Login

चंद्र आहे साक्षीला! - भाग ४९ 

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ४९ 

समीरला भेटून आलेली सानिका बंद दरवाज्याला टेकून उभी होती. अनावर झालेला हुंदका तिच्या तोंडातून बाहेर पडला. तेवढ्यात बाहेर आलेल्या आशाताईंनी तिला तसं बघितलं आणि टेन्शनमध्ये त्या तिच्याजवळ आल्या. 

"सानू, काय झालं. अशी इथे उभी राहून का रडतेयस? तू समीरला भेटायला गेलेलीस ना? काही भांडण झालं का तुमचं?" त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं आणि सानिका त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. कितीतरी वेळ त्या तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत होत्या. तिच्या वागण्यातून साधारण काय झालं असेल ह्याचा अंदाज त्यांना आला होता. समीरही पहिल्यांदाच तिला सोडायला येऊनही घरात आला नव्हता त्यावरूनच त्या काय ते समजून गेल्या. भावनांचा आवेग ओसरल्यावर सानिका त्यांच्यापासून लांब झाली. 

"काही नाही गं, उद्या मी जाणार आहे ना, म्हणून थोडं वाईट वाटत होतं. तुला खूप मिस करेन मी." त्यांचे गाल ओढत ती म्हणाली. 

"मला मिस करणार आहेस का बाकी कोणाला? समीर आला होता ना बाहेर? मग आत नाही आला?" तिला हॉलमधल्या बेडवर बसवत त्या म्हणाल्या. तिने नकारार्थी मान हलवली. त्याचं नाव ऐकून पुन्हा एकदा मन भरून येत होतं. तिची अवस्था बघून आत्ता काही बोलायची वेळ नाहीये हे त्यांनी जाणलं होतं. 

"एवढी आठवण येणार आहे माझी तर नको जाऊस ना. किती छान रुळली होतीस इकडे. तुला येऊन महिनाच झालाय असं वाटतच नव्हतं. गावातले सगळे तुझं किती कौतुक करत होते आजच्या सभेनंतर. मला तर फार छान वाटलं. इकडे आलीस तेव्हा कशी रडत कुढत बसायचीस घरात आणि आता बघ.." त्या प्रेमाने तिला म्हणाल्या. त्यांच्यातल्या आईलाही कुठेतरी तिने त्यांच्याबरोबर राहावं असं वाटत होतंच. सानिका नुसतीच त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून डोळे पुसत बसली होती. 

"सानू, तुला एक सांगू का बाळा? आयुष्यात आपण बरेचदा आपल्याकडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावत राहतो, त्या मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो. आपल्याला वाटत असतं की त्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या आपल्याला मिळतात तेव्हा आपल्याला कळतं की फक्त त्या गोष्टी आपल्याकडे नव्हत्या म्हणून आपल्याला त्या मिळवायची महत्वाकांक्षा होती. त्यादिवशी तुझ्या प्रमोशनची बातमी सांगितलीस मला तेव्हा खूप खुश झाले मी, पण तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद कुठेच दिसत नव्हता मला. कणवलीला आलीस तेव्हाच्या सानिकाला ही बातमी ऐकून काय करू अन काय नको झालं असतं. पण आता माझ्या समोर बसलेली सानिका मनापासून खुश नाहीये असं वाटतंय मला." त्या म्हणाल्या.

"असं नाहीये आई, मी खुश आहे. इतकी वर्ष मेहनत करून मिळवलेलं यश आहे हे. ते कसं डावलू शकते मी." सानिका म्हणाली. 

"मान्य आहे ना. हे प्रमोशन मिळवणं तुझं स्वप्न होतं. पण स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, त्यांच्या प्रायॉरिटीज बदलतात. आपल्याला फक्त ते ओळखता आलं पाहिजे. नाहीतर मृगजळाच्या मागे धावताना आपल्या हातात असलेल्या सुंदर गोष्टी निसटून जायला वेळ लागत नाही." त्या तिला थोपटत म्हणाल्या.

"जाऊदे, खूप झाली आता रडारड. उद्याची तयारी झाली का? आणि सानू तिकडे जाऊन परत ते डाएट वगैरे करत बसू नकोस हां. इकडे किती छान पोटभर जेवायचीस. तिकडे पण खाण्यापिण्याकडे, तब्येतीकडे लक्ष दे. कामापलीकडे पण काहीतरी कर, इकडे करत होतीस तसं. आयुष्यात माणसं महत्वाची असतात, असं घुम्यासारखं जगण्याला काही अर्थ नाही गं. " त्या म्हणाल्या.

"किती बोलतेस गं आई मला तू. त्या दिवशी रुक्ष म्हणालीस, आता घुमी म्हणालीस." सानिका थोड फुगवून म्हणाली. तशा आशाताई हसल्या. 

"आणि काळजी तूच घे स्वतःची. तुला वाटलं तर कधीही तू तिकडे निघून ये. काय? आणि फोनवर तर बोलत राहूच आपण." त्यांचे गाल ओढत ती म्हणाली. रात्री दोघी मायलेकी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसल्या होत्या. रात्री कधीतरी उशिरा आशाताईंच्या मांडीवर डोकं टेकवूनच  सानिकाला झोप लागली. जगातली सगळी सुखं एकीकडे आणि आईच्या कुशीत झोपायचं सुख एकीकडॆ. मनातली सगळी दुःख विसरायला लावायची ताकद असते त्यात.. आशाताई मात्र आपल्या मांडीवर झोपलेल्या एकुलत्या लेकीच्या निरागस चेहऱ्याकडे प्रेमाने बघत होत्या. 'कायम खुश ठेव रे माझ्या लेकराला आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे.' त्यांनी मनातच देवाकडे प्रार्थना केली. 

____****____

सकाळी साडेसातच्या सुमारास सानिका आवरून तिची बॅग घेऊन खाली आली. आशाताईंच्या हातच्या गरमागरम पोह्यांचा वास घरभर पसरला होता. त्याने एवढ्या सकाळीही सानिकाची भूक चाळवली. "आई, काय वाईट सवयी लावून ठेवल्या आहेस गं मला. इकडून परत गेल्यावर कोण देणार आहे मला सगळं असं आयतं हातात." ती अधाशासारखी पोहे तोंडात कोंबत म्हणाली. 

"अगं हळू खा गं. ठसका लागेल." आशाताई म्हणाल्या. पुढ्यातले पोहे संपवून सानिका निघाली. तिने निघताना देवाला आणि आशाताईंना नमस्कार केला. 

"येते आई. काळजी घे." ती डोळ्यांत पाणी आणून त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली. 

"हो तू पण. गाडी नीट चालव. पायाची काळजी घे. दुखायला लागला तर कुठेतरी थांब मध्ये आणि पोहोचलीस की फोन कर." त्या तिला सूचना देत म्हणाल्या. 

"मी कितीही मोठी झाले तरी तुझ्या सूचना काही संपणार नाहीत ना. येते आता.. आय लव्ह यु आई आणि मी तुला खूप मिस करेन!" सानिका हसून म्हणाली आणि बॅग घेऊन निघाली. तिला सोडायला मागे आलेल्या आशाताई आपल्या लेकीच्या दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहात होत्या. तिच्या येण्याने त्यांच्या घराला घरपण आलं होतं, आता पुन्हा त्या चार भिंतींमध्ये त्या आणि त्यांचं एकटेपण. एक निःश्वास सोडून त्या बंगल्याच्या पायऱ्या चढायला लागल्या.

____****____

गाडी घेऊन निघालेली सानिका तिच्या साईड मिररमध्ये मागे पडत जाणारा आशाताईंचा 'पारिजात' बांगला पाहत होती. आसपासची घरं, बागा, वाड्या पाहत होती. तिला गोपाळचं दुकान दिसलं, त्याला बाय करायला थांबायचा विचार होता तिचा पण त्याचं दुकान बंद होतं. ती तशीच पुढे आली, समोर चंद्याचं दुकान होतं पण तेही बंद होतं. 'हे सगळे गेलेत कुठे दुकानं बंद करून. कोणाला न भेटताच जावं लागणार बहुतेक.' तिने स्वतःशीच विचार केला. डोक्यात समीरचा विचार चालू होता तिच्या. त्याला भेटू का? पण तिने तो विचार दूर सारला. आपल्याच विचारात ती गावाच्या चौकात पोहोचली आणि तिने चमकून ब्रेक मारला. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. गावातली सगळी लोकं गावाच्या चौकात जमा झाली होती, तिचा निरोप घ्यायला. सानिका गाडीतून उतरून बाहेर आली.

"तुम्ही सगळे इकडे?" तिने आश्चर्याने  विचारलं.

"हो मग, तुला काय वाटलं आम्ही तुला बाय करायला येणार नाही?" गौतमीने पुढे येऊन सानिकाला मिठी मारली. "लवकर परत ये हां आम्हाला भेटायला. आम्ही तुला खूप मिस करू." ती डोळ्यांत पाणी आणत म्हणाली. तिच्यामागोमाग चंदू आणि गोपाळही होते. त्यांच्या मागोमाग गावातले बाकीचे सानिकाला भेटत होते. वैद्य काका-काकूही होते. 

"सानिका, नीट जा. आणि हो मी सांगितलेलं कायम लक्षात ठेव. ह्या वैद्यकाकांना विसरायचं नाही. कधीही काही लागलं तर मला कॉल कर." वैद्यकाकांनी मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्यामागोमाग वैद्यकाकूंनी तिला मिठी मारली आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांची सून तर नव्हती बनू शकली ती पण तरीही तिचा लळा लागला होता त्यांना. सानिकाची नजर त्यांच्यामागे भिरभिरत होती. तिच्या नजरेचा रोख बघून वैद्य काकू म्हणाल्या, "तो नाही आलाय. सकाळीच कुठेतरी निघून गेलाय." पदराने डोळ्यातलं पाणी टिपलं त्यांनी. सानिकाच्याही डोळ्यांत पाणी आलं पण तेव्हड्यात पिहू धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. 

"सानिकाताई, नको ना जाऊस. मी तुला खूप मिस करेन." ती डोळे पुसत म्हणाली.

"पिहू, मी पण तुला खूप मिस करेन. पण मी काय सांगितलंय लक्षात आहे ना? तू तुला हवं तेव्हा मुंबईला येऊ शकतेस मला भेटायला. खूप मज्जा करू आपण तिकडे. ओके? आता रडायचं नाही." सानिका तिची समजूत घालत असतानाच मागून निमकर पती-पत्नी आले. सानिकाला बघून त्यांनी हात जोडून तिचे आभार मानले. 

"तुझे आभार कसे मानू कळत नाहीये. तुमच्यामुळे आमची मुलगी आज आमच्याजवळ आहे. आम्ही तुला इतकं बोललो पण तरी तू पिहूसाठी.." निमकर बोलत असताना मध्येच थांबले. "तुझ्या उपकारांची परतफेड कशी करू आम्ही?"

"काका असं का बोलताय, झालं गेलं गंगेला मिळालं. आणि पिहू माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. मग तिच्यासाठी एवढं तर करूच शकते ना मी. पण तरीही तुम्हाला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर मला प्रॉमिस करा की ह्यापुढे तुम्ही पिहूला, तिच्या शिक्षणाला कायम प्रोत्साहन द्याल. खूप हुशार आहे ती. आयुष्यात खूप मोठी होईल. येते मी आता." सानिका त्यांच्यासमोर हात जोडत तिकडून निघाली. तेवढ्यात पिहूने तिच्या हातात एक गिफ्ट बॉक्स ठेवला. सानिकाने गोंधळून तिच्याकडे बघितलं. 

"मी नाही, त्याने दिलंय." ती हसून म्हणाली. समीरने माझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय? काय असेल? तिला ते उघडायचा खूप मोह होत होता. पण तेवढ्यात समोरून कोणीतरी तिला हाक मारली आणि तिचं लक्ष तिकडे गेलं. समोरून लतिका येत होती. 

"सानिका, आय एम सॉरी. मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. मी त्यादिवशी तो फोटो घेऊन सगळीकडे अफवा पसरवत फिरले आणि त्यामुळे, तुझं आणि सॅमीचं भांडण झालं. मला कायम असं वाटायचं तू कोण कुठली मुंबईवरून आलेली, इकडच्या लोकांच्या मागेपुढे करतेस. पण आज कळलं मला सगळे तुझ्यावर इतका जीव का लावतात. तू खरंच खूप चांगली आहेस. प्लिज मला माफ कर? फ्रेंड्स?" तिने सानिकासमोर हात धरत विचारलं. सानिकानेही हसून तिच्या हातात हात दिला.

"चालेल फ्रेंड्स.. पण एका अटीवर. समीरला सॅमी नाही म्हणायचं." सानिका हसून म्हणाली आणि तिकडून निघाली. लतिका गोंधळून तिच्याकडे पाहात होती.

सगळ्यांचा निरोप घेऊन सानिका गाडीत बसली. सगळे तिच्याकडे बघून हात हलवत होते. जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते. काहींच्या डोळ्यांत पाणीही होतं. त्यांच्या प्रेमाने सानिकाचं मन भरून आलं. इकडे आली तेव्हा फक्त आशाताईंसाठी आली होती ती. तिच्या धकाधकीच्या आयुष्यातून छोटासा ब्रेक मिळावा म्हणून.. पण ह्या गावाने तिला इतकं काही भरभरून दिलं होतं ज्याची तिने कधी अपेक्षाही केली नव्हती. काही आठवड्यांपूर्वी तिच्या मुंबईच्या घराची ओढ लागलेल्या तिला आज मात्र ती तिचं खरं घर सोडून जातेय असं वाटत होतं. समाधानाने तिने सगळ्यांकडे बघून हात हलवला आणि गाडी चालू केली. तिच्या गाडीच्या साईड मिररमध्ये त्या सगळ्यांचे चेहरे हळूहळू मागे पडत होते.. आणि मागे पडत होतं कणवली.. तिच्या बालपणीच्या आठवणी..  आशाताई.. तिचे मित्र-मैत्रिणी.. तिच्यावर जीव लावणारी गावातली माणसं आणि तिचा समीर! गाव सोडल्यावर तिची गाडी भरधाव वेगाने मुंबईच्या रस्त्याला लागली. पण मन मात्र अजूनही कणवली मध्येच रेंगाळत होतं, तिकडच्या गावाच्या सभांमध्ये,  शाळेतल्या मुलांबरोबर,  शंकराच्या मंदिरासामोरच्या पारावर, आशाताईंनी प्रेमाने फुलवलेल्या बागेत, वैद्यांच्या वाड्यात आणि त्या मधमाश्यांच्या झाडावर.. तिच्या समीरपाशी!

क्रमशः!

0

🎭 Series Post

View all