Login

चंद्रवासी - भाग 2

अंतराळवीर आणि चांद्रवासीयांच्या भेटीची कथा
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा संघ 4 (कामिनी)

चंद्रवासी भाग २

दोघेही धक्क्याने जणू गोठले होते. मधूने स्वतःला सावरलं आणि पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला. सुदैवाने त्यांच्याकडे अजून दोन दोन ऑक्सिजन सिलेंडर आणि खाण्यापिण्याचे सामान होते; पण ते फार काळ पुरणार नव्हतं. त्यात चंद्रावर रात्र झाल्यामुळे तापमान 130 डिग्रीच्याही खाली गेलं होतं. त्यांच्या सूटमुळे त्यांना काही प्रमाणात ऊब मिळत असली, तरी काहीतरी सोय होईपर्यंत निवाऱ्याची सोय बघणं गरजेचं होतं.

“सोहम, आपल्याला जिथे वारा, वादळ ह्यापासून सुरक्षित राहता येईल अशी जागा शोधली पाहिजे.” मधूने सोहमला हलवत भानावर आणलं. दोघेही तिथून अशी एखादी जागा शोधायला निघाले. दोघे भीती आणि थंडीने कापत होते. इथे त्यांना काही घर किंवा इमारती मिळणार नव्हत्या; पण त्यांना आडोसा मिळेल असं काहीतरी शोधणं गरजेचं होतं.


त्यांनी पृथ्वीवर शास्त्रज्ञांशी संपर्क साधला.

“कॅप्टन सोहम बोलतोय. आम्हाला लगेच आमच्या परिसराचा आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा नकाशा हवा आहे.”

सगळ्या शास्त्रज्ञांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यांचे दोन शास्त्रज्ञ चंद्रावरच अडकले होते आणि यान गायब झालं होतं. दोन तीन दिवसांपेक्षा जास्त तग धरून राहणं सोहम आणि मधूला अशक्य होतं. इतक्या कमी दिवसात पृथ्वीवरून यान तयार करून चाचण्या घेऊन ते सोहम आणि मधू अडकलेल्या ठिकाणी पोहोचवणं निव्वळ अशक्य होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. देशभरातली प्रसारमाध्यमे संशोधन संस्थेवर दबाव आणत होते. जगभरातल्या संशोधनसंस्था एकत्र येऊन कॅप्टन सोहम आणि मधूला वाचवायचे सर्व प्रयत्न करीत होत्या.


सोहम आणि मधूने त्यांना मिळालेल्या नकाशानुसार त्यांना सुरक्षित राहता येईल अशी दोन दगडांमधील एक जागा शोधून काढली. थोडंसंच खाऊन घेतलं.

“मधू मला वाटतं आपण आळीपाळीने झोपावं. तू आधी झोपून घे. तू उठलीस की मी झोपतो.” सोहम म्हणाला.

मधूने होकार दिला आणि ती दगडावर डोकं टेकून झोपायचा प्रयत्न करायला लागली.

मागच्या काही तासांमध्ये इतकी उलथापालथ झाली होती की झोप लागणं अशक्यच होतं. दगडांमध्ये फारशी जागा देखील नव्हती; पण जिवंत आणि तल्लख राहण्यासाठी झोप घेणं आवश्यक होतं. बऱ्याच वेळाने तिला झोप लागली.

असेच आळीपाळीने ते झोपत होते. पुरवून पुरवून खाणं आणि पाणी वापरत होते.

दोघांना तिथे अडकून पडून आता दीड दिवस होत आला होता. जवळचं खाणं पूर्ण संपलं होतं. पाणीसुद्धा फारच कमी शिल्लक राहिले होते. आता त्यांच्याकडे एकच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक होता.

“सोहम, तू घाल हा.” मधूने निग्रहाने सोहमला सांगितलं.

पण मधूला असंच सोडायला सोहम तयार नव्हता.

“नाही मधू, आपण दोघेही इथून सुखरूप जाऊ किंवा दोघेही इथेच जीव सोडू; पण दोघेही एकत्रच राहणार आहोत आपण. आपण हा सिलेंडर दोघे मिळून वापरू.”

सोहम दर मिनिटाने मधूला आणि स्वतःला ऑक्सिजन मास्क लावत होता; पण त्यांची परीक्षा अजूनही संपली नव्हती. आजच चंद्रावर धुळीचं प्रचंड वादळ उठलं होतं. कमी गुरुत्वाकर्षण असल्याने दोघेही पुन्हा पुन्हा त्या दगडांवर आपटत होते.


दोघांचीही अवस्था आता बिकट होत चालली होती. हळूहळू दोघांचीही शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा दोघे एका काचेच्या गोलाकार खोलीत होते. खोलीत निळसर प्रकाश पसरला होता. त्या दोघांवर निश्चितपणे काही उपचार केले गेले होते. ती खोली काहीशी उबदार दिसत होती. त्यांचा सूट काढून त्यांना काहीतरी वेगळंच घातलेलं होतं. हे असं कापड त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही बघितलं नव्हतं. ते नक्की कुठे आहेत काहीच कळत नव्हतं. खोलीत काही चिन्हं बनवलेली होती; पण ती त्यांना वाचता येत नव्हती. सुदैवाने ते दोघेही एकाच खोलीत होते. त्यांना दोन स्वतंत्र पलंगांवर झोपवलेलं होतं. त्यांच्या अंगात विविध नळ्या जोडलेल्या होत्या. त्यांना ऑक्सिजन मास्क लावावा लागत नव्हता. ते आजूबाजूचं निरीक्षण करत होते तेव्हाच काहीतरी आवाज आला. कोणीतरी निश्चितच तिथे येत होतं.

क्रमशः
©अभा बोडस
0

🎭 Series Post

View all