चंद्र आहे साक्षीला! - भाग ३९
सकाळचे १० वाजले होते. वैद्यांच्या ऑफिसमध्ये नुकत्याच फायनल झालेल्या डीलचं पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची धावपळ चालू होती. समीरही आज ऑफिसमध्येच होता. प्रत्येकाने तयार केलेल्या फाईल्स डोळ्यांखालून घालून सह्या करणं चालू होतं त्याचं. तेवढ्यात दरवाजाकडून आलेल्या हिल्स च्या आवाजांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. ऑफिसच्या पिऊनने नुकत्याच उघडलेल्या ग्लासडोअर मधून सानिका आत शिरत होती. वाईन कलरचा गळ्याभोवती फ्रिल असलेला फुल स्लीव्स शर्ट आणि व्हाईट कलरची ट्राउजर घातली होती तिने. एका हातावर व्हाईट ब्लेझर आणि दुसऱ्या हातावर ब्रँडेड पर्स होती. चेहऱ्यावर तिचा नेहमीच हलकासा मेकअप होता. केस छान सेट करून मोकळे ठेवले होते. डोळ्यावरचा गॉगल काढत ती दारातून आत आली "गुड मॉर्निंग!"
सगळे तिच्याकडेच बघत होते. एखाद्या मोठ्या कोर्पोरेशनची सी.इ.ओ वगैरे वाटत होती ती. तिच्या चालीतला आत्मविश्वास खास करून वाखाणण्याजोगा होता. आज खूप दिवसांनी तिने तिचे ऑफिसचे कपडे घातले होते. मेहतांच्या प्रेझेन्टेशनसाठी. समोरच्या सगळ्यांच्या आपल्यावर खिळलेल्या नजरा बघून तिने एकदा स्वतःकडे वरपासून खालपर्यंत बघितलं. विचित्र तर नव्हती दिसत ती. तिने प्रश्नार्थक नजरेने समीरकडे बघितलं. तोही पहिल्यांदाच तिला अशा कपड्यात बघत होता. एरवीच्या तिच्या कॅज्युअल लुकपेक्षा एकदमच वेगळा होता हा लूक. स्मार्ट, डॅशिंग, इंडिपेंडंट.. तिने नजरेनेच त्याला 'काय?' विचारलं. समीरने त्याच्या आजूबाजूला बघितलं. सगळे हातातलं काम सोडून तिच्याकडे बघत होते. त्याच्या स्टाफमधली तरुण पोरंही.. जरा रागच आला त्याला.
"एव्हरी वन. बॅक टू वर्क प्लिज." तो म्हणाला तसे सगळे पुन्हा आपापल्या कामांकडे वळले.
"समीर सगळे असे का बघत होते माझ्याकडे? काही विचित्र दिसतेय का मी? असेल तर आत्ताच सांग मला. त्या मेहेतांसमोर पुन्हा एकदा स्वतःचं हसं करून घ्यायचं नाहीये मला." ती नुकत्याच तिच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या समीरला म्हणाली.
"रिलॅक्स सानू, खूप छान दिसतेयस. काय गं, ह्या मेहेतांचं वय काय असेल? मला जेलस व्हायचं काही कारण नाहीये ना?" तिला चिडवत तो म्हणाला.
"समीर.. तू पण ना. काहीही बोलतोस. मी जाते आत मिटिंग रूममध्ये सगळी तयारी करून ठेवते." म्हणून ती गेली.
सानिकाचं प्रेझेंटेशन चालू असताना बाहेर बसलेल्या समीरचं लक्ष तिच्याकडेच होतं. त्या संपूर्ण काचेच्या मीटिंगरूम मधून तो तिचे प्रेझेंटेशन स्किल्स, बॉडी लँग्वेज न्याहाळत होता. तिच्या चेहऱ्यावरून, वागण्याबोलण्यातून जो सहजपणा जाणवत होता तो बघून स्क्रीनवर दिसणारी माणसंही प्रभावित झाल्यासारखी वाटत होती. जवळपास तासाभराने प्रेझेंटेशन संपलं आणि चेहऱ्यावर मोठं स्माईल घेऊन सानिका बाहेर आली.
"तुला सांगते समीर, एवढं रिलॅक्स वाटतंय मला. त्या मेहेतांनी जर आमचं डील घेतलं नाही ना तर त्यांचाच लॉस आहे." समीरच्या बाजूला बसत पाण्याची बाटली तोंडाला लावत ती म्हणाली.
"अरे वाह, आज टेन्शन नाही आलंय वाटतं. इथे आली होतीस तेव्हा काय अवस्था होती तुझी. आशाकाकू म्हणाल्या होत्या मला." समीर म्हणाला.
"खरंय, पण मी एवढं सगळं करून पण दीक्षित सरांनी त्यांना हवं तेच केलं ना. म्हणून मी ठरवलंय टेन्शन घ्यायचं नाही आता. तू म्हणतोस तसं चिल मारायचं. फार काय नोकरी जाईल ना. ठीक आहे. तू देशील ना मला तुझ्या कंपनीत जॉब?" तिने हसत विचारलं.
"देईन ना. फक्त प्रॉब्लेम असा होईल की तू समोर असताना माझं काम होणार नाही आणि मग मी तुला काम करू देणार नाही. म्हणजे कंपनीचं दिवाळं निघाल्यात जमा आहे." तिच्याकडे बघून डोळे मिचकावत तो म्हणाला.
"तू कशावरूनही फ्लर्ट करू शकतोस ना?" सानिका आजुबजुला बघत कुजबुजत होती.
"फ्लर्ट करायची वेळ गेली आहे मॅडम, प्रपोज केलं आहे मी डायरेक्ट. हां त्याचं उत्तर अजून मिळालं नाहीये ती गोष्ट वेगळी." समीर गरीब चेहरा करत म्हणाला. 'लवकरच मिळेल. इन फॅक्ट मी आजच तुला सांगणार आहे.' सानिकाने मनातच ठरवलं.
"मग आता काय प्लॅन?" उद्यापासून ती ऑफिसला येणार नाही म्हणून समीरला जरा वाईटच वाटत होतं.
"आता मी घरी जाऊन मस्त ताणून झोप काढणार आहे. दोन दिवस नीट झोप झाली नाहीये. आणि संध्याकाळी आपण सगळे भेटतोय ना? गौतमीचा मेसेज आलेला मला." सानिका तिची पर्स घेऊन निघाली.
"हो अर्थात, फक्त मला जरा उशीर होईल. इकडचं काम संपवून यायला. भेटतोच मी तुम्हाला आपल्या नेहमीच्या जागी." समीर म्हणाला आणि सानिका त्याला बाय करून निघाली.
____****____
संध्याकाळी सगळे त्यांच्या नेहमीच्या पारावर भेटले होते. त्यांना तिथे भेटलेलं पाहून लतिका पण तिकडे आली होती. सगळ्यांच्या कपाळावर थोड्या आठ्या आल्याच होत्या.
"सॅमी नाही आलाय का अजून?" तिने विचारलं आणि सानिकाने त्रासिक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं. ती काही बोलणार तेवढ्यात तिचा फोन वाजला म्हणून ती बोलायला बाजूला गेली.
"हॅलो सर, बोला." सानिका म्हणाली.
"सानिका काँग्रॅच्युलेशन! तुला कल्पना नाहीये तू आज किती भारी प्रेझेंटेशन दिलं आहेस. अगं ते मेहता केवढे खुश होते. त्यांचं डील आपल्या कंपनीलाच मिळालं आहे. ऑल थँक्स टू यु." दीक्षित सर म्हणाले.
"दॅट्स ग्रेट न्यूज सर. पण ह्याचं सगळं श्रेयं माझं नाहीये बरं का. आपल्या अख्ख्या टीमने खूप छान काम केलंय. सो थँक्स टू देम." सानिका हसत म्हणाली. तिच्यावर टाकलेली एवढी मोठी जबाबदारी तिने यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर.
"सानिका, ह्या न्यूजबरोबरच मी तुला अजून एक गोष्ट सांगायला फोन केला आहे. मेहेतांची अशी अट आहे की त्यांचा प्रोजेक्ट तूच लीड केला पाहिजेस. आणि तो ही शक्य तितक्या लवकर. सो मी तुला तुझी सुट्टी लवकर संपवून परत यायची परवानगी देतोय. मला माहितीये तुला तसंही एवढी मोठी सुट्टी घ्यायचीच नव्हती आणि तुला कामातून ब्रेक मिळवा हा जो माझा हट्ट होता तो ही पूर्ण झाला आहे. त्यामुळे तू तुला हवं तर अगदी उद्यापासूनही लगेच जॉईन होऊ शकतेस." दीक्षित सर खुश होऊन म्हणाले.
"काय? उद्यापासून? कसं शक्य आहे सर. माझे इकडे काही प्लॅन्स आहेत. असं लगेच नाही जमणार मला. माझी अजून ३ आठवडे सुट्टी राहिली आहे ती पूर्ण करून येते ना मी." सानिका एकदम गडबडून गेली. तिच्या शब्दांवर तिचाच विश्वास बसत नव्हता. स्वतःच्या नोकरीपेक्षा बाकी कोणतेही प्लॅन्स तिला कधीपासून महत्वाचे वाटायला लागले होते? पण गेल्या महिनाभरात खूप काही बदललं होतं. ह्या गावात तिने स्वतःचं एक रुटीन सेट केलं होतं. तिचे शाळेचे क्लासेस होते, कणवली युथचे काही प्रोजेक्ट्स चालू केले होते त्यात तिची मदत लागणार होती, आशाताईंना समजवावं लागणार होतं, वैद्यकाकांशी बोलावं लागणार होतं, तेही तिच्या आयुष्यात खूप महत्वाचे झाले होते.. आणि समीर? त्याला तर तिने अजून तिच्या मनातलं सांगितलंही नव्हतं आणि आता तिला अचानक असं मुंबईला जावं लागणार होतं?
"हॅलो सानिका? आहेस का? अगं मी सहज म्हंटलं. अगदी उद्याच आलं पाहिजेस परत असं काही नाही. पण आठवडाभरात आलीस तर उत्तम. अजून एक सरप्राईज आहे बरं का तुझ्यासाठी. तू हा प्रोजेक्ट सुरु करायच्या आधीच मी तुला ह्या फर्ममध्ये सिनिअर पार्टनर म्हणून प्रमोट करणार आहे. आफ्टरऑल यु डिझर्व इट!" दीक्षितसर म्हणाले तशी स्वतःच्याच विचारात हरवलेली सानिका भानावर आली.
"व्हॉटsss? आर यु सिरिअस सर? प्रमोशन? " सानिकाने आश्चर्याने विचारलं. महिनाभरापूर्वी तिला तिच्या नोकरीची शाश्वती नव्हती आणि आज तिला प्रमोशनही मिळत होतं. वाह मेहता, तुम्ही तर अगदी देवासारखे धावून आलात.
"अर्थात, कधी ना कधी तुला ते मिळणारंच होतं. पण आज तू दाखवून दिलंस की तू ह्या नवीन जबाबदारीसाठी पूर्णतः तयार आहेस. तू परत आल्यावर तुझ्या हाताखाली आत्ताची तुझी टीम तर असेलच पण मी अजूनही काही लोकं वाळिंबेंच्या टीममधून तुझ्या टीममध्ये हलवणार आहे. ह्या प्रोजेक्टबरोबर अजूनही काही महत्वाचे क्लाएन्टस तुला हॅन्डल करायचे आहेत आता. सो सानिका, आम्ही सगळे वाट बघतोय इकडे तुझी." दीक्षितसर उत्साहाने म्हणाले.
"ठीक आहे, मी विचार करून सांगते सर. कमीत कमी एक आठवडा तरी मिळेल का मला अजून?" तिने विचारलं.
"अर्थातच. फक्त त्यापेक्षा उशीर नको करुस. आपल्या प्रोफेशनमध्ये वेळेला किती महत्व आहे हे तर तुला माहितीच आहे." दीक्षितसर म्हणाले. त्यांच्या बोलण्याला नाईलाजाने दुजोरा देऊन सानिकाने फोन ठेवला. फोनवर झालेलं बोलणं प्रोसेस करत होती ती. केवढ्या गोष्टी अचानक बदलत होत्या तिच्या आयुष्यात. खुपच कठीण परिस्थितीमध्ये अडकली होती ती. ज्यासाठी सगळा अट्टाहास केला होता ते यश एका बाजूने तिला खुणावत होतं आणि दुसऱ्या बाजूला नव्याने तिच्या आयुष्यात आलेली नाती होती. ह्या दोन्हीमधलं एक काहीतरी निवडणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं. तिला लवकरात लवकर समीरशी ह्या विषयावर बोलावं लागणार होतं. मनाशी काहीतरी ठरवत ती मागे वळाली आणि तिच्या पोटात गोळा आला. नुकताच आलेला समीर तिच्या मागे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून त्याने तिचं आत्ताचं बोलणं ऐकलं आहे हे स्पष्ट होतं.
"समीर.. मी.." सानिकाला अचानक शब्दच सुचत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या वेदनांनी तिलाही वाईट वाटत होतं.
"काँग्रॅच्युलेशन्स! तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं तुला. सॉरी मला चोरून नव्हतं ऐकायचं तुझं बोलणं मी जस्ट तुला बोलवायला आलो होतो तेव्हा कानावर पडलं." तो तिची नजर चुकवत म्हणाला. त्याच्या डोळ्यांत आलेलं पाणी त्याला तिच्यासमोर नव्हतं आणायचं. सानिका निःशब्द उभी होती त्याच्या समोर.
"मग कधी चाललीयेस परत? एकदम खुश असशील ना परत तुझ्या जुन्या रुटीनमध्ये जायला. इकडे आल्यापासून त्याचीच तर वाट बघत होतीस तू." त्याने तिच्याकडे बघत विचारलं.
"समीर. प्लिज असं नको बोलूस. मला तुला काहीतरी सांगायचंय." ती त्याच्याजवळ जात म्हणाली.
"हेच ना की तू पुढच्या आठवड्यात परत चालली आहेस?" त्याने तिच्या डोळ्यांत बघत विचारलं. मनात एक वेडी आशा होती, ती नाही म्हणेल. पण तिच्या शांततेत त्याला त्याचं उत्तर मिळालं. त्याला माहितीच तर होतं, कधी ना कधी जाणारंच होती ती, तिने स्वकष्टाने उभारलेल्या तिच्या मुंबईतल्या आयुष्यात परत. मग एवढा का कासावीस होत होता तो?
"समीर, माझा नाईलाज आहे. अजून जास्तीत जास्त एक आठवडा थांबता येईल मला इकडे. पण हे कधीना कधी होणारंच होतं ना. पुढच्या आठवड्यात नाही तर अजून दोन आठवडयांनी मला जावं तर लागलंच असतं ना." ती हळूच त्याचा हात हातात घेत म्हणाली.
"बरोबर आहे तुझं. तू गेलंच पाहिजेस. आफ्टरऑल एवढे कष्ट केले आहेस तू हे मिळवण्यासाठी. आपली ओळख काय काही दिवसांची आहे. त्यासाठी तू इथे थांबावंस अशी अपेक्षाच नव्हती माझी. पण.. व्हॉट अबाऊट अस, सानू? का त्याचा विचार केलाच नाहीयेस तू अजूनही?" तो तिच्याकडे अपेक्षेने पाहात होता.
"मी केलाय त्याचा विचार समीर.." सानिका बोलत असतानाच बाकीचे सगळे तिकडे आले.
"सानिका ही लतिका काय सांगतेय, तू मुंबईला परत चालली आहेस लगेच? पण तुझी तर सुट्टी अजून बाकी आहे ना?" चंद्याने विचारलं.
"एवढ्या घाईघाईने का? सगळं ठीक आहे ना." गौतमीने विचारलं. सगळे तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती तिच्याकडे.
"अरे काय तुम्ही प्रश्न विचारत बसलाय तिला. आधी तिला काँग्रॅट्स तर करा. तिचं प्रमोशन झालंय. काय लतिका तू पण. मुद्द्याचं सांगितलंच नाहीस." समीर हसत पुढे येऊन म्हणाला आणि बाकीच्यांच्या प्रश्नांमधून तिची सुटका झाली. नेहमीप्रमाणेच तिच्या मदतीला धावून आला होता तो.
"अरे वाह, सही! काँग्रॅच्युलेशन्स. हे असं नाही सांगायचं हां. पार्टी पाहिजे आम्हाला." चंद्या खुश होऊन म्हणाला.
"खूप भारी यार सानू. आय एम सो हॅप्पी!" गौतमीनेही तिला पुढे येऊन मिठी मारली. "पण काय यार, मिस करेन मी तुला. किती भारी मैत्री झाली होती आपली. तिकडे जाऊन विसरू नकोस हां आम्हाला." सगळे सानिकाशी बोलत होते पण समीर मात्र मागे उभा होता. तिचं लक्ष सारखं त्याच्याकडेच जात होतं. तोही तिच्याकडेच बघत होता. बाकीचे त्यांच्या चेहऱ्यावरून काय ते समजून गेले.
त्यांच्यामागे उभ्या असलेल्या लतिकाच्या चेहऱ्यावर मात्र विजयी हास्य पसरलं होतं, "बरं झालं सुंठेवाचून खोकला गेला. फार मागेपुढे करत होतीस ना सॅमीच्या. ही एकदा गेली इकडून की मी माझ्या सॅमीला परत मिळवणारंच!" ती स्वतःशीच म्हणाली.
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा