चंद्र आहे साक्षीला! - भाग ४६
विश्वास गेल्यावर हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये फक्त सानिका आणि समीर होते.
"सानू.. आय एम सो सॉरी. मी काल जे काही वागलो त्यासाठी." समीरने पुढे येऊन सानिकाचा हात अलगद हातात घेतला. पण ती त्याच्याकडे बघतही नव्हती.
"प्लिज माझ्याकडे बघ ना. खूप मोठी चूक केलीये मी मला माहितीये. तुझं बोलणं ऐकून घ्यायला हवं होतं, तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. पण गोष्टी एवढ्या पटापट घडत होत्या. तुला गमवायच्या भीतीने चिडचिड होत होती माझी. त्यातच तो फोटो.." समीर तिच्यासमोर मान खाली घालून बोलत होता.
"प्लिज मला माफ कर. खूप मोठी शिक्षा मिळाली आहे मला त्याची ऑलरेडी सानू. काल जेव्हा तू सापडत नव्हतीस ना, खूप घाबरलो होतो गं मी. मला वाटलं आता तू मला परत कधीच दिसणार नाहीस. तुझा तो रडवेला चेहरा राहून राहून डोळ्यासमोर येत होता माझ्या. खूप दुखावलं ना मी तुला. तुझी काही चूक नसताना. खरंच मूर्ख आहे मी. त्या विश्वासपेक्षा जास्त मूर्ख.. जर काल तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी?" समीर भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. सानिकाने त्याच्याकडे बघितलं. तिच्याही डोळ्यांत पाणी आलं होतं.
"बोल ना काहीतरी प्लिज.. तू अशी गप्प नको बसूस ना. मी काय केलं तर तुझा राग जाईल सांग मला. मी ते करायला तयार आहे." समीर डोळे पुसत म्हणाला.
"इट्स ओके. जे झालं ते झालं. आफ्टरऑल काल तू नसता आलास तर मी.." सानिकाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच समीरने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि नकारार्थी मान हलवली. तिला काही झालं असतं ह्या कल्पनेनेही त्याचं अंग शहारलं.
"थँक्स फॉर सेव्हिंग माय लाईफ." सानिका त्याचा हात बाजूला करत म्हणाली. तिच्या वागण्यात अचानक आलेल्या ह्या परकेपणाचा समीरला त्रास होत होता. एरवी त्याच्याशी हसतखेळत वागणारी सानिका आज एकदम फॉर्मल वागत होती. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं.
"सानू, काल तू घरी आलेलीस तेव्हा तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना?" त्याने विचारलं.
"मला आठवत नाहीये." सानिका त्याची नजर चुकवत म्हणाली.
"हो का, हरकत नाही! आठवलं की सांग. सध्या तू बरी आहेस एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी." तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला. सानिकाने तिचा हात त्याच्या हाताखालून काढून घेतला. समीरला वाईट वाटलं.
"सानू प्लिज.." तो बोलत असतानाच दारातून आशाताई आणि वनिताताई आत आल्या. सानिकासाठी डबा घेऊन. त्यांना बघून समीर उठून बाजूला गेला. आशाताई आपल्या लेकीला प्रेमाने खाऊ घालत होत्या.
"काय रे, भांडण मिटलं की नाही अजून?" वनिताताईंनी त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या समीरला विचारलं. पण त्याची नजर समोर सानिकाच्या चेहऱ्यावर खिळलेली. वनिताताईंचे शब्द त्याच्या डोक्यावरूनच गेले. त्यांनी त्याच्या दंडावर चापटी मारली तसा तो भानावर आला.
"नुसता बघत बसणार आहेस तिच्याकडे का तिला मनातलं सांगणार पण आहेस तुझ्या? तिचं माहित नाही पण मला आता अजून वाट बघवणार नाहीये." त्यांनी विचारलं.
"आई, ही वेळ आहे का हे बोलायची. तिची अवस्था बघ. तासाभरापूर्वी शुद्धीवर आलीये ती. तिला बरं होऊ दे मग बोलेन मी तिच्याशी. आता चूक एवढी मोठी केलीये म्हंटल्यावर माफीपण सहज नाहीच मिळणार ना." समीर हताश होऊन म्हणाला.
____****____
"हॅलो, सानिका? अगं आहेस कुठे? किती फोन केले मी." दीक्षित सर म्हणाले. संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर सानिका घरी आली होती. तिचा फोन चालू केल्यावर दीक्षित सरांचे बरेच मेसेजेस आणि मिस्डकॉल्स येऊन गेले होते. तिने लगेचच त्यांना फोन केला.
"हॅलो सर, सॉरी, तुमचे कॉल्स घेता नाही आले मला, फोन बंद होता माझा. तुम्ही का कॉल करत होतात?" तिने विचारलं.
"हो, म्हंटलं तुझं काही ठरलंय का बघावं. कधी परत येतेयस मग? सोमवार पासून जॉईन करता येईल का तुला?" त्यांनी विचारलं. सोमवार? म्हणजे चार दिवसांनी? आता एवढं सगळं झाल्यावर तिला खरंतर लगेच इकडून निघायची ईच्छा नव्हती. नाही म्हंटलं तरी झाल्या प्रकारानंतर मनातून हादरली होती ती. अशात मुंबईला जाऊन एकटीने राहायचं म्हणजे कठीणच होतं जरा. पण तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं आणि तिने तिचा विचहर बदलला.
"हो सर. सोमवारी जॉईन होईन मी. भेटूच तेव्हा." म्हणून तिने फोन ठेवला. समोर बसलेल्या आशाताई तिचं बोलणं ऐकून तीनताड उडाल्या.
"सानू? मी तुला कुठे सोडणार नाहीये हां तू पूर्ण बरी झाल्याशिवाय. केवढं लागलंय, गाडी कशी चालवणार आहेस?" त्या काळजीने म्हणाल्या.
"मला जावंच लगेल आई. नोकरीचा प्रश्न आहे. तसंही इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये आता. उगाच प्रॉब्लेम्स वाढतील त्याने." शेवटची दोन वाक्य ती तोंडातच पुटपुटली.
"झालं का तुझं परत नोकरी नोकरी चालू. जीवाची जरा काळजी घेत जा गं. ते काही नाही, मी तुझ्या सरांशी बोलून सांगते त्यांना की तू काही अजून दोन-तीन आठवडे येणार नाहीस." त्या तिचा फोन हातात घेत म्हणाल्या.
"आई मी काय शाळेत आहे का, पालकांच्या परवानगीने दांडी मारायला. मला खरंच जावं लागेल. आणि डोन्ट वरी, मी बरी आहे आता." सानिका म्हणाली. तेव्हड्यात तिच्या फोनवर समीरचा फोन आला. ते बघून आशाताईंचा चेहरा खुलला.
"तू बोल, मी आलेच." म्हणून त्या काहीतरी काम काढून तिकडून निघाल्या.
"हाय, कशी आहेस?" पलीकडून समीरचा आवाज ऐकून तिच्या काळजाचे ठोके वाढले.
"ठीक आहे." ती शक्य तितक्या निर्विकारपणे म्हणाली.
"मग जरा हसून बोल की." तो तिला चिडवायला म्हणाला.
"तुझं काही काम होतं का? नसेल तर नंतर बोलूया का? मी थोडावेळ झोपते आहे." सानिका तिच्या भावनांवर कंट्रोल ठेवत म्हणाली.
"सानू प्लिज दोन मिनिटं बोल ना माझ्याशी. अजुन राग गेला नाहीये का? मला कळतंय तुझ्या वागण्यातून. आय एम सॉरी ना." तो म्हणाला. त्याच्या आवाजातलं आर्जव ऐकून तिला वाईट वाटलं.
"असं काही नाहीये समीर. थोडी दमले आहे म्हणून झोपतेय. आपण प्लिज नंतर बोलूया." म्हणून तिने त्याने काही बोलायच्या आधीच फोन ठेऊन दिला. डोळ्यातले अश्रू गालांवर ओघळले. डोळे बंद करून ती गेल्या दोन दिवसातल्या गोष्टींचा विचार करत होती. सगळं किती अचानक झालं होतं. तिला तिच्या समिरवरच्या प्रेमाची जाणीव झाली तेव्हापासून ती त्याला तिच्या भावना सांगण्यासाठी आतुर होती. पण त्यानंतर त्यांचं झालेलं भांडण, त्याचं तिच्याशी तुटक वागणं, त्यामुळे दोघांना झालेला त्रास हे सगळं आठवून तिच्या काळजातून वेदनेची कळ उठली. एकमेकांच्या समोर असताना पण जर आमच्यात अशी भांडणं होत असतील तर मी मुंबईला गेल्यावर काय होईल? तेव्हा तर एकमेकांना समजावणं किती कठीण होईल. ह्या सगळ्या त्रासातून ती एकदा गेली होती. रोजची भांडणं, त्यामुळे होणारी चिडचिड, त्याचा कामावर होणारा परिणाम आणि नात्यामध्ये येणारं वितुष्ट हेसगळं तिने खूप जवळून अनुभवलं होतं. तिच्या आणि जॉनच्या नात्यात. अगदी परवापर्यंत तिला वाटत होतं की तिच्या आणि समीरच्या नात्यात असं होणारंच नाही. तो त्याच्या समजूतदारपणाने सगळं सांभाळून घेईल. त्यामुळे लांब राहूनही त्यांच्यामध्ये अंतर येणार नाही. पण गेल्या दोन दिवसातल्या घडामोडींमुळे मात्र तिच्या मनातल्या ह्या विश्वासाला तडा गेला होता. त्यात तिला अचानकच मुंबईला जावं लागणार होतं त्यामुळे तिला आणि समीरला त्यांच्या नात्याचा पाया बळकट करायला एकत्र वेळच मिळणार नव्हता. असं असताना नवीन नातं चालू करण्याच्या अट्टाहासापायी ती त्याला कायमचं गमवायला तयार नव्हती.
"हे सगळं मी एवढं कठीण का करून ठेवलं आहे? मी का स्वतःला आधीच थांबवलं नाही त्याच्या एवढं जवळ जाण्यापासून. मला माहिती होतं ना कधी ना कधी मला इकडून परत जायचंय. मग मी का एवढी त्याच्यात गुंतत गेले आणि त्यालाही माझ्यामध्ये एवढं गुंतू दिलं. कशी समजावणार आहे मी त्याला आता." सानिकाचं डोकं विचार करून बधिर झालं होतं. औषधांच्या ग्लानीने आणि मानसिक थकव्याने तिला कधी झोप लागली तिलाही कळलं नाही.
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा