चंद्रमणी कोणी चोरला (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
चंद्रमणी कोणी चोरला

सगळेजण त्या चंद्रमणीकडे हरखून बघत असतानाच अचानक एक माकड आत आले. सगळे कौतुकाने ते माकड बघत होते. काही कळायच्या आतच त्या माकडाने सरळ चंद्रमणीवर उडी घेतली आणि तो मणी पळवला.

“पकडा त्याला.” सगळ्यांचा एकच गोंधळ उडाला.

राजा देखील शिपायांना ते माकड पकडायला सांगत होता पण ते खूप वेगाने तिथून निसटून गेले.

“महामंत्री जी! हे सर्व काय आहे? एवढी कडक सुरक्षा असताना ते माकड येऊन चंद्रमणी कसे घेऊन गेले? कोणाची होती ही जबाबदारी?” राजा रागाने गरजला.

सगळे घाबरून स्तब्ध झाले होते.

“पंडित रामाकृष्णा! चंद्रमणीच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची होती ना! हे सर्व काय आहे?” राजा पुन्हा रागाने म्हणाला.

“महाराज हे एक विचार करून अगदी योजनाबद्ध असलेले षडयंत्र आहे.” रामा हात जोडून म्हणाला.

“कोणी केलंय हे?” राजाने रागात विचारलं.

“यांनी.” रामाने स्वतःच्या उजव्या बाजूला बोट केले.

नेमका तिथे आचार्य उभा होता.

“हे काय बोलतायत महाराज हे? आम्ही हे का करू? नक्कीच यांना मानसिक आजार झालेला आहे. आमच्यावर खोटे आळ घेतायत. यामुळे प्रलय येईल सर्व काही…” आचार्य बोलत सुटला होता आणि रामाने त्याला कसेबसे थांबवले.

“आचार्य! तुम्हाला नाही म्हणले. तुम्ही इथे मध्ये कुठून आलात. बाजूला व्हा. तुमच्या मागे आहेत त्यांना बोलतोय मी.” रामा म्हणाला.

“आमच्या मागे तर रूपा देवी आहेत.” आचार्य म्हणाला.

“हो. महाराज याच आहेत खऱ्या चोर.” रामा म्हणाला.

“या रूपा देवी. हे आरोप तुमच्यावर लावले जात आहेत. या आणि उत्तर द्या.” आचार्य म्हणाला.

ती रडत पुढे आली.

“महाराज हे आम्ही केलेले नाही.” ती रडत म्हणाली.

“पंडित रामा! तुमच्याकडे काही पुरावा आहे?” राजाने रागात विचारलं.

“हो आहे महाराज. विचारा यांनाच ज्या रात्री मी काढा द्यायला यांच्या कक्षात गेलो होतो त्या रात्री या त्याच माकडाला खायला घालत होत्या. ते एक प्रशिक्षित माकड होते आणि यांच्या इशाऱ्या नुसारच त्याने चोरी केली आहे.” रामा म्हणाला.

“महाराज आम्हाला सर्व प्राणी, जीवजंतू आवडतात आणि म्हणून आम्ही त्याला खायला घातले. आम्हाला माहीत नाही ते त्या दिवशी अचानक कुठून आले होते आणि ते कोणाचे आहे पण फक्त आम्ही त्याला खाऊ घातले म्हणून आम्हाला चोर ठरवणार? माफ करा महोदय परंतु तुमच्या पेशाची अनेक लोकं आमचे सेवेकरी आहेत.” ती म्हणाली.

“पंडित रामा तुम्ही आमच्या पाहुण्यांचा अपमान करताय.” राजा चिडून म्हणाला.

“पंडित रामा आम्ही तुम्हाला लज्जित करू इच्छित नाही पण फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतोय आम्ही देवगडचे महान शासक श्री हर्षवर्धन यांची कन्या आहोत. आम्हाला तो चंद्रमणी चोरुन काय करायचे आहे. आम्ही फक्त संगीताची पुजारी आहोत.” ती रडत म्हणाली.

ते ऐकून रामाचा चेहराच पडला.

“तुम्ही फक्त त्या दिवशी आम्हाला त्या माकडाला खायला घालताना पाहिले आणि आम्हाला चोर घोषित केले? फक्त हाच पुरावा आहे तुमच्याकडे? महाराज! काय हेच आहेत तुमच्या कुळाचे संस्कार? जिथे पाहुण्यांना बोलावले जाते आणि त्यांचा भर दरबारात अपमान करून त्यांच्या इभ्रतीला डाग लावला जातो?” ती रडत रडत म्हणाली.

“मी… मी… मी… माफी मागतो महाराज. माझ्याकडून खरा चोर ओळखायला चूक झाली. कदाचित रूपा देवी त्या चोर नसतीलही पण मी…” रामा घाबरत घाबरत म्हणाला पण त्याला तोडत आचार्य बोलू लागला; “खूप छान. आधी पाहुण्यांचा अपमान करायचा आणि नंतर माफी मागायची. सरडा सुद्धा रंग बदलायला जरा वेळ घेतो पण हे? लगेच रंग बदलतात.”

“आम्हाला काही माहित नाही. आमचा एकवेळ जीव गेला तरीही चालेल पण आमचा संकल्प अधुरा राहता कामा नये. आम्ही गणरायाच्या चरणांवर तो चंद्रमणी अर्पण करायचा संकल्प केला होता आणि तो जर तुमच्यामुळे अधूरा राहिला तर आम्ही काय करू आम्हालाही माहित नाही.” राजा रागात म्हणाला.

“महाराज! माझा विश्वास आहे तो चंद्रमणी ज्याने त्या माकडाकरवी चोरुन घेतला आहे तो इथेच आपल्यातच आहे. महाराजांना माझी विनंती आहे कृपया इथे उपस्थित कोणालाही महालाच्या बाहेर जाऊ न देण्याचे आदेश देण्यात यावेत यामुळे तो खरा चोर त्याच्या प्रशिक्षित माकडाला भेटणार नाही आणि चंद्रमणी इथून बाहेर जाणार नाही.” रामा म्हणाला.

“बघितलं महाराज? यांना खरंच मनोवैद्याची गरज आहे. यांना घरी पाठवून आराम करायला सांगा. वेड लागलंय यांना. असे आजारी लोक इतक्या महत्त्वाच्या विशेष सल्लागाराच्या हुद्यावर आहेत यात धोकाच आहे.” आचार्य म्हणाला.

“एक क्षण आचार्य! पंडित रामा! आम्ही आता अजून आमच्या पाहुण्यांचा अपमान करू शकत नाही. सर्व अतिथी गण त्यांच्या त्यांच्या कक्षात जाऊ शकतात.” राजा म्हणाला.

सर्व पाहुणे तिथून आपापल्या कक्षात गेले. रामाला जे नको होते तेच झाले. ते लोक गेल्यावर राजा बोलू लागला; “सगळीकडे कडक पहारा लावला जावा. अतिथी कक्षाच्या बाहेरही सैनिक उभे करावेत आणि हेच नियम दरबारातील प्रत्येक संबंधित व्यक्तींना लागू आहेत. आचार्य, महामंत्री, पंडित रामा तुम्हालाही आणि आम्हालाही. आमच्या स्वतः आणि दोन्ही महाराण्यांवर देखील अशीच देखरेख असेल. नियम हे सर्वांना सारखेच. जे नियम आपल्या पाहुण्यांना तेच आपल्या सगळ्यांना.” राजा म्हणाला.

सगळे यासाठी तयार होतेच. आचार्यला वाटत होते आता रामाचे काही खरे नाहीये. इतक्यात राजा पुढे बोलू लागला; “पंडित रामा तुमच्या हातात दोन दिवस आहेत. महापूजेच्या आधी आम्हाला चंद्रमणी हवाय. जर तसे झाले नाही तर तिसऱ्या दिवशी तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल.”

सगळेच हे ऐकून सुन्न झाले होते. शारदा आणि अम्माला तर हे ऐकून खूप काळजी वाटू लागली होती.

“आता काय करणार आहेस रामा?” बंधूने विचारलं.

“माहित नाही बंधू पण महाराजांच्या शब्दासाठी मी जीवही पणाला लावू शकतो.” रामा म्हणाला.

“सभा समाप्त.” राजा म्हणाला. तो खाली उतरला आणि जाता जाता रामाच्या जवळ थांबला आणि म्हणाला; “आम्हाला तुमच्यावर अजूनही विश्वास आहे. चंद्रमणी सुखरूप परत आणा आणि आम्हाला चुकीचे कोणते पाऊल उचलण्यापासून थांबवा.”

रामाने फक्त हात जोडून होकारार्थी मान हलवली. राजा तिथून गेला आणि आचार्य टकलावर बोटं फिरवत हसत होता. दरबार संपल्यावर सगळे घरी आले. रामाच्या आधीच त्याचे कुटुंबीय घरी पोहोचले होते आणि ते लोक सामानाची बांधाबांध करत होते.

“हे सर्व काय सुरू आहे गुंडप्पा?” रामाने त्याला विचारलं.

“तामान भलतोय.” तो म्हणाला.

“ते दिसतंय पण आपण कुठे चाललो आहोत का?” रामाने विचारलं.

“जिते नशीब घेऊन जाईल तिते.” तो म्हणाला.

रामा वैतागून पुढे आला आणि त्याने तेच शारदाला विचारले.

“हे घ्या आणि यात स्वतःचे कपडेलत्ते भरा.” शारदा म्हणाली.

“अगं पण का? कुठे जायचं आहे? आणि हो जिथे नशीब घेऊन जाईल तिथे असं बोलू नकोस गुंडप्पाने तेच सांगितलं आहे.” रामा म्हणाला.

“काय करणार? तुम्ही कारनामे असेच करता की कधी या घरातून आपल्याला काढतील सांगता येत नाही. त्यापेक्षा आपलं आपलं सामान बांधून तयार असलेलं बरं. जिथे नशीब घेऊन जाईल तिथे जाऊ.” शारदा म्हणाली.

“असं अम्मा म्हणाली?” रामाने विचारलं.

“त्यांनी काठी आपटली? काही संकेत दिले?” शारदाने विचारलं.

“नाही.” रामा म्हणाला.

“मग त्या कशाला बोलतील? मीच बोलले.” ती म्हणाली.

त्याला आता घरच्यांना कसे समजवावे हे कळेना. त्याला माहित होतं दरवेळी तो कोणत्या ना कोणत्या संकटात सापडतो आणि त्याच्या झळा त्याच्या कुटुंबीयांना देखील बसतात.

“अम्मा, शारदा अगं ऐका ना! आधीच आता चंद्रमणी कोणी चोरला आहे हे शोधून काढायचं आहे. ठेवा हे सगळं. कोणी कुठे नाही जात.” रामा म्हणाला.

इतक्यात अम्माने काठी आपटली आणि ती खुणा करू लागली.

“जा त्याला खायला दे आणि झोपायला पाठव.” अम्मा खुणा करून म्हणाली.

“हे काय बोलताय तुम्ही?” शारदाने आश्चर्याने विचारलं.

ती पुन्हा खुणा करू लागली; “सांगते ते ऐक. त्याला जरा निवांत झोपू दे.”

ती काय म्हणतेय हे शारदा सांगत असल्याने रामाने लगेच ती बरी आहे ना, तिला ताप आलेला नाही ना हे पाहिले. अम्माचे ऐकून शारदाने त्याला झोपायला पाठवलं. रामा आत गेला आणि दार लावताना त्या दोघी काय बोलतायत हे ऐकू लागला.

“अम्मा हे काय? आज तुमचं प्रेम अगदी ऊतू चाललंय ते.” शारदाने विचारलं.

“अगं काही प्रेम बिम ऊतू चाललं नाहीये. तो जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या डोक्यात कल्पना येतात. माझा पोरगा आहे तो. झोपून उठला की बघ काहीतरी उपाय सांगेल.” अम्मा खुणा करून म्हणाली आणि शारदा बोलली.

रामाने ते ऐकलं आणि जाऊन झोपला. तो उठला तर अम्मा, शारदा आणि गुंडप्पा त्याच्याकडे बघत बसले होते. अचानक डोळे उघडल्यावर आळस देता देता त्या तिघांना समोर पाहून तो दचकला.

“काय हे? असे का बघताय?” त्याने विचारलं.

“काही नाही. आरामात आळस द्या आणि मग सांगा काय उपाय मिळाला?” शारदा म्हणाली.

“अरे उपाय आहे काही जांभई नाही की लगेच आली.” रामा म्हणाला.

“म्हणजे काही सुचलं नाही?” शारदाने विचारलं.

“नाही पण सुचेल.” रामा म्हणाला.

यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “जा! आत्ताच्या आत्ता घरा बाहेर जा आणि जोवर तुला मार्ग मिळत नाही घरात पाऊल ठेवायचं नाही.”

“हे काय आहे? कसं कुटुंब आहे माझं? माझ्या संकटाच्या वेळी मलाच घराबाहेर काढतं.” रामा म्हणाला.

“ते काही नाही. चल आधी बाहेर.” अम्मा खुणा करत म्हणाली.

तो पुन्हा झोपू लागला तर अम्माने त्याला बाहेर जायला लावलंच पण त्या आधी तिने तिची पूर्वजांची अंगठी त्याला घालायला दिली. त्याच्या बोटात ती सैल होत होती पण ती अंगठी घालून नक्कीच त्याला काहीतरी सुचेल असे तिला ठामपणे वाटत होते. रामाने ती घातली आणि मगच तो विचार करत करत बाहेर पडला.

“अरे रामा त्या माकडाला शोध ना.” बंधू म्हणाली.

“ते एवढं सोपं नाहीये बंधू.” रामा म्हणाला.

“पण तुला तर त्या माकडाची खूण माहित आहे. त्याचा एक पूर्ण कान लाल आहे. त्याला त्यावरून शोधता येईलच ना. एकदा ते माकड सापडलं की ते कोणाचे आहे हेही कळेल.” बंधू म्हणाली.

“तुला वाटतंय तेवढं हे काम सोपं नाही बंधू. शेवटी इतर माकडांमध्ये शोधावं लागणार आहे त्याला.” रामा म्हणाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all