Login

चंद्र आहे साक्षीला : भाग ३ (अंतिम भाग)

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने बहरलेली प्रेमकथा!
"आई अहो नऊ वाजत आले अजून शरद शुद्धीवर नाही आला." गेले दोन तास बाहेरून शरदला निश्चल पडलेले पाहून पौर्णिमाचा धीर आता हळू हळू सुटत चालला होता.

"पौर्णिमा तू नको काळजी करू." सासुबाई तिला त्यांच्या परीने शांत करत होत्या इतक्यात डॉक्टर तिथे व्हिजीट साठी आले आणि काहीही न बोलता थेट आतमध्ये गेले तसा पौर्णिमाचा जीव अजूनच खालीवर व्हायला लागला.

ती काचेमधून आतमध्ये पहायला लागली. डॉक्टरांनी शरदच्या छातीवर एक - दोन इंजेक्शन्स दिले आणि सलाईन मध्ये काही इंजेक्शन देऊन, त्यांनी नर्सला काही सुचना दिल्या आणि ते बाहेर आले तसे पौर्णिमा त्यांच्या समोर येऊन उभी राहिली.

"डॉक्टर कायं झालं? शरद ठीक आहे ना? तो येईल ना शुद्धीवर?"

"हे पहा खरंतर आम्ही मगाशी सलाईन दिले त्यानंतर पेशन्टने दोन तासात शुद्धीवर येणे अपेक्षित होते पण अजूनपर्यंत पेशन्ट शुद्धीवर आला नाही तर त्याच्या डोक्याला काही मार लागला आहे का कुठे आतमध्ये अशी एक शंका निर्माण होत आहे. मी इंजेक्शन दिले आहे आत्ता त्यानंतर एका तासात पेशन्ट शुद्धीवर आला तर ठीक, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो.. आम्ही आमचे उपचार करत आहोत.. धीर धरा. " डॉक्टर एवढे बोलून निघून गेले आणि पौर्णिमाच्या शरीरातील अवसान गळून पडले. ती मटकन खाली कोसळली जमिनीवर.

" पौर्णिमाsss ". सासूबाईंनी तिला उठवून बाकावर बसवले.

" आई माझा शरदss "

" पौर्णिमा तूला सांगितले ना मी काही होणार नाही आपल्या शरदला म्हणून. माझा देव इतका निष्ठुर नाही होणार माझ्या मुलांच्या बाबतीत. शरद शुद्धीवर येणारच बघं तू." शरदच्या आईचा धीर पाहून संजय मात्र अगदी भारावून गेला.

घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. संजय, शरदची आई आणि पौर्णिमा मात्र शरदकडे डोळे लावून होते. एक तास पूर्ण व्हायला अवघे पंधरा मिनिटे बाकी होते. शरदची आई देवाचा जप करत होती, पौर्णिमा मात्र शरदकडे डोळे लावून बसली होती. इतक्यात आतमधून नर्स बाहेर आली आणि काहीच न सांगता थेट निघून गेली. आतमध्ये शरदचे शरीर निश्चल पडले होते. पौर्णिमाची अस्वस्थता इतकी वाढली की ती जागीच कोसळली.

पौर्णिमाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर तिच्या सासूबाई उभ्या होत्या.
"आई शरद?" पौर्णिमाने अगोदर शरदची चौकशी केली.

"पौर्णिमा बघं मी म्हटलं होतं ना माझा देव इतका निष्ठुर नाही होणार. माझ्या मुलांची परिक्षा नाही घेणार तो. अगं आठ वर्षांपूर्वी याच कोजागिरीच्या रात्रीने तुमचे सुख हिरावून घेतले, तुमच्या प्रेमाची परिक्षा घेऊन माझ्या मुलाला प्रतिक्षेत ठेवले. आज मात्र तुमचे प्रेम पाहून त्या नियतीला ही हार मानावीच लागली शेवटी. " पौर्णिमाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवून तिच्या सासूबाई बोलू लागल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडत होते. पौर्णिमा मात्र गोंधळून त्यांच्याकडे पाहत होती अगदी.


" आई कायं झालं? मला काहीच कळत नाही आहे. शरद ठीक आहे ना तुम्ही रडत का आहात? "

"अगं वेडाबाई हे तर आनंदाश्रू आहेत. हो तुझा शरद ठीक आहे अगदी आणि हे अश्रू होणार्‍या आजीचे आहेत. आठ वर्षांनंतर नियतीने पुन्हा हे सुख पदरात दिले आहे." सासूबाईंच्या बोलण्याने पौर्णिमाला सारे काही उलगडले तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येऊन वहायला लागले.

"आई मला शरदकडे जायचे आहे. " पौर्णिमा बेडवरून उठत बोलली तसे तिच्या सासूबाईंनी तिला आधार देऊन उठवले. वॉर्ड मधून बाहेर येऊन दोघीही शरदच्या रूममध्ये आल्या तिथे संजय बसला होता शरद जवळ.
शरदला शुद्धीवर आलेले पाहून पौर्णिमा आनंदली.

शरदच्या आईने त्याला गोड बातमी सांगितली तेव्हा त्याचा आनंदाला ही सीमा उरली नाही. शरद आणि पौर्णिमाला आतमध्ये थांबवून त्याची आई आणि संजय मिठाई आणण्यासाठी गेले तशी पौर्णिमा शरदच्या छातीवर जाऊन बिलगली.

शरदने तिला प्रेमाने गोंजारले.
"शांत होss अगं आज तर किती आनंदाचा दिवस आहे."

"हो खरं आहे पण काही वेळापूर्वी माझी अवस्था कायं होती कसे सांगू?मला वाटलं ही कोजागिरी पुन्हा एकदाss"

" शूsss" शरदने तिच्या डोक्यात टपली मारली तसे तिने तिची मान वर करून शरदकडे पाहिले. शरदने हलकेच त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले.

आजची कोजागिरी शरद आणि पौर्णिमेच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन आली होती. आठ वर्षांपूर्वी याच कोजागिरीच्या दिवशी नियतीने त्यांच्या प्रेमाची परिक्षा घेतली होती आणि आज आठ वर्षांनी प्रेम जिंकले होते नियती पुढे.

पौर्णिमा च्या गालांवर आज शरदचे प्रेमाची नवी लाली चढली होती.
"पौर्णिमा आज सुद्धा तोच चंद्र आहे नभात साक्षीला आणि इतकी गोड बातमी तू मला दिली आहेस तर आठ वर्षापूर्वी तू जे गाणे म्हणणार होती ते आज ऐकवं मलाss आत्ताच्या सुखद क्षणी" खिडकीमधून येणार्‍या चंद्र प्रकाशाकडे पाहून शरद बोलला तसे पौर्णिमा हळू आवाजात गुणगुणायला लागली.

"चंद्र आहे साक्षीला... "

शरद पौर्णिमेच्या प्रेमरंगाचा दरवळ त्या कोजागिरी मध्ये सर्वत्र दरवळत होता.