चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा फेरी)
(लघुकथा फेरी)
शीर्षक : चर्चासत्र
"मला सांगा तुमच्यापैकी कोणाकोणाला सैन्यात भरती होऊन भारत मातेची सेवा करायची आहे?" मेजर अनिकेत चव्हाणने सभागृहात उपस्थित तरुण विद्यार्थ्यांना विचारले; पण तो प्रश्न ऐकून तिथे भयाण शांतता पसरली.
मेजर अनिकेत चव्हाण पाच वर्षांपासून राजस्थान सीमेवर कार्यरत होते. साधारण दहा दिवसांची रजा घेऊन ते त्यांच्या गावी परतले होते; म्हणून त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळेच आज त्या चर्चासत्रात त्यांनी तो प्रश्न विचारला होता; पण विद्यार्थ्यांचा शून्य प्रतिसाद पाहून ते खजिल झाले.
"काय झालं? कोणालाच आपल्या मायभूमीचे, आपल्या राष्ट्राचे, आपल्या भारतमातेचे ऋण फेडायचे नाही देशसेवा करून?" मेजर अनिकेत चव्हाण सगळ्यांकडे पाहून विचारत होते.
"सर, मलाही आर्मी ऑफिसर व्हायचंय, देशसेवा करायची आहे पण..." गौरव चाचरत बोलला.
"पण काय?" मेजर अनिकेत चव्हाण यांनी विचारले.
"पण घरी सगळे म्हणतात की सैन्यात एकदा भरती झालं की व्यक्ती शहीद होऊनच परत येतो; म्हणून कितीही इच्छा असली तरी घरून नकार आहