Login

चक्रव्यूह-एक चकवा. भाग-2.

विद्याबरोबर नक्की काय घडलं असेल? नक्की वाचा.

'चक्रव्यूह'- एक चकवा (भाग-2)

©®श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.

विद्याचा पाठलाग करता करताच बॉसला कॉल करून 'मला उशीर होइल' असं सांगितलं आणि मी तिच्या पाठोपाठ चालू लागलो.

इतक्यात तिला कोणाचातरी कॉल आला आणि तिच्या पायांचा वेग वाढला. तिचा पाठलाग करताना मी तिला दिसता कामा नये, याची जाणीव मला असल्यामुळे मी थोडंसं अंतर राखूनच चालत होतो. अशातच ती एका अरुंद गल्लीकडे वळली,त्या गल्लीत म्हणावी तेवढी वर्दळ नव्हती. थोडं अंतर चालल्यावर ती एका बिल्डिंगच्या गेटमधुन आत शिरली. मी तिच्या पाठोपाठ आत शिरणारच होतो तोवर सिक्युरीटी गार्डने मला रोखलं.

"अय हिरो! ना ओळख ना पाळख आणि असा बिनदिक्कत कुठं घुसतोय? कोण आहेस तू? आणि इथं का आलायस? चल निघ इथून." 

गार्डने माझी कसून चौकशी केली. माझ्या उत्तरांनी त्याचं समाधान न झाल्यामुळे तो मला आत सोडत नव्हता.

मग मी त्याला विद्याबद्दल, "विद्या इथंच राहते का?" असं विचारलं.

त्यावर त्याने फक्त "नाही" असं सांगितलं. त्याशिवाय बाकीचं तो काहीच सांगत नव्हता.

एवढ्यात दोन मोटारगाड्या एकामागोमाग एक अशा आल्या. त्यांना सिक्युरिटी गार्डने मोठं गेट उघडून सलाम करतच आत प्रवेश दिला.

मला काहीच समजत नव्हतं,म्हणून मी सिक्युरिटी गार्डला अधिक विचारणा केली असता त्याने मला तिथून हाकलून लावलं.

 मी थोडावेळ त्या गल्लीतच घुटमळलो पण मला काहीच अंदाज येत नव्हता. सगळ्या बिल्डींगची दार बंदच होती.

विद्या माझी फार जवळची मैत्रीण नसली तरी कधीकाळी ती मलापण आवडायची. त्यामुळे मला तिची काळजी वाटत होती. तिच्याबरोबर नक्की काहीतरी वाईट घडलं आहे याची मला कल्पना आली होती. त्याबरोबरच तिचं सध्याचं वागणं थोडंसं विचित्र असल्यामुळे मला तिला तिथं टाकून जाणं पटत नव्हतं. मी भावाला कॉल करुन माझी बंद पडलेली बाईक घेऊन जायला सांगितलं आणि ऑफिसमधून कॉल येऊ नये म्हणून मोबाईल बंद करुन खिशात टाकला.

त्यानंतर मी तिथंच एका झाडाखाली आपला तळ ठोकला आणि विद्या कधी बाहेर येते याची वाट पाहु लागलो.

आता मला ते कॉलेजचे सोनेरी दिवस जसेच्या तसे डोळ्यासमोर दिसू लागले होते.

त्यातील तो प्रसंग पण मला अगदी स्पष्ट आठवत होता, जिथे विद्याला एक अनोळखी युवक भेटला होता त्याच्याबरोबरच पुढें जाऊन तिचं लग्न झालं होतं. (ती बऱ्याच जणांना आवडत असल्यामुळे तिच्यावर कोणाचं ना कोणाचं लक्ष असायचंच,त्यामुळे तिच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरायच्या. मलापण थोडीफार माहिती होतीच.)

आमच्या कॉलेजची सहल महाबळेश्वरला निघाली होती. 

महाबळेश्वरच्या घाटातून जाताना आमच्या बसच्या पुढे एक चकचकीत मोटारगाडी चालली होती. तिच्या पाठोपाठच आमची बस होती. दरड कोसळायची शक्यता असल्यामुळे बस ड्रायव्हर सावधपणे बस चालवत होता.

आम्ही सगळे मस्त मजेत गाणं म्हणत होतो.

(देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जाँ 

कदमों में तेरे निकले मेरा दिल है बस यही अरमाँ) - २

डोले डोले डोले अए अए ,डोले डोले डोले अए अए , डोले डोले अए अए आए 

(मिट जायेंगे मर जायेंगे, काम कोई कर जायेंगे 

मरके भी चैन ना मिले, तो जायेंगे यारों कहाँ ) - २

अरे ओहो ...  हूँ हूँ हूँ 

देखा ना हाय ...

 इतक्यात अचानक काहीतरी कारणामुळे पुढील मोटारगाडीचा ब्रेक दाबला गेला आणि त्यामुळे पाठीमागून आमच्या बसचा थोडासा धक्का त्या मोटारीला लागला. इतक्यात त्या मोटारीतून एक उंच आणि देखणा युवक खाली उतरला आणि मागे येऊन आमच्या बस ड्रायव्हरशी वाद घालू लागला. चुकी स्वतःची असूनही तो ड्रायव्हरशी भांडत होता,म्हणून आम्ही सगळे खाली उतरलो. त्यात विद्या सगळ्यात पुढे होती. तिला पाहून त्याला जास्तच चेव चढला. विद्यापण त्या युवकाकडे बघतच बसली होती,कारण तो होताच तसा कोणालाही भुरळ पडावी असा!

 पाठीमागून येणाऱ्या वाहनांचे हॉर्न ऐकून विद्या भानावर आली आणि त्याला म्हणाली,

"अहो! जाऊ दे ना. कशाला उगाच प्रकरण वाढवताय? पाठीमागे वाहतूक थांबली आहे." 

तोपण तिच्याकडे बघुन काहीतरी विचार करु लागला आणि म्हणाला,

"ठीक आहे. तुम्ही सांगताय म्हणून याला सोडतो. माझी एवढी महागडी गाडी पाठीमागून ठोकून खराब केली.तरीपण तुमच्याकडे बघून याला माफ करतो."

 तो तरुण गाडीत बसला आणि त्याने खिडकीतून एकदा वळून विद्याकडे पाहिलं. त्यानंतर ती गाडी पुढे निघून गेली.

 त्यानंतर आम्ही सगळे गाडीत बसून पुढील प्रवासासाठी निघालो.

विद्याला तो तरुण खुप आवडला होता,ती त्याचाच विचार करत होती आणि 'तो महाबळेश्वरवर पुन्हा भेटावा' असं तिला मनापासून वाटत होतं.

आणि देवाने जणू तिच्या मनातलं ऐकलं. तो तिला महाबळेश्वरवर पुन्हा दिसला.

विद्या त्याला थॅंक्यू बोलण्याचा बहाणा करुन त्याच्याजवळ गेली. यातूनच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांचं नाव,गाव, पत्ता,संपर्क दिले घेतले, असं आम्हाला समजलं. महाबळेश्वरवरुन आम्ही परत आलो आणि पुन्हा कॉलेज सुरु झालं, पण विद्या मध्येच अचानक कॉलेज सोडून गेली. तेव्हा समजलं की तिने त्या तरुणाशी लग्न केलं आणि ती त्याच्याबरोबर दुबईला निघून गेली. त्यानंतर ती कोणालाही कधीच दिसली नव्हती.

त्यावर ती मला आज अश्या अवस्थेत दिसली होती.

मी अजुन तिच्या बाहेर येण्याची वाट पहात होतो, कारण त्याशिवाय माझ्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळणार नव्हती.


 

नक्की काय घडलं असेल विद्याबरोबर?

ती त्या बिल्डिंगमध्ये कशासाठी गेली असेल?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

'चक्रव्यूह'- एक चकवा.

श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.९९७५२८८८३५.

(कथा आवडल्यास नक्की लाईक करून आपला बहुमोल अभिप्राय द्या. तसेच मला फॉलो करा.)

🎭 Series Post

View all