चंद्र आहे साक्षीला! - भाग ४१
वैद्यांच्या वाड्यात त्यांना बोलवायला आलेल्या गौतमी बरोबर सगळे गावाच्या चौकात आले. तिकडे पारावर निमकर पती-पत्नी डोक्याला हात लावून बसले होते. गावातली बाकीची लोकंही जमली होती. सानिकाला तिथे पोहोचलेलं बघून आशाताई पटकन तिच्याजवळ आल्या.
"काय झालंय आई? सगळे एवढे टेन्शनमध्ये का आहेत?" सानिकाने त्यांना विचारलं. समीर आणि वनिताताई पण तिच्या बाजूलाच उभे होते. वसंतराव समोरच उभ्या असलेल्या बाकीच्या गावाच्या कमिटी मेम्बर्सशी बोलायला गेले होते.
"सानू अगं ती पिहू आज घरीच नाही आलीये." त्या खालच्या आवाजात तिला म्हणाल्या." सकाळी शाळेतल्या कोणत्या क्लासला गेली होती. नेहमीच्याच वेळेला निघाली होती म्हणे दुपारी. आधी त्यांना वाटलं मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल म्हणून यायला उशीर झाला असेल. पण आता सात वाजून गेलेत. अजून तिचा पत्ता नाहीये. तिच्या सगळ्या मैत्रिणींना विचारलं पण कोणालाच काही माहीती नाहीये. तिच्या आईची अवस्था फार वाईट झालीये गं रडून रडून."
समीर आणि सानिका अवाक होऊन ऐकत होते. गावातून एक मुलगी अचानक गायब झालीये ह्यावर समीरचा विश्वासच बसत नव्हता. ह्यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. ह्या गावातल्या सगळ्यांना तो नीट ओळखत होता. सानिकालाही जबरदस्त धक्का बसला होता. आज सकाळी तिच्याच क्लाससाठी शाळेत आली होती पिहू. निघताना तिला बायही करून गेली होती. मग अचानक गायब कुठे झाली ती? तिने समोर बसलेल्या तिच्या रडून बेजार झालेल्या आईकडे बघितलं. त्यांना बघून सानिकाला वाईट वाटलं. एक वयात आलेली मुलगी रात्री घरी नाही आल्यावर त्यांच्या मनात काळजीचं किती काहूर माजलं असेल याची तिला कल्पना होती. मागे घडलेला सगळा प्रसंग बाजूला ठेऊन ती पटकन पुढे गेली.
"काकू, तुम्ही काळजी करू नका. आपण तिला शोधून काढू." त्यांना धीर द्यायला ती म्हणाली.
"मागच्यावेळीच तिला घरात डांबून ठेवलं असतं तर ही वेळ आली नसती. पण तुम्हाला सगळ्यांना आमच्या घरच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायची हौस होती ना. तुमच्यामुळेच झालंय हे." बाजूला बसलेले निमकर म्हणाले. समोर वसंतरावांना पाहून त्यांना सानिकाला काही बोलता येत नव्हतं पण त्यांचे डोळे तिच्याकडे बघत आग ओकत होते. सानिकाने त्याकडे दुर्लक्ष केलं. ह्याक्षणी पिहूला शोधणं महत्वाचं होतं तिच्यासाठी. तिने एकदा समीरकडे बघितलं. तो कसलातरी विचार करत होता.
"चंदू, गोप्या.. गावातल्या सगळया पोरांना एकत्र करून घेऊन या. आजची रात्र फार महत्वाची आहे. आपल्याला पिहूला शोधून काढायलाच हवं. निमकर तुम्ही घरी जा, ती घरी आली तर आम्हाला फोन करून सांगा. बाकीचेही आता घरी जा आणि आसपास लक्ष ठेवा. आम्ही पिहूला शोधतो. सकाळपर्यंत काही कळलं नाही तर पोलिसांत तक्रार द्यावी लागेल." समीर पुढे येऊन सगळ्यांकडे बघून म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून हळूहळू गावकरी पांगले. निमकरही घरी गेले. आशाताईही सानिकाला घेऊन जायला तिच्या जवळ आल्या. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं.
