चार दिवस सुनेचे-1

चार दिवस सुनेचे

सकाळी कामाच्या गडबडीत असतांना सासूबाईंचा फोन आला तशी तिने हातातील सगळी कामं सोडून बोलायला घेतलं..

"हॅलो, बोला आई.."

"काय गं, झालं का आवरून.."

"नाही, चाललंय एकेक.."

"हम्म..उशिरा उठत असाल..म्हणून.."

"नाही ओ, 6 वाजता उठते की मी इथेही.."

"सहा काय लवकर असतात होय? चार वाजता उठावं घरातल्या बाईने.."

"बरं..करून बघते.."

"काय डबा दिला आज प्रशांतला?"

"बटाट्याची भाजी.."

"अरेरे, काय गं रोज कोरडं.. इथे होता तेव्हा मी त्याला छान रसाभाजी द्यायचे.."

"अहो आजच दिली, रोज नेतातच ओली भाजी.."

त्यांचं संभाषण बराच वेळ चाललं. खरं तर सासूबाईंचा फोन आला की सुषमाचा दिवसच खराब जायचा. कारण फोनवर विचारपूस कमी अन टोमणे जास्त असायचे.

लग्नानंतर वर्षभर सुषमा आणि माधव सासरी होते, माधवला दुसऱ्या शहरात नोकरी लागली तसे दोघे वेगळे राहायला गेले. वेगळं राहूनही सासूबाईंचा त्यांच्या संसारातील रस काही संपत नव्हता. रोज त्यांना काय काय झालं याची इथंभूत माहिती लागायची.

घरात लग्नाचा अजून एक दिर होता. त्याच्यासाठी मुली बघणं सुरू होतं.

दुसऱ्या दिवशी परत सासूबाईंचा फोन आला तेव्हा सुषमा ने दिराच्या लग्नाबद्दल विचारलं,

"स्थळं आलीयेत का कुठली? माझ्या माहितीत पण बघू का??"

"नको गं बाई...मी बघेन बरोबर एखादी चांगली.."

"बरं... माझ्या माहेरी एक मुलगी आहे, खूप छान.."

"नको नको नको...तुझ्या माहेरच्या मुली नको, सगळ्या दहा वाजेपर्यंत झोपणाऱ्या.."

सुषमाला रागच आला,

माझंच चुकलं, माझी मदत त्यांना ऑफर केली ते...

सासूबाई कधी सरळ बोलतच नसत...त्यांना सुषमा पासून शंभर तक्रारी असायच्या. आता नवीन सून आणून सुषमा ला दाखवणार की सून कशी असते ते असा त्यांनी चंगच बांधला..

🎭 Series Post

View all