Login

चकवा (भाग -1)

Horror And Suspense Story


"कॉलेजमधून घरी परतत असताना रस्त्यात एक वयस्कर भिकारी दिसला. माझ्याकडे बघून काही खायला मागू लागला. मला दया आली अन् मी त्याला जवळच्या कॅन्टीनमधून दोन समोसे आणून दिले.

आता मात्र तो ते न खाता पाणी मागू लागला.... मला जरा विचित्रच वाटलं ... मी तिथून निघून जाऊ लागले तर तो भिकारी माझ्या मागे येऊ लागला.

"तहान तर तुलाही लागली असेलच ना! चल पाणी पिऊ" असे म्हणत तो आता पुढे झाला अन् त्याने इशाऱ्याने मला आपल्या मागे येण्याची खूण केली.

अचानक काय झालं माहित नाही पण मी देखील अगदी भारावल्यासारखी त्याच्या मागे-मागे जाऊ लागले. किती वेळ, किती अंतर चालले असेन मला माहित नाही. त्या माणसाने मला तलावाजवळ नेले आणि पाण्यात ढकलून दिले.

पुढचं मला काहीच आठवत नाही.... जागी झाले तेव्हा मी एका अनोळखी ठिकाणी होते.... अगदी निर्मनुष्य भागात... जणू जंगलच!"

रमणीनं आपलं बोलणं संपवलं अन् पोलीसबाईंनी खूण करताच समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावला.

"चकवा तो! चकवाच लागला होता माझ्या सोनूला!!"आजी जवळजवळ किंचाळलीच..."देवाची कृपा म्हणून पोर सुखरूप आहे हो! नाहीतर आधीच एकुलती एक... आईबापानं काय केलं असतं?" आजीनं वर बघून हात जोडले अन् हाताची दहाही बोटं कानशीलावर मोडत नातीची अलाबाला घेतली. लगेच देवघरात जाऊन अंगारा आणला अन् तिच्या कपाळावर लावला.

पोलीस इन्स्पेक्टर प्रशांत जामनिक आणि त्यांच्या सहायक हवालदार सुमित्राबाई काळे विनायक महाजन ह्याच्या प्रशस्त हॉलमधील सोफ्यावर बसून हा सगळा प्रसंग लक्षपूर्वक पाहत होते.

******************************************

रमणी चौदा वर्षांची... आईबाबांची एकुलती एक मुलगी.... दिसायला गोरीपान, नाजूक जिवणी, केसांचा बॉबकट ... अगदी अप्सराच जणू!

तिचे आईबाबा दोघेही आपापल्या कामात व्यस्त... दोघेही खोऱ्यानं पैसा ओढत. घरी म्हातारी आजी अन् कामाला नोकर-चाकर... पैश्याने सधन असल्याने रमणीच्या सगळ्या गरजा आणि हौशी पूर्ण होत!

दोन दिवसांपूर्वी शाळेत गेलेली रमणी रात्र झाली तरी घरी आलीच नाही. पाच वाजता शाळा संपली की मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार असं सांगून गेलेली आपली नात रात्री आठपर्यंत घरी आली नाही म्हणून आजी घाबरली अन् आपल्या मुला-सुनेला फोनवरून ह्याची कल्पना दिली.

रमणीचे आईबाबा सगळी कामं सोडून तातडीने घरी आले. सगळीकडे शोधाशोध सुरु केली. तिच्या मोबाईलवर फोन केला तर फक्त रिंग जात होती... फोन उचलल्या जात नव्हता.

तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली. कुणालाच रमणीबद्दल काहीच माहिती नव्हती. ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तिला फोन केला तर आज तिचा वाढदिवस नाही असं कळलं.

****************************************

सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी करून झाली, शाळेतदेखील बघून झालं... रमणी मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पण गेली नाही हे कळताच विनायकरावांचा धीर सुटला... रात्रीचे अकरा वाजले तरी रमणी घरी परतली नव्हती.... तिचा फोन बंद येत नव्हता हाच काय तो एकमेव दिलासा....


रमणीला चकवा लागला होता. ह्या चकव्याच्या तावडीतून पोलिसांनी तिची सुखरूप सुटका केली आणि तिला तिच्या आईवडिलांकडे सोपवलं हे तर कथेच्या सुरवातीलाच कळलंय.

पण त्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले... वाचूया पुढच्या भागात
0

🎭 Series Post

View all