चार दिवस सुनेचे 2

चार दिवस सुनेचे
एके दिवशी सासूबाईं त्यांच्या माहेरी एका लग्नासाठी गेलेल्या. लग्नाला इतकी वर्षे झाली तरी सासूबाईंना माहेरची अजूनही तितकीच ओढ असायची. आपल्या माहेरचं कौतुक करताना त्या अजिबात थकत नसत.

त्याच लग्नात त्यांना एक मुलगी दिसली, मनाली नाव तिचं. त्यांच्याच चुलत भावाची मुलगी.

"किती मोठी झाली ही? लग्नाला आलीये चांगली.."

असं म्हणत असतानाच सासूबाईंना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या..इतकी सुंदर मुलगी, तीही भावाची..म्हणजे माझ्या माहेरची... माझी सून म्हणून आली तर??

सासूबाईंना अजिबात राहवलं नाही. त्यांनी जवळच्या दोन नातेवाईकांना सांगून त्यांच्यापर्यंत निरोप पोचवला. सासूबाईंच्या चुलतभावालाही आनंद झाला. असंही मनालीसाठी ते स्थळ बघतच होते.

सासूबाईंचा हा चुलतभाऊ म्हणजे गावातली मोठी असामी. सगळा गाव त्याला घाबरून असे. राजकारणात पुढारी आणि गावात दरारा, यामुळे भाऊ चांगलाच परिचित होता. त्याची मुलगी करून आणली म्हणजे आपलाही मान वाढणार. या सर्व विचाराने सासूबाईंना कितीतरी दिवस झोप येईना.

चुलतभावाला आमंत्रण गेलं. त्याची मुलगी करून आणायची म्हणजे माहेरी सतत येणं जाणं राहणार. या जाणिवेने त्या खुश होत्या. हीच आनंदाची बातमी देण्यासाठी त्यांनी सुषमाला फोन केला..

"अगं माझा चुलतभाऊ आहे ना, त्याची मुलगी मनाली... तिला पसंत केलंय आपणण.."

"काय सांगताय, छानच की..पण सागर भावजीना आहे का ती पसंत??"

"माझ्या शब्दाबाहेर नाही तो..नाहीतर काही मुलं बायको आली की आईला विसरतात.."

टोमण्यांशिवाय सासूबाई बोलतच नसत..

"बरं आता तयारीला लागुया.."

"हो आता कधी एकदाचं लग्न होतंय असं झालं. तुमचं लग्न झालं तेव्हा विचार केलेला की आता मी मोकळी झाले, पण कसलं काय..पण आता मनाली येणार मग कसलीच चिंता नाही मला..माझ्या माहेरच्या मुली, अगदी सकाळी चार ला उठून सडा रांगोळी करतात, 7 पर्यंत स्वयंपाक तयार ठेवतात.. आणि बाकीची कामं तर विचारूच नको, इतका वेग असतो ना त्यांना..आता बघ मनाली आली की घर कसं फुलासारखं ठेवेल.."

असं बोलत असताना मोठ्या सुनेला- सुषमाला किती वाईट वाटत असेल याचा विचारच त्या करत नव्हत्या. सुषमाला सुद्धा कारण नसताना अपराधी वाटत होतं.

कसं उठणार होती ती पहाटे चार ला? रात्री 12 पर्यंत तर तिचं ऑफिसचं काम चालायचं.. कसा करणार 7 पर्यंत स्वयंपाक? कसं आवरणार घरचं एकदम? तिला नोकरी आणि घर दोन्ही सांभाळायचं होतं... सुषमा ने तिच्या परिने 100% घराला देण्याचा प्रयत्न केला होता. पण सासूबाईंनी प्रत्येक गोष्टीत चुकाच काढल्या होत्या...

🎭 Series Post

View all