विषय:- प्रेमकथा
फेरी:- राज्यस्तरीय कथामालिका लेखन
"मॅडमऽ स्टुडिओ आ गया|" म्हणत ड्रायव्हरने गेटच्या आतमध्ये कार लावली. तशी ती गुंतलेल्या विचारातून बाहेर आली. पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करून ती कार बाहेर पडली आणि स्टुडिओच्या आत प्रवेश करून रिसेप्शनकडे गेली.
"आय एम पुनम बर्वे." तिचे नाव ऐकल्या बरोबर फॉर्म भरायला बसलेल्या मॉडेल मागे वळून पाहू लागल्या. अर्थातच यंदाची श्रावण क्वीन तिथे हजर झाली होती.
रिसेप्शनिस्ट म्हणाली,"ओह! हाय. प्लिज सीट अँड फील द फॉर्म." एवढं बोलून तिने कोणाला तरी फोन लावून श्रावण क्वीन पुनम आली असल्याचे कळवले.
रिसेप्शनिस्टने तिला फ्रेश रूमकडे जाण्याचा रस्ता दाखवला. फ्रेश रूम खूपच मोठी होती. तिथे मॉडेल तयारी करण्यात व्यस्त होत्या. कुणी आरशात बघून लिपस्टिक लावत होतं, तर कुणी केस ठीक करत होतं. पुनम फ्रेश होऊन आली. रिकाम्या असलेल्या आराशासमोर स्वतःचे रुप न्याहळत ती उभी राहिली. सगळं व्यवस्थित होतं. फक्त केस तिने वरच्यावर अलगद सेट केले आणि मनातच बोलली, \"एवढ्या सगळ्याजणी असताना कधी नंबर लागेल कुणास ठाऊक? नंबर तर लागेल पण एवढ्या मोठ्या शोचे सिलेक्शन झाले तर बापरे! केवढा मोठा स्टेज असेल. रेड कार्पेटवर मी श्रावण क्वीन पुनम बर्वे. वाह.. वाह.. विचार करूनच मन अगदी गार्डन झालंय. दुसरं मन लगेच पुटपुटलं अजुन ऑडिशनचा पत्ता नाही. आता तो सगळ्यांत महत्वाचा भाग आहे. अरे हो... आता वेळ नको वाया घालवायला.\" तिचं विचारचक्र थांबलं आणि लगबगीने ती रिसेप्शनकडे गेली.
रिसेप्शनिस्ट स्वतः तिला ऑडिशन रूमकडे घेऊन गेली. सगळ्या मॉडेल बसलेल्या असताना देखील पुनमचा पहिला नंबर लागला होता त्यामुळे तिला खुपच स्पेशल जाणवायला लागलं. मनावर आलेली विचारांची मरगळ क्षणात पळून गेली. एका नव्या उत्साहात ऑडिशन रूमचा दरवाजा ढकलून तिने रूममध्ये प्रवेश केला. तिथे चार माणसं बसली होती. त्यातील एक जण उठला. सावळा रंग, उंच असा कुरळ्या केसांचा! त्याने पांढरा शुभ्र शर्ट व जीन्स परिधान केली होती. चॉकलेट बॉय दिसत होता तो. तिच्या जवळ येऊन तो म्हणाला, "हे पुनमऽ श्रावण क्वीन."
त्याला पाहताच पुनम म्हणाली,"सुधांशु?"
"हो मी सुधांशु. तु कसं ओळखलं? आपण तर पहिल्यांदाच भेटतो आहे." त्याने प्रश्न केला.
"इकडे एकच व्यक्ती माझ्या ओळखीतली आहे. ती म्हणजे तुम्ही. त्यामुळे झटकन ओळखलं." ह्यावर दोघे हसू लागले.
"बाहेर इतर मॉडेल वेटींगवर आहेत बरं का! पण आमचा श्रावण क्वीनला फर्स्ट प्रेफरन्स. सहा महिन्यांनी जो फॅशन शो होणार आहे तो सगळ्यात मोठा फॅशन शो असणार आहे. त्यात नशीब चमकवण्याची संधी चालून येईल. इथे बसलेले हे तिघे शोचे जर्ज आहेत. आधी ते पाच ते सात राऊंडचा कॅट वॉक पाहतील, नंतर तुमचा सेल्फ इंट्रो घेतील. काही घाई करू नकोस. अगदी व्यवस्थित प्रेसेंट हो. गुड लक." पद्धतशीरपणे त्याने तिला थोडक्यात माहिती सांगितली.
पाच राऊंडचा कॅट वॉक तिने व्यवस्थित करून दाखवला. त्यानंतर तिचा सेल्फ इंट्रो घेण्यात आला. तिला जर्जने एक प्रश्न विचारला. "तुम्ही श्रावण क्वीन तर आहातच. महाराष्ट्रातल्या मोठ्या फॅशन शोमध्ये सुद्धा तुमचे नाव झळकेल. त्यांनतर तुम्हाला सिनेमात काम करण्याची संधी चालून आली तर तेव्हा तुमचे हावभाव कसे असतील?"
"लहानपणापासून माझे स्वप्न होते. जर मी सिनेस्टार झाले तर? पण कधी कधी स्वप्न पूर्ण व्हायची राहून जातात. मात्र माझे स्वप्न पूर्ण झालेले पाहून मी खूप खूश झालेली असेन. जिच्यामुळे आज मी इथपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या आणि अगदी कमी वेळात पूर्ण करू शकले ती माझी खास मैत्रीण रोहिणी माझ्या एका बाजूला उभी असेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे श्रावण क्वीनच्या काँटेस्टमध्ये मी गावाकडची आहे म्हणून मला काही जणांनी हिणवले देखील होते. त्यावर मी एवढंच म्हणेन गावातील मुलींनी गावातच राहिले पाहिजे असे जरुरीचे नाही. आत्मविश्वास आणि आवडीनुसार तिला देखील तिचे आयुष्य घडविण्याचा अधिकार आहे." तिने उत्तर दिले.
जर्जेसने टाळ्या वाजवून तिच्या कडून फॉर्म घेतला." अभिनंदन. आमच्या शोसाठी तुमचे सिलेक्शन करण्यात आले आहे. लवकरच तुम्हाला शेड्युल ईमेल केला जाईल. सी यू सून" त्यातील एक जर्ज बोलला.
पुनम सोबत सुधांशु देखील ऑडिशन रूमच्या बाहेर आला. एकदाचा बाहेर येऊन तिने सुटकेचा निःश्वास टाकला. "तुम्हा दोघांचे जेवढे आभार मी मानावे तितके कमीच आहेत. माझ्या आयुष्यात तुम्ही देवदूतच बनून आला आहात."
"आम्ही साधी सरळ माणसं आहोत. कुणाचं टॅलेंट कोणी त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. बाय द वे लवकरच भेटूया." तिला बाय करून तो ऑडिशन रूमकडे वळला.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला ती मनात साठवून घेऊ लागली. \"कसला हँडसम आहे हा? त्याचे व्यक्तिमत्त्व तर कमालच आहे. शिवाय त्याची समजवण्याची रीतसर पद्धत आणि बोलण्याची लकब कसली भारी आहे. पहिल्या नजरेत प्रेमात पडावं असा! लगेच दुसऱ्या मनाने तिला टोकलं. प्रेम? छे! छे! तो तर रोहिणीचा चंद्र आहे. माझ्या मनात कशाला असे नको ते विचार यायला हवे?\" एकटीच मनाशी संवाद साधत ती स्टुडिओच्या बाहेर पडली. पर्समधून फोन काढून तिने रोहिणीला फोन लावला.
रोहिणी मीटिंगमध्ये बिझी होती. ऑफिस स्टाफने रोहिणीला फोन आल्याचे सांगितले. हातात फोन घेत ती म्हणाली,"अभिनंदन डियर."
"अगं पण तुला कसं कळलं?" पुनमने प्रश्न केला.
"ए चांद तेरे चांदनी की कसम. मेरे पास भी एक चांद है." रोहिणी गाणं गाऊ लागली.
"ओहो. म्हणजे सुंधाशु तेरा चांद सबसे तेज है." हसतच पुनम बोलून गेली.
"अच्छा ऐक. आता तू घरी जाऊन रेस्ट कर. काहीतरी ऑर्डर करून खाऊन घे. रात्री आपण तिघे डिनरसाठी बाहेर जाणार आहोत. एवढ्या वर्षांनी माझी मैत्रीण भेटली आणि तिच्या यशाची सेलिब्रेशन पार्टी तो बनती है. आज की पार्टी मेरी तरफ से. ओके बाय बाय बाय." तिने फोन ठेवला.
स्टुडिओपासून रोहिणीचे घर एक तासाच्या अंतरावर होते. पुनमने हील रोडला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. टॅक्सीमध्ये एफएम रेडिओ सिटीवर गाणं वाजत होतं. \"तेरा यार हू मैं. जाते नही कही रिश्ते पुराने, किसी के आ जाने से....\"
पुनम क्षणात कॉलेजच्या दिवसांत हरवली. कॉलेज सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर आबांनी भरलेल्या डोळ्यांनी पुनमला हॉस्टेलवर सोडले. तिच्या बाजूला अजून एक बेड होता. तिकडे कोण अन् कशी व्यक्ती येईल? असा विचार मनात घोळत असताना एक गोरी, सडपातळ, मध्यम उंच, नाकी डोळी सुंदर दिसणारी, जीन्स व त्यावर शॉर्ट लखनवी पिवळा कुरता परिधान केलेली, पायात काळ्या रंगाची बेली शूज घातलेली, मोकळ्या केसांचा स्टेप कट त्यावर गॉगल, गळ्यात वन साइड क्रॉस बॅग लटकवलेली, चाक असलेली मोठी सुटकेस कशीतरी ओढत आणून एक मुलगी दरवाज्याबाहेर येऊन दमतच थबकली. दरवाज्यावरचा नंबर चेक करून तिने रूममध्ये प्रवेश केला.
पटकन हात पुढे करत ती म्हणाली होती,"हे आय एम रोहिणी." रोहिणीच्या नावामध्ये एक खुबी होती. ती अगदी तिच्या नावाप्रमाणेच होती. टीमटीमणाऱ्या ताऱ्याकडे ज्याचे लक्ष वेध घेईल आणि तो प्रेमात पडेल अशीच ती होती. उच्च वर्गीय असूनही तिचा दूजाभाव नसलेल्या स्वभावावर अनोळखी व्यक्ती देखील इंप्रेस होऊन जायची. तशी पुनम तिच्यावर पहिल्या ओळखीत फिदा झाली होती. रोहिणीच्या मनावर फार मोठे दडपण होते, पण ते न दाखवता ती सगळ्यांना खूश ठेवायची. दुसऱ्याच्या मनाचा विचार जरा जास्तच करायची. आजही तिच्यात जरा देखील बदल झालेला नव्हता. मैत्री ह्यालाच म्हणतात ना? अगदी कृष्णा सारखी मित्रत्व निभावणारी. रोहिणीने देखील पूनमची सारथी होऊन साथ तर दिली होतीच आणि चंदेरी दुनियेची सफर देखील घडवून आणली होती.
एका मागोमाग एक आठवणी पूनमच्या मनःपटलावर उमटत होत्या आणि टॅक्सी सोसायटी खाली येऊन थांबली तरीही तिला समजलं नव्हतं.
क्रमशः....
©®नमिता धिरज तांडेल
जिल्हा पालघर
जिल्हा पालघर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा