चंद्र आहे साक्षीला! - भाग ५१
नुकताच कामावरून परतलेला समीर बाहेरच सोफ्यावर मागे डोकं टेकवून डोळे मिटून बसला होता. तेवढ्यात त्याच्या कपाळावर झालेल्या हाताच्या उबदार स्पर्शाने त्याचे ओठ रुंदावले. त्या हातावर हात ठेवत त्याने विचारलं, "झोपली नाहीस अजून आई?"
वनिताताई आपल्या थकलेल्या लेकाकडे काळजीने बघत होत्या. "नाही,, तुझीच वाट बघत होते. आजकाल सकाळी लवकर जातोस ते रात्री उशिरा घरी येतोस. काही बोलणंच होत नाही आपलं. म्हंटलं आता तुझ्याकडे आईसाठी वेळ नाहीये तर आपणच जागं राहावं." त्या त्याच्या बाजूला बसत तक्रारीच्या सुरात म्हणाल्या.
"तू पण ना आई, नुसती ड्रामा क्वीन आहेस." समीरने त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं. त्या मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. काही न बोलता तो तसाच पडून होता काही वेळ.
"समीर, तू बरा आहेस ना बाळा? मी बघतेय गेले दोन आठवडे तू तुझ्याच तंद्रीत असतोस, एक तर काम करत असतोस किंवा तुझ्या खोलीत असतोस. आधीसारखं हसणं नाही, लोकांमध्ये मिसळणं नाही, माझी खिल्ली उडवणं नाही. जेवणात पण नीट लक्ष नसतं. तिच्याशी काही बोलणं झालं का?" वनिताताईंनी चाचरतच विचारलं. सानिका परत गेल्यापासून आपल्या लेकामध्ये झालेला बदल त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता.
"असं काही नाहीये आई." समीरने त्यांचा प्रश्न टाळला.
"तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस पण माझ्याशी खोटं बोलू नकोस. आई आहे मी तुझी, तुझ्या चेहऱ्यावरून कळतं मला तुझं काहीतरी बिनसलं आहे ते." त्या काळजीने म्हणाल्या. त्यांच्या आवाजतली चिंता बघून समीरला वाईट वाटलं. तो उठून त्यांचा हात हातात घेऊन बसला.
"आठवण येतेय तिची?" त्याच्याकडे बघत त्यांनी विचारलं. त्याच्या गळ्यात आवंढा दाटून आला होता त्यामुळे शब्द बाहेर पडत नव्हते. त्याने नुसतीच होकारार्थी मान हलवली .
"ती इकडून जायच्या आधी तुमचं काय बोलणं झालं माहिती नाही मला. पण मला काही हे सगळं पटलेलं नाहीये. मी तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं आहे ना. तू तिच्यात जेवढा गुंतला आहेस तेवढीच ओढ मला तिच्याबाजुनेही दिसत होती. मग ती अचानक असं सगळं नाकारून परत का गेली? ती इकडे असताना कायम एकत्र असायचात तुम्ही. आशाला पण हेच वाटत होत की तुमच्यात मैत्री पलीकडे काही आहे. मग प्रॉब्लेम कुठे झालाय?" वनिताताईंनी विचारलं.
"आई, ह्यात तिची काही चूक नाहीये. तू उगाच तिच्यावर राग धरू नकोस. तुझा मुलगा प्रेमात आपटला म्हणजे समोरच्यानेही त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे असं थोडी असतं. तिला नसेल वाटलं माझ्याबद्दल काही. आणि मी पण माती खाल्लीच ना. तिला आमच्या नात्यावर कॉन्फिडन्स द्यायचा सोडून मी कोण त्या विश्वासवरून तिच्याशी भांडलो. त्यातून केवढा मोठा प्रॉब्लेम झाला. ह्या सगळ्यानंतर तिला नसेल वाटलं हे नातं पुढे न्यावंसं. तसंही तिने मला कधीच सांगितलं नव्हतं की तिचं माझ्यावर प्रेम आहे. तू ऐकलं नाहीस का गावाच्या शेवटच्या सभेमध्ये ती काय म्हणाली? ती मला तिचा चांगला मित्र मानते. जसे गौतमी, चंद्या आहेत तिच्यासाठी तसाच मी." तो त्यांची नजर चुकवत म्हणाला. ह्या परिस्थितीतही सानिकाबद्दल कोणाच्या मनात कटुता निर्माण झालेली त्याला सहन होत नव्हतं. पण वनिताताईंनाही त्यांच्या मुलाची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. त्या अजूनही काळजीने त्याच्याकडे बघत होत्या.
"मग तुझं काय आता? तू असं अजून किती दिवस कुढत राहणार आहेस? शेवटचं तुला हसताना कधी बघितलंय तेही मला आठवत नाहीये." वनिताताई काळजीने म्हणाल्या.
"प्रयत्न करतोय आई मी. पण सोप्प नाहीये गं. तिला विसरण्यासाठी कामात गुंतवलं आहे स्वतःला. पण मन पुन्हा पुन्हा तिच्याकडेच ओढ घेतं. काही दिवसांसाठी आली होती ती इकडे. पण त्यात माझं आयुष्यच बदलून गेली. तिचा निरागस चेहरा डोळ्यांसमोरून जातच नाही गं. एवढ्या कमी वेळात एवढ्या आठवणी देऊन गेलीये ना ती की त्यातून बाहेरही पडवत नाहीये आणि त्या बरोबर जगताही येत नाहीये. आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्यात एवढा गुंतलो मी आणि आता बाहेर पडणं खूपच कठीण जातंय. मी माझ्याच चुकीने गमावलं आहे का गं तिला?" समीर दोन्ही हातात चेहरा धरून रडत होता. इतकावेळ चेहऱ्यावर असलेला उसना मुखवटा गळून पडला होता. आपल्या लेकाच्या चेहऱ्यावरच्या वेदना बघून वनिताताईंचं काळीज पिळवटून निघत होतं. हे असं प्रेमभंगाचं दुःख त्याच्याच वाटेला का यावं?
"असा रडू नकोस रे बाळा. खूप त्रास होतो मला तुझ्यासाठी काही करता येत नाहीये ह्याचा. विसरून जा हे सगळं. तुझ्यावर असं भरभरून प्रेम करणारी दुसरीच कोणीतरी असेल कदाचित तुझ्या नशिबात." त्या त्याला समजवायचा प्रयत्न करत होत्या. त्याने पुन्हा त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं.
"नाही आई, मला दुसऱ्या कोणाचंच प्रेम नकोय. मला माझी सानूच हवी आहे." तू अजूनही हुंदके देऊन रडत होता. पण मगासचा दुःखाचा आवेग थोडा कमी झाला होता. सानिका गेल्यापासून पहिल्यांदाच कोणासमोर तरी त्याने आपलं मन मोकळं केलं होतं त्यामुळे त्याला थोडं हलकं वाटत होतं. पण वनिताताईं मात्र उद्विग्न मनाने त्याला तसंच थोपटत कितीतरी वेळ बसून होत्या.
____****____
सानिकाला मुंबईला येऊन दोन आठवडे होत आलेले. तिचं रुटीन काहीसं मार्गी लागलं होतं. ऑफिसमधला मेहतांचा प्रोजेक्ट आजपासून सुरु होणार होता त्यामुळे तिला आज वेळेत पोहोचायचं होतं ऑफिसला. सकाळी गडबडीत आवरत असतानाच तिच्या घराचा दरवाजा वाजला. तिने घाईत येऊन उघडला तर समोर मिथिला छोट्या वेदाला घेऊन उभी होती. दोघींचा चेहरा रडून लाल झालेला.
"मिथू? तू सकाळी सकाळी इकडे? आणि चेहरा असा का झालाय तुझा?" तिने पटकन पुढे येऊन मिथिलाच्या हातातून वेदाला घेत विचारलं.
"सानू.." मिथिला हुंदके देत तिच्या गळ्यात पडली. ते पाहून वेदाही रडायला लागली. सानिका गोंधळून कोणाला आधी शांत करायचं ह्याचा विचार करत होती. शेवटी तिने मिथिलाला आणून सोफ्यावर बसवलं. स्वयंपाकघरातून एक कॅडबरी आणून वेदाच्या हातात दिली तशी ती रडायची थांबून खुद्कन हसली. मग सानिकाने तिचा मोर्चा मिथिलाकडे वळवला.
"सानू, माझं आणि हितेनचं खूप मोठं भांडण झालं आज. मला आता त्याचं तोंड पण बघायचं नाहीये." मिथिला हुंदके देत म्हणाली.
"अगं पण एवढं कशावरून भांडलात?" सानिकाने काळजीने विचारलं.
"काही विचारू नकोस. गेली कित्येक वर्ष मी घरातलं, वेदाचं सगळं करतेय. माझं करिअर, इंडिपेन्डन्स सगळं मी त्यासाठी बाजूला ठेवलं तरी त्याला माझी काही किंमतच नाहीये. त्याच्यासाठी फक्त त्याचं ऑफिस आणि आई एवढंच महत्वाचं आहे. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी त्याला म्हंटलं सुट्टी घे, आपण कुठेतरी बाहेर जाऊ दोघंच आणि वेदाला आईंकडे ठेऊ. तर म्हणाला कशाला तिला त्रास. घरीच काहीतरी करू. तसंही रोज एकत्रच असतो आपण मग कशाला काही वेगळं करायचं. मग माझं पण डोकं फिरलं. मी म्हंटलं त्याला मला पण ह्या त्याच त्याच रुटीनमधून ब्रेक हवाय. तो ऑफिसला निघून गेल्यावर बाकीच्या लोकांना भेटतो, ऑफिसच्या पार्ट्याना जातो. मला काहीच करता येत नाहो ह्यातलं. तर तुला माहितीये तो काय म्हणाला? 'तू तर घरातच असतेस दिवसभर, मग कशाला अजून ब्रेक हवाय तुला, निवांत तर चालू आहे तुझं आयुष्य.'" मिथिला तिचा आणि हितेनचा संवाद सांगताना पुन्हा रडायला लागली. सानिकाला 'संसार' ह्या गोष्टीमधला फार अनुभव नसल्याने तिचं सांत्वन कसं करायचं ते कळत नव्हतं. त्यात आज तिला ऑफिसला वेळेत पोहोचणं फार महत्वाचं होतं.
"हे बघ मिथू, तू शांत हो आधी. अशी भांडणं होत असतात. तू आज इथेच थांब हवं तर. मला आता खरंच निघावं लागेल पण मी संध्याकाळी आले की आपण निवांत बसून बोलू. ओके?" तिला कसंबसं समजावून सानिका घरातून बाहेर पडली आणि ऑफिसच्या दिशेने निघाली.
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा