चंद्र आहे साक्षीला! - भाग ४५
गावातल्या सरकारी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या बाहेर समीर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. सानिकाला हॉस्पिटलमध्ये आणून तासभर होऊन गेला होता पण अजून डॉक्टरांनी तिच्या तब्येतीबद्दल काहीच कळवलं नव्हतं. जवळच खुर्चीत आशाताई बसल्या होत्या. लेकीच्या काळजीने त्यांचा चेहरा पार कोमेजून गेला होता. वनिताताई त्यांचं सांत्वन करत होत्या. समीरच्या मागोमाग वसंतरावही फेऱ्या मारत होते. सानिकाच्या काळजीने त्यांचं मनही थाऱ्यावर नव्हतं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. समीर धावतच त्याच्याजवळ गेला.
"डॉक्टर, सानिका कशी आहे?" त्याने विचारलं.
"रिलॅक्स समीर. ती एकदम ठणठणीत आहे. हां बऱ्याच ठिकाणी खरचटलं आहे तिला. आणि तिला बेशुद्ध करायला थोडं क्लोरोफॉर्म दिलं होतं त्यामुळे तिच्या शरीरात त्याचा थोडा इफेक्ट आहे अजून. एवढ्या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर आल्यावर थोडा मानसिक धक्काही बसणारच ना. त्यामुळे बेशुद्ध झाली आहे. काळजीचं काहीच कारण नाही. आम्ही तिच्या जखमा साफ करून ड्रेसिंग केलं आहे. एक दोन दिवसांनी ते बदलायला घेऊन या तिला. आजची रात्र इकडेच राहू दे तिला. थोडासा डोक्याला मार लागला आहे तिच्या त्यामुळे काळजी घेतलेली बरी. उद्या तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता घरी." म्हणून डॉक्टर तिकडून गेले. सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला होता.
"मी सानिकाला बघून येते." म्हणून आशाताई तिच्या खोलीच्या दिशेने गेल्या. वनिताताई आणि वसंतरावही त्यांच्याबरोबर गेले. समीर तिकडच्याच एका खुर्चीत आधारासाठी बसला. गेले काही तास त्याची काय अवस्था होती हे त्यालाच माहिती होतं. सानिका घरी नाहीये हे कळल्यापासून आत्ता डॉक्टरांनी ती बरी आहे सांगेपर्यंत त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. केवढा मोठा दिलासा मिळाला होता त्याला. मगाशी ती त्याच्या मिठीत बेशुद्ध झाली तेव्हा काही क्षणांसाठी त्याच्या काळजाचे ठोकेच थांबले होते. दोन्ही हातात चेहरा धरून त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. तेवढ्यात चंदू आणि गोपाळ आले तिकडे.
"कशी आहे आता सानिका?" त्यांनी काळजीने विचारलं.
"बरी आहे. अजून शुद्धीवर नाही आलीये. उद्या सकाळपर्यँत येईल म्हणालेत डॉक्टर ." समीर म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा त्याच्या आवाजातही जाणवत होता.
"बरं झालं सम्या तू वेळेत पोहोचलास नाहीतर काय झालं असतं.." चंदू म्हणाला.
"वेळेत नाही पोहोचलो मी. तिची अवस्था बघितली नाहीस का तू? त्या हरामखोरांनी तिच्यावर हात उचलला. कसा झालेला तिचा चेहरा. मी वेळेत पोहोचलो असतो तर हे झालंच नसतं. पण मीच मूर्ख आहे. नको त्या गोष्टींचा राग डोक्यात घालून घेतला आणि तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कल्पना करवत नाहीये मला तिला काही झालं असतं तर मी काय केलं असतं." समीर रडवेला होत म्हणाला.
"पण काही झालं नाही ना. मग कशाला एवढं टेन्शन घेतोयस. तू जा घरी थोडावेळ. सकाळ होत आलीये. आम्ही थांबतो इकडे. तू फ्रेश होऊन कपडे बदलून ये." चंदू त्याचा एकंदरीत अवताराकडे बघून म्हणाला. समीरला इतका वेळ स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. त्याचा मूळचा पांढऱ्या रंगाचा शर्ट पार मळाला होता, केसांत आणि चेहऱ्याला माती लागली होती, त्या गुंडांशी झालेल्या मारामारीत त्याच्या हातालाही थोडंसं लागलंच होतं.. पण सानिकाशी बोलल्याशिवाय तो तिकडून हलणार नव्हता.
"तुम्ही जा घरी. मी थांबतो इकडेच. ती शुद्धीवर आल्यावर जाईन मी." चंदू आणि गोपाळ नाईलाजाने तिकडून निघाले. ते गेल्यावर समीर मागच्या भिंतीला डोकं टेकून बसला. हॉस्पिटलमधली हालचाल आता मंदावली होती. कॉरिडॉरमध्ये शांतता होती. पण त्याच्या मनात मात्र विचारांचं वादळ होतं.. सकाळपासून झालेल्या घटना त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा घडत होत्या. सानिका आणि विश्वासच तो फोटो, त्यावरून त्या दोघांचं झालेलं भांडण, सानिकाचं त्याला मनवण्यासाठी त्याच्या मागे फिरणं आणि त्याचं तिला तोडून बोलणं.. सगळं आठवून पुन्हा पुन्हा त्रास करून घेत होता तो स्वतःला. त्या जंगलातल्या रस्त्यावर भीतीने थरथरत बसलेली सानिका त्याच्या डोळ्यासमोर आली तसे त्याने खाडकन डोळे उघडले. आत्ताच्या आत्ता तिला बघायचं होतं त्याला. तो तसाच उठून तिच्या रूमच्या दिशेने निघाला. आय.सी.यु च्या काचेच्या दारातून त्याने आत बघितलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हॉस्पिटलच्या त्या बेडवर त्याची सानू शांत झोपली होती. तिच्या मलूल झालेल्या चेहऱ्यावर अजूनही बोटांचे वळ होते. त्याच्याही नकळत त्याची पावलं त्याला आत घेऊन आली. तिच्या बेडच्या बाजूला बसून तो एकटक तिच्याकडे बघत होता. तिच्या सलाईन लावलेल्या हातावरून त्याने हळूच आपला अंगठा फिरवला. "सॉरी सानू. प्लिज लवकर बरी हो ना. तुला असं बघवत नाहीये गं. कधी एकदा तुला गोड हसताना बघतोय असं झालंय मला." तो तिच्याशी बोलत होता. बराच वेळ तसाच बसून होता तो तिच्या जवळ. पहाटे कधीतरी तो पुन्हा बाहेर आला. कॉरिडॉरमधल्या बेंचवर बसून त्याने मागच्या भिंतीवर अलगद डोकं टेकवलं. दिवसभराच्या दगदगीने कधीतरी त्याला झोप लागली.
____****____
"कसं वाटतंय आता सानिका?" गोपाळने विचारलं. तो, चंदू आणि गौतमी सकाळी तिला भेटायला आले होते. सकाळचे आठ वाजत आलेले. सानिकाला नुकतीच शुद्ध आली होती. रात्रभराच्या झोपेने आणि औषधांमुळे तिला आता जरा तरतरी आलेली. आशाताई तिच्यासाठी नाश्ता बनवायला घरी गेल्या होत्या.
"तुम्ही कोण? आणि मी इकडे कशी आले?" तिने त्यांच्याकडे बघून प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
"सानिका अगं मी गोपाळ. माझा गोठा आहे तुमच्या घराजवळ. आठवतंय का? आणि हा चंदू, ही गौतमी." गोपाळ तिला आठवून द्यायचा प्रयत्न करत होता. ते तिघं आलटून पालटून तिच्या डोक्याच्या पट्टीकडे बघत होते.
"चंद्या अरे वहिनींची मेमरी गेली की काय? आपल्या सम्याला पण विसरल्या असतील का आता? त्याचा तर पार देवदासच होईल." गोपाळ काळजीने चंदूच्या कानात कुजबुजला. तो पण टेन्शनमध्ये आलेला. हे सगळं पिक्चरमध्ये वगैरे ठीक वाटतं पण ही इकडे उठून खरंच 'में कौन हुं? कहाँ हुं' विचारत होती. तिची ती अवस्था बघून तिघांच्या तोंडावर बारा वाजले होते. सानिका त्यांच्याकडे आलटून पालटून बघत होती आणि अचानक ती खदखदून हसायला लागली. तिला तसं हसताना बघून ते तिघं अजूनच टेन्शनमध्ये आले. डोक्यावर परिणाम झाला की काय?
"अरे तुमची तोंडं बघून हसायला येतंय मला. किती टेन्शन मध्ये आहात. मज्जा करत होते मी." सानिका कसंबसं हसून हसून डोळ्यांतून येणारं पाणी पुसत म्हणाली आणि त्या तिघांचा जीव भांड्यात पडला.
"तू पण ना सानू. किती घाबरवलंस आम्हाला." गौतमीने पटकन पुढे येऊन तिला मिठी मारली.
"हा हा हा, सॉरी. पण तुम्ही तिघं एवढे सिरिअस तोंड करून बोलत होतात माझ्याशी. मला राहवलं नाही. म्हणून छोटीशी मज्जा केली." सानिका हसत म्हणाली. त्या तिघांच्या गप्पा चालू असतानाच नुकताच उठलेला समीर आत आला. त्याला बघून ते चौघं हसायचे थांबले. दारात उभा असलेला समीर सानिकाकडे बघत होता. तिला पुन्हा तसं हसताना बघून त्याचा जीव भांड्यात पडला.
"चला आम्ही निघतो आता. सानिका तू आराम कर आणि लवकर बरी हो." म्हणून ते तिघं तिकडून निघाले. ते बाहेर पडल्यावर समीर हळूहळू चालत येऊन सानिकाच्या समोर स्टुलावर बसला.
"हाय, कशी आहेस?" त्याने तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत विचारलं. रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे त्याचे डोळे लाल झाले होते. शर्टाची इन बाहेर आली होती. केस विस्कटून कपाळावर आले होते. काळजीने चेहरा पिळवटला होता.
"ठीक आहे." सानिकाने दुसरीकडे बघत उत्तर दिलं. आदल्या दिवशीचं त्याचं बोलणं आठवून पुन्हा पुन्हा वाईट वाटत होतं तिला.. आणि त्यालाही.
"सानू, मी.." समीर काही बोलायच्या आधीच दारातून विश्वास आत आला.
"ओह माय गॉड सानिका, अगं काय झालं हे? आर यु ओके?" त्याने पुढे येत काळजीने विचारलं. समीरने बोलायला उघडलेलं तोंड बंद केलं.
"मी नंतर येतो. तुम्ही बोलून घ्या." म्हणून समीर तिकडून जायला निघाला.
"थांब समीर. माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलायचं नाहीये का तुला?" सानिकाच्या आवाजाने त्याची बाहेर जाणारी पाऊलं थांबली.
"विश्वास, बरं झालं इथे आलास. तुझ्या तोंडून जरा सांगशील का काल आपलं काय बोलणं झालं ते? मी सांगितलं असतं पण माझ्या बोलण्यावर फार विश्वास नाहीये लोकांचा." सानिकाने समीरकडे एक कटाक्ष टाकत म्हंटलं.
"कशाबद्दल?" विश्वासने भोळेपणाचा आव आणून विचारलं.
"इतक्या लवकर विसरलास? गावभर तर दवंडी पिटवली आहेस तू आपण लग्न करणार आहोत अशी." सानिकाच्या चेहऱ्यावरचा राग बघून विश्वासाची बोलती बंद झाली होती.
"बोल.." सानिकाने आवाज चढवला तसा विश्वास भडाभडा बोलायला लागला. त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक समीरचा गैरसमज दूर होत होता. त्याचं बोलणं चालू असताना समीर त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता. त्याच्या एका मुर्खपणामुळे केवढं काही होऊन बसलं होतं. पुढे जाऊन दोन पंच त्याच्या बावळट चेहऱ्यावर मारायची ईच्छा होत होती समीरला पण सानिकासमोर त्याला काही करता येत नव्हतं.
"सॉरी सानिका, मला खरंच तू खूप आवडतेस. त्यादिवशी सगळ्यांनी आपल्याला त्या चौकात बघितलं आणि मला प्रश्न विचारायला लागले. एवढ्या सगळ्यांना मी कसं सांगणार होतो की तू मला नाही म्हणाली आहेस. मला वाटलं आज मैत्रीला हो म्हणाली आहेस तर उद्या लग्नालाही म्हणशील. म्हणून मी.." विश्वास बोलत होता. सानिका नाईलाजाने मान हलवत होती.
"तुला काय वाटलं, हे असलं काहीतरी करून मी तुझ्याशी लग्नाला तयार होईन? मी तुला आधीही सांगितलंय आणि आता परत सांगतेय, तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. मला पुन्हा तुझं तोंडही बघायचं नाहीये. यु आर लकी, आत्ता मला चालता येत नाहीये. नाहीतर मी तुझी त्या गुंडांपेक्षा वाईट अवस्था केली असती." सानिका चिडून बोलत होती.
"तुला हवं तर मी मदत करू शकतो." समीर पटकन पुढे येऊन म्हणाला. सानिकाने एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला. विश्वासनंतर आपला नंबर लागणार आहे हे समीर कळून चुकला. गुपचूप मागे जाऊन तो मान खाली घालून उभा राहिला. सानिकची माफी मागून विश्वास तिकडून निघून गेला. आता रूममध्ये फक्त सानिका आणि समीर उरले होते.
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा