चला विसावू या वळणावर भाग १

त्याला व्यक्त होता येईल का
"मेलं बाईचा जन्म नकोच. कितीही राबलं तरी किंमत शून्य." नेहमीप्रमाणे शांताचं ठरलेलं वाक्य ती बोलून गेली.
तिला वाटलं नेहमीप्रमाणे तिचा नवरा कमलेश ऐकून घेईल;पण आज तसं न होता तो रागातच म्हणाला.
"बंद कर तुझं रडगाणं. रोजचंच आहे हे तुझं."

ह्या वाक्याने शांता अजून चवताळली.
"काय? मी रडगाणं करते आहे? म्हणजे त्रास होतो ते बोलायचं नाही का? मी तुमच्याकडे मन मोकळं नाही करणार तर कोणाकडे? आता तुम्हालाही त्रास व्हायला लागला आहे."

"हो प्रत्येकवेळी तुला किती त्रास आहे हे मी ऐकूनच घेत आलो आहे,पण आता तुला सवय झाली आहे. रोज उठलं की तोच पाढा वाचायचा का?"

"का नाही बोलणार मी? माझा एकुलता एक मुलगा लग्न झाला आणि बदलला. वर्ष होत नाही तोपर्यंत वेगळा राहायला गेला. सासू, नंणदा, जावा सर्वांचा त्रास काढला. मला किती त्रास होत आहे. मी बोलणार." शांता.

"मला त्रास होत नाही का? मलाही त्रास होतोय;पण मग आता जे दिवस उरले आहेत ते असंच किरकिर करत घालवायचे का?"

"मी किरकिर करते आहे? जाऊ द्या ह्यापूढे मी आता काही बोलणार नाही."
ती किचनमध्ये निघून गेली.

कमलेशला सारे पाठचे दिवस आठवले.
त्याचेही फार हालाखीचे दिवस होते.


तो लहान असतांना बाबा गेल्यामुळे आईसोबत तो देखील कामाला जाऊ लागला होता. अवघे १५ वर्ष वय,पण शांत बसून चालणार नव्हतं.
अंगमेहनतीची कामं करत राहिला.

दिवसभर काम आणि रात्री शाळा असा त्याचा दिनक्रम. एक बहीण आणि भाऊ.
घासातला घास काढून दिला.

खेळण्या बागडण्याच्या वयात जबाबदारीने खचून गेला.

कसंबसं नोकरीला लागला.

मोठा म्हणून आईच्या अपेक्षा जास्त होत्या.
लहान भाऊ आणि बहीण अल्लड होते.
हा समजुतदार होता.

आई म्हणेल तसं ऐकायचा.

आईच्या पसंतीने लग्न केलं.

शांतासोबत लग्न. मुलगा झाला. जबाबदारी वाढली. शांता सर्वांशी जुळवून घेत होती; पण
त्याची आई मात्र कडक स्वाभावाची होती.
सून म्हंटल्यावर तर तिच्या बाबतीत वागणं वेगळं होतं.
थोड्या वर्षाने भावाचे लग्न झालं,नंणदेचं लग्न झालं.

आशाला वाटलं आता जाऊबाई आली तर तिला थोडा आराम मिळेल; पण दिराचा तिच्यावर जीव. वहिनी दिवसभर राबली तरी त्याला दिसायचे नाही आणि तीने जरा कामं केली की, त्याला कसंतरीच व्हायचे.

क्षुल्लक कारणावरून त्याने भांडण काढले आणि वेगळा राहायला गेला.

आईची जबाबदारी कमलेशवर आली. त्याने ती जबाबदारी घेतली.

कमलेशचा मुलगा विवेक मोठा होऊ लागला.
शिक्षणाचा खर्च,आईचे आजारपण, पाहुणे सगळा खर्च त्यानेच केला.

शांताची कसलीच हौस नाही. तिनेही त्याला साथ दिली.

अधूनमधून शांता आणि तिच्या सासूचे खटके उडत.
कमलेश दोघींना शांत करायचा.
तो आईला सोडू शकत नव्हता आणि बायकोला देखील.

घरात भांडण झाले की,त्यालाही प्रचंड त्रास व्हायचा. ते कधीच त्याने बोलून दाखवलं नाही.
बायको आणि आई दोघीही महत्वाच्या होत्या. ना आईला दुखवू शकत ना बायकोला.

आई, आजाराने गेली,पण शांताचा राग मात्र अजूनही तसाच होता.

जो त्रास दिला होता तो सहजासहजी विसरता येणार नव्हता.

कमलेश तिचं नेहमीच ऐकून घ्यायचा.

त्याचा त्रास त्याने कधी बोलून दाखवला नाही.

त्यानेही आयुष्यभर घरासाठी खूप काही केलं होतं. जे वाट्याला आलं ते त्याने मान्य केलं.

एकुलत्या एक मुलाला चांगलं शिक्षण दिलं. तो सेटल झाला.

शांता आता स्वप्न पाहू लागली, सून आली की जबाबदारीतून मोकळं होईल, झालं भलतंच.
खटके उडू लागले आणि ती वेगळी झाली.
मुलगा वेगळं झाल्याचे दुःख तिला काही केल्या सहन होत नव्हते.
तो गेल्यापासून दिवसाची सुरुवात अशीच होत होती.

मी त्रास काढला आणि मला काही आराम नाही.
सासुचं मी केलं आणि माझ्या वेळेस सून वेगळी झाली.
मी फक्त आणि फक्त त्रास काढत राहिले.

मला काय सुख?

कमलेशने देखील त्रास काढला होता, फरक इतकाच होता तो बोलून दाखवत नव्हता.

मुलगा वेगळा राहायला जाणार हे समजल्यावर तो ही रात्रभर रडला होता.

शेवटी तो पुरुष, तो बायकोसमोर देखील रडत नाही.
पुरुष त्याला कसला आला आहे त्रास?

वर्षानुवर्षं हाच समज आहे.

त्यालाही शांता इतकाच त्रास होत होता; पण त्याला कसं व्यक्त व्हायचं हे समजत नव्हतं.

शांताचा त्याच्यावर खूप जीव होता.
शेवटी तोच होता त्याच्याशिवाय तिला तरी कोण होतं?

मुलगा होता त्याला जीव लावला होता तो देखील दूर गेला होता.

मुलाच्या विरहाने ती रडायची आणि कमलेश देखील. त्रास तिलाही होत होता आणि त्यालाही.

फरक इतकाच होता.
ती व्यक्त होत होती आणि तो शांत बसत होता.
तो व्यक्त होईल ? का नेहमीप्रमाणे शांत बसेल?
क्रमशः

कथेची सुरवात कशी वाटली जरूर सांगा.
कथा आवडल्यास एक like जरूर द्या.
अश्विनी ओगले.