"आई तू पुढे हो. मी आलेच. मला समीरशी जरा बोलायचंय." ती त्यांना म्हणाली.
"आता एकटी कुठे येतेस तू. आधीच इथे काय होऊन बसलंय. उगाच माझ्या जीवाला काळजी नको लावूस हां सानू. वेळेत घरी ये." म्हणून त्या तिकडून निघाल्या. त्या गेल्यावर सानिका समोर उभ्या असलेल्या समीरजवळ गेली. तो फोनवरून गावातल्या पोरांना सूचना देत होता.
"समीर, दोन मिनिटं आहेत का तुझ्याकडे. मला तुझ्याशी बोलायचंय." ती म्हणाली. त्याने फोन कट करून तिच्याकडे बघितलं.
"सानिका, माझ्याकडे आत्ता अजिबात वेळ नाहीये." काहीसा रुक्षपणेच म्हणाला तो.
"समीर, जरा भांडण बाजूला ठेऊया का आपण. तुला कशाचं वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी पण ..." ती बोलत असतानाच त्याने तिला हाताने थांबवलं.
"सानिका ही वेळ आहे का हे सगळं बोलायची? तुला परिस्थितीचं काही गांभीर्य आहे की नाही? इकडे पिहू गायब झालीये आणि तुला हे सुचतंय? तू ह्या सगळ्यापासून लांब रहा, तसंही काही दिवसांत तू इकडून गेल्यावर तुझा काही संबध नाहीये ह्या सगळ्याशी." तो चिडून म्हणाला आणि फोनवर बोलत बाजूला गेला. सानिका सुन्न होऊन ऐकतच राहिली. 'एका गैरसमजावरून हा एवढं कसं बोलू शकतो मला? इकडे काय मी प्रेमाच्या गोष्टी करायला आलेय असं वाटतंय का ह्याला?' पण स्वतःचं दुःख बाजूला ठेऊन तरीही ती त्याच्यामागे गेली. पिहूसाठी..
"समीर, मला पिहूबद्दलच बोलायचंय. एकदा माझं ऐकून तर घे." ती त्याला समजावत म्हणाली.
"पिहूबद्दल काय बोलायचंय तुला?" तिचं नाव ऐकून तो जरा शांत झाला.
"तुला आठवतंय मागच्या वेळी गावात सगळा राडा झाला तेव्हा ती कोणत्यातरी मुलाबद्दल बोलत होती? तो मुलगा तिला त्रास देत होता. आपण त्या मुलाबद्दल माहिती काढली तर? मला राहून राहून वाटतंय त्याचा इथे काहीतरी संबंध असेल." ती म्हणाला. समीरने शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतलं.
"ठीक आहे. मी बघतो. तू घरी जा." म्हणून समीर पुन्हा आलेल्या फोनवर बोलण्यात बिझी झाला. त्याच्या इग्नोर करण्याने दुखावत होती ती. सगळे पिहूला शोधात असताना स्वतः घरी जाऊन बसणं तिला पटत नव्हतं. शेवटी काही अंशाने तीही जबाबदार होतीच पिहूच्या ह्या अवस्थेला. तिला पण सगळ्यांना पिहूला शोधायला मदत करायची होती.
"समीर, मी पण.." सानिका पुन्हा त्याच्यामागे गेली.
"सानिका तुला दिसत नाहीये का इकडे माझं काय चाललंय? काय सारखं समीर समीर लावलंय? आणि काय गं, तुझा होणार नवरा कुठे दिसत नाहीये ह्या सगळ्यात? का माणुसकीशी काही घेणं देणं नाहीये त्याचं? इथे गावातले लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे जीवाचं रान करून त्या मुलीला शोधतायत आणि हा गायब. घरी लग्नाचं प्लॅनिंग करत बसलाय वाटतं. आणि तसं असेल तर तू इथे का थांबली आहेस? तू पण जा ना." समीर चिडून म्हणाला. तेवढ्यात चंदू तिकडे बाकीच्यांना घेऊन आला. सानिकाचे डोळे पाणावले. चेहरा लाल झाला. रागाने आणि त्याच्या बोलण्याने तिला झालेल्या दुःखाने. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत ती तिकडून निघून गेली. समीर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता. काळीज तीळ तीळ तुटत होतं त्याचं. तिला तसं दुखावून तिच्यापेक्षा जास्त त्रास त्यालाच होत होता. अजूनही प्रेम तर होतंच ना. पण तिच्या वागण्याने मनातून खूप दुखावला होता तो. तिचा स्पष्ट नकार सहन करू शकला असता तो पण हा गैरसमज, जो तो सत्य मानून चालला होता त्यामुळे त्याने मनात तिच्याबद्दल बांधलेले सगळे अंदाजच खोटे ठरत होत होते. जिच्यावर मी प्रेम केलं ती अशी कशी वागू शकते? एवढा कसा चुकू शकतो मी तिला ओळखण्यात? ह्याचा त्याला जास्त त्रास होत होता.
"सम्या.." चंदूच्या हाकेने तो भानावर आला. "असे बारा का वाजलेत तोंडावर? आणि सानिका अशी रडत का गेली?"
"काही नाही. ते महत्वाचं नाहीये. चला आपण कामाला लागूया. तू आणि गोपाळ बाईकवरून आपल्या सगळ्यात जवळच्या बसस्टॉप वर जाऊन बघा. वाटेत कोणी पिहूला बघितलं आहे का ते पण विचारा. मी आपल्या गावातल्या चौकातल्या सी.सी टी व्ही चं फुटेज चेक करतो. आपल्या बाकीच्या पोरांना त्या बीचच्या दिशेने पण पाठवा. तो सामसूम रस्ता आहे जरा. जर कोणता मुलगा वगैरे इन्व्हॉल्व्ह असेल तर कदाचित ते तिकडे गेले असू शकतात." समीरने त्याला सूचना दिल्या आणि चंदू गोपाळाला घेऊन तिकडून निघाला. आता तिथे लावण्या आणि गौतमीच उरल्या होत्या.
"तुम्ही दोघी पिहूच्या सगळ्या मैत्रिणींकडे जाऊन चौकशी करा. आई वडिलांसमोर काही बोलल्या नसतील त्या पण पिहूच्या आयुष्यात कोणी मुलगा होता का ह्याची माहिती काढायचा प्रयत्न करा. आणि हो एकट्या फिरुया नका, एकत्रच रहा आणि तासाभरात घरी जा. काही लागलं तर मला फोन करा." समीर त्या दोघींना म्हणाला आणि त्या तिकडून निघाल्या.
"सॅमी, मी काय करू? मला पण तुला मदत करायचीये. शेवटी पिहू माझ्या लहान बहिणीसारखीच आहे." समीरला एकटं पाहून तिकडे आलेली लतिका म्हणाली. "ए मी तुझ्याबरोबर सी.सी टी व्ही चं फुटेज बघायला येते ना." तो काही म्हणायच्या आधीच ती म्हणाली. तिला समजावत बसायला वेळ नव्हता त्याच्याकडे शेवटी तो नाईलाजाने तिला घेऊन निघाला.
गावच्या शाळेच्या ऑफिसमध्ये बसून ते दोघं सी.सी टी व्ही फुटेज बघत होते. पिहू सकाळच्या क्लासला शाळेत आलेली त्यानंतर गायब झालेली म्हणून त्याच्या एक तास आधीचं फुटेज त्यांनी सुरु केलं. समीर इंटेन्सली स्क्रीनवर काही विचित्र दिसतंय का ते बघण्याचा प्रयत्न करत होता आणि लतिका त्याच्याकडे बघत बसलेली. त्याच्याबरोबर असा एकांत मिळाल्यामुळे भलतीच खुश होती ती.
"सॅमी, तू ठीक आहेस ना? दुपारी जे झालं त्यानंतर? सानिका किती चुकीचं वागली. तुझ्यासारख्या मुलाशी कोणी असं कसं वागू शकतं." लतिका आगीत तेल ओतत म्हणाली.
"लतिका, तुला इथे कामावर फोकस करता येत नसेल तर तू निघालीस तरी चालेल. ह्या गप्पांसाठी वेळ नाहीये माझ्याकडे. उगाच डोकं खाऊ नकोस माझं." समीर वैतागून म्हणाला.
"मी तुझ्या काळजीपोटीच म्हणतेय ना? तू नसशील मानत तरी मी तुला खूप चांगला मित्र मानते. तुझ्याशी कोणी चुकीचं वागलेलं नाही आवडत मला." लतिका डोळ्यात पाणी आणत म्हणाली. समीरने डोक्याला हात लावला. कधी नव्हे ते त्याला तिच्याशी एवढं तोडून बोलल्याचं थोडं वाईट वाटलं.
"हे बघ लतिका. आय एम सॉरी पण मी जरा टेन्शनमध्ये आहे आत्ता. सो प्लिज आपण ह्या विषयावर नंतर बोललो तर चालेल का?" तो शक्य तितक्या शांतपणे म्हणाला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर सानिकाचं नाव बघून त्याचा हात पटकन फोनकडे गेला. पण लतिकाने त्याने फोन उचलायच्या आधीच तो कट केला.
"व्हॉट द हेल? तू मला न विचारता माझा फोन कसा कट करू शकतेस?" त्याने चिडून विचारलं.
"तूच म्हणालास ना की सध्या पिहूला शोधणं जास्त महत्वाचं आहे? मग आता तू तिचा फोन कशाला घेतोयस? सॉरी म्हणायला फोन करत असेल ती. उगाच तुझा मूड पुन्हा खराब होईल." लतिका तोंड वाकडं करत म्हणाली. तेवढ्यात समीरला स्क्रीनवर काहीतरी दिसलं आणि त्याने समोर चालू असलेलं फुटेज पॉज केलं. पिहू शाळेच्या गेटमधून बाहेर पडल्यावर एक मुलगा तिच्याशी बोलायला आला. काही मिनिटं एकमेकांशी बोलून पिहू काहीशी गडबडीतच त्याच्याबरोबर तिकडून निघाली. गावातला वाटत नव्हता तो मुलगा. सानिकाचा अंदाज खरा होता का? त्या मुलानेच गायब केलं होतं का पिहूला. तेवढ्यात सानिकाचा पुन्हा फोन आला, समीरचं लक्ष नाहीये बघून लतिकाने तो पुन्हा कट केला आणि फोन सायलेंट वर टाकला. समोरच्या स्क्रीनचा एक फोटो घेऊन समीर तिकडून निघाला. लतिकाला त्याने वाटेत घरी सोडलं आणि तो बाईकवरून तो मुलगा आणि पिहू ज्या दिशेला गेले त्या दिशेने निघाला. डोक्यात सुरु असलेल्या विचारांच्या चक्रांमुळे त्याला आपल्या खिशात व्हायब्रेट होत असलेल्या फोनचीही जाणीव नव्हती. अनेकदा वाजून तो बंद झाला.
पलीकडे ती त्याच्या नावाचा धावा करत होती, "समीर प्लिज फोन उचल, आय नीड यु." फोनवर आलेल्या लो बॅटरीच्या वार्निंगकडे हताश होऊन पाहात होती ती. सगळ्या आशा सोडून दिल्या असतानाच तिला दूरवरच्या रस्त्यावरून येणाऱ्या बाईकचे दोन मिणमिणते दिवे दिसले. लांबूनही ती बाईक पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने त्याला आवाज द्यायला तोंड उघडलं पण त्या आधीच एका राकट हाताने तिचं तोंड बंद केलं!
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा