Login

चला विसावू या वळणावर भाग २

त्रास त्यालाही होत होता आणि तिलाही, फरक इतकाच ती व्यक्त होत होती आणि तो शांत बसत होता
गेल्या भागात आपण पाहिले की, कमलेश शांताचं बोलणं ऐकत नाही. रोज रोज तेच बोलत राहते म्हणून तो तिला बोलतो, शांताला वाईट वाटतं आता पाहू पुढे.

किचनमध्ये गेल्यावर तिला रडूच येतं.
'मन मोकळं करत होते आणि कमलेश असं तोडून बोलले. त्रास होणार नाही तर काय?'

कमलेश रागात बोलून गेला होता. त्याला कल्पना आली. तो देखील किचनमध्ये गेला. तो येताच तिने पटकन पदराने डोळे पुसले. तो पाणी प्यायला. तिच्याकडे निरखुन पाहिले. पापण्या भिजल्या होत्या. नक्कीच रडली होती,त्याला कल्पना आली.

"शांता,काय हे. रडत होती." कमलेशने तिची हनुवटी अलगद धरली.

तसं तिला अजूनच रडू आलं. अश्रू अनावर झाले.

शांताला रडताना पाहून त्याला फार वाईट वाटलं. त्याचाही कमी जीव नव्हता.

"बरं सॉरी मी असं बोलायला नव्हतं पाहीजे." कमलेशने कान पकडून माफी मागितली.

शांताचा रुसवा सहजासहजी जाणार नव्हता.

तिच्या मनाला तर शब्द लागले.

"मी रडगाणं करते?" त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली.

"मला तसं म्हणायचे नव्हते शांता. मी रागाच्या भरात बोललो; पण तू तरी समजून घे. असं रोज उठून विवेक आणि कविता विषयी बोलणं. माझ्या आईविषयी बोलणं, ती केव्हाच गेली जग सोडून. काही उपयोग आहे का? बघ मी कधीच तुला त्रास दिला नाही. निलेश तर आईची जबाबदारी झटकून गेला. मग मी काय करणं अपेक्षित होतं? आईला त्या वयात वृध्दाश्रमात सोडायचं होतं? मान्य आहे आईचं चुकायचं, आणि तसं मी तुलाही बोलायचो. तिला समजवायला गेलं की, तिला वाटायचं मी तुझ्या बाजूने बोलतो आहे. मी कधीच तुला काही बोललो नाही. तू तुझी कर्तव्य निभावत होती,मला पुरेपूर साथ देत होती."

कमलेश कधी नव्हे ते आज बोलता झाला होता.

ती देखील मन लावून ऐकत होती.

"तुला नेहमी वाटतं आणि तू तसं बोलते मी खूप सहन केलं आहे; पण शांता माझंही आयुष्य समाधानकारक नव्हतं. लहानपणापासून वाट्याला आलेली गरिबी, वडिलांचं छत्र नाहीसे झाले. खरंच वडील गेल्यावर आम्ही फार लाचार झाल्यासारखे झालो . कसं का होईना आईने सांभाळ केला. तिचंही वय जास्त नव्हतं. कमी वयात लग्न झालं होतं. पदराशी तीन मुलं तेव्हा वैधव्य नशिबी आले. वासनेने बरबटलेल्या नजरांचा सामना ती रोज करायची. फार वाईट वाटायचं मला. रागही यायचा नशिबावर. राग आला तरी काय करणार. नशिबाने जे समोर भोग लिहिले होते ते भोगावे लागणार होते, दुसरा पर्याय देखील नव्हता.

दुसऱ्यांच्या वडिलांना पाहिले की रडू यायचं. आमच्या नशिबी ते सुख कुठे?
त्या वयात जबाबदारी काय असते हे कळण्याआधी जबाबदारी अंगावर आली.
जी कामं असतील ती करायचो. आई मला म्हणायची तू नको कामं करू;पण तिचे हाल मला बघवत नव्हते.
माझी नाळ जोडली होती तिच्याशी. शांता, माझी आई होती ती. तिला असं कष्ट करतांना पाहिले, की मला आधीचे दिवस आठवायचे.

माझ्या बाबांनी तिला अगदी राणीसारखी ठेवलं होतं. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. बाबा सगळी हौस करायचे. आम्हालाही जे हवं ते आणून द्यायचे. खेळणी तर पूर्ण कपाट भरून होती. कपडे देखील बाबा आवडीने आणायचे.
खूप हौशी होते ते. खूप प्रेम करायचे बाबा. ते गेले आणि चित्र पालटले. जे सोनं घालून आई मिरवायची, एक एक करून तिने सोनं मोडलं. ज्या दिवशी मंगळसूत्र मोडलं त्यादिवशी बाबाच्या फोटोकडे पाहून खूप रडली. मी चोरून पाहत होतो. मला फार वाईट वाटलं."

हे बोलत असतांना कमलेश रडू लागला.

"तुम्ही असं रडू नका. मी तुम्हाला रडताना बघू शकत नाही." शांताने त्याचे डोळे पुसले.

क्षणभर शांत बसला.

त्याला खूप काही आठवत होतं. त्या आठवणी जुन्या असल्या तरीदेखील नव्याने जखमा देण्यास पुरेश्या होत्या.

वडिलांचे छप्पर जेव्हा डोक्यावर नसते तेव्हा जी फरफट होते, ती कमलेशने फार जवळून अनुभवली होती. किती वर्षांनंतर ते दुःख आज बाहेर पडत होतं.

तो शांताकडे कधीच व्यक्त होत नव्हता; मात्र आज त्याला माहित नाही काय झाले होते. आज भरभरून बोलत होता. आज त्याची सहनशक्ती जणू संपली होती.
आजवर फक्त ऐकूनच घेत आला होता. सतत त्याच गोष्टी ऐकून आता मनही कमजोर झालं होतं.

तो पुढे बोलू लागला.

"शांता, माझ्या वाट्याची चपाती मी माझ्या लहान बहिणीला आणि भावाला द्यायचो. मोठा भाऊ म्हणून ती गोष्ट सहज आत्मसात केली. घासातला घास दिला. तू मला नेहमी बोलून दाखवते निलेशचं वागणं खटकलं तुला;पण माझ्या मनाचा विचार केला तू? त्याच्या वागण्याचा मला त्रास नसेल झाला का?
तो ज्या दिवशी वेगळा झाला त्यादिवशी मी खूप रडलो होतो. मी भाऊ म्हणून नव्हे तर बाप म्हणून संगोपन केलं होतं. तुला विवेकच्या जाण्याचा त्रास झाला अगदी तसाच त्रास निलेश गेला तेव्हा झाला. कोणाला बोलायचं होतं मी? कुठे मन मोकळं करायचे होते?

आई देखील माझ्याकडे रडत होती, मला कमजोर होऊन चालणार नव्हतं. तिला काही झालं तर असा नकारात्मक विचारही डोकावायचा. मी आईची जबाबदारी घेतली. शांता, झाडाची पानं गळतात तेव्हा झाड कसं भकास दिसतं,तसं माझं झालं होतं. मला त्रास होत असताना तटस्थ उभं रहावं लागणार होतं, मी तटस्थ राहिलो. अंगातून प्राण निघून गेला होता. सारं डोळ्याने पाहावं लागत होतं.
निलेश गेल्यावर अनेक आठवणी डोळ्यात पाणी आणायच्या. विवेकच्या जाण्याचा त्रास होतो ना अगदी तसाच त्रास होत होता.

लहानपणी दादा हाक मारून मिठी मारणं, सतत माझ्या अवतीभवती असणं, आईनी दम दिला किंवा मारायला आली तर माझ्याकडे पळत येणं, त्याला काय पाहिजे असेल तरीही दादा आठवायचा. त्यानेही खूप जीव लावला मला. कोणी माझ्याविषयी वाईट बोललं की, त्याला खूप राग यायचा. खरंच खूप जीव लावला त्याने. मी आजारी पडलो की, माझं डोकं चेपून दयायचा , तर कधी पाय चेपून द्यायचा. आरती देखील तशीच होती. मोठा भाऊ म्हणून दरारा होता;पण दोघेही खूप जीव लावायचे. शांता, कठीण असतं स्वतःच्या माणसांना दूर जाताना पाहणं,कारण आपण पुन्हा तेच क्षण,त्यांच्यासोबत जगू शकत नाही.
आजही मला त्रास होतो शांता, फरक इतकाच मी शांत बसतो. मनाची समजून घालतो.
एकच विचार करतो माझी बायको माझ्या सोबतीला आहे. तू माझा आधार आहे शांता आणि मी तुझा आधार.

ढग भरून यावे आणि अविरत बरसत राहावे अगदी तसंच आज कमलेशचं झालं होतं. इतके वर्ष मनात ठेवलेलं सारं बाहेर पडत होतं. आज तो व्यक्त होत होता.

क्रमशः
अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all