चंद्र आहे साक्षीला! - भाग ५०
सोमवारी सकाळी सातच्या अलार्मने सानिका उठून बसली. आज खूप दिवसांनी ऑफिसला जाणार होती ती. त्यामुळे तिला वेळेत यावरून निघायचं होतं. पटापट आवरून ती नेहमीसारखी टकाटक ड्रेसअप होऊन ऑफिसला जायला निघाली. जाताना ती तिच्या नेहमीच्या कॅफेमध्ये थांबली. तिला बघून काउंटरमागची मुलगी धावतच तिच्याजवळ आली.
"सानिका मॅम, आज खूप दिवसांनी आलात. नेहमीचीच कॉफी आणि सँडविच?" तिने विचारलं.
"हाय सई, कशी आहेस? आणि येस, नेहमीचीच कॉफी." सानिका म्हणाली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं. "अक्चुअली मला मसाला चहा मिळेल का? कॉफी नको." ती मुलगी तिची ऑर्डर घेऊन तिकडून निघाली. सानिका कोपऱ्यातल्या टेबलवर येऊन बसली. ऑर्डर येईपर्यँत ती तिचा फोन बघत होती. तिचे गावातल्यांबरोबर काढलेले फोटोज बघत होती. तिच्या आणि समीरच्या फोटोवर काही क्षण तिची नजर रेंगाळली. वैद्यांकडच्या पूजेच्या दिवशी काढलेला फोटो होता तो त्यांचा. तिचा आणि समीरचा हसरा चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल आलं. त्या फोटोत पण तो तिच्याकडेच बघत होता. नकळत तिने त्याचा नंबर फिरवायला हात पुढे नेला. परत आल्यापासून त्याच्याशी बोलणंच नव्हतं झालं. फक्त ती पोहोचल्याचा मेसेज केला होता तिने. काय करत असेल तो? बरा असेल ना? ती विचारात हरवली असतानाच तिची ऑर्डर आली. फोनवर त्याच्या नावावर रेंगाळणारी बोटं तिने महत्प्रयासाने आवरली. पुढ्यातला नाश्ता संपवून ती ऑफिसच्या रस्त्याला लागली.
____****____
"सानिका, वेलकम बॅक, वेलकम बॅक!" तिला दारातून आत शिरताना बघून दीक्षित सर त्यांच्या केबिनमधून धावतच बाहेर आले. त्यांच्या मागोमाग तिच्या टिममधले बाकीचेही आले होते. रश्मी, सागर, सुप्रिया.. अजून एक दोन नवीन चेहरेही दिसत होते ते वाळिंबेंच्या टिममधले असावेत. वाळिंबे! ते कुठे दिसत नाहीत.. म्हणून सानिकाने ऑफिसवरून नजर फिरवली. समोरच्या मीटिंगरूम मधून आपली पॅन्ट वर खेचत येताना दिसले ते तिला. 'हं, आता कसं ऑफिसमध्ये आल्यासारखं वाटलं मला.' सानिका स्वतःशीच विचार करत हसली.
"सानिका, हे एक छोटंसं वेलकम गिफ्ट तुला. तू एवढी तुझी सुट्टी कॅन्सल करून माझ्या सांगण्यावरून आलीस इकडे त्याबद्दल." दीक्षित सर तिच्या हातात पुष्पगुच्छ देत म्हणाले.
"ह्याची खरंच काही गरज नव्हती सर. पण थँक यु." सानिका हसून म्हणाली. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर सानिका तिच्या जुन्या केबिनमध्ये येऊन बसली. तिच्यामागोमाग सागर आतमध्ये आला.
"मॅम, आपल्या सगळ्या नवीन प्रोजेक्टसच्या फाईल्स तुम्हाला मेल केल्या आहेत मी. तुम्हाला अजून काही लागलं तर मला सांगा. मी बाहेरच आहे." म्हणून तो बाहेर गेला. आता सानिका एकटीच होती त्या केबिनमध्ये. गेली आठ वर्ष ह्याच ऑफिसमधून काम केलेलं तिने तरी आज तिला तिथे एका परकेपणाची जाणीव होत होती. मनातले विचार बाजूला सारून तिने तिचा ई-मेल उघडला आणि सागरने पाठवलेल्या फाईल्स डोळ्याखालून घालायला सुरवात केली. सुट्टीनंतरचा पहिला दिवस असल्यामुळे खूप काम होतं तिला. अख्खा दिवस तिचा मिटींग्समध्ये आणि सागरने पाठवलेल्या फाईल्स बघण्यात गेला. दिवसाची संध्याकाळ कधी झाली ह्याचंही भान तिला राहिलं नव्हतं. साधारण सातच्या सुमारास ती तिच्या केबिनमधून बाहेर आली. रश्मी आणि सागर काहीतरी काम करत बसलेले.
"हे काय, तुम्ही दोघं अजून इकडेच? घरी नाही जायचंय का आज?" तिने विचारलं. ते दोघं तिच्या चेहऱ्याकडे बघत होते. ती मनापासून विचारतेय का उपरोधाने हेच त्यांना कळत नव्हतं.
"अरे असे काय बघताय? सागर तुझी बायको प्रेग्नन्ट आहे ना? मग जा घरी. तिच्याबरोबर वेळ घालव." ती हातातलं सफरचंद खात म्हणाली.
"नाही ठीक आहे मॅडम, मी सांगितलंय तिला आज उशीर होईल ते." सागर चाचरत बोलला. सानिका हळुवार पाऊलं टाकत त्याच्यापाशी आली. त्याला आता घाम फुटला होता. पहिल्याच दिवशी शिव्या पडणार असं दिसतंय. त्याने मन घट्ट केलं. पण झालं काहीतरी वेगळंच, सानिकाने पुढे येऊन त्याच्या लॅपटॉपची स्क्रीन बंद केली.
"इट्स ओके सागर. तू निघालास तरी चालेल. मी थांबले आहे कारण मला घरी जाऊन करण्यासारखं फार काही नाहीये. पण तू वेळेत घरी जा. कधी आहे तुझ्या बायकोची ड्यू डेट?" तिने विचारलं.
"पुढच्या महिन्यात आहे मॅडम." सागर डोळे विस्फारून तिच्याकडे पाहात होता. आजपर्यंत कधीच त्याच्याशी कामाशिवाय एक शब्द न बोलणारी सानिका आज चक्क त्याला लवकर घरी जायला सांगत होती.
"ओके, काळजी घे तिची. सी यु टुमॉरो!" म्हणून सानिका पुन्हा तिच्या केबिनमध्ये गेली. थोड्यावेळाने ऑफिसमधली बाकीची सगळी लोकं निघून गेली होती. दिवसभराच्या कामाने थकलेल्या सानिकाने मागे खुर्चीवर डोकं टेकवलं. तिची त्या रिकाम्या घरी जायची इच्छाच होत नव्हती. मनाशी काहीतरी विचार करून तिने गौतमीला कॉल लावला.
"हायssss, काय म्हणताय सानिका मॅडम. आता काय बाबा मोठी मॅडम झालीस तू." समोरून गौतमी म्हणाली. त्यावर सानिका नुसतीच हसली. पण तिचं नाव ऐकून गौतमीच्या समोर बसलेल्या समीरच्या हृदयाचा ठोका चुकला.
"सानू यार जाम मिस करतोय आम्ही तुला. आत्तापण पारावर गप्पा मारायला भेटलोय तर तुझी आठवण येतेय." ती म्हणाली तशी सानिकाची कळी खुलली.
"अच्छा तुम्ही सगळे भेटलायत का? मग स.. समीर पण आहे का?" तिने न राहवून विचारलं. फक एकदा त्याचा आवाज ऐकण्यासाठी आसुसली होती ती. तिचा प्रश्न ऐकून गौतमीने समोर बसलेल्या समीरकडे बघितलं. तो स्वतःच्याच विचारात हरवला होता. सानिका गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तो बाकीच्यांना भेटला होता. तेही त्यांनी खूप आग्रह केल्यावर.
"हो आहे ना, देते त्याला." म्हणून गौतमीने समीरच्या समोर फोन धरला. समीर गौतमीकडे आणि फोनकडे आलटून पालटून बघत होता. सानिकाशी झालेल्या शेवटच्या भेटीनंतर आता पहिल्यांदाच तो तिच्याशी बोलणार होता.
"हॅलो?" समीर आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत म्हणाला. पलीकडे सानिकाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. चार दिवसांनी त्याचा आवाज ऐकत होती ती.
"हाय" ती म्हणाली. पुढचे काही क्षण दोघं काहीच बोलले नाही. फोनवर फक्त एकमेकांचे श्वास ऐकू येत होते. ती शांतता दोघांनाही सहन होत नव्हती पण मनातलं बोलायला शब्दही सापडत नव्हते.
"कशी आहेस? पाय बरा झाला का?" समीरने विचारलं. तिच्याशी बोलणं झालं नसलं तरी आशाताईंना रोज तिच्या तब्येतीबद्दल विचारत होता तो.
"बरी आहे आता. तू कसा आहेस? परत आल्यावर काही बोलणंच नाही झालं आपलं." सानिका म्हणाली.
"हो जरा कामात बिझी होतो. तुझं पण ऑफिस चालू झालं असेल ना. कसं वाटतंय?" त्याने विचारलं. थोड्यावेळ अशाच अजून काही निरर्थक प्रश्नांच्या देवाणघेवाणीनंतर दोघांनाही कळत नव्हतं पुढे काय बोलायचं. समोर उभे असलेले चंदू, गौतमी आणि गोपाळ त्याच्याकडे बघत होते. इतके दिवसांनंतर तिचा आवाज ऐकून थोडं तरी चैतन्य आलं होतं त्याच्या चेहऱ्यावर. मगाशी सानिकाच्या आवाजातूनही तिला असलेली समीरची ओढ जाणवलीच होती गौतमीला. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे तर का एकमेकांपासून लांब राहायचा हा अट्टाहास आहे हे त्या तिघांनाही कळत नव्हतं. पण त्यांच्या हातातही काहीच नव्हतं. बोलून झाल्यावर समीरने फोन गौतमीकडे दिला आणि तो काही न बोलताच तिकडून निघाला. त्याचं दुःख, तिच्यासाठी झुरणं, त्याला त्यांच्यासमोर नव्हतं दाखवायचं. बाईकवरून वेगाने तो घराकडे निघाला. इतकी वर्ष ह्या गावात राहिल्यावर सुध्दा आज त्याच्या तिथल्या प्रत्येक आठवणीमध्ये तीच होती. आशाताईंच्या 'पारिजात' बंगल्यावरून पुढे जाताना त्याच्या गेटवर त्याच्या हातातून फळांची पिशवी घेणारी सानिका त्याला आठवली, शंकराच्या पारासमोरून जाताना खळखळून हसून सगळ्यांशी गप्पा मारणारी सानिका डोळ्यासमोर आली, गावाच्या शाळेबाहेर त्याने दिलेला फुलांचा गुच्छ हातात धरून लटक्या रागाने त्याच्यादिशेने चालत येणारी सानिका दिसत होती त्याला.. पण समोर दिसत असूनही तिच्या जवळ जाता येत नव्हतं. उद्विग्न मनाची घालमेल घेऊन तो तसाच त्याच्या घराच्या दिशेने निघाला, तिच्या सगळ्या आठवणी बाजूला सारायचा अयशस्वी प्रयत्न करत!
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा