्या इंडस्ट्रीमध्ये रात्रपाळीत वॉचमन म्हणून काम मिळाल्याचे शेजारी फोन करून माझ्याशी बोलले होते. मात्र जेव्हा ते परतले तेव्हा काहीसे शांत वाटले आणि ते काम करणार नसल्याचे सांगितले. त्याचे आम्हाला फारसे काही वाटले नाही कारण वर्षभरापासून असे अनेकवेळा झाले होते.”


“मग त्यात राजीवचा काय संबंध? नोकरी मिळाली नाही, अंगावर कर्जाचे ओझे. त्यामुळेच त्यांनी मृत्यूला जवळ केले असावे.” शशांक एकदा राजीव आणि एकदा कव्याकडे पाहत म्हणाला.


“तेच तर. मन मानायला तयार नसले तरी नकळत सगळ्यांसोबत मीही तेच स्वीकारले होते. माणूस गेला तर दुःख होतं पण आयुष्य थांबत नाही, तसेच आमचे जगणे सुरु होते. महिन्याभरात माझा बारावीचा निकाल आला. चांगले मार्क्स मिळाले. बाबांचे स्वप्न विसरून मी आई म्हणाली तसे मोन्टेसरीचा कोर्स करायला तयार झाले आणि एक दिवस माझे सगळे कागदपत्र चाळत असताना मला बाबांची ती चिठ्ठी दिसली.”


“कसली चिठ्ठी?” त्यांचा पुढचा प्रश्न.


“त्यांच्या गळालेल्या अवसानाची. त्यांच्या मृत्यूच्या खऱ्या कारणाची. कर्जापायी बाबांनी मृत्यूला कवटाळले नव्हते तर स्वतःच्या मलीन होणाऱ्या प्रतिमेच्या भीतीपायी त्यांनी जीव दिला होता. गरीब असले तरी त्यांनाही त्यांच्या त्यांच्या प्रतिमेची काळजी होती. फरक एवढाच होता की तुमच्यासारखी श्रीमंत माणसं पैश्यांच्या जोरावर आपली प्रतिमा डागाळू देत नाहीत आणि बाबासारखी गरीब माणसं आपली इमेज जपण्यासाठी मृत्यूला जवळ करतात.” राजीववर एक विखारी नजर टाकत ती म्हणाली.


“पण तरीही यात राजीवचा काय संबंध? हा प्रश्न उरतोच की.” शशांक.


“हम्म. त्या चिठ्ठीवरून मला कळलं की बाबा त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवसापूर्वी जिथे नोकरी मिळावी म्हणून गेले होते त्या इंडस्ट्रीजचे नाव होते, ‘अमृता इंडस्ट्रीज’ आणि त्याचे मालक होते राजीव अधिकारी. त्यांना तिथे कामही मिळाले होते. खूप आनंदात होते ते आणि त्यांच्या आनंदात आणखी भर पडली ती म्हणजे त्या दिवशी खुद्द राजीव अधिकारींचे त्यांना दर्शन झाले होते. एवढे मोठे व्यक्तिमत्व असूनही एका साध्याश्या वॉचमन म्हणून कामाला रुजू होणाऱ्या माणसाशी ते दोन शब्द बोलले ही खूप मोठी गोष्ट होती.” डोळ्यात जमा होत आलेले पाणी पुसत ती म्हणाली.


“मात्र लवकरच या आनंदावर विरजण पडले. त्या दिवशी इतर कामे आटोपून रात्री गावाला परत येत असताना त्यांची सायकल पंक्चर झाली आणि मग नाईलाजाने त्यांना सायकल घेऊन पायी निघाले. गाव जरा आडवळणाचे होते; पण त्यांना सवय होती.


आपल्याच आनंदात ते निघाले असता एक कार त्यांना क्रॉस करून पुढे गेली आणि काही अंतरावर जाऊन थांबली. त्यातून एक माणूस एका मुलीला बाहेर ढकलत असल्याचे जाणवताच ते धावतच तिथे पोहचले आणि त्या इसमाला पकडले आणि.. कारच्या उजेडात त्यांनी त्या इसमाचा चेहरा पाहिला. दुसरे तिसरे कुणी नसून ते दुपारी त्यांना भेटलेले राजीव अधिकारी होते.” एक लांब श्वास घेत ती क्षणभर थांबली.


“ड्रग्सच्या अतीसेवनाने बेशुद्ध झालेली एक मुलगी खाली पडली होती. त्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या बाबांनी तिला सहारा देत त्यांना जाब विचारताच राजीव सरांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बाबांचे त्या मुलीसोबत फोटो क्लिक केले आणि त्यांच्या भानगडीत न पडण्याचे सांगितले. त्यांची बाचाबाची झाली त्यात त्यांना कळलं की हे साहेब त्या मुलीचे शुगर डॅड आहेत. तिला शरीरसुखाच्या बदल्यात ते भरपूर पैसा देऊन तिच्या आर्थिक गरजा पुऱ्या करतात आणि आता ती लग्नासाठी मागे लागल्याने त्यांनी तिला ड्रग्जचा ओव्हर डोज देऊन इथे सोडले होते.


बाबासारख्या साध्या माणसाला हे सगळं पचवणं कठीण होतं. त्यांनी पोलिसांत जाण्याची धमकी दिली तर राजीव सरांनी त्यांनाच त्यांचे आणि त्या मुलीचे फोटो दाखवले आणि उद्याच्या पेपरमध्ये हे सगळं छापून येणार अशी भीती घातली.


पापभिरू होते हो माझे बाबा. खूप मोठा धक्का होता. ते घरी आले तेच मुळी शांत होऊन. मिळालेली नोकरी करणार नाही हे सांगून झोपी गेले. दुसरा दिवस तसेच शांत शांत होते आणि त्यानंतर त्यांनी बदनामीच्या भीतीने त्यांनी विषाची बाटली जवळ केली.” ती बोलायचे थांबली. क्षणभर सगळी शांतता पसरली होती.


“पण मग तू तेव्हाच पोलिसांना सांगायचं ना?” शांततेचा भंग करत मधुर म्हणाला.


“मनात विचार आलाच की. पण खिशात पोलीस घेऊन वावरणाऱ्या या श्रीमंत माणसाविरोधी खरंच पोलिसांनी तेव्हा ऍक्शन घेतली असती? बाबांची चिठ्ठी म्हणजे खूप मोठा ठोस पुरावा नव्हताच कारण राजीव साहेबांकडे बाबा आणि त्या मुलीचे फोटो होते. बदनामी तर बाबांचीच झाली असती ना? मग मीच याच्या मुळाशी जायचं ठरवलं. आईच्या मनाविरुध्द पुण्यात आले. इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं आणि माझ्या मिशनला लागले.


अमृता इंडस्ट्रिज आणि त्याच्या मालकाचा शोध घेणं हेच माझं ध्येय होतं. ते करायला फारसा त्रास झाला नाही. काही दिवस मी मुद्दामच मिस्टर राजीवच्या ऑफिससमोर जाऊन उभी राहायचे आणि एक दिवस त्यांची नि माझी गाठ पडली. कणवाळू स्वभावाच्या असलेल्या यांनी माझी विचारपूस केली आणि मी माझ्या गरिबीचे दुःख गाऊन सहानुभूती मिळवली. एखादा छोटा जॉब देण्याबद्दल विचारणा केली आणि मग मला हवं तेच झालं. काही दिवसांनी यांचा मला कॉल आला.”


“कसला कॉल?” बोटे क्रॉस करून अमृताने विचारले.


“त्यांनी मला सरळ सरळ ऑफर दिली होती.”


“ऑफर?”


“शरीरसुखाच्या बदल्यात माझ्या सगळ्या आर्थिक अडचणी ते भागवणार होते.” ती राजीवकडे पाहत म्हणाली.


राजीव हा आरोप स्वीकारेल का? की काव्यावरच हा डाव उलटेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________


🎭 Series Post

View all