चंद्र आहे साक्षीला! - भाग ५४
ऑफिसातले बाकीचे सगळे निघून गेल्यावर समीर एकटाच उरला होता. सारखा तो त्याच्या समोरच्या फोनकडे बघत होता. त्याने सानिकाला सकाळी बुके पाठवल्यानंतर तिचा काहीच मेसेज किंवा कॉल आला नव्हता. आवडलं नसेल का मी तिला असं तिच्या ऑफिसमध्ये फुलं पाठवलेलं? का सकाळी तिचा कॉल उचलला नाही म्हणून राग आला असेल? मीच करू का कॉल? तो स्वतःच्याच विचारात हरवला होता. शेवटी मनातले सगळे विचार बाजूला सारून तो ऑफिसमधून घरी जायला निघाला तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने उत्सुकतेने फोन बघितला पण त्यावर चंदूचं नाव बघून त्याचा मूडच गेला.
"बोल चंद्या." समीर बाईकवर बसत म्हणाला.
"अरे सम्या , कुठे आहेस? जरा फ्री आहेस का?" पलीकडून चंद्याचा टेन्शनमधला आवाज ऐकून समीरला पण काळजी वाटली.
"हो बोल ना. काय गोंधळ घातलायस?" डोक्यावर घालायला उचललेलं हेल्मेट खाली ठेवत समीर म्हणाला.
"अरे माझी गाडी बंद पडली आहे. गावापासून जरा लांब आहे मी. तुला जमेल का यायला? गोप्याला फोन केला होता पण तो उचलत नाहीये." चंद्या म्हणाला. समीरने घड्याळाकडे बघितलं. ९ वाजत आलेले. खरंतर तो इतका दमला होता की कधी एकदा घरी जाऊन बेडवर आडवा पडतोय असं झालेलं त्याला. पण आता त्याला जावंच लागणार होतं. चंदूला पत्ता पाठवायला सांगून तो निघायची तयारी करायला लागला. काही क्षणांत फोनवर चंदूचा मेसेज आला. त्याने पाठवलेला पत्ता बघून समीरच्या कपाळावर आठ्या आल्या. हा एवढ्या रात्री एवढ्या लांब का कडमडायला गेलाय? समीर मनातच चरफडत चंद्याने पाठवलेल्या जागेकडे निघाला. अर्ध्या तासाने तो तिकडे पोहोचला तेव्हा चंद्या रस्त्याच्या बाजूला बाईक लावून बसला होता.
"काय रे, एकटा इकडे काय करतोयस? ही काय वेळ आहे का बीचवर यायची?" समीर आजूबाजूला बघत म्हणाला. हा तोच बीच होता जिथे सानिकाबरोबर ते सगळे पिकनिकला आलेले. रस्त्यावर लाईट्स नव्हते पण पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. "एक मिनिट, तू काय गर्लफ्रेंड बरोबर वगैरे आला होतास का इकडे?" समीरने डोळे बारीक करत विचारलं.
"नाही रे, आपला सहज पाय मोकळे करायला आलेलो. तर गाडी बंद पडली." चंद्या डोकं खाजवत म्हणाला.
"पाय मोकळे करायला? गाडीवरून?" समीर त्याच्याकडे संशयाने बघत होता.
"आता माझी उलट तपासणी करणं बंद कर यार तू. आलो होतो इकडे फिरायला, पडली बंद गाडी.. त्यात काय एवढं." चंद्या वैतागून म्हणाला.
"बरं मग आता निघायचं का? गाडी घ्यायला उद्या येऊ आपण." समीर बाईक चालू करत म्हणाला.
"नाही नको. आता आलाच आहेस इथपर्यंत तर जरा समुद्रावर फिरायला जाऊ की. किती दिवसांत आपण दोघं असे भेटलोच नाही आहोत." चंद्या दात विचकवत म्हणाला. समीरला आता त्याच्या वागण्याचं कोडंच पडलेलं.
"चंद्या, सानू जरी इकडे नसली तरी माझं तिच्यावरच प्रेम आहे हे माहितीये ना तुला? त्यामुळे तुझ्याबरोबर रोमान्स नाही करता येणार मला." समीर वैतागून घड्याळाकडे बघत म्हणाला. त्याच्या बोलण्याने चंदूचं तोंड पडलं, 'हा समजतो काय मला.'
"मित्रासाठी एवढा पण वेळ नाहीये का आता तुझ्याकडे? छान गप्पा मारल्या असत्या, एकदम हार्ट टू हार्ट." चंद्याने उगाच काहीतरी इमोशनल डायलॉग मारला. समीर नाईलाजाने बाईकवरून उतरला आणि बीचच्या दिशेने चालायला लागला. "सगळे माझ्या राशीला का बांधलेत कळत नाही. घरी आई आणि इकडे हा. सगळे ड्रामा करण्यात पुढे."
समीरच्या मागे चालत असलेल्या चंद्याने पटकन त्याच्या फोनवरून मिथिलाला मेसज केला "आपला प्लॅन यशस्वी झालाय. आपले रोमिओ ज्युलिएट आता एकत्र येणारंच!" सानिका मुंबईला निघून गेल्यावर समीरची झालेली अवस्था चंदूला बघवत नव्हती. मागे मुंबईवरून परत आल्यावर समीरकडून त्याला मिथिलाबद्दल कळलं होतं. त्याने सोशल मीडियावरून तिच्याशी कॉन्टॅक्ट करून सानिका आणि समीरला एकत्र आणायचा प्लॅन बनवला होता.
रात्रीच्या काळोखात समुद्राच्या पांढऱ्या फेसाळ लाटा हळूहळू दृष्टीक्षेपात येत होत्या. वाळूत रुतलेल्या असंख्य शिंपल्यांवरून परावर्तित होणाऱ्या चंद्र प्रकाशामुळे जणू चांदण्यांचा सडा पडल्याचा भास होत होता. आकाशातल्या त्या तेजस्वी गोळ्याचं प्रतिबिंब समुद्राच्या हळुवार वर खाली होणाऱ्या लाटांवर हिंदकळत होतं. एक वेगळीच शांतता, वेगळंच समाधान मिळत होतं निसर्गाच्या त्या अद्भुत देखाव्यात. "सानु नसती आली इकडे." तो स्वतःशीच बोलला. त्याने मागे वळून बघितलं तर चंद्या त्याच्यापासून थोडं अंतर ठेऊन चालत होता.
"काय रे.. गप्पा मारायच्या होत्या ना? मग आता असा मागे काय चालतोयस?" समीर त्याच्याकडे बघत थांबला.
"मी फक्त गप्पा मारायच्यात म्हंटलं. आपण दोघांनी मारायच्यात असं थोडी म्हंटलं." चंद्या गालातल्या गालात हसत म्हणाला.
"चंद्या मगाशी बाईक बंद पडली तेव्हा डोक्यावर पडलास का रे? इथे आपल्याशिवाय कोणी आहे का बोलायला?" समीरने वैतागून विचारलं. 'का मी ह्याचा फोन उचलला. राहू द्यायला हवं होतं रात्री इकडेच.' तेवढ्यात एक ओळखीचा सुगंध त्याच्या नाकात भरला आणि तो जागीच स्तब्ध झाला. हा तर तिच्या पर्फ्युमचा.. छे छे कसं शक्य आहे. त्याने चंदूकडे बघितलं.
"एन्जॉय.." म्हणून गालात हसत तो तिकडून निघून गेला. समीर मात्र तसाच शॉकमध्ये उभा होता. हिम्मतच होत नव्हती त्याची मागे वळून बघायची. मनाला होत असलेली तिच्या अस्तित्वाची जाणीव शरीर मात्र मानायला तयार नव्हतं. आत्ता कशी येईल ती इकडे? नाही नाही, मला काहीतरी भास होतोय.. समीर स्वतःशीच नकारार्थी मान हलवत होता. तेवढ्यात तिचा आवाज कानावर पडला, "समीर..". क्षणभर पायांतलं त्राणच गेलं त्याच्या. दुःख, प्रेम, आनंद.. सगळ्या सगळ्या भावना अनावर झाल्या होत्या त्याला. हळूच तो मागे वळला. ती खरंच उभी होती त्याच्यासमोर.. त्याची सानू!
पांढऱ्या रंगाच्या लांब पायघोळ ड्रेसमध्ये, केस मोकळे सोडलेले, टपोऱ्या पिंगट डोळ्यांच्या पापण्यांची अलगद उघड झाप करत.. त्याच्या दिशेनेच चालत येत होती ती. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळलेली. फक्त एकदा तो चेहरा पुन्हा बघण्यासाठी तीळ तीळ तुटला होता तो गेले काही दिवस आणि आज ती समोर आल्यावर बाकी सगळंच तिच्या त्या निरागस चेहऱ्यापुढे फिकं पडलं होतं. अगदी आकाशातलं पौर्णिमेचं चांदणंही.. अजुनही ती एक स्वप्नच वाटत होती त्याला. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. गेल्या काही दिवसात थोडा बारीक झाला होता का तो? चेहऱ्यावर दाढीची खुंट पण दिसत होती आणि डोळ्यांत निराशा. पण आता तिला पाहून चैतन्य आलं होतं चेहऱ्यावर आणि डोळ्यांत पाणी. तिच्या असण्याची खात्री करून घ्यायला त्याने तिच्या हाताला चिमटा काढला.
