चंद्रमणी सापडणार का (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
चंद्रमणी सापडणार का?

गुंडप्पा तिथेच लाडू खात उभा होता. त्या मुलीरुपी देवीने कल्याण होवो असा आशीर्वाद दिल्यावर रामा खुश झाला.

“गुंडप्पे चल आता कल्याण होणार आहे सगळं.” तो खुशीत म्हणाला आणि ते दोघे तिथून निघाले.

घरी येऊन त्याने अम्मा आणि शारदाला सुद्धा बरोबर घेतले. त्यांच्या हातात एक लाडवाने भरलेली टोपली होती.

“हे लाडू घेऊन आपण कुठे चाललो आहोत?” शारदाने विचारलं.

“मी माहिती काढली आहे शारदा नगरातल्या याच मंदिराच्या आसपास भरपूर माकडे असतात. हे लाडू बघून ते लाल कान असलेले माकड देखील येईल आणि चंद्रमणी शोधता येईल.” रामा म्हणाला.

ते लोक एका देवळाबाहेर पोहोचले होते आणि तेच दाखवत रामा बोलत होता. एक चांगली जागा बघून त्यांनी बसायला घोंगडी अंथरली आणि थोड्या दूर माकडांना दिसेल अशी ती लाडवांची टोपली ठेवली. सगळे बसून बसून कंटाळले होते. रामा तर बसल्या बसल्या तिथेच झोपला आणि गुंडप्पा देखील त्याच्या पायावर डोकं ठेवून झोपला. जरा वेळ झाल्यावर रामाला जाग आली तर टोपलीत असलेले लाडू कमी झाले होते. अम्माला लाडू आवडतात आणि तिने तर खाल्ले नाहीत असा विचार करून रामाने तिला त्याबद्दल विचारले.

अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “यांनी लाडू खाल्ले नाहीयेत. चार पाच माकडे आली होती त्यांनी खाल्लेत.”

“ठीक आहे ठीक आहे. बसून बसून माझी कंबर आखडली आहे. मी जरा पाय मोकळे करून येतो पण मी येईपर्यंत त्या लाडवांकडे बघायचं सुद्धा नाही.” रामा म्हणाला.

“हो हो जा. नाही बघत.” अम्माच्या वतीने शारदा म्हणाली.

“असं नाही मला वचन दे मी येई पर्यंत त्यातल्या एकाही लाडवाला हात लावणार नाहीस.” रामा म्हणाला.

“या वचन देतायत नाही लावणार हात.” शारदा म्हणाली.

रामा पाय मोकळे करायला गेला आणि तो थोड्याच वेळात परत आला तर त्यातले लाडू गायब होते.

“हे काय लाडू कुठे गेले?” रामा म्हणाला.

“तू गेल्यावर दहा पंधरा माकडे आली होती त्यांनी खाल्ले.” अम्मा खुणा करत म्हणाली.

“पण मग लाडू तर माकडांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होते. बाकीचे कुठे आहेत?” रामाने विचारलं.

अम्माचे तोंड बघून त्याला संशय आलाच होता ते अम्माने खाल्ले आहेत.

“यांनी खाल्ले.” शारदा म्हणाली.

“अम्मा वचन दिलं होतं ना? तू एकाही लाडवाल हात लावणार नाहीस म्हणून.” रामा म्हणाला.

ती खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “यांनी वचन पाळालं आहे. यांच्या हाताने नाही तर माझ्या हातून यांनी लाडू खाल्ले आहेत.”

“बरं जाऊदे. एक कान लाल असलेलं माकड आलेलं का?” रामाने विचारलं.

“नाही.” शारदा म्हणाली.

“आता काय करणार आहेस रामा? त्या माकडाला लाडू आवडत नसतील का?” बंधू म्हणाली.

यावर रामाने विचार केला आणि त्याला आठवले त्या रात्री रूपा देवी त्या माकडाला केळे देत होती तरीही त्याने ते न घेता तिच्या हातातील लाल मिरची घेतली होती.

“आपला कदाचित मार्ग चुकला. त्या माकडाला लाडू नाही तर मिरच्या आवडतात. अम्मा, शारदा चला घरी जाऊन मिरच्या आणू आणि पुन्हा इथेच बसू.” रामा म्हणाला.

यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “यांना काहीतरी बोलायचं आहे आणि मलाही.”

“मला पन तेच बोलायचं आहे.” गुंडप्पा मध्येच म्हणाला.

“तुला काय माहित आम्हाला काय बोलायचं आहे?” शारदाने विचारलं.

“मला माहित आहे. तू बोल शालदा.” तो म्हणाला.

“तुमचं तुम्ही घरी जाऊन मिरच्या आणा आणि पुन्हा येऊन बसा. आम्ही चाललो घरी.” शारदा म्हणाली.

“चल शालदा घली जाऊन आलाम कलू.” गुंडप्पा म्हणाला आणि ते तिघे निघाले.

रामा जाऊन मिरच्या घेऊन आला आणि पुन्हा तिथेच जाऊन बसला. त्याच्या हातातच ती मिरच्यांची लहान टोपली होती आणि बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला. त्याला माकडाच्या हलक्या आवाजाने आणि हालचालीने जाग आली. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर एक माकड मिरची खात बसले होते. रामाने त्याचा कान पाहिला आणि तो लालच दिसला. रामा त्या माकडाला पकडायला त्याच्या मागे जाऊ लागला. ते माकड त्याला चकवा देत पळत होते. पळता पळता ते एका लहानशा घरात घुसले असे त्याला वाटले आणि तो तिथे गेला. तो त्या माकडाला शोधत होता. इतक्यात मागून एक माणूस आला आणि त्याने रामाच्या खांद्यावर हात ठेवला.

“पंडित रामाकृष्णा तुम्ही? माझ्या झोपडीचे भाग्य उजळले. साक्षात तुम्ही इथे आलात. कसे येणे केलेत?” तो म्हणाला.

“इथे एक माकड येताना पाहिले का?” रामाने विचारलं.

“माकड? नाही.” तो म्हणाला.

“मी स्वतः तुमच्या घराच्या मागून माकड येताना पाहिले आहे.” रामा म्हणाला.

“महोदय मी माकड प्रशिक्षक आहे. माझ्याकडे चाळीस एक माकडे आहेत. त्यातीलच एखादे तुम्ही पाहिले असेल.” तो म्हणाला.

“नाही महोदय. हे माकड वेगळे आहे. चंद्रमणी ज्या माकडाने चोरला आहे ते माकड आहे हे.” रामा म्हणाला.

“त्याची काही विशेष खूण?” त्याने विचारलं.

“त्याचा एक कान लाल आहे आणि मी स्वतः त्याला इथे येताना पाहिले आहे.” रामा म्हणाला.

“एक लाल कान? थांबा तुम्हाला असं वाटतंय ना ते माझ्या घराच्या मागच्या बाजूला आहे मग मी त्याला बोलवतो.” तो म्हणाला.

त्याने लगेच बाजूला असलेला डमरू घेतला आणि माकडासारखा आवाज काढू लागला. थोड्याच वेळात ते माकड आत आले आणि तिथे असलेल्या खाटेवर बसले. रामाने पाहिले खरंच त्याचा कान लाल होता.

“हेच ते माकड आहे ज्याने चंद्रमणी चोरला आहे.” रामा म्हणाला.

“माफ करा महोदय पण मी खात्रीने सांगू शकतो हे ते माकड नाही. हे माझे माकड आहे. तुम्ही ज्या माकडाबद्दल बोलताय ते माकड आणि हे माकड भाऊ भाऊ आहेत.” तो म्हणाला.

“कशावरून?” रामाने विचारलं.

“या माकडाचा डावा कान लाल आहे तर ज्या माकडाने चंद्रमणी चोरला आहे त्याचा उजवा कान लाल आहे आणि त्याच्या इतके हुशार आणि चपळ माकड नाहीच आहे. त्याला जे काही सांगितले जाते ते ते माकड एका झटक्यात लक्षात ठेवून सर्व करते.” तो म्हणाला.

रामाने तो चंद्रमणी चोरीला गेला होता तो प्रसंग आठवला आणि त्याला जाणवले की खरंच हे खरं आहे.

“तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे त्या माकडाचा उजवा कान लाल आहे. तेही तुमचेच माकड असेल ना? त्याला तुम्ही असे चोरीचे प्रशिक्षण कसे दिले?” रामा म्हणाला.

“नाही. मी त्याला असे काहीच शिकवले नाहीये आणि आता ते माकड माझे नाही. काही दिवसांपूर्वीच मी ते विकले होते.” तो म्हणाला.

“कोणाला?” रामाने विचारलं.

“नक्की सांगता येत नाहीये कारण तो माणूस संपूर्ण चेहरा झाकून आला होता आणि अश्या संशयीत माणसाला मला ते विकायचे नव्हते पण त्याने मला इतके धन दिले की मला ते विकावे लागले.” तो म्हणाला.

“यासाठी तुम्हाला मी शिक्षा देऊ शकतो. आज त्या माकडामुळे आणि त्याच्या चुकीच्या हातात गेल्यामुळे चंद्रमणी सारखा बहुमूल्य हिरा जो राजघराण्याची संपत्ती आहे तो गायब आहे.” रामा रागात म्हणाला.

“क्षमा करा पण मला नव्हतं माहित हे असं काही घडेल. कृपया मला शिक्षा नका देऊ. तुम्ही म्हणाल ते मी करेन.” तो म्हणाला.

“ठीक आहे मग मी सांगतो तसं तुम्हाला करावं लागेल.” रामा म्हणाला आणि त्याने काहीतरी योजना त्याला सांगितली.
*************************
इथे दरबारात गणपतीच्या नित्य आरतीसाठी सगळे राजाची वाट बघत होते. आचार्य आणि त्याचे शिष्य, कोतवाल एकत्र उभे होते आणि जसे त्यांनी राजाला येताना पाहिले त्यांची चर्चा सुरू झाली.

“गुरुजी मग पुढे काय झाले ज्याने त्याचा संकल्प पूर्ण केला नाही त्याच्यावर देव चिडला?” मणीने विचारले.

“हो मग. ज्यांनी संकल्प केला होता त्यांना तर तो पूर्ण करता आला नाही म्हणून देवाने त्यांना शाप दिला की तुझ्या हजारो पिढ्या कधीच यशस्वी होणार नाहीत, कायम दारिद्र्य राहील आणि सुख समाधान लाभणार नाही.” आचार्य चोरट्या नजरेने राजाकडे बघत बोलला.

“मग? असेच घडले का गुरुजी?” धनीने विचारले.

“घडणार तर असेच होते पण त्यांनी देवाला त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईबद्दल कथन केले आणि म्हणून देवाने तो शाप मागे घेतला. मग काय? ज्या माणसामुळे तो संकल्प पूर्ण होऊ शकला नाही त्या माणसाला मृत्युदंड देऊन त्यांच्या पूर्वजांच्या सेवेसाठी यमसदनी पाठवण्यात आले.” आचार्य म्हणाला आणि त्याने मागे पाहिले.

राजा जरा घाबरूनच हे सर्व ऐकत होता. त्याची कसलीच मनस्थिती नव्हती.

“महाराज! तुम्ही कधी आलात? आम्हाला समजलेच नाही.” आचार्य म्हणाला आणि त्याने राजाला कुंकू लावले.

राजाने नित्य पूजा केली आणि काहीही न बोलता तो तिथून निघून गेला. आचार्यचे आगीत तेल ओतायचे काम तर झाले होते.

“आपल्या योजनेमुळे नाही तर नाही पण त्या माकडामुळे का होईना चंद्रमणी चोरीला गेला.” आचार्य खुश होत म्हणाला.

“बघा गुरुजी तुमच्यापेक्षा ते माकड हुशार निघालं.” मणी म्हणाला.

त्याबरोबर आचार्यने त्याच्या कानाखाली वाजवली.

अश्यातच दोन दिवस संपले आणि आज चंद्रमणी गणपतीच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस उजाडला. सर्व दरबार भरला होता आणि सगळीकडे एकच कुजबुज सुरू होती की रामा चंद्रमणी परत आणू शकेल का? इतक्यात राजा आला. त्याचे जयघोषात स्वागत झाले तो विराजमान झाला.

“महामंत्री जी! पंडित रामाकृष्णा कुठे आहेत? दिसत नाहीयेत.” राजा म्हणाला.

“अजून आले नाहीयेत महाराज.” ते म्हणाले.

“माफ करा महाराज पण पंडित रामा पळून गेले. केव्हाच लांबवर गेले असतील.” आचार्य म्हणाला.

मंत्र्यांना त्याचे बोलणे आवडत नव्हते पण सध्या ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

“महाराज खरंतर असं बोलताना जीभ जळतेय पण आज त्या पंडित रामामुळे तुमचा संकल्प मोडला आहे. कुळाचे नाव मातीमोल झाले आहे.” आचार्य म्हणाला.

त्याच्या बोलण्याने राजाला राग येत होता. त्याला काहीही झाले तरी त्याचा संकल्प पूर्ण करायचा होता पण हे असे घडले होते. इतक्यात रामा आत आला; “महाराज श्री कृष्णदेवराय यांचा विजय असो.” तो म्हणाला.

त्याच्या सोबत अम्मा, शारदा आणि गुंडप्पा देखील आले होते. ते तिघे बाकी प्रजेसोबत मागे थांबले.

“मी कुठेही पळून गेलो नाहीये आचार्य आणि महाराजांचा संकल्प देखील पूर्ण होणार; आजच होणार.” रामा म्हणाला.

“चंद्रमणी सापडला का? कोण आहे तो चोर?” राजाने विचारलं.

“महाराज आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो चंद्रमणी एका माकडाने चोरला आहे आणि ते बिचारे मुके जनावर त्याला जे सांगितले गेले ते करून मोकळे झाले. त्याला काय कळतंय तमाशा आणि चोरी यातला फरक? खरा चोर तर त्याच्याकडून चोरी करून घेणारा तो माणूस आहे. तो पकडला जाणे महत्त्वाचे आहे आणि चंद्रमणी स्वतः चोर येऊन तुमच्या स्वाधीन करेल महाराज.” रामा म्हणाला.

“म्हणजे तुम्ही पुन्हा तुमच्या बुध्दी चातुर्याने त्या चोराला ओळखले आहे आणि पकडले आहे. बरोबर ना?” महामंत्री म्हणाले.

“नाही मंत्रीवर. मला नाही माहित खरा चोर कोण आहे पण तो चोर स्वतः चंद्रमणी घेऊन येईल.” रामा म्हणाला.

“बघा महाराज! यांच्या काहीच हाती लागलं नाहीये म्हणून असं करतायत. आता माकड चंद्रमणी घेऊन समोर येणार आहे का?” आचार्य म्हणाला.

“थोडा संयम ठेवा प्रभू समजेलच.” रामा म्हणाला.

त्यावर आचार्य त्याच्याशी अजून वाद घालू लागला. त्याला फक्त हेच सिद्ध करायचं होतं रामा काहीही करू शकला नाहीये. त्यांचे बोलणे ऐकून शेवटी राजा ओरडला; “बास पंडित रामाकृष्णा! आम्ही तुम्हाला दोन दिवसाचा कालावधी दिला होता. आज जर चंद्रमणी मिळाला नाही तर आजचा दिवस तुमच्या आयुष्याला शेवटचा दिवस असेल.”

त्याच्या बोलण्याने रामा हात जोडून उभा राहिला आणि अम्माने घाबरून शारदाचा हात घट्ट धरला.