चार दिवस सुनेचे-3 अंतिम

चार दिवस सुनेचे
सुषमाला वाईट वाटलं खरं, पण सगळा राग विसरून आता दिराच्या लग्नासाठी ती तयारीला लागली.

तिकडे सासूबाईंना किती उड्या मारू अन किती नको असं झालं. त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडू लागली. आपली नवीन सून पायाला भिंगरी लावल्यासारखी काम करतेय, घरातली साफसफाई करतेय...एक झालं की दुसरं काम, दुसरं झालं की तिसरं.. असं दिवसभर राबतेय...रात्री आपल्या उशाशी बसून डोकं दाबून देतेय, आपल्या इशाऱ्यावर नाचतेय, आपण सांगू ती पूर्व दिशा करतेय..

याच स्वप्नांना गाठीशी घेऊन त्यांनी सागरचं लग्न केलं आणि मनालीला सून म्हणून घरात आणलं. सुषमा लग्नासाठी म्हणून सासरी आलेली ती अजून पंधरा दिवस तरी थांबणार होती.

लग्न होऊन 2 दिवस झाले. सगळी पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली. आता रुटीन सुरू झालं. सुषमाला कामाचा चांगलाच थकवा आलेला. पण आता नवीन जाउबाई आल्या आहेत म्हटल्यावर तीही निर्धास्त झालेली.

पहाटे 7 ला सुषमाला जाग आली. तिने पटकन तोंड धुतलं आणि स्वयंपाकघरात आली. सासूबाईंनी मनालीचं जे वर्णन केलं होतं ते तिला आठवलं, ती म्हणाली,

"सासूबाई, स्वयंपाक तयार झाला असेल एव्हाना.."

सासूबाई आधीच काळजीत पडल्या, ही अजून उठली कशी नाही? त्या गपचूप बेडरूममध्ये गेल्या आणि मनालीला फोन लावला... तिने उचलला नाही..

सुषमा हसली आणि कामाला लागली...दहा वाजले तसं मनाली जांभया देत खोलीबाहेर आली..सुषमा म्हणाली,

"काय गं, इतका उशीर??"

"अगं थकवा येतो लग्नाचा...नाहीतर एरवी चार वाजता उठत असणार.."

सासूबाई आपल्या माहेरची म्हणून तिची बाजू बरोबर सांभाळत होत्या..

"नाही ओ आत्या...मी दहा शिवाय कधी उठतच नाही.."

सासूबाईंना 1000 volts चा शॉक बसला...एकीकडे हे ऐकलेलं दुसरीकडे सुषमाला काय तोंड दाखवणार म्हणून..

सुषमाने पण संधी सोडायची नाही असं ठरवलं..

"बरं मग आज काय स्वयंपाक करणार??"

"मी?? मला कुठे काय येतं.."

सासूबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या,

"अगं तुला किती छान स्वयंपाक येतो असं ऐकलंय मी.."

"कुणी सांगितलं? आजवर कधी भाजी टाकलेली नाही मी..चहा वगैरे येतो.. मी चहा टाकते सर्वांना.."

"दहा वाजता कुणी चहा घेत नाही बरं आमच्याकडे.. तू बस, मीच टाकते तुझ्यासाठी चहा.."

सुषमा गालातल्या गालात हसत चहा टाकायला गेली..

"बाकीचे कामं येत असणार तुला... स्वयंपाक काय, आज उद्या येईलच.."

सासूबाई तिची बाजू घ्यायचं सोडत नव्हत्या, बोलता बोलता मुद्दाम त्यांनी घर झाडायला घेतलं..त्यांना वाटलेलं मनाली त्यांच्याकडून झाडू घेईन आणि म्हणेन "मी करते.."

सुषमा गंमतच बघत होती...

अख्ख घर झाडून झालं, मनाली मस्तपैकी खुर्चीवर बसून त्यांची गंमत बघत होती.. तिने चहा घेतला आणि परत तिच्या खोलीत गेली...

सासूबाईं घाम गाळत मटकन बसल्या...सुषमा म्हणाली,

"काय हो सासूबाई, तुम्ही तर फार कौतुक करत होतात.. काय झालं त्याचं?"

सासूबाई आता चांगल्याच अडकल्या, एकीकडे त्यांचा चांगलाच फुगा फुटला होता आणि दुसरीकडे त्यांना टोमणे मारायला आता सुषमाही जवळच होती..

सासूबाईंचा संताप झालेला, त्यांनी चुलतभावाला फोन लावला..

"बोल ताई, काय म्हणतेस? मी तालुक्याला आलोय जरा, एकाची खरडपट्टी काढायची होती जरा.. माझ्या मुलीचं सर्टिफिकेट देत नव्हता..नापास झाली म्हणून काय झालं? बनावट बनवून द्यायला याच्या बापाचं काय जातंय??"

सासूबाई अजूनच हादरल्या, आपला भाऊ मोठा राजकारणी आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही,

"ताई बाकी सगळं ठीक ना? आमच्या लेकीला काही त्रास नाही म तिकडे??"

भावाने उलट प्रश्न केला तसा सासूबाईंचा bp वाढला..याच्या मुलीची तक्रार केली तर हा उद्या आपल्याच दारात आपल्यालाच गुन्हेगार ठरवून मोकळा आणि वर माझी माझ्याच माहेरी बदनामी होणार ते वेगळं..

मोठया फुशारकीने सासूबाईंनी लग्न लावून दिलं पण आता मात्र त्या चांगल्याच अडकल्या...सुषमाची बाजू त्यांना कळायला लागली, तिची किंमत कळायला लागली..

पण आता उशीर झाला होता, सुषमा ला इतके टोमणे मारून झाले होते की आता ही संधी ती सोडणार नव्हती..

सुषमा तिच्या घरी परत गेली. आता मात्र सासूबाईंवर कामाचा डबल भार पडला...नवीन सुनबाईचे नखरे प्रचंड, ही भाजी आवडत नाही, ती चालत नाही...मग तिच्यासाठी वेगळं बनवणं भाग असायचं...

आधी सासूबाईंचा सुषमाला फोन आला की सुषमाला धडकी भरायची, आता मात्र फोनवर सुषमाचं नाव दिसलं की सासूबाईंना धडकी भरते...

ते म्हणतात ना,

चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे...

अगदी खरंय....


🎭 Series Post

View all