"आऊच.. समीर! इतके दिवसांनी भेटल्यावर चिमटे काढणार आहेस का मला? आणि काय हा अवतार. जरा दाढी तरी करायची. परत फळवाला समजले असते तर मी तुला?" ती गाल फुगवून म्हणाली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. खरंच होती ती त्याच्यासमोर.. पण अजूनही बोलायला शब्द सुचत नव्हते.
"खूप वाट बघायला लावली ना मी?" तिने पुढे येऊन त्याच्या गालावर हात ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदनेला ती कारणीभूत होती ह्या जाणीवेने तिचेही डोळे भरून आले. त्याने नुसतीच मान हलवली. तो डोळे मिटून तिचा स्पर्श अनुभवत होता.
"आय एम सॉरी, काय करू, ह्या बाबतीत खूप स्लो आहे मी." ती रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली.
"समीर, समजत नाहीये कुठून सुरवात करू. इकडे पहिल्यांदा आले तेव्हा आयुष्य एखाद्या रोबोट सारखं झालं होतं माझं. प्रेम, मैत्री ह्यासगळ्यासाठी वेळच नव्हता माझ्याकडे. एक मिथिला सोडली तर कोणीच नव्हतं मैत्रीण म्हणायला आयुष्यात. पण इकडे आल्यावर गोष्टी खूप बदलत गेल्या. पहिल्यांदा तू भेटलास तेव्हा खूप आगाऊ वाटला होतास मला.. तुझं फ्लर्ट करणं, माझी खिल्ली उडवणं.. मला विचित्रच वाटायचं. कारण कोणी माझ्याशी असं वागायची सवयच नव्हती मला. सगळे मला घाबरूनच वावरायचे माझ्या आजूबाजूला. अर्थात त्याला मीच जबाबदार होते. स्वतःभोवती एक अभेद्य भिंत उभारली होती मी. त्यातून कुठल्याच भावना माझ्यापर्यंत पोहोचू देत नव्हते मी. पण तू मात्र कशाचीही पर्वा न करता ती भिंत मोडून काढत होतास. फक्त तुझ्या ह्या मनमोकळ्या स्वभावाने. कसाही वागलास तरी तुझा हा स्टुपिड क्युट चेहरा बघून तुझ्यावर चिडता नाही यायचं. तुझ्याबरोबर वेळ घालवताना मला कळलंच नाही कधी मला तुझं फ्लर्ट करणं, माझ्या आजूबाजूला घुटमळणं, माझ्या डोळ्यांत हरवून जाणं आवडायला लागलं. तू माझ्याकडे बघितलंस की उगाच आपण खूप सुंदर आहोत असं वाटायचं. तुला दुसऱ्या कोणाबरोबर बघून जीव वरखाली होत होता माझा. तुझं मिश्किल वागणं, खोड्या काढणं फक्त माझ्यासाठीच असलं पाहिजे असं वाटायला लागलं होतं. तुझ्या जवळ असण्याने गोंधळून जात होते मी आणि तू जवळ नसताना तुलाच शोधत होते." सानिकाने आलेल्या हुंदक्याला वाट करून दिली.
"जेव्हा तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस, तेव्हा मन सुखावलं होतं. तुझ्या स्पर्शाने हरखून गेले होते मी. शब्द अगदी ओठांवर येऊन थांबले होते. पण आपण प्रेमात पडू शकतो हे मानायला मन तयारच नव्हतं तेव्हा. तू मात्र तुझ्या प्रत्येक वागण्यातून तुझ्या प्रेमाची जाणीव करून देत होतास. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता." सानिकाने प्रेमाने समीरकडे बघितलं. आज पहिल्यांदाच ती तिच्या मनातलं असं भरभरून बोलत होती त्याच्यासमोर.
"प्रेम निरपेक्षच असलं पाहिजे ना सानू. नाहीतर तो व्यवहार होतो." समीर म्हणाला.
"खरंय, पण आजकाल कोणाच्या नशिबात असतं ते? माझ्या नशिबात होतं तर ते झिडकारून मी निघून गेले. अर्थात मी नाकारल्याने गोष्टी कुठे बदलतात. मुंबईला गेल्यापासून एकही क्षण असा नाही गेला जेव्हा तुझी आठवण नाही आली मला समीर. तू जवळ असताना जे समजलं नाही ते तुझ्यापासून लांब गेल्यावर समजलं मला. दिवस कामात निघून जायचा पण रात्री सगळ्या आठवणी अंगावर यायच्या. तुझा चेहरा राहून राहून डोळ्यांसमोर यायचा. आणि अशाच एका रात्री मला आपली मुंबईतली रात्र आठवली." सानिका बोलली आणि समीरने चमकून तिच्याकडे बघितलं.. फायनली!
"तेव्हा मी माझ्या तोंडाने माझ्या प्रेमाची कबुली दिली होती ना? मग तू मला काहीच का नाही बोललास समीर? माझ्या वागण्याचा राग नाही आला?" तिने विचारलं.
"आला ना. रागही आला आणि खूप प्रेमही. पण मला तू नशेत बोललेल्या गोष्टींसाठी तुला जबाबदार नव्हतं धरायचं सानू." समीर तिच्या चेहऱ्यावरची केसांची बट बाजूला करत बोलला.
"बरं झालं नाही बोललास काही. नाहीतर मी आता जे करणार आहे त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मला बघायला मिळाले नसते." सानिका म्हणाली. समीर तिच्याकडे गोंधळून बघत होता. तेवढ्यात ती त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली, त्याचा हात हातात घेऊन.
"समीर, आपल्यामध्ये झालेल्या एका भांडणावरून आपलं नातं टिकणार नाही हे मी ठरवून मोकळी झाले. पण इतकी सोप्पी गोष्ट मला कशी कळली नाही रे की ह्या अशा छोट्या तक्रारींमधून, भांडणांमधूनच मनं अजून जवळ येतात. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधणारी मी हे समजूच नाही शकले की दोन इम्परफेक्ट लोकं एकत्र येऊनच एक परफेक्ट नातं बनतं. जे तुझ्यात नाही ते मी पूर्ण करेन आणि जिकडे मी कमी पडेन ते तू भरून काढशील. असंच असतं ना सहजीवन? समीर, मला माहितीये हे बोलायला मी खूप उशीर करतेय. ओठांवर शब्द आत्ता येत असले तरी मनाने कधीच तुझ्याबाजूने कौल दिला आहे. खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर. तुला भेटल्यापासूनचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि माझ्या आयुष्यात ह्यापुढे येणारा प्रत्येक क्षणही मला तेवढाच स्पेशल हवा आहे. समीर, विल यु मॅरी मी?" सानिकाने विचारलं आणि समीरही गुढगे टेकवून तिच्यासमोर बसला.
"सानू, आर यु सिरिअस?" त्याने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं. इतके दिवसांच्या विरहानंतर हा क्षण जणू त्याच्या मनावरच्या सगळ्या जखमांवरची फुंकर बनून आलेला. सानिकाने नुसतीच होकारार्थी मान हलवली.
"ऑफकोर्स, येस येस येस! तुला कल्पना नाहीये सानू आज तू मला काय दिलयंस. आय एम सो हॅपी टुडे." त्याने पुढे येऊन तिला मिठीत घेतलं. तीही आज त्याच्या मिठीत कसलीही चिंता न करता विरघळत होती.
"सॉरी समीर, खूप त्रास दिला ना मी तुला." ती रडत रडतच बोलत होती.
"शूssss, इट्स ओके सानू. तू जर प्रत्येकवेळी मला असं रोमँटिक बोलून मनवणार असशील तर मला पुन्हा पुन्हा त्रास द्यायची पूर्ण परवानगी आहे तुला. आय लव्ह यु सानू! आय लव्ह यु अ लॉट!" तिच्या डोक्यावर ओठ टेकवत तो म्हणाला.
"आय लव्ह यु टू!" म्हणून सानिका अजूनच त्याच्या मिठीत शिरली. प्रेमाचा आवेग ओसरल्यावर दोघं पौर्णिमेच्या चांदण्यात न्हायलेल्या त्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर हातात हात घालून फिरत होते. त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत.. त्या रेशमी ओल्या वाळूत पायांचे ठसे उमटवत चालत असतानाच समीरने सानिकाच्या कंबरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढलं. त्याच्या अचानक जवळ येण्याने ती गोंधळली.
"सानू, तुला त्या रात्रीचं सगळंच आठवलं का गं?" तिच्या नाकावर नाक घासत त्याने विचारलं. त्याच्या प्रश्नाचा रोख कळला तसे सानिकाचे गाल लाल झाले.
"अगदी सगळं नाही पण मी तुला आय लव्ह यु म्हणाले तेवढं आठवलं." ती नजर चोरत म्हणाली. पण समीरला तिच्या चेहऱ्यावरच्या लाली वरून त्याच्या प्रश्नाचं उत्तर आधीच मिळालं होतं.
"अच्छा? पण मला तर बरंच काही आठवतंय त्याच्या पुढचं. मी आठवण करून देऊ का तुला?" तो तिच्याजवळ झुकत म्हणाला. त्याचे गरम श्वास तिला तिच्या गालांवर जाणवत होते. त्याचे खट्याळ डोळे तिची उडालेली धांदल पाहून हसत होते.
"समीर.. प्लिज सोड मला. कोणीतरी बघेल." त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत ती म्हणाली. तशी त्याची मिठी अजूनच घट्ट झाली.
"नॉट फेअर सानू. एवढी वाट बघायला लावलीस, एवढं रडवलंस मला. आता काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे ना मला त्याची." तो तिच्या कानाजवळ कुजबुजला.
"हो का? जास्त लाडात नको येऊस. मगाशी मी एवढं खाली बसून तुला प्रपोज केलं त्याचं काय? माणसाने कसं अल्पसंतुष्ट असावं." सानिका डोळे फिरवत म्हणाली. तिचं ते बालिश वागणं बघून समीरला हसायला आलं.
"आहे मी संतुष्ट. खरंच.. आता मला अजून काहीच नको. माय हार्ट इज फुल टुडे! तुझ्यामुळे.. आय कान्ट वेट टू स्टार्ट माय लाईफ विथ यु!" म्हणून समीरने पुढे येऊन तिच्या डोक्याला डोकं टेकवलं. सानिकाने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले! रात्रीच्या त्या निरव शांततेत फक्त समुद्राच्या लाटांची गाज होती, त्याच्या जोडीला होता तो अवखळ वारा आणि स्वतःच्याच विश्वात रममाण ते दोन जीव.. आणि होता तो .. त्यांच्यासारख्याच अनेक जीवांच्या मिलनाचा साक्षीदार..आकाशातून त्यांच्याकडे पाहून गुणगुणणारा तो चंद्र..
गीत झाले जीवनाचे, सूर येता साथीला..
संपली कटुता मनीची, हात हाती तव दिला!
स्पर्शता ओठांनी तू, हळुवार माझ्या कुंतला..
जखमा जुन्या या अंतरीच्या, प्रेम लेवुनी लोपल्या!
अंधारल्या वाटेत माझ्या, लक्ष ज्योती उजळल्या..
झाले तुझी मी तन मनाने, चंद्र आहे साक्षीला!
समाप्त!
थोडंसं 'चंद्र आहे साक्षीला!' बद्दल -
एवढी मोठी कथामालिका लिहायची ही पहिलीच वेळ. आपल्याला जमेल का ही शंका होती मनात. बरं फक्त पार्टस वाढवून उपयोग नाही, शेवटपर्यंत वाचकांना गुंतवून ठेवता येईल असं कथानक सुचणं आणि ते लेखणीत उतरवणं ह्या दोन्ही कमालीच्या कठीण गोष्टी आहेत ह्याची जाणीव ही कथामालिका लिहिताना झाली.
तुम्ही सगळ्यांनी ह्या कथेला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप आभार! जेवढी वाट तुम्ही रोजच्या भागाची बघत होतात तेवढीच वाट मी तुमच्या प्रतिक्रियांची बघत होते. कथा लिहिताना ह्या कथेतल्या सगळ्याच पात्रांशी खूप समरूप झाले होते. उद्यापासून हे सगळंच मिस करेन.. समीर आणि सानिकाला, कणवली मधल्या लोंकाना आणि तुमच्या प्रतिक्रियांना सुद्धा.. पण जिथे सुरवात आहे तिथे शेवटही असणारच. लवकरच पुन्हा भेटू एका नवीन कथानकासह! तोपर्यंत सानिका आणि समीरची ही लव्हस्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा!
© मृण्मयी कुलकर्णी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा