ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा - संघ 4(कामिनी)
जलदकथा - संघ 4(कामिनी)
शीर्षक : चंद्रवासी भाग १
संध्याकाळची वेळ होती. वेळेची उलट मोजणी सुरू झाली होती. कॅप्टन सोहम आणि मधू सूट आणि मास्क घालून केबिनमध्ये बसले होते. गेल्या कित्येक दिवसांची मेहनत आज पणाला लागणार होती. दोघांच्याही मनात संमिश्र भावना होत्या. दोघेही काहीच बोलत नव्हते. काहीच वेळात त्यांचं अवकाशयान आकाशात झेपावलं. सोहम आणि मधूने आपापल्या जागा घेतल्या. आता त्यांना पुढचे अनेक दिवस यान नियंत्रित करून योग्य स्थळी पोहोचवायचं होतं. सगळ्या देशांचं आणि त्यांच्या देशवासियांचं लक्ष त्यांच्यावर टिकून होतं.
दोघेही जण सतत त्यांच्या अंतराळसंस्थेच्या शास्त्रज्ञांशी सतत संपर्कात होते. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रत्येक माहितीचं ताबडतोब विश्लेषण केलं जात होतं. त्या विश्लेषणाच्या आधारावर दोघे यान नियंत्रित करत मार्गक्रमण करत होते. लवकरच तो दिवस येऊन ठेपला. कालच यान चंद्राच्या कक्षेत दाखल झालं होतं आणि आज यानाच्या विलग होणाऱ्या छोट्या यानातून ते चंद्राच्या जमिनीवर उतरणार होते. देशभरात ह्या घटनेचं प्रत्यक्ष प्रक्षेपण चालू होतं. सर्वांची धडधड वाढली होती. सोहम आणि मधू अत्यंत शांतचित्त दिसत असले, तरी त्यांच्या मनात खळबळ माजली होती.
योग्य अक्षांशावर पोहोचताच ते यानापासून विलग झाले. आता ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने जमिनीच्या दिशेने चालले होते. वेग कमी करणे हे त्यांचं आत्ताचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं. योग्य वेळेस हळूहळू एक एक इंजिन चालू करून यानाला उलट दिशेने प्रज्वलित करून वेग कमी करायचा होता. मधू वेग आणि उंची मापत होती.
शेवटी इतिहास घडवणारा तो क्षण येऊन ठेपला. यानाचे पाय एक धक्का देत चंद्राच्या मातीत रुतले. सोहम आणि मधू यानातून खाली उतरले. आता त्यांची खरी मोहीम सुरू झाली होती. त्यांनी ऑक्सिजन मास्क, बांधलेले खाद्यपदार्थ आणि पाणी सोबत घेतलं. कॅमेरा आणि पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांशी संपर्क करण्यासाठीची उपकरणं आणि चंद्रावरचे नमुने गोळा करण्यासाठीची उपकरणं सोबत घेतली. त्यांना पुढचे दोन दिवस चंद्रावर यानाच्या आसपासच्या भागातून परीक्षणासाठी नमुने गोळा करायचे होते.
त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. संशोधनासाठी त्यांनी जास्तीत जास्त नमुने गोळा करणं महत्त्वाचं होतं. बऱ्याच वेळानंतर दोघेही जण यानात परतले. काही तास झोप आणि विश्रांती घेऊन ते पुन्हा बाहेर पडले. आज त्यांचा इथला शेवटचा दिवस होता. आज त्यांना अजून एक गोष्ट चित्रित करायची होती. आजच चंद्रावर रात्र होणार होती.
दोघांनी मिळून पुरेसे नमुने गोळा केले. आता त्यांना रात्री चंद्राच्या तापमान आणि वातावरणात होणारे बदल नोंदवायचे होते. हा हा म्हणता सगळं अंधारात बुडालं. त्यांनी नोंदी घेतल्या. सारे बदल चित्रित केले. आता त्यांची परतीची वेळ जवळ येत चालली होती. ते दोघे झपाट्याने यानाच्या दिशेने निघाले; पण काहीतरी चुकलं होतं. काहीतरी अघटित घडलं होतं. दोघेही भयचकित नजरेने एकमेकांकडे पहात होते. त्यांचं यान गायब झालं होतं!
क्रमशः
©अभा बोडस ( संघ कामिनी )
©अभा बोडस ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा