चक्रव्यूह- एक चकवा. भाग-4.

काय असेल त्या बॅगेमध्ये? नक्की वाचा.

'चक्रव्यूह'- एक चकवा (भाग-4)

©®श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.


 

बॉसशी बोलता बोलताच माझा स्टॉप आला होता.

मी स्टॉपवर उतरुन चालत दहा मिनिटात घरी पोहोचलो, दारात गाडी बघून मला आनंद झाला कारण भावाने ती दुरुस्त करुन आणून लावली होती.

त्यांनतर थोड्या वेळात मी जेवण आटोपलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी विद्या मला सगळ सांगणार होती. तो विचार करत करत मला कधी झोप लागली समजलंच नाही.

दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने मी वेळानेच उठलो,अंघोळ करुन जेवून घेतलं आणि मी विद्याला कॉल करुन 'कधी यायचं?' ते विचारलं.

तिने सांगितलं की,

"मुलगीला सुट्टी आहे त्यामुळे आपण बाहेर भेटून बोलू. मी स्टॉपवर तुझी वाट बघत थांबते,पण मला जास्तवेळ थांबता येणार नाही."

मी बाईक काढली आणि बाहेर पडलो.

थोड्याच वेळात मी तिच्या बसस्टॉपवर पोहोचलो. तर तिथं ती चेहऱ्यावर स्कार्फ बांधून उभी होती. मी बाईक थांबवताच ती  बाईकच्या दिशेने आली म्हणून मला ती विद्याच आहे हे समजलं.

मी तिला बाईकवर घेतलं आणि पुढे निघालो.

तिने विचारलं,"आपण कुठे जायचं आहे?"

मी म्हणालो,"थोड्या अंतरावर एका टेकडीवर भवानी देवीचं मंदिर आहे.तिथं आपल्याला बिनधास्त बोलता येईल,तिथं जाऊ."

ती म्हणाली,"ठीक आहे चल. पण मला जास्तवेळ थांबता येणार नाही."

मी म्हणालो,

"हो! मला त्याची कल्पना आहे. म्हणून तर जवळच जात आहोत आपण."

आता आम्ही टेकडीच्या दिशेने जाऊ लागलो. थोड्या वेळात आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. आता पायऱ्या चढून वरती जावं लागणार होतं, त्यामुळे पायथ्याशीच एका दुकानातून पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन आम्ही पायऱ्या चढू लागलो.

थोड्याच वेळात आम्ही वरती पोहोचलो. तिथं जास्त लोक नव्हते हे आमच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट होती.

आम्ही सगळ्यात आधी आई भवानीचं दर्शन घेतलं आणि एका बाजूला जाऊन बसलो.

थोडावेळ असाच गेला, मग मीच विषयाला हात घातला.

मी म्हणालो,"विद्या तुझ्या आयुष्यात काय काय घडलं ते सगळ मला आज जाणून घ्यायच आहे. तरी तू काही न लपवता जे जे काही असेल ते सगळं मला सांग."

तीपण बहुतेक आज मला 'सगळं सांगायचंच' अशी मनाची तयारी करून आली होती. ती बाटली उघडून थोडसं पाणी प्यायली आणि तिने सांगायला सुरुवात केली,

ती म्हणाली,

"सुशांत मला महाबळेश्वरला पहिल्यांदा भेटला होता,तिथूनच आमची ओळख झाली.

नंतर आमचे एकमेकांना कॉल्स आणि भेटी चालू झाल्या,मी त्याच्यात इतकी गुंतून गेले की,मला कशाचंच भान नाही राहीलं. तो मला वेड लावत गेला आणि मी त्याच्यामागे वेडी होत गेले. मला काय चांगलं आणि काय वाईट? काय बरोबर आणि काय चूक?हे जाणून घ्यायची इच्छाच नव्हती, माझं जग व्यापल होतं त्याने आणि मी त्याला कोणत्याही गोष्टीला नकार देत नव्हते. कारण मला त्याला गमवायचं नव्हतं. यातच मी माझी मर्यादा कधी ओलांडली हे मलाच समजलं नाही. मला थोड्या दिवसांनी समजलं की,"मी सुशांतच्या बाळाची आई बनणार आहे." ही गोष्ट मी त्याला सांगितली तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. पण मला खूप भिती वाटत होती, कारण आता आई बाबांना काय सांगायच? आणि त्यांना जेव्हा ही गोष्ट समजेल तेव्हा ते काय करतील?" या विचाराने माझी झोप उडाली होती. सुशांतला याबाबतीत सांगितलं तर तो म्हणाला की,

"तू घरी सांगून टाक आणि त्यांना आपल्या लग्नाबद्दल पण सांग."

मला तर काहीच सुचत नव्हतं. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

मी कसतरी धाडस करुन घरी सगळं सांगितलं, ते ऐकताच आईबाबांचं अंग थरथर कापू लागलं होतं. मी त्या दोघांना पाणी आणून दिलं आणि फॅन सुरु केलेत. थोडावेळ असाच गेला,आई रडू लागली होती आणि बाबा रागाने फणफणत होते. त्यादिवशी कोणीही जेवले नाही,शिवाय आई बाबा माझ्याशी एक अक्षरही बोलले नाहीत. मग मीच त्यांना गयावया करून बोलायला भाग पाडलं.

बाबा म्हणाले,

"ॲबॉर्शन करून घे. हे पाप या जगात यायला नको आणि कोणाला काही कळता कामा नये. लवकरात लवकर याची विल्हेवाट लाव."

हे ऐकताच माझ्या डोळयांत टचकन पाणी आले.

डोळे पुसत मी म्हणाले,

"बाबा आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय."

यावर बाबा खुप चिडले आणि म्हणाले,

"ज्या माणसाला मी ओळखत नाही,ज्याचं नाव, गाव,त्याची फॅमिली, त्याचा बॅकराउंड याचा मला सोड तुलापण थांगपत्ता नाही. त्याच्याशी मी तुझं लग्न अजिबात लावुन देणार नाही. अगदी काही झालं तरीही नाही. हे पाप कोणाला कळायच्या आत नाहीसं झालं पाहिजे."

मग आमचा नाईलाज झाला, मी आणि सुशांतने पळून जायचं ठरवलं,

सुशांतने सांगितल्याप्रमाणे मी घरातले सगळे दागिने घेऊन त्याच्याबरोबर पळून गेले आणि एका मंदिरात लग्न केलं.

सुशांत म्हणाला,

"माझ्या घरातून मला पैसे आणता आले नाहीत,हे दागिने मला दे. मी हे गहाण ठेवून पैसे घेऊन येतो. मग आपण नंतर ते सोडवून आणू."

मी माझे सगळे दागिने त्याला दिले. मग तो पैसे घेवून आला आणि आम्ही एक घर भाड्याने घेऊन राहु लागलो. 

नंतर मला एक छान गोंडस मुलगी झाली,सगळ छान चालू होतं. पण सुशांत अधूनमधून कुठेतरी गायब व्हायचा आणि मग काही दिवसांनी परत यायचा,असे बरेच दिवस चालू होतं.

तो परत येताना बॅगेतून काहीतरी भरून आणायचा.

असाच एकेदिवशी तो पाच दिवस गायब  होता आणि तो परत येताना बॅग भरून घेऊन आला होता. मागे कोणीतरी लागल्यासारखा तो घरात आला आणि त्याला घाम येऊन दमही लागला होता. मला त्याची तब्येत ठीक दिसत नव्हती आणि तो पुरता घाबरून गेला होता. अशातच त्याला चक्कर आली, मग मी त्याला प्यायला पाणी देऊन फॅन सुरु केला. नंतर त्याला जरा बरं वाटलं.

तो मला म्हणाला,"तुला माझं एक काम करायला हवं."

मी म्हणाले,"सांग ना.काय करायचं आहे?"

तो म्हणाला,"मी पत्ता देतो,तिथे ही बॅग नेऊन दे फक्त आणि परत ये. माझी तब्येत ठीक नाहीये आणि आजच ती बॅग द्यायला हवी."

मी विचारलं,"एवढं अर्जंट देण्यासारखं काय आहे या बॅगेत?"

तो खुप चिडला आणि म्हणाला,"बॅग अजिबात उघडू नको,सांगितलं तेवढं कर फक्त." तो ओरडला आणि त्याने कोणालातरी कॉल करून आपली बायको बॅग घेवून येणार असल्याची कल्पना दिली.

मी बॅग घेतली आणि मुलीकडे लक्ष द्यायला सांगून बाहेर पडले,पण राहून राहून सारखा डोक्यात एकच विचार येत होता की, 'या बॅगेत नक्की काय असेल? आणि आजच्या आज देण्यामागचा उद्देश काय असेल?'

काय असेल त्या बॅगेमध्ये?

विद्या ती बॅग सहिसलामत योग्य पत्त्यावर घेऊन जाईल का?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

'चक्रव्यूह'- एक चकवा.

श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.९९७५२८८८३५.

(कथा आवडल्यास नक्की लाईक करून आपला बहुमोल अभिप्राय द्या. तसेच मला फॉलो करा.)

🎭 Series Post

View all