Login

चांगुलपणा- भाग 1

ड्रेसिंग टेबलवर छुपा कॅमेरा लावणाऱ्या कारागिरांना अटक
TV वर लागलेली बातमी बघून नवरा बायको जागीच थबकले, संपूर्ण शरीर थरथरू लागलं, छातीतली धडधड अत्युच्च पातळीला पोचली..कारणही तसंच होतं...

"फर्निचर करणाऱ्या कामगार टोळीचा पर्दाफाश.. ड्रेसिंग टेबल बसवताना त्यात छुपा कॅमेरा लावून ते व्हिडीओ अनाधिकृत वेबसाईटला विकले"

Tv वर दाखवण्यात येणारी टोळी निशा आणि यशला लगेच ओळखू आली. पाच-सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या घराचं नव्याने फर्निचर केलं होतं. चार कामगार यायचे आणि त्यांचं काम करून निघून जायचे. त्यांच्याकडे बघून वाटतही नव्हतं की ही लोकं इतकी विकृत असतील. कामचुकारपणा नाही की वायफळ बडबड नाही. कारागीर अगदी वेळेवर यायचे, त्यांचं काम करायचे आणि निघून जायचे. म्हणायला त्यांचा काहीही त्रास नव्हता आणि चेहऱ्यावरून ते असं काही करतील असं स्वप्नातही वाटत नव्हतं.

वाऱ्यासारखी ही बातमी देशभरात पसरली, झालेल्या प्रकरणाचा निषेध करण्याऐवजी नागरिक ज्या वेबसाईटवर रेकॉर्ड झालेले व्हिडीओ अपलोड झाले होते ते शोधायला सुरवात केली. ज्या ज्या लोकांच्या घरी या कारागिरांनी काम केलं होतं त्यांचा घरात सुतकी वातावरण झालं होतं.

"त्यात माझा व्हिडीओ तर नसेल ना? लोकांनी पाहिला तर नसेल ना?"

त्या कारागिरांनी ज्या घरात काम केलं तिथल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात ही चलबिचल सुरू होती. जवळपास प्रत्येकाचा ड्रेसिंग टेबल हा बेडरूममध्ये, जिथे खाजगी गोष्टी होतात तिथे होता.

"अगं... हे काय होऊन बसलंय.."

असं म्हणत यशने bat घेऊन तो ड्रेसिंग टेबल फोडून टाकला, कानठळ्या बसतील असा आवाज झाला. आरशाच्या चार स्क्रूमध्ये तो कॅमेरा शोधू लागला पण मिळाला नाही. शोध घेण्यासाठी त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिथे बरीच गर्दी होती. पत्रकार जमले होते, कॅमेरे खिळले होते.आरोपी कारागीर पोलिसांच्या जमावात मध्यभागी मान खाली घालुन बसले होते. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कामाचे त्यांना भरमसाठ पैसे मिळत होते. पत्रकार पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार करत होते. गर्दीचा आवाज इतका होता की पोलीस सर्वांना शांत करण्यासाठी विशेष पोलीस पाठवत होते.

"137 पैकी 136 घरात यांनी कॅमेरा बसवला होता"

पोलीस पत्रकारांना माहिती देत होते.

यश आणि निशाच्या अगदी बेडसमोरच हा ड्रेसिंग टेबल होता, बेडमधील खाजगी विषय ते अगदी वस्त्रांतर करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींना तो टेबल साक्षी होता.