चंद्रमणी चोर (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
चंद्रमणी चोर

रामा हात जोडून उभा होता.

“जे काही करायचं असेल ते लवकर करा पंडित रामाकृष्णा!” राजा म्हणाला.

“तू आता काय करणार आहेस रामा?” बंधूने विचारलं.

“असं काहीतरी जे याआधी कधी पाहिलं गेलं नसेल. आता देवी आईच्याच हातात आहे सगळं. ही योजना सफल तीच करेल.” रामा म्हणाला.

राजाने पुन्हा त्याला सांगितले तसे तो बोलू लागला; “महाराज! मी सर्व अतिथी गणांना इथे बोलावून फक्त एकच प्रश्न विचारू इच्छितो.”

राजाने लगेच पाचही पाहुण्यांना बोलावण्याची आज्ञा दिली. लगेचच ते येऊन उभे राहिले. रामा त्या पाहुण्यांच्या जवळ गेला. पहिला उभा होता मथुरा दास.

“मी सरळ आणि स्पष्टच विचारतोय, चोरी तुम्ही केली?” रामाने विचारलं.

त्याने लगेच गाणं गाऊन चोरी केलेली नाही असे सांगितले. दुसरा होता योगिंद्र राव त्यानेही चोरी केली नाहीये असेच सांगितले. तिसरा सोमनाथ होता. त्यानेही तसेच सांगितले. चौथी क्लारा उभी होती. रामा तिच्या समोर उभा राहिला तेव्हा आचार्य मध्येच आला.

“हे काय सुरू आहे? या सुंदरी चोर असूच शकत नाहीत. आम्हाला पूर्ण खात्री आहे.” आचार्य म्हणाला.

त्याला तिच्यावर संशय येतोय हे पचनी पडतच नव्हते. तीही मी काही चोरी केली नाही म्हणत होती आणि शेवटी होती रूपा देवी. रामा तिच्या जवळ गेल्या गेल्याच ती रडायला लागली.

“समजलं देवी तुम्ही चोरी केली नाहीये कृपया शांत व्हा. माझा तुमच्यावर विश्वास बसला आहे.” रामा म्हणाला.

“महाराज हे आपल्या पाहुण्यांचा अजून किती अपमान करणार आहेत? कितीवेळा त्यांना भर दरबारात लाज वाटेल असं वागणार आहेत?” आचार्य म्हणाला.

“हे सर्व काय सुरू आहे पंडित रामा? आम्हाला तुमची पद्धतच कळत नाहीये. कोणता चोर खरं सांगेल मी चोरी केली म्हणून?” राजा म्हणाला.

“मला काही क्षण अजून द्या महाराज. तो चोर स्वतः हे सांगणार मी चोरी केली किंबहुना त्याला कबूल करावेच लागणार आहे.” रामा म्हणाला.

त्याने लगेच तीन टाळ्या वाजवल्या आणि दोन सेवक एका ताटात पोटल्या घेऊन आले.

“या सर्व पोटल्या दरबारात उपस्थित सगळ्यांना द्या. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कोणीही राहता कामा नये. द्या! सुरुवात मीच करतो.” रामा म्हणाला आणि त्याने त्यातून एक पोटली उचलली.

त्या सेवकांनी सांगितल्या प्रमाणे सगळ्यांना एक एक पोटली वाटली.

“एक मिनिट! आचार्यांना पण एक द्या.” रामा म्हणाला.

“का? आम्ही का घ्यायची? आम्ही काही चोर नाहीये. आमचा काही मान सन्मान आहे की नाही? महाराज! हे आम्हाला पटत नाहीये.” तो चिडून म्हणाला.

“शांत व्हा आचार्यवर! आम्ही तुमचा सन्मान करतोच. आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही हे असे काहीच केलेले नाहीये पण आम्ही बाकी पदाधिकाऱ्यांचा देखील मान ठेवतोच. त्यांनीही एक एक पोटली घेतली आहे. एक काम करा आम्हाला आणि दोन्ही महाराण्यांना देखील एक एक पोटली द्या.” राजा म्हणाला.

त्या बरोबर आचार्यने देखील एक पोटली घेतली.

“याचे काय करायचे आहे पंडित रामा?” राजाने विचारलं.

“मी सांगेन तेव्हा सगळ्यांनी ती उघडायची पण त्या आधी मी कोणालातरी इथे बोलावू इच्छितो.” रामा म्हणाला.

त्याने पुन्हा टाळी वाजवली त्याबरोबर तो माकडाला प्रशिक्षण देणारा माणूस लाल कान असलेले माकड घेऊन आला. ते माकड पाहून सैनिकांनी त्या माकडावर भाले रोखले.

“महाराज! हेच ते चोर माकड आहे. लगेचच याला बंदी करून शिक्षा देण्यात यावी.” आचार्य म्हणाला.

“नाही आचार्य! हे ते चोर माकड नाहीये. त्या माकडाचा कान लाल होता.” रामा म्हणाला.

आचार्यने पाहिले तर याचाही कान लाल होता.

“हा काय याचाही कान लाल आहे.” तो म्हणाला.

“नाही आचार्य! त्याचा उजवा कान लाल होता. हे माकड त्याचा भाऊ आहे.” रामा म्हणाला.

त्याने त्या माणसाला खूण केली आणि त्याने डमरू वाजवला.

“जा तुझ्या भावाला शोध. कुठे आहे त्याला सगळ्यांसमोर बोलव आणि चोर सगळ्यांना दाखवून दे.” तो म्हणाला.

ते माकड आचार्यच्या दिशेने बघत होते.

“धनी, मणी तुम्ही चोरी केली आहे का? हे तुमच्याकडे पाहतंय.” आचार्य म्हणाला.

“काहीही काय गुरुजी? ते आमच्याकडे नाही तर तुमच्याकडे पाहतंय.” मणी म्हणाला.

खरंच ते माकड आचार्यला पाहत होतं.

“आज याने आपल्या खऱ्या भावाला ओळखलं मणी.” धनी म्हणाला.

“हो बघ ना दोघांचे चेहरे किती सारखे दिसतायत.” मणी म्हणाला.

तो माणूस पुन्ह पुन्हा त्या माकडाला त्याच्या भावाला बोलाव म्हणून सांगत होता. ते माकड आवाज काढू लागले तसे ते दुसरे माकड तिथे हजर झाले. सगळे आश्चर्याने बघत होते.

“सगळ्यांनी पोटली उघडा.” रामा म्हणाला.

लगेचच सगळ्यांनी तसे केले. त्यात एक एक लाल मिरची होती ती सगळ्यांनी हातात धरली. ते माकड सगळ्यांकडे बघत होते आणि एका माणसाच्या खांद्यावर जाऊन मिरची खात बसले.

“हाच आहे महाराज खरा चोर.” रामा म्हणाला.

तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः सोमनाथ होता.

“महाराज! मला माहित होते हे माकड त्याच्या मालकाच्या हातून मिरची खाणार म्हणून मी हे सर्व रचले. यांच्यावर तर माझा संशय आधी पासूनच होता. ज्या दिवशी गाण्याची स्पर्धा झाली तेव्हा मी रूपा देवींना जाऊन भेटलो होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यावरूनच माझा संशय पक्का ठरत गेला. रूपा देवींनी वरच्या सुरात गायन का केले? हे जाणून घ्यायला मी गेलो होतो. त्यांनीच मला सांगितले की, सोमनाथने स्वतः त्यांना सांगितले होते त्यांचे वरच्या पट्टीतील सूर चांगले आहेत. त्यात त्यांनी गायन केल्यास त्याच ही स्पर्धा जिंकतील. इतकंच नाही महाराज तर गाणे गाताना दिवे मध्यम करण्याची कल्पना देखील सोमनाथ यांचीच होती. हा त्या माकडाला संकेत होता आत येण्याचा आणि रूपा देवींचे गाणे संपले की चंद्रमणी पळवून घेऊन जायचा असेच त्या माकडाला शिकवले गेले होते. हे चांगल्या प्रकारे जाणून होते चंद्रमणी ब्रम्ह कमळात आहे आणि ते एकतर स्वतः फुलते किंवा सुरांची ताकद त्याला फुलवते आणि हे हेही जाणून होते हे कौशल्य फक्त आणि फक्त रूपा देवींच्या गाण्यात आहे.” रामा म्हणाला.

सगळे आश्चर्याने पाहत होते. आचार्यचे तर तोंड बघण्यासारखे झालेले.

रामा पुढे बोलू लागला; “तुम्ही हे निर्धन असल्याचे सोंग करून गरिबीवर काळीमा फासत होतात. तुम्हाला त्या दिवशी महालात यायला उशीर झाला तेव्हाही मला खटकले होते. कारण महाराज सगळे अतिथी आले तेव्हा हे यांच्याकडून खास प्रशिक्षित केलेले माकड खरेदी करण्यात व्यस्त होते. त्यांनतर त्यांनी त्या माकडाला संपूर्ण योजनाबद्ध प्रकारे तयार केले आणि चंद्रमणी मिळवला पण यांच्यावर आरोप करण्याआधी ठोस पुरावा असणे आवश्यक होते. एक असा पुरावा जो हे नाकरूच शकत नाहीत कारण शेवटी आपले पाहुणे होते जे काही करायचे ते त्यांचा मान ठेवून करायला हवे होते.” रामा म्हणाला.

राजालाही राग आला होता. रामा त्याच्या जवळ गेला आणि बोलू लागला; “महाराज यासाठी तुम्हाला काय शिक्षा देतील माहित नाही पण माझे जर चालले असते तर मी इथेच भर दरबारात तुम्हाला शंभर फटक्यांची शिक्षा दिली असती. तुम्ही माफ करण्याच्या किंवा दया दाखविण्याच्या पलीकडे आहात.”

“माफ करा महाराज! हा पंडित बोलतोय ते खरं आहे. ही माझीच योजना होती. चंद्रमणी चोरल्यावर रात्रीच या माकडाने तो माझ्याकडे आणून दिला.” तो रडत हात जोडून म्हणाला.

“चंद्रमणी कुठे आहे?” राजाने रागात विचारलं.

“माझ्याच कक्षात आहे. सुरक्षित ठेवला आहे.” तो म्हणाला.

“आत्ताच्या आत्ता याला आमच्या नजरेसमोरून घेऊन जा आणि आजीवन कारावासाची शिक्षा द्या. त्याच्या कक्षातून चंद्रमणी सुद्धा जप्त करून घ्या.” राजा म्हणाला.

“महाराज!” महामंत्री म्हणाले आणि लगेचच हालचाली सुरू झाल्या.

खरा चोर सापडल्यामुळे अम्मा, शारदा आणि गुंडप्पा खुश होते. रामा रूपा देवीच्या समोर जाऊन उभा राहिला.

“माफ करा रूपा देवी. काही काळासाठी मी तुमच्यावर संशय घेतला पण तेव्हा परिस्थितीच तशी होती. आशा आहे तुम्ही समजून घ्याल आणि मला माफ कराल.” रामा हात जोडून म्हणाला.

तिने फक्त स्मित करत मान डोलावली.

“तर महाराज! ही होती संपूर्ण कहाणी पंडित रामाकृष्णाची जुबानी. माफ करा थोडा उशीर झाला पण सत्य समोर आले.” रामा म्हणाला.

“उशीर तर तुम्ही दरवेळी करता पंडित रामा.” राजा म्हणाला.

त्याच्या वाक्याने रामाच्या काळजात धस्स झालं. इतक्यात राजा पुढे बोलू लागला; “पण त्याचा परिणाम अद्भुत असतो. आजच आम्ही तुमच्या सगळ्या उशिरांना माफ करून टाकतो. कारण तुम्ही तुम्हीच राहणार आणि उशीर होतच राहणार.”

यावर रामाने सुटकेचा निःश्वास सोडला. तो स्मित करत हात जोडून उभा होता.

“आज तुमच्यामुळे आमच्या कुळाचे आणि संकल्पाचे रक्षण झाले आहे. आज आम्ही तुम्हाला काही द्यायचे म्हणले तर काहीही देऊ शकतो पण तुम्ही हे जे कार्य केले आहे ते कोणत्याही भेट वस्तू पेक्षा खूप मोठे आहे म्हणूनच आम्ही ठरवले आहे की, चंद्रमणी श्री गणरायाच्या चरणी आम्ही नाही तर तुम्ही अर्पण करणार आहात.” राजा म्हणाला.

त्याच्या बोलण्याने रामाने एकदम चमकून पाहिले. शारदा आणि अम्मा तर खूप खुश झाल्या होत्या. मंत्री आणि दोन्ही राण्या देखील खुश होत्या फक्त आचार्य आणि त्याचे शिष्य आ वासून बघत होते. लगेचच पूजेची तयारी झाली. स्वतः राजाने तो चंद्रमणी रामाच्या हातात दिला. त्याने गणपती समोर असलेल्या ब्रम्ह कमळात तो ठेवला. शारदा आणि अम्मा साश्रू नयनांनी हे बघत होते. आरती झाली आणि “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष झाला.

रामा डोळे भरून मूर्ती पाहत होता. आज त्याच विघ्नहर्त्यामुळे त्याच्यावर आलेले हे विघ्न टळले होते.
***********************
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रामा ‘ओम नमः शिवाय’ चा जप करत होता. त्याचा जप झाल्यावर त्याने अम्माला हाक मारली पण कावळ्याचा आवाज आला. असे तीन चार वेळा झाले.

‘अरे! अम्माला हाक मारतोय तर कावळ्याचा आवाज कुठून येतोय? अम्मा कुठे गेली?’ तो स्वतःशीच म्हणाला आणि उठून बाहेर आला.

बाहेर अंगणात अम्मा, शारदा आणि गुंडप्पा बरेच खायचे पदार्थ घेऊन बसले होते आणि तिथे एक कावळा होता. तो बाहेर आल्यावर अम्माने शांत रहा अशी खूण केली.

“सांगतायत शांत रहा.” शारदा हळू आवाजात म्हणाली.

“हीची ही खूण कोणीही ओळखेल. पण हे काय? तुम्ही एवढे पदार्थ घेऊन इथे का बसलायात?” रामाने विचारलं.

“तुमचे पिताश्री आलेत. आमचे सासरे. त्यांना खाऊ घालतोय.” शारदा म्हणाली.

यावर रामा हसू लागला.

“हे माझे पिताश्री? काहीही. ते केव्हाच हे जग सोडून गेलेत. हा फक्त एक कावळा आहे.” रामा म्हणाला.

यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “माफ करा या मुर्खाला. कुठे काय बोलतो कळत नाही.”

यावर रामाने तिच्याकडे थोडं रागाने पाहिले.

“असे मी नाही या म्हणाल्या.” शारदा म्हणाली.

अम्मा पुन्हा खुणा करू लागली आणि शारदा सांगू लागली; “आज तुमच्याच आशीर्वादाने हा दरबारात मोठ्या पदावर कामाला आहे.”

“लामा अले नमस्काल कल तुदे पिताशली आहेत ना!” गुंडप्पा म्हणाला.

“गप्प बस! माझे पिताश्री म्हणे. इथे एवढे पदार्थ ठेवलेले बघून एकच काय नगरातले सगळेच कावळे जमतील इथे आणि जर त्यातून कोण माझे पिताश्री असतील तर? तुम्हालाच नंतर पश्चात्ताप होईल आपण कोणा दुसऱ्याला एवढं खाऊ घातलं म्हणून.” रामा म्हणाला.

यावर अम्मा पुन्हा खुणा करू लागली आणि शारदा सांगू लागली; “माफ करा स्वामी याला. हा काय बोलतोय हे त्यालाच कळत नाहीये. घ्या तुम्ही हे लाडू खा.”

अश्या खुणा करत तिने कावळ्यासमोर वाटी केली. तो कावळा तिथून उडाला आणि रामा हसू लागला. त्याने जाता जाता अम्माच्या डोक्यावर प्रसाद टाकला.

“घे अम्मा पिताजींनी तुला जाता जाता प्रसाद दिला आहे तो ग्रहण कर आणि तुम्ही दोघे पण.” रामा हसत म्हणाला.

‘तसं तर हा शुभ शकुन आहे असं म्हणतात आता बघूया हा संकेत काय घेऊन येतोय.’ रामा मनात म्हणाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all