Login

कथा- चंदनाचे हात पाय ही चंदन भाग २

The Story Of A Little Boy
कथा-चंदनाचे हात पायही चंदन भाग २


आज शनिवार. केशव पहाटेच उठला. शाळेची तयारी करून, त्याने एका पायावर भार देत दप्तर उचलले .त्याच्या लक्षात आलं, अरे! आज तर विना दप्तराची शाळा... आज खूप मजा येईल. कविता, कथा, चित्र काढण्याचा आजचा दिवस. त्याला खेळ खेळायला खूप आवडे. परंतु पायाच्या अधुपणा मुळे त्याचा खेळण्यात ला वेग कमी पडत होता.
प्रत्येक शनिवारी त्याला त्याच्या विशेष शिक्षिका भेटायला यायच्या. त्याच्यासाठी त्या नेहमी भेटवस्तू आणायच्या. कधी चॉकलेट्स, कधी बिस्किट्स, तर कधी खेळण्याच्या वस्तू. त्याला या बाई खूप आवडायच्या. कोणत्याही लहान बालकाला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लाभली तर त्याला त्या व्यक्तीचा खूप लळा लागतो.

केशव चे सुमधुर भजन त्या बाईंना आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांना खूप आवडायचे. आज तर त्याचा आनंदाचा, आवडीचा दिवस.
"काय रे केशव!तुला इतकं चांगलं भजन कसं गाता "? "मी माह्या आप्पा ले, रोज संध्याकायी विठ्ठलाच्या मंदिरात हात धरून नेत असतो. त्यायले दिसत नाही ना! मी बी बसतो त्यायच्या सोबत भजन म्हनाले". "असं! म्हणजे तुझे आजोबा सुद्धा भजन गातात तर!" "हो ना! मायी माय म्हनते, यानं याच्या आज्या चा गया घेतला." "असं होय!"

फुलांचा सुगंध जसा ना दमता वाऱ्यावर दरवळतो, तसाच केशव चा मधुर आवाज सुद्धा केशवा च्या बासरी प्रमाणे दरवळणारा... त्याला भक्ती गीते म्हणण्याचा छंदच जडला होता. मंदिर असो की शाळा. किंवा घराचा परिसर. सगळीकडे केशव च्या भक्ती रसाने सर्वांना मोहवून टाकले होते.

वर्गाच्या चौकटीत बाहेर एक शिक्षिका विद्यार्थ्यांची कशी माऊली होते ,याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे त्याच्या विशेष शिक्षिका... "बरं का केशव! पुढचा महिना ऑगस्ट". "आपल्याला स्वातंत्र्य दिनासाठी छान देशभक्तीपर गीत तुझ्या आवाजात घ्यायचं आहे. तू म्हणू शकशिल का ते गीत?"
"हो बाई! मी आतापासूनच सराव करतो त्या गीताचा. पण गीत कोणतं आहे?" "गीत हिंदी आहे. तुला जमेल ना!". हो बाई !मी प्रयत्न करतो"... बाईंनी गीताची कॅसेट त्याला वाजवून दाखविली.

"ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन
तुझ पे दिल कुर॔बान...
तू ही मेरी आरजू, तु ही मेरी आबरू
तू ही मेरी जान...
ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन"....


केशवच्या देश भक्ती पर गीताने सर्वांवर काय परिणाम झाला, पाहूया भाग तीन मध्ये.


छाया बर्वे राऊत अमरावती