ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा - संघ 4 (कामिनी)
जलदकथा - संघ 4 (कामिनी)
चंद्रवासी भाग ३
सोहम आणि मधू आवाजाच्या दिशेने बघत होते. काहीच सेकंदात दरवाजा उघडला आणि दोन माणसं आत आली; पण ती नक्की माणसं होती का? काहीतरी वेगळेच होते ते. जवळजवळ सात फूट उंची, काहीसा ओघळलेला चेहरा, काटकुळं शरीर! वेगळ्याच कापडापासून बनवलेले आगळेवेगळे कपडे घातले होते. सोहम आणि मधू त्यांना बघून गारठलेच! त्यांनी अगम्य भाषेत काहीतरी सांगितलं आणि त्यांच्या शरीरात जोडलेल्या नळ्या काढल्या. त्यांना धरून उभं केलं आणि घेऊन जायला लागले. ही जागा आणि माणसा सदृश दिसणारे, नक्की कोण आहेत हे समजून घ्यायचं असेल, तर त्यांच्याबरोबर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच मिळू शकणार होती.
दुसऱ्या खोलीत जात असताना बाहेरची जी झलक बघायला मिळाली त्यावरून सोहम आणि मधूच्या लक्षात आलं की ते अजूनही चंद्रावरच होते. म्हणजेच त्यांना ज्यांनी वाचवलं होतं ते होते चंद्रवासी. हा इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा शोध ठरणार होता. फक्त त्यांना पृथ्वीवर ह्याचे पुरावे घेऊन पोहोचणं आवश्यक होतं. सोहम आणि मधू शांतपणे त्यांच्या पाठोपाठ चालत राहिले. असं वाटत होतं की ते जमिनीच्या आत उतरत चालले आहेत.
बराच वेळ चालल्यावर ते एका खोलीबाहेर येऊन पोहोचले. चांद्रवासींनी त्यांना तिथेच थांबायची खूण केली आणि ते दार उघडून आत गेले. काही मिनिटांनंतर त्यांनी सोहम आणि मधूला आत नेलं. तिथे खोलीच्या मध्यभागी एका उंच आसनावर एक चंद्रवासी बसला होता. इतर चंद्रवासी त्याच्याशी ज्या आदराने बोलत होते, त्यावरून तो त्यांचा प्रमुख असावा असा कयास दोघांनी बांधला.
दुर्दैवाने चांद्रवासीयांची भाषा पृथ्वीवरच्या कुठल्याच भाषेशी मिळतीजुळती नव्हती. त्यामुळे ते आपापसात काय चर्चा करत आहेत किंवा त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हा मोठा प्रश्न सोहम आणि मधूसमोर उभा ठाकला होता. काय करावं ह्याचा विचार करत असतानाच अचानक त्यांची नजर तिथे ठेवलेल्या यानावर गेली. ते त्यांचंच यान होतं. यान बघून सोहमच्या डोळ्यात चमक आली. तो यानाकडे आणि स्वतःकडे बोट दाखवत खुणा करायला लागला; पण त्यावरून चांद्रवासीयांना त्या कितपत कळत होत्या कुणास ठाऊक! सगळे पर्याय आता संपलेत असं वाटत होतं. सोहम निराश झाला; पण मधूला अजून एक पर्याय सुचला. ती यानाच्या आत शिरली. यानातून ती एक वस्तू घेऊन बाहेर आली.
क्रमशः
©अभा बोडस
©अभा बोडस
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा