चंद्र आहे साक्षीला! - भाग ४८
संध्याकाळी वैद्यांच्या वाड्यातून सानिका आत शिरली आणि तिला बघून वनिताताई धावतच बाहेर आल्या. "सानिका अगं कशाला एवढी चालत आलीस. पाय अजून बरा कुठे झालाय तुझा?"
"पाय बराय आता काकू, पेनकिलर्स घेतल्यावर दुखायचा थांबतो थोडा. आणि आता थोडी चालायची सवय केलीच पाहिजे या. उद्या मुंबईला गेल्यावर एकटीच तर असणार आहे मी." ती म्हणाली. मनातून त्रास होत होता तिला. नाही म्हंटलं तरी इतक्या माणसांमध्ये राहायची सवय झाली होती तिला आता. तिचं बोलणं ऐकून वनिताताईंचा पण चेहरा उतरला.
"इतक्या लगेच जायलाच हवं का गं? थोडे दिवस राहा की अजून. पूर्ण बरी होऊन गेलीस तर आमच्या पण जीवाला काळजी नाही." त्या काळजीने म्हणाल्या.
"खरंच थांबले असते काकू, पण मला जावंच लागेल. बरं समीर आहे का घरी? त्याच्याशी बोलायचं होतं थोडं." ती म्हणाली.
"हो, दुपारी घरी आल्यापासून त्याच्या रुममध्येच आहे. फार काही बोललाच नाहीये. तुला राग येणार नसेल तर एक विचारू का बाळा?" त्यांनी हातांची चुळबुळ करत विचारलं. सानिकाने मानेनंच संमत्ती दिली.
"तुमचं काही बोलणं झाला का त्यादिवशीच्या प्रसंगानंतर? मला नाही माहिती तुला समीर काही बोलला आहे का, पण तो गुंतला आहे तुझ्यात. त्यादिवशी तू समोर नसताना त्याच्या मनाची होणारी घालमेल बघितली आहे ना मी. आयुष्यात कधी कोणासाठी इतकं तुटताना नाही पाहिलंय मी त्याला आधी. पण तुझ्याबाबतीत प्रत्येक गोष्टीतच हळवा होतो तो लगेच. मला माहितीये त्या विश्वासवरून तुमचं खूप भांडण झालं त्यादिवशी आणि त्यात समीरचीच चूक आहे. असं कोणावरही विश्वास ठेऊन तुला एव्हढं बोलायला नको होतं त्याने आणि त्यासाठी मी त्याचा चांगलाच समाचार घेणार आहे. पण बाळा त्याचा हेतू वाईट नव्हता गं. तुझं नाव दुसऱ्या कोणाबरोबर जोडलेलं तो सहन नाही करू शकला म्हणून असा वागला तो." त्या बोलत होत्या. त्या पुढे काय बोलणार आहेत ह्या कल्पनेने तिच्या मनावर दडपण येत होतं.
"मी काय म्हणते, तुम्ही दोघंही तो झालेला विषय सोडून द्या ना आता. उगाच ताणून धरण्यात काय उपयोग आहे. त्यात तू उद्या जाणार आहेस म्हणून तो आधीच खूप अस्वस्थ आहे. तुला त्याच्या मनातलं काही बोलला का तो? त्याच्याबाजूने तुझ्याबद्दल ज्या भावना आहेत त्याच मी तुझ्या डोळ्यांत पण बघितल्या आहेत सानिका. माझा अंदाज चुकीचा नाहीये ना?" वनिताताईंनी विचारलं. सानिकाला काय बोलावं सुचत नव्हतं.
"काकू, मी एकदा समीरशी बोलून येऊ का? त्यानंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते." ती म्हणाली आणि त्या नाईलाजाने तिकडून गेल्या.
____****____
दरवाजावर दोनदा वाजवून सुद्धा काही उत्तर आलं नाही तेव्हा सानिका दबकतच आत शिरली. रूममध्ये पूर्ण अंधार होता. समोरच्या खिडकीजवळ उभा राहून बाहेर बघत होता तो.. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण तशीच बघत उभी होती ती. अंगावर अजूनही सकाळचाच निळा शर्ट होता त्याच्या.. हाताच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड करून हाताची घडी घालून बाहेर दूरवर कुठंतरी बघत होता तो. खिडकीतून येणाऱ्या मंद हवेच्या झुळुकेने त्याचे कपाळावर आलेले केस उडत होते.. सानिका हळुवार पाऊलं टाकत त्याच्याजवळ गेली. तिची चाहूल लागली तसं त्याने तिच्याकडे वळून बघितलं. तिला समोर बघून त्याने पटकन दुसरीकडे बघत त्याचे डोळे पुसले आणि पुन्हा तिच्याकडे बघितलं.
"सानू तू इकडे? तू कशाला आलीस, मला फोन करायचास ना. कुठे पडली असतीस म्हणजे? तू आधी इकडे बस बघू." म्हणून त्याने तिला खिडकीजवळच्या वेताच्या झोपाळ्यावर बसवलं. जवळचंच एक छोटं स्टूल घेऊन तो तिच्यासमोर बसला. त्याचा लाल झालेला चेहरा आणि डोळ्यातलं दुःख पाहून सानिकाच्या काळजाला घरं पडत होती.
"समीर.. मला थोडं बोलायचं होतं." ती म्हणाली. तो अपेक्षेने तिच्याकडे बघत होता.
"आज गावाच्या मीटिंगमध्ये मी अचानक उद्या इथून निघून जायचा निर्णय सुनावला, त्यानंतर आपलं काही बोलणंच नाही झाला. घरी जाताना आई गाडीमध्ये होती आणि तुही शांतच होतास. मला माहितीये हे तुला अशा पद्धतीने कळायला नको होतं. पण तुला कसं सांगायचं हेच मला कळत नव्हतं. गेल्या काही दिवसांत आपल्यामध्ये जे काही झालंय.." सानिका बोलायची थांबली.
"सानू, आपलं नातं आता इथं येऊन पोहोचलंय का की माझ्याशी बोलायची तुला भीती वाटतेय?" म्हणून समीर खेदाने हसला.
"नाही तसं नाहीये समीर. प्लिज माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला माहितीये माझ्या इथून असं अचानक जाण्याचा तुला त्रास होतोय.." सानिका बोलत असतानाच समीरने विचारलं "आणि तुला? तुला नाही होत आहे त्रास? माझ्यापासून लांब जाण्याचा?"
"अफकोर्स होतोय, असं का बोलतोयस? गेल्या काही आठवड्यात आपली इतकी छान.. मैत्री झालीये.. मग वाईट तर वाटणारंच ना." सानिका तिचे शब्द जपून वापरात होती.
"फक्त मैत्री?" त्याने तिच्या डोळ्यांत बघितलं. तिला वाटलं होतं तितकं सोप्पं नव्हतं हे. मन कितीही घट्ट करून आली असली तरी त्याला समोर बघून तिचं मन त्याच्याकडेच ओढ घेत होतं. म्हणायला तिच्यापासून फक्त हातभराच्या अंतरावर बसला होता तो. मन सांगत होतं सगळं लॉजिक बाजूला ठेऊन त्याच्या मिठीत शिरायला पण बुद्धी मात्र साथ देत नव्हती.
"हेच योग्य नाही का होणार आपल्यासाठी? एकमेकांपासून एवढं लांब राहून मैत्री पलीकडे आपलं नातं वाढवणं खूप कठीण जाईल समीर आपल्याला. प्रत्येक नात्याबरोबर अपेक्षा येतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझंही. जवळ राहूनही ते कठीणच असतं मग तू इकडे आणि मी मुंबईत असताना आपण ते कसं निभावणार आहोत? आपलं त्यदिवशीचं भांडणच बघ ना, मी इथे होते म्हणून येऊन तुला समजवायचा प्रयत्न तरी करू शकले, पण लांब असताना ते किती कठीण होईल ह्याची कल्पना नाहीये तुला." ती खाली मान घालून बोलत होती. त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती तिच्यात. त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती.
"भांडणं कोणामध्ये होत नाहीत सानू? फक्त एका भांडणावरून आपल्यामध्ये काही होऊच शकत नाही हा निर्णय घेणंही चुकीचं आहे ना. मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. पण कुठलंही नातं परीपक्व व्हायला वेळ द्यावाच लागतो ना. आणि लॉन्ग डिस्टन्सचं म्हणशील तर आपण काहीतरी मार्ग काढू ना ह्यातून. मला माहितीये तुला सगळ्या गोष्टी नीट प्लॅन करून करायला आवडतात. मी सगळा विचार करून ठेवला आहे. आपण महिन्यातून दोन-तीनदा भेटत जाऊ एकमेकांना. कधी मी मुंबईला येईन, कधी तू इकडे ये. तसंही माझं बिझनेसच्या निमित्ताने फिरणं चालूच असतं. तुला हवं तर मी तिकडे राहायलाही येऊ शकतो मध्येमध्ये. आमचा फ्लॅट पण आहे मुंबईत. किंवा तू इकडे येऊन आपल्या ऑफिसमधून काम करू शकतेस. आत्ताच्या पँडेमिक नंतर वर्क फ्रॉम होमचा पर्याय सगळ्याच कंपन्या देतात की. आणि जसं आपलं नातं पुढे जाईल, तसे आपण पुढचे डिसिजन्स घेऊ की. लग्नानंतर आपण दोघंच असू तोपर्यंत आपण हवं तर इकडे राहू आणि मग मुलं झाली की त्यांच्या शिक्षणासाठी कुठल्यातरी शहरात शिफ्ट होऊ. मी तिकडून बिझनेस मॅनेज करेन. आणि तू पण म्हणत होतीसच ना की तू पण जॉब सॊडून बिझनेसचा विचार करणार आहेस. मग ते तू इकडून पण करू शकतेस सुरवातीच्या दिवसांत." समीर तिचा हात हातात घेत तिला समजावत म्हणाला. त्याच्या आवाजातला उत्साह पाहून, त्याने पुढे तिच्याबरोबर रंगवलेली स्वप्न ऐकून, त्याच्या हाताच्या उबदार स्पर्शाने तिचे डोळे भरून येत होते. तिचीही तीच स्वप्न होती. पण सगळी स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. त्या भंगलेल्या स्वप्नांना उराशी कवटाळून जगताना होणाऱ्या यातनांपेक्षा आधीच रिऍलिटीची जाणीव होऊन त्यांना दूर सारणं कधीही बरं नाही का.
"ह्या सगळ्या गोष्टी आधी खूप सोप्प्या वाटतात पण नंतर तितक्याच कठीण होऊन बसतात. सुरवातीला फोनवर बोलून, महिन्यातून एकदोनदा भेटून भागेल, पण नंतर आपल्या एकमेकांकडून अपेक्षा वाढत जातील. आपला आनंद किंवा दुःख जेव्हा एकमेकांबरोबर प्रत्यक्षात शेअर करता येणार नाही तेव्हा होणारी चिडचिड, आपण एकमेकांशिवाय बाकीच्या लोकांबरोबर जास्त वेळ घालवतोय ह्या जाणीवेतून येणारा पझेसिव्हनेस, त्यातून होणारी भांडणं आणि त्रास हे सगळं नंतर वाढतच जातं. आणि मग नात्यात वितुष्ट यायला वेळ नाही लागत. नवीन नात्याच्या अट्टाहासापायी आपण कायमचे एकमेकांना दुरावलो तर नाही सहन होणार मला. एकदा ह्या सगळ्यातून गेल्यावर पुन्हा तीच चूक नाही करायचीये मला. समीर माझ्यासाठी पण खूप कठीण आहे रे हे. पण मला हेच योग्य वाटतंय. तुला होत असलेला त्रास मला दिसतोय आणि त्याला मीच जबाबदार आहे. मी आधीच तुझ्यापासून अंतर ठेऊन वागायला हवं होतं, माझ्या वागण्या बोलण्यातून मी तुला संकेत देत गेले आणि आता आपल्या दोघांसाठी हे कठीण होऊन बसलंय. पण मी मुद्दामून नाही केलं रे, मी तुझ्यात कशी गुंतत.." सानिका बोलताना मध्येच गप्प बसली.
"काय म्हणालीस तू सानू? तू पण माझ्यात गुंतली आहेस?" समीरने पटकन पुढे येऊन तिचा चेहरा हातात घेतला. पण सानिका त्याच्यापासून लांब झाली आणि उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. निरभ्र आकाशातल्या अमावास्येच्या चांदण्याकडे बघत. त्याचं सौंदर्य चंद्राशिवाय किती अपूर्ण वाटत होतं.
"सांग ना सानू. एकदा तरी सांग मला तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत ते. त्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. पण प्लिज, एकदा मला खात्री करू दे ना, जे प्रेम मी तुझ्या डोळ्यांत बघितलं, तुझ्या वागण्यातून अनुभवलं ते खरंच होतं. तो माझा भास नव्हता." समीर तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. त्याच्या त्या आर्जवी आवाजाने सानिकाने इतकावेळ कष्टाने अडवलेला हुंदका बाहेर पडला. दोन्ही हातात तिचा चेहरा लपवून ती नाईलाजाने मान हलवत रडत होती. तो तिच्यासमोरून जायच्या आधीच त्याच्या आठवणीने व्याकुळ होत होती ती. तिला तसं रडताना बघून समीरच्याही मनात काहीतरी तुटत होतं. पटकन पुढे येऊन त्याने तिला मिठीत घेतलं.
"शूsss.. बास सानू. रडू नकोस प्लिज. तुला नसेल सांगायचं तर नको सांगुस. मी तुला आग्रह नाही करणार. तुला जसं हवं तसंच होईल. तुला हे नातं पुढे नाही न्यायचंय ना. ठीक आहे, मला तुझा निर्णय मान्य आहे. पण प्लिज आता अशी रडू नकोस. माझा शर्ट खराब होतोय." तो तिला हसवायला चिडवत म्हणाला.. स्वतःच्या गळ्यात दाटून आलेला आवंढा अडवत. तिची मिठी पुरेपूर अनुभवत होता तो. तिचा स्पर्श मनात साठवून घेत होता. पुन्हा कधी त्यांना ते क्षण एकत्र मिळणार होते? तीही रडणं थांबवून त्याच्या मिठीत सुखावली होती. त्याच्या पर्फ्युमचा मंद वास, त्याचं प्रेम, त्याची उबदार मिठी मनात साठवून घेत होती. आपण बरोबर करतोय ना? हा विचार उगाच तिच्या मनाला शिवून गेला. पण दुसऱ्याच क्षणी तिने तो दूर ढकलला.
मिठीच आवेग ओसरल्यावर दोघं एकमेकांपासून दूर झाले. तिच्या चेहऱ्यावरचे केस त्याने त्याच्या बोटांनी मागे केले आणि तिच्या गालावरचे अश्रू पुसले. "आय विल मिस यु अँड युअर डिम्पल. एकदा गोड हसून दाखव ना." तो म्हणाला तशी ती हसली. तिच्या गालावरच्या खळीवर त्याने अलगद त्याचा अंगठा घासला. "दॅट्स लाईक माय गर्ल! अशीच हसत राहा कायम." तो म्हणाला, तिच्या पिंगट बदामी डोळ्यांत खोलवर पाहात.
____****____
"सानू, एक विचारू?" समीरचा आवाज ऐकून घरात चाललेली सानिका थांबली. समीर तिला घरी सोडायला आला होता.
"जर मागच्या दोन दिवसात आपल्यात जे भांडण झालं ते झालं नसतं तर तुझा निर्णय वेगळा असला असता का?" त्याने विचारलं. सानिकाने बोलायला तोंड उघडलं पण तिने विचार बदलला.
"बाय समीर, गुड नाईट!" म्हणून ती आत निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो ती दिसेनाशी होईपर्यंत पाहात होता. उद्या ती इकडून निघून जाणार होती आणि ते बघायला तो तिथे नसणार होता. तिला स्वतःच्या आयुष्यातून असं निघून जाताना बघणं त्याला शक्यच नव्हतं.
"बाय सानू.. माहित नाही कसा राहणार आहे मी तुझ्याशिवाय." त्याचा गळा दाटून आला होता. समीर आणि सानिकाची 'कणवली' मधली शेवटची भेट.. आता संपली होती! पण त्यांची लव्हस्टोरी? ते तर येणारा काळच ठरवणार होता.
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा