Login

चकवा (अंतिम भाग )

Horror And Suspense Story


रमणीची चोरी तर पकडल्या गेली. पण आता ती आपल्या मनातलं बोलू लागलीये-

"सुशांतला माझ्यासोबत वेळ घालवायचाय म्हणजे खूप गप्पा, फिरणं, हसणं खिदळणं, हातात हात घेणं, हॉटेलमध्ये जेवण आणि खूप मोट्ठी शॉपिंग असंच वाटलेलं मला....हेच तर खरं प्रेम असतं ना... नवराबायकोमधलं...सुशांतचं माझ्यावर \"खरं\" प्रेम आहे असंच वाटलेलं मला पण सुशांत तर काहीतरी वेगळंच" नुसत्या आठवणीनंही रमणीच्या अंगावर काटा आला.

"मग पुढे काय झालं?" सुमित्राबाईंच्या आवाजाने ती भानावर आली.

"सुशांत जबरदस्ती माझे कपडे काढू लागला तशी मी घाबरले त्याच्या हाताला कडकडून चावा घेतला अन् वाट फुटेल तिकडे पळत सुटले.

रस्ता संपला तिथे एक तलाव होता... मी तिथे खूप वेळ बसून राहिले. घरी जाण्यासाठी माझ्याकडे काही साधन नव्हते आणि आईबाबांना तोंड दाखवायची हिम्मतही....

आता तर घरून एकसारखे कॉल येऊ लागलेले... माझी कुणाशीही बोलायची हिंमत होईना. शेवटी मला शोधत तुम्ही आलात अन् मी घरी आले."

"आणि मग घरी हे सगळं कळू नये म्हणून बनाव केलास... होय ना?"

"हो. माझी आजी देवभोळी... नेहमी भुताखेतांपासून माझं, घरादाराचं रक्षण व्हावं म्हणून वेगवेगळे तोडगे, टोटके करत असते.

तिनेच मला एकदा माझ्या पणजोबांना चकवा लागल्याची गोष्ट सांगितलेली... मी तलावाकाठी बसल्याचे पाहिल्यावर तुम्हाला पटेल म्हणून मी चकव्याची गोष्ट रचली."

"पण संध्याकाळी सात-साडेसात पासून रात्रीपर्यंत ऊन नसतं ना बेटा, की चकवा तुला पाण्यात बुडवेल आणि तुझे ओले कपडे खडखडीत वाळतील." इन्स्पेक्टर प्रशांतने केसची उकल करायला सुरुवात केली.

"रमणीचं निरीक्षण केल्यावर तिचा उसवलेला ड्रेस, हातापायावरच्या खुणा ह्यावरून आम्हाला संशय आलाच होता. म्हणून शाळेत आणि रमणीच्या मैत्रिणींकडे चौकशी केल्यावर आम्हाला सुशांतबद्दल माहिती मिळाली.

एक नंबरचा बदमाश आहे हा सुशांत... तीन वर्षांपासून एकाच वर्गात आहे. चोरी, जुगार, श्रीमंताच्या मुलींना नादी लावणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे हे त्याचे उद्योग"

"बापरे!" रमणी आता धास्तावली होती. आपण क्षणिक प्रेमाच्या मोहात केव्हढी मोठी चूक केली असती ह्या जाणीवेने हादरली.

"काल आजींच्या खोलीत डोकावल्यावर मला वेगवेगळी यंत्र, मंत्र आणि ताईत दिसले शिवाय टेबलवर काही गूढविद्येची पुस्तकं... त्यामुळे रमणीला "चकव्याची" कथा सुचण्याची पार्श्वभूमी लक्षात आली".

"हो, आमच्या सासूबाईंचा विश्वास आहे असल्या गोष्टींवर... त्या काही ना काही नुस्खे करत असतात पण आम्ही त्यांना अडवत नाही... असते ज्याची त्याची श्रद्धा!" वीणाताई प्रथमच बोलल्या.

"तसं पाहिलं तर चकवा आपल्या सगळ्यांनाच लागलाय ना...वीणाताईंना करिअरच्या मागे लागण्याचा, विनायकरावांना बिझनेसमध्ये अफाट पैसा कमावण्याचा आणि रमणीला अगदी लहान वयात प्रेम मिळवण्याचा...

म्हणजे तुम्ही नोकरी सोडून घरी बसा असं माझं म्हणणं नाहीये वीणाताई..." इन्स्पेक्टर प्रशांत आता घरगुती भूमिकेत शिरले होते.

"पण नोकरीतल्या जबाबदाऱ्यांना कुठेतरी आवर घालून मुलीकडे लक्ष द्यायला हवंच ना! फेसबुकवर वाढणाऱ्या लाईक्सपेक्षा आपल्या मुलीचं वाढतं वय ही तुमची प्रायोरिटी असायला हवी. तिचा एकटेपणा तिला बाहेर सोबत शोधायला प्रवृत्त करतोय हे विसरू नका."

"विनायकराव, आपल्या मुलीला इतक्या लहान वयात मोबाईल घेऊन दिलात, दिमतीला नोकर-चाकर ठेवले, गाड्या-घोड्या दिल्या म्हणजे जबाबदारी संपली असं नाही होत. तिला ह्या अडनिड्या वयात आईइतकीच वडिलांचीही गरज आहे.... तिच्या गरजा समजून घेण्यासाठी... बाहेरच्या जगाशी ओळख करून देण्यासाठी....आणि त्या सुशांतमध्येही ती कुठेतरी तुम्हांला शोधतेय हे लक्षात येतंय का तुमच्या?

इन्स्पेक्टर प्रशांतचं बोलणं ऐकून विनायकराव अंतर्मुख झाले होते.

"झालं गेलं गंगेला मिळालं... नीतिमत्तेचा योग्य मार्ग सोडून गैरमार्गाला लावतो तो चकवा.... आपल्या साध्या भोळ्या समाधानी मनाला फसवून क्षणिक सुखाच्या मागे धावायला लावतो तो चकवा... आणि हा चकवा कुठे बाहेर नसतो तर तो आपल्या मनातच असतो... मनाचा संयम सगळ्यात महत्वाचा... आणि आपले ध्येय साध्य करत असताना कुठे थांबायचं हे कळणं त्याहून महत्वाचं." आजीनं भरतवाक्य म्हटलं.

"बरं, मग आता ह्या केसचं काय करायचं? काही गुन्हा वगैरे दाखल करायचाय का?"विनायकरावांची शंका

"नाही हो, कसला गुन्हा अन् कसलं काय!" ह्या केसबद्दल जी माहिती मिळाली त्याची माहिती तुम्हाला द्यायला आलो फक्त.. रमणीचा काका ह्या नात्याने ... पण पोलिसी वेशात... कारण त्याशिवाय रमणीबाई काही खरं बोलल्या नसत्या... हो किनई!

आणि मलाही तुमच्या रमणीएव्हढीच मुलगी आहे.... ह्यानिमित्याने मीदेखील एक धडा घेतलाय.... आपण पालक पोटापाण्याच्या मागे कितीही व्यस्त असलो तरी घरी गेल्यावर मुलाबाळांना क्वालिटी टाईम द्यायलाच हवा...."

तुम्हाला काय वाटतं?
0

🎭 Series Post

View all