चंद्र आहे साक्षीला! - भाग ४२
( मागच्या भागात :
फोनच्या पलीकडे ती त्याच्या नावाचा धावा करत होती, "समीर प्लिज फोन उचल, आय नीड यु." फोनवर आलेल्या लो बॅटरीच्या वार्निंगकडे हताश होऊन पाहात होती ती. सगळ्या आशा सोडून दिल्या असतानाच तिला दूरवरच्या रस्त्यावरून येणाऱ्या बाईकचे दोन मिणमिणते दिवे दिसले. लांबूनही ती बाईक पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने त्याला आवाज द्यायला तोंड उघडलं पण त्या आधीच एका राकट हाताने तिचं तोंड बंद केलं!
)
समीरची बाईक त्या निर्जन कच्च्या रस्त्यावरून पुढे चालली होती. आजूबाजूच्या दाट जंगलामुळे आणि अंधारामुळे त्याला फार काही दिसत नव्हतं. इकडेच आले असतील का ते दोघं? पुढची वाट अंधारामध्ये दिसेनाशी होईपर्यंत तो तिकडे काही मिळतंय का हे शोधायचा प्रयत्न करत होता. शेवटी काहीच हाती लागत नसल्याचं बघून तो तिकडून निघाला. त्या रस्त्यावर फिरताना एक अनामिक हुरहूर त्याला लागून राहिली होती. कोणाची तरी नजर आपल्यावर खिळली आहे असं त्याला पुन्हा पुन्हा वाटत होतं. त्याने एक नजर आजूबाजूला टाकली. अचानक त्याला आठवलं, ही तीच जागा होती जिकडे सानिका धावायला आली असताना पडली होती आणि त्याने पहिल्यांदा तिचा हात पकडला होता. तिच्या आठवणीने भरून आलं त्याला. कालपासून त्याची नुसती चिडचिड चालू असली तरी आतमध्ये धुमसत असलेलं दुःख त्याने कोणासमोर बोलून दाखवलं नव्हतं. 'खूप बोललो का आपण तिला. कसा झाला होता तिचा चेहरा. एकदा तिचं ऐकून घ्यायला हवं होतं का?' तिचा मगासचा रडवेला चेहरा आठवून तो हळहळत होता. नकळत त्याचा हात फोनकडे गेला. पंधरा मिस्ड कॉल्स? कोणाचे आहेत ते बघण्यासाठी तो फोन अनलॉक करत असतानाच चंदूचा फोन आला. बसस्टॉप वर पिहू मिळाली नव्हती त्यांना. बाकी कोणी बघितलंही नव्हतं तिला. आता पुढे काय करायचं हे गावातल्यांशी बोलूनच ठरवावं लागणार होतं त्याला. घाईतच तो फोन ठेऊन तिकडून निघाला.
____****____
समीर घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते. सगळीकडे शोधूनही पिहूचा काहीच पत्ता न लागल्याने दुसऱ्या दिवशीच शेजारच्या गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायचं ठरलं होतं. कमीत कमी २४ तास झाल्याशिवाय तक्रारही करता येणार नव्हती म्हणून सगळे नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने घरी परतले होते. वनिताताई समीरची वाट बघत जाग्या होत्या. त्याची गाडी फाटकातून आत शिरताना बघून त्यांनी जेवणाचं ताट वाढलं.
"समीर, आलास का? जेऊन घे बाळा. सकाळपासून नीट जेवलाच नाहीयेस." आपल्या थकलेल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या. दुपारी झालेल्या प्रसंगाचा ताण पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याचं नेहमीचं मिश्किल हास्य तर कुठल्याकुठे गायब झालं होतं.
"हो आई, भूक तर लागलीये. तू जेवलीस?" त्याने ताटावर बसत विचारलं. त्यांनी नुसतीच मान हलवली. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं म्हणून त्या उघडायला गेल्या. दारात आशाताई उभ्या होत्या.
"आशा तू आत्ता इकडे?" त्यांनी आश्चर्याने विचारलं.
"हो अगं, सानिकाचा फोन लागत नव्हता म्हणून आले. इकडेच आहे ना ती? मगाशी समीरशी बोलायला म्हणून गेली ती अजून घरीच आली नाहीये. शेवटी मीच आले बघायला इकडे. बोलावतेस का तिला?" त्यांचा चेहरा काळजीने काळवंडला होता. वनिताताई पुरत्या गोंधळून गेलेल्या. तिचं नाव ऐकताच समीरच्या हातातला घास हातातच राहिला. तो तसाच टाकून तो दारापाशी आला.
"काकू ती इकडे नाहीये. संध्याकाळी गावात भेटली होती मला पण त्यानंतर ती घरीच यायला निघाली होती. ती घरी नाहीये?" त्याने काळजीने अधीर होत विचारलं.
"नाही. तिची वाट बघता बघता माझा डोळा लागला. तेवढ्यात तिचा फोन येऊन गेला. मी उठले तेव्हा ती घरी नव्हती आली. मी खूप वेळा फोन केला तिला पण लागत नाहीये रे. कुठे गेली असेल ही." त्या अगदी रडवेल्या झाल्या होत्या. आपली लाडकी लेक समोर नाहीये बघून त्यांच्या पायातलं त्राणच गेलं. वनिताताई त्यांना कशाबशा आतमध्ये घेऊन आल्या. पण समीर? तो तसाच दारात सुन्न उभा होता.. सानू मिळत नाहीये? कुठे गेली असेल ती? काहीतरी आठवून तो पटकन धावत आत आला. त्याने त्याचा फोन अनलॉक केला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. तिचे दहा मिस्डकॉल्स येऊन गेले होते. त्याने तीन-चार वेळा तिला फोन करायचा प्रयत्न केला. पण तिचा फोन बंद होता. त्याच्या हृदयाची स्पंदनं वाढली होती. स्वतःचाच राग येत होता त्याला. प्रत्येक सरत्या क्षणाबरोबर त्याची अस्वस्थता वाढत होती. चिडून त्याने फोनकडे बघितलं. स्क्रीनवर एक अनरीड मेसेज होता तिचा. थरथरत्या हाताने त्याने तो उघडला. "हेल्प.. पिहू.. गावाबाहेर.. जंगल." एवढंच लिहिलं होतं त्यात. त्याच्या डोळ्यातून ओघळलेला एक अश्रू त्या फोनवर पडला. कुठल्या संकटात अडकली होती ती? मागचा पुढचा कसलाही विचार न करता तो बाईकची चावी घेऊन निघाला. वाटेत त्याने चंदू, गोपाळ, गौतमी सगळ्यांना फोन केले. त्यांचं कोणाचंच सानिकाशी नीट बोलणं झालं नव्हतं. समीरने बाईकचा वेग वाढवला आणि सुसाट वेगाने तो त्याच्या सानिकाकडे निघाला. पोहोचेल का तो वेळेत तिच्यापाशी?
____****____
तीन तासांपूर्वी.. गावाच्या चौकात!
"सानिका तुला दिसत नाहीये का इकडे माझं काय चाललंय? काय सारखं समीर समीर लावलंयस? आणि काय गं, तुझा होणार नवरा कुठे दिसत नाहीये ह्या सगळ्यात? का माणुसकीशी काही घेणं देणं नाहीये त्याचं? इथे गावातले लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे जीवाचं रान करून त्या मुलीला शोधतायत आणि हा गायब. घरी लग्नाचं प्लॅनिंग करत बसलाय वाटतं. आणि तसं असेल तर तू इथे का थांबली आहेस? तू पण जायचंस ना." समीर चिडून म्हणाला. तेवढ्यात चंदू तिकडे बाकीच्यांना घेऊन आला. सानिकाचे डोळे पाणावले. चेहरा लाल झाला. रागाने आणि त्याच्या बोलण्याने तिला झालेल्या दुःखाने. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत ती तिकडून निघून गेली.
'केवढं बोललास तू समीर मला. एकदा विचारायचंस तरी की नक्की झालं काय होतं. कुठलातरी फोटो बघून तू ठरवून मोकळा झालास का की मी त्या बावळटाशी लग्न करायला तयार झालेय. स्वतःच्या तोंडाने सांगितलं नसलं तरी माझ्या नजरेतून, माझ्या वागण्यातून काळात नाहीये का तुला किती महत्वाचा आहेस तू माझ्या आयुष्यात? किती प्रेम आहे माझं तुझ्यावर?' सानिका डोळे पुसत स्वतःशीच विचार करत चालली होती. तेव्हढ्यात ती निमकरांच्या घरापाशी पोहोचली. मनाशी काहीतरी विचार करून ती त्यांच्या घराकडे गेली. आतमध्ये पिहूची आई नेहमीप्रमाणेच तोंडाला पदराचा बोळा लावून बसली होती आणि तिचे वडील कधी नव्हे ते शुद्धीवर होते.
"आत येऊ का?" सानिकाने विचारलं. तसं त्या दोघांनी तिच्या दिशेने बघितलं. तिला बघून त्यांच्या चेहऱ्यावरची दुःखाची जागा रागाने घेतली होती.
"आता कशाला आलीयेस इकडे? आमच्या मुलीच्या आयुष्याची वाताहात करून समाधान नाही झालंय का तुझं?" तिची आई म्हणाली.
"प्लिज माझं ऐकून घ्या. तुम्हाला माझ्यावर जो राग काढायचाय तो काढा पण आत्ता आपण पिहूला शोधणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला मला जे बोलायचंय ते बोला." सानिका डोळ्यांत पाणी आणून म्हणाली. तशी तिची आई गप्प बसली. सानिकाने तिचा मोर्चा पिहूच्या वडिलांकडे वळवला.
"काका, पिहू मागच्या वेळेला कोणा मुलाबद्दल बोलत होती. तुम्ही त्याला ओळखता का? तो कसा दिसतो वगैरे सांगू शकाल का? प्लिज आठवून सांगा." ती त्यांना म्हणाली. इतका वेळ आग ओकत असलेले निमकरांचे डोळे आता जरा शांत झाले होते. शेवटी वडील होते, पोरीसाठी काहीतरी तर वाटत होतं त्यांना अजूनही.
"तो त्या दारूच्या दुकानावर कामाला असायचा कधी कधी. गेले काही दिवस दिसला नाही तो मला. एक दोनदा मी त्याला दुसऱ्या एका माणसाबरोबर बघितलं आहे. तो गावातला नाहीये पण कधीतरी येतो. गालावर कसला तरी व्रण आहे त्या माणसाच्या." ते आठवून सांगत होते. त्यांचं वर्णन ऐकून सानिकाच्या पोटात खड्डा पडला. हा तोच माणूस होता जो तिला जंगलातल्या त्या घरासमोर दिसला होता. त्या गुंडांचा म्होरक्या.. त्यालाच तिने पूर्ण गावासमोर कानाखाली वाजवली होती. मागच्या वेळेला ती त्या घराजवळ गेली होती तेव्हा त्यांचं बोलणं चोरून ऐकलं होतं तिने. कोणत्यातरी मुलीबद्दल बोलत होते ते. ती मुलगी सानिका नव्हती तर पिहू होती? सानिकाच्या डोक्यात पटापट विचार चक्र फिरत होती. तो माणूस तेव्हा कुठूनतरी परत आल्यावर गावातून निघून जाण्याबद्दल बोलला होता, जर ते पिहूला घेऊन निघून गेले तर? तिला गायब होऊन आधीच पूर्ण दिवस होत आलाय. सानिका हातातल्या घड्याळाकडे बघत विचार करत म्हणाली. "मला उशीर करून नाही चालणार. जर ते हातातून सटकले तर पिहू.." तिला पुढचा विचार पण करवला नाही. तशीच ती त्यांचा निरोप घेऊन तिकडून निघाली आणि त्या घराच्या दिशेने चालायला लागली. रस्त्यात ती सगळ्यांना फोन करायचा प्रयत्न करत होती. तिने समीरला फोन करायचा प्रयत्न केला पण त्याचा फोन कट केला. तिने मागोमाग चंदू आणि गोपाळलाही फोन केला. चंदूने फोन उचलला पण त्याचं बोलणं तिला ऐकूच येत नव्हतं. वेळ खूप कमी होता तिच्याकडे. मनाशी काहीतरी विचार करून ती तिच्या जॉगिंगच्या रस्त्याला लागली. जवळजवळ धावतच होती ती आता. "पिहू! मी येतेय बाळा, फक्त तोपर्यंत स्वतःची काळजी घे."
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा