Login

चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.भाग -२

वाचा एका चक्रव्यूहात अडकलेल्या तिची कथा.
चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ.

भाग -२

“माझी कसली परवानगी?” डॉक्टर शशांकचे बोलणे पुरे होत नाही तोच एक भारदस्त आवाज कानी पडला.


“राजीव?”


“डॅड?”

त्या अनपेक्षित आवाजाने डॉक्टर शशांक आणि अमृता दोघेही उठून उभे झाले. दोघांच्याही चेहऱ्यावर चोरी पकडल्या गेल्याचे भाव स्पष्ट दिसत होते.


“शशांक? अमृता? तुम्हा दोघांचे काय चाललेय?” सूट-बूट आणि टाय अश्या ऑफिशीअल वेषात असलेला राजीव काहीश्या जरबेने विचारत होता.


“राजीव, ते..”


“डॅड, मी काव्याला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचे म्हणतेय.” डॉक्टर शशांकचा गडबडलेला चेहरा बघून अमृताने विषयात हात घातला.


“नो, मी याला परवानगी देणार नाही.” खुर्चीवर शांतपणे बसत राजीव उत्तरला.


“मी तुम्हाला परवानगी मागतच नाहीये तर सांगते आहे.” ती काहीश्या बेफिकीरीने उत्तरली.


“अमृताऽऽ”


“राजीव, शांत हो. अरे तिला एकदा सेकंड ओपिनियन हवे आहे म्हणून ती हे म्हणतेय आणि ज्या डॉक्टरकडे जाणार आहे तो माझा विद्यार्थी आहे, तेव्हा काळजी करण्याचे काही कारण नाही.” डॉक्टर त्याला शांत करत म्हणाले.


“शशांक, अरे दुसरीकडे जायला मी का नाही म्हणतोय हे तुला कळत नाहीये. अरे अश्याने त्या पोरीची बदनामी होईल रे आणि तिच्यासोबत अमृताचीही.”


“डॅड, तिच्यासोबत एवढं काही घडून गेलंय आणि तुम्हाला बदनामीचे येऊन पडलेय? तशी ती तर आधीच बदनाम झालीये की.” ती किंचित उपहासाने म्हणाली.


“त्या दोन कौडीच्या मुलीबद्दल मला काहीही बोलायचे नाहीये. केवळ तुझी मैत्रिण म्हणून मी तिला इथे आणलंय, बस्स. काळजी वाटते ती तुझी. अमृता, अगं तू तिच्यासारखी रस्त्यावर पडलेली नाहीयेस. अमृता इंडस्ट्रिजच्या मालकाची, द ग्रेट राजीव अधिकारीची एकुलती एक मुलगी आहेस. तू जर काही चुकीचे पाऊल उचललेस ना तर सगळीकडे बातमी होईल. तुझ्या मैत्रिणीप्रमाणे तुझ्याही चारित्र्यावर शिंतोडे उडतील म्हणून नाही म्हणतोय.” समजावणीच्या सुरात राजीव बोलत होता.


“डॅड, आय जस्ट डोन्ट केअर. ती दोन कौडीची मुलगी माझी बेस्टी आहे हे विसरु नका.”


“तू आमची एकुलती एक मुलगी आहेस हे तूही विसरू नकोस.”


“ती सुद्धा माझी एकुलती एकच मैत्रिणी आहे आणि ती बरी व्हावी म्हणून मी काहीही करेन.” नाकाचा शेंडा उडवून अमृता उठली आणि टेबलावरचा मोबाईल हातात घेत त्वेषाने केबिनबाहेर पडली.


“शशांक, अरे बघतोस ना?”


“राजीव, शांत हो रे. ही तरुण पिढी आहे. आपण जेवढे त्यांना थांबवायचे प्रयत्न करू तेवढे ते आपल्या हातातून बाहेर निसटतील.”


“म्हणजे मग मी काहीच करायचे नाही का? असेच हातावर हात ठेवून बसून राहायचे?” राजीव हतबलतेने म्हणाला.


“डोन्ट वरी, डॉक्टर मधुरशी मी बोलेन. तू घरी जा आणि अमृताला सांभाळ. होऊ दे एकदा तिच्या मनासारखं. डॉक्टर मधुर काव्याला परत माझ्याकडेच पाठवेल याची मला खात्री आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही.” राजीवच्या हातावर हात ठेवत डॉक्टर शशांक.


_______

“डॅड स्वतःला काय समजतात? काव्या माझी मैत्रीण आहे. तिच्यासाठी काय करायचे हे माझे मी ठरवेन.” कार चालवत असताना अमृता एकटीनेच बडबडत होती.

मनात उफाळलेला राग डोळ्यात पसरला होता आणि आता हळूहळू अश्रुंच्या रुपात तो बाहेर कोसळू लागला होता.

‘काव्या का वागलीस गं असं? तू कुठे गुंतली आहेस, कोणावर प्रेम करतेस किंवा कोणी तुला त्रास देतोय हे किमान एकदाही माझ्याशी शेअर करावं असं तुला नाही वाटलं का गं? बेस्ट फ्रेंड होतो ना यार आपण?’ डोळ्यातील पाऊस हाताने पुसत तिने कारची स्पीड वाढवली.


कधी नव्हे ते आज आकाशीच्या नभांनीही बरसण्याचा जोर धरला होता. बाहेर पाऊस.. डोळ्यात पाऊस. समोरचे सगळे धूसर होऊ लागले होते. त्यातून माग काढत ती तिची कार कशीबशी पुढे दमटवत होती.
मनात मात्र काव्याच्या आठवणी पिंगा घालत होत्या.


तिच्या सोबत केलेल्या मस्त्या, कधी तिचे तर कधी स्वतःचे लेक्चर चुकवून केलेले मुव्हीजचे प्लॅन्स. कधी गणपतीला मारलेल्या फेऱ्या तर कधी पर्वतीवर जाऊन केलेल्या टेहाळण्या. मात्र या सर्वांत प्रकर्षाने आठवत होती ती तिच्याशी झालेली पहिली भेट.


दोनच तर वर्षांपूर्वी दोघी पहिल्यांदा भेटल्या होत्या आणि पहिल्याच भेटीत एकमेकींच्या बेस्टी झाल्या होत्या. मैत्रीचे नाते कधी आणि कसे फुलेल हे कुठे ठरलेले असते? तसेच त्यांचेही झाले होते.


दोन वर्षांपूर्वी राजीवचा पन्नासावा वाढदिवस म्हणून अमृता शॉपिंगला बाहेर पडली होती. आपल्या आवडत्या डॅडसाठी काय काय घेऊ नि काय नको असे झाले होते. मोठमोठे मॉल्स पालथे घालून तिने भलीमोठी शॉपिंग केली होती. शेवटच्या मॉलमधून बाहेर शेवटची शॉपिंग करून बाहेर पडणार तोच गिफ्ट काउंटररमध्ये तिची नजर एका सुंदरश्या पेनवर खिळली आणि ती तिथे जाऊन पोहचली.


“हा पेन मला छानश्या गिफ्ट रॅपमध्ये रॅप करून द्या ना.”

“हा घ्या आणि हे बिल. फक्त पाचशे रुपये.”


“थँक यू.” म्हणून अमृताने हातातील मोबाईलने क्यू आर कोड स्कॅन करायला घेतला आणि त्याच वेळी तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला.


“एक मिनिट हं.” पर्समधून क्रेडिट कार्ड काढायला म्हणून तिने पर्समध्ये हात घातला आणि घरून निघताना घाईमध्ये तिची सगळी कार्ड बेडवर विसरल्याचे आठवले.


“मॅम, कॅश पेमेंट चालेल.” तिचा चेहरा बघून दुकानातील ताई म्हणाल्या.


“कॅश नाहीये.” तिचा चेहरा पडला होता. सगळे कार्ड्स नेहमीच सोबत असायचे त्यामुळे आजवर अशी कॅश घेऊन जायची कधी गरज पडली नव्हती.


“मग सॉरी मॅम, तुम्ही आता हे नाही घेऊ शकत. हवे तर तुम्ही पैसे घेऊन परत या.”


“नाही, ते शक्य नाहीये. मला ना हे गिफ्ट आताच द्यायचे होते.” तिला काय करावे काहीच सुचत नव्हते.

“हे घे पाचशे रुपये. तू तुझे गिफ्ट घेऊ शकतेस.”


“एक्सक्युज मी?” डोळ्यात पाणी साचत असताना एक आवाज कानावर पडला तसे अमृताने मान वळवून बाजूला पाहिले.


अंगावर साधासा सलवार कमीज घातलेली एक अनोळखी तरुण मुलगी तिच्याकडे हातात पैसे घेऊन स्मित करत उभी होती.


“मी तुझ्याकडून का पैसे घेऊ? जर तुला खरंच मदत करायची असेल तर तुझा मोबाईल तेवढा दे. मी माझ्या डॅडना कॉल करून बिल पे करायला सांगते.”


“ज्यांच्यासाठी गिफ्ट घेते आहेस त्यांनाच बिल पे करायला सांगणार आहेस?” ती तरुणी.


“हे गिफ्ट त्यांच्यासाठी आहे हे तुला कसं माहित?” अमृताने भुवया उंचावून विचारले.


“तुझी इतका वेळची बडबड मी ऐकली की.”


“ओह!” अमृताने ओशाळपणे डोक्याला हात मारून घेतला.


“पण तरीही मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही एकतर मी तुला ओळखत देखील नाही.”


“मी काव्या. काव्या देसाई. व्हीआयटीमध्ये आहे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतेय. झाली की आपली ओळख.” काव्या गोड हसली.


“अगं पण तरीही..”


“अगं तुला मी हे पैसे असेच देत नाहीये गं. उधार म्हणून देतेय. तुला जमेल तसे मला परत कर. कारण माझ्यासाठी एकेक रुपया फार महत्त्वाचा आहे.” काव्याने पुन्हा स्मित केले तसे अमृतानेही हसून तिच्या हातातील पैसे घेतले.


“ए काव्या थँक्स यार. ॲक्च्युली ना मी डॅडसाठी भरपूर शॉपिंग केली; पण हा पेन इतका डोळ्यात भरला ना की स्वतःला नाही रोखू शकले.” मॉलमधून बाहेर पडताना अमृता तिला म्हणाली.


“त्यात थँक्स काय गं? वडिलांचं आयुष्यात असणं किती महत्त्वाचं असतं हे माझ्यापेक्षा आणखी कोणाला कळणार? मी तुझी मदत करू शकले याचा खरंच मला आनंद आहे. शेवटी बाबा असू देत नाही तर डॅड, वडील शेवटी वडील असतात ना?” काव्याच्या डोळ्यात एक टपोरा थेंब उभा राहिला.


“राईट! ऐक ना, मला मदत करून तू आनंदी आहेस ना? मग मला तुझा आनंद वाढवण्याची पुन्हा एक संधी दे. आज डॅडच्या वाढदिवसानिमित्त मी एक छोटेखानी पार्टी ठेवली आहे तेव्हा तू प्लीज यायचं आहेस. या पार्टीचे माझ्याकडून तुला खास निमंत्रण.” काव्याकडे बघून गोड हसत अमृता म्हणाली.


“मी आणि पार्टीला? नाही गं हे अशक्य आहे.”


“नाही कसं? तुला यायचंच आहे.” अमृता हक्काने म्हणाली.


“अगं पण.. “


“तू येते आहेस.”


“अमृता.”


“मला कुठलंच स्पष्टीकरण नकोय. आता माझी मैत्रीण झालीहेस ना? मग यावेच लागेल.”


“पण..”


“प्लीज?”


“ओके!”

तिच्याकडून हिरवी झेंडी मिळाली आणि अमृताने तिला एक घट्ट मिठी मारली. ती मिठी, ती पहिली मिठी.. त्यांच्या नव्या नात्याच्या मुहूर्तमेढीच्या सुरुवातीची!


मैत्रीचे हे नवे नाते कुठल्या चक्रव्यूहात अडकण्याची सुरुवात तर नव्हती ना?
वाचत रहा.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_________

🎭 Series Post

View all