चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -१७ (अंतिम भाग.)

वाचा चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा.
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.
भाग-१७ (अंतिम भाग.)


“जस्ट लाईक अ कॉलगर्ल?”

“अहं, लाईक अ शुगर डॅडी अँड शुगर बेबी. म्युच्युअल बेनिफिट्सच्या आधारावर चालणारी रिलेशनशिप. वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या माणसानं स्वतःच्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी संबंध ठेवायचे. अर्थात त्यात कसलीही भावनिक अटॅचमेंट असणार नव्हती. असणार होता तो केवळ व्यवहार. राजीव अधिकारीच्या खोलात जायला मला ही ऑफर स्वीकारावी लागणार होती आणि ती मी स्वीकारली.


हळूहळू मला कळत गेलं की मी एकटीच त्यांची शुगर बेबी नाहीये. खेड्यापाड्यातून, बाहेरच्या दुसऱ्या शहरातून आलेल्या अनेक गरजू मुली यात अडकल्या आहेत. कोणाला शिकायला पैसे हवेत म्हणून, कोणाला चैनीचे आयुष्य जगायचे म्हणून, कोणी ड्रग्जच्या आहारी गेलेल्या म्हणून. गरज वेगवेगळी असली तरी नातं एकच होतं.. शुगर डॅड अन् बेबीचं.”


“काव्या, जस्ट स्टॉप इट. मी ऐकून घेतोय म्हणून तू काहीही सांगशील?” राजीव तिच्या अंगावर धावून आला. तशी तिने एक जोरदार चपराक त्याच्या गालावर लगावली.


“मिस्टर राजीव अधिकारी, चार लोकांमध्ये स्वतःच्या इज्जतीचा बाजार मांडणाऱ्यातील मी नाहीये. जगाला दाखवता की तुमचे तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे आणि एकांतात निरनिराळ्या ललनांसोबत मजा मारायला मिळतेय म्हणून बायकोच्या अपंगत्वाचे आभार मानता. किती नीच आहात तुम्ही. “ ती गरजली.


“काव्याऽऽ”


“मिस्टर अधिकारी.” लोटलेले दार उघडून एक ओळखीचा आवाज कानावर आला.


“इन्स्पेक्टर सारंग? अगदी वेळेवर आलात. या मुलीला अरेस्ट करा.” राजीव आनंदाने म्हणाला.


“सॉरी सर, हिला नव्हे तर तुम्हाला अरेस्ट करायला आम्ही आलोय. काव्याने तुमच्याबद्दल कंप्लेंट केलीय आणि आता इथे तिने जे सांगितलेय तेही आम्ही बाहेर मोबाईलवर ऐकत होतो.” मधुरच्या नंबरवरून कनेक्ट झालेला कॉल दाखवत इन्स्पेक्टर म्हणाले.


“पुराव्याअभावी तुम्ही मला अटक करू शकत नाही. मी माझ्या वकिलांना फोन करतोय.” राजीव मग्रूरीने म्हणाला.


“हा काव्याचा मोबाईल. यात तुमचे ऑडिओ, व्हिडीओ असे बरेच पुरावे आहेत आणि तुमच्या अटकेसाठी ते पुरेसे आहेत.” इन्स्पेक्टर म्हणाले.


“काव्या तुझ्या मोबाईलमध्ये पुरावा असताना मग तू या दोन दोन डायऱ्या का लिहिल्यास? आणि अर्जुनला त्यात का गोवलेस? आणि ती प्रेग्नसी, ते अबार्शन, तो वेडेपणा? नाटक होतं का गं ते सगळं?” वैदेहीने हुंदका देत विचारले.


“नाही, सारं काही नाटक नव्हतं तर मी आखत असलेल्या चक्रव्यूहाचा तो एक भाग होता. या खेळात मी माझं सर्वस्व पणाला लावून उतरले असले तरी माझा प्रतिस्पर्धी किती ताकदवार आहे हे मला ठाऊक होतं. त्यांना माझा जरासुद्धा संशय आला असता तर त्यांनी मला आणि माझ्या मोबाईलला कुठल्याकुठे गहाळ करून टाकले असते. म्हणून मग मी डायरी लिहायला घेतली. ‘चक्रव्यूह!’ अमु आणि माझ्या झालेल्या भेटीपासूनचा वृत्तांत त्यात लिहिला.


मला माहिती होतं की मला काही झालं तरी माझी मैत्रीण सत्य शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल. फक्त आपल्या जिवाभावाच्या सखीचे आपल्याच वडिलांशी संबंध होते याचा राग येऊन ती माझ्याशी मैत्री तोडेल ही शंका होती आणि म्हणून मग मीच तिच्याशी मैत्रीचे खोटे नाटक केले असं लिहून ठेवलं जेणेकरून ती मैत्री कायमची तुटल्या जावी. सत्य कळल्यावर अमुच्या नजरेला नजर मिळण्याचे धाडस माझ्यात उरले नसते.” एक उसासा टाकत ती म्हणाली.


“मात्र हे सत्य अश्या रीतीने तिच्यासमोर येऊ नये म्हणून मी प्रेग्नन्सीचा मार्ग निवडला. जेणेकरून त्यावरून ब्लॅकमेल करून मीच राजीव अधिकारीकडून सत्य वदवून घेणार होते. मात्र त्यांनी हा डाव माझ्यावर उलटवला.”


“तो कसा?”


“त्यांनी बाळाचा स्वीकार करण्यास सहमती दर्शवली पण एक विचित्र अट समोर ठेवून. अर्जुन आणि अमुच्या नात्याची त्यांना शंका आली होती. त्यांच्यापेक्षा जरा कमी पत असलेला अर्जुन त्यांना पसंत नव्हता म्हणून मग त्यांनी मला अर्जुन आणि माझ्या नसलेल्या नात्याची स्टोरी लिहायला लावली. मला वाटलं माणूस म्हणून कितीही नीच असले तरी वडील म्हणून त्यांनी कायम अमुचे हित चिंतले होते. विचार केला की काही दिवस गैरसमज होईल; पण माझं बाळ आलं की सगळं पटवून देऊ शकेल.


खरं तर या चक्रव्यूहाचा प्लॅन बी म्हणून मी प्रेग्नन्सीची चाल खेळले होते; पण मातृत्वाची चाहूल लागताच मला माझं बाळ महत्त्वाचं वाटू लागलं होतं. ते या जगात यावं म्हणून राजीव जे सांगतील ते मी ऐकत गेले आणि काहीही संबंध नसताना अर्जुनला यात ओढले. त्याला तर बिचाऱ्याला यातलं अजूनही काहीच ठाऊक नाहीये.”


“मग हे ॲबार्शन?”


“आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधी कमी समजू नये हा धडा शिकवणारा हा प्रसंग होता. आईपणाच्या भावनेत जगताना मी राजीववर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा माझी फसगत झाली होती. ते मला म्हणाले की मी या अवस्थेत इथे राहणे योग्य नाही. त्यापेक्षा त्यांच्या फॉर्महाऊसवर मी राहावं. तिथे कोणी ओळखीचं असणार नव्हतं आणि माझी काळजीही घेतली जाणार होती. कधी नव्हे ते मी या शब्दांना भुलले आणि त्यांच्यासोबत जायला तयार झाले.


फॉर्महाऊसवर जाताना खूप आनंदात होते मी. बाळाचे स्वप्न बघताना त्यात रमून गेले होते. अचानक थोडा खोकला आला आणि राजीवनी मला पाण्याची बाटली दिली. मीही हसून दोनचार घोट पाणी प्याले आणि काही वेळातच माझ्या डोळ्यावर झोपेची गुंगी चढू लागली. जेव्हा जाग आली तेव्हा मी एका अंधाऱ्या खोलीत होते. माझं पोट प्रचंड दुखत होतं आणि ज्या बेडवर मी होते तो रक्ताने माखला होता. माझं अबार्शन करून त्या बाळाला या जगात येण्यापूर्वीच त्याच्या हत्येचे पाप त्यांनी त्यांच्या माथी मारून घेतले होते.


मी भोवळ येऊन तिथेच कोसळले. पुढे मला कोणी घरी सोडले ते ठाऊक नाही; पण बाळासाठी मी वेडी झाले होते खरी. एकच धोशा घेऊन मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. आईने तर घर डोक्यावर घेतले होते. तिच्या मुलीने तिची अब्रू अशी धुळीला मिळवली होती. मग काय करणार? तिला तर माझं तोंडही पहायचे नव्हते आणि मग अमु आठेक दिवसांनी तू तिथे आलीस. अचानक मी कुठे गायब झाले म्हणून मला शोधत तू माझ्या घरापर्यंत पोहचलीस. माझी अवस्था बघून तुझ्या आदर्श डॅडना कॉल करून मला त्या घरातून बाहेर काढलंस. तुझ्या सो कॉल्ड प्रेमळ डॅडना माझा पुळका आला आणि लेकीची मैत्रीण म्हणून त्यांनी डॉक्टर शशांककडे ट्रीटमेंटसाठी मला सोपवलं.


डॉक्टर शशांक. फेमस सायकॉलॉजिस्ट! मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी तर मला पुरतं वेडी करण्याचा चंगच बांधला होता. मेडिसिन घेतली की माझ्यातील वेडेपणा उफाळून यायचा, मी हिंसक व्हायचे हे माझ्या लक्षात येत गेलं आणि मग मी गोळ्या घेणं बंद करू लागले. वेडेपणाचे नाटक मात्र सुरु ठेवले कारण मला माहिती होतं की माझी अवस्था बघून अमु मला नक्कीच यातून बाहेर काढेल. मी तर त्या संधीची वाट बघत होते.


जेव्हा ती मला बाहेर फिरायला जायचे म्हणून डॉक्टर मधुरकडे घेऊन निघाली तेव्हा खरंच आनंदात होते मी. मात्र तिने चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध मिक्स करून मला ते दिले. परत एकदा माझा चान्स हुकला होता; पण मी डॉक्टर मधुरकडे सेफ आहे याची जाणीव झाली आणि मी गप्प बसले.”


“शशांक अंकल? तुम्ही मुद्दाम चुकीचे औषध देत होतात?”


“अमृता, सॉरी बाळा. मी राजीवच्या बोलण्यात आलो होतो. त्याच्या म्हणण्यानुसार काव्या चांगली मुलगी नव्हती आणि तिचे सत्य बाहेर आले तर तुझ्यासोबत त्याची बदनामी झाली असती म्हणून तिला वेडी ठरवून हॉस्पिटलमध्येच ठेवणार होतो. तसेही तिच्या घरच्यांनी तिला झिडकारलेच होते. बट बिलीव्ह मी, जर सत्य इतके भयानक आहे हे मला ठाऊक असतं ना तर मी कधीच राजीवची साथ दिली नसती. जर मी इतका वाईट असतो तर तुला मधुरकडे जायला मी का परवानगी दिली असती? तरीही चुकलोय मी.


काव्या, काही अंशी मी सुद्धा तुझा गुन्हेगार आहे. प्लीज, मला माफ कर.” डॉक्टर शशांक हात जोडून तिला उभे होते.


“डॉक्टर, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. मी काय माफ करावं? आणि तसेही तुम्ही तुमची मैत्री निभावत होतात की. अमुदेखील तेच तर करत होती.” ती पुसटशी हसली.


“पुढे जे घडत गेले ते घडणारच होते. माझ्याबाबतीत नेमके काय घडले याचा शोध घेतल्याशिवाय अमु स्वस्थ बसणार नाही हे मला ठाऊक होते म्हणून मी जराशी निश्चिन्त होते आणि त्या अवस्थेत अर्जुनबद्दल लिहिलेल्या डायरीविषयी मी विसरूनच गेले नि नेमकी तीच डायरी तिच्या हाती लागली. मग विश्वासघाताचे सत्र सुरु झाले;आणि जी अमु माझ्यासाठी लढायला उठली होती तीच मला तिची वैरी ठरवून बसली.”


“सॉरी काव्या.” अमृता रुद्ध स्वरात म्हणाली.


“नाही गं राणी, तू खरंच सॉरी म्हणू नकोस. तुला सांगू? मागच्या आठवड्यात तू अर्जुन प्रकरणामुळे आजारी पडलीस आणि डॉक्टर शशांककडून ट्रीटमेंट घेते आहेस हे जेव्हा कळलं ना तेव्हा खूप घाबरले होते गं मी. राजीव अधिकारी तुलाही वेडी करताहेत असं वाटलं गं. नाशिकहून तुझ्याकडे पळून यावं वाटत होतं; पण तसे नाही करू शकले. मात्र आज सकाळी जेव्हा तू आत्महत्येचा प्रयत्न केला हे कळले तेव्हा पुरती हादरले गं मी आणि डॉक्टर मधुरच्या पायावर लोटांगण घालून तुझ्याकडे घेऊन यायला सांगितले.” अमृताचा हात घट्ट पकडत काव्या म्हणाली.


“ऍक्च्युली वैदेही मॅडमनीच मला कॉल करून काव्याला इकडे घेऊन येण्याबद्दल सांगितले होते. आय डोन्ट नो, कसा पण या चक्रव्यूहाशी इंडिरेक्टली मी सुद्धा जोडल्या गेलो होतो. काव्या वेडी नाहीये हे ती माझ्याकडे दाखल झाली तेव्हाच ओळखले होते आणि तिच्या अश्या वागण्यामागे नक्कीच काही कारण असावे हे दिसत होते. त्यात तिच्यासाठी तळमळणाऱ्या अमृताने अचानक असे पाऊल उचलले तेव्हा वाटलं की खरंच हिला माझ्या मदतीची गरज आहे. मी काव्याला अमृताला भेटवण्याचे प्रॉमिस केले; पण त्याबद्दल्यात तिच्याकडून सत्य सांगण्याची अट ठेवली.


Aनाशिक ते पुणे या प्रवासात केवळ तीच बोलत होती. तिच्या आयुष्याच्या या काळ्या बाजूबद्दल कदाचित पहिल्यांदा ती कुणाशी बोलली असावी. तिच्या डोळ्यातील प्रत्येक थेंबात मला सच्चेपणा दिसत होता. सगळं ऐकून मी सुन्न झालो होतो आणि मग निर्णय घेतला. इथे पोहचल्यावर आधी पोलीस स्टेशन गाठले. रीतसर कंम्प्लेंट केली. काव्याचा मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केला आणि इथेही बोलावून घेतले. या हॉस्पिटलचे डॉक्टर तसे माझ्या ओळखीचे, त्यांनाही थोडी कल्पना देऊन काव्याला अमृताजवळ थांबू देण्याविषयी बोललो आणि पुढे जे घडले ते सगळ्यांच्या समोर आहे.” पुढचे सांगत मधुरने पूर्णविराम दिला.


“आजवर कित्येक मुली आयुष्यात आल्या आणि गेल्या पण या मुलीने माझी ही बाजू शेवटी माझ्या कुटुंबासमोर आणली. तुला मी सोडणार नाही काव्या.” रागात बेधुंद झालेला राजीव काव्यावर झेपावला की इन्स्पेक्टरने त्याला ओढून घेतले.


“मिस्टर अधिकारी, आधीच तुमच्या नावावर कितीतरी गुन्ह्यांचा आलेख चढलाय. त्यात पुन्हा ही चूक करू नका. आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय अँड यू आर अंडर अरेस्ट.” त्याच्या हातात बेड्या घालत ते म्हणाले.


हातातील बेड्या बघून राजीवचा चेहरा उतरला होता तर काव्याच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू ओघळले होते. वैदेहीची माफी मागत तिने अमृताला एक घट्ट मिठी मारली. शेवटी तिनेच आखलेले हे चक्रव्यूह भेदण्यात ती यशस्वी झाली होती.

-समाप्त-
साहित्यचोरी गुन्हा आहे.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
________


🎭 Series Post

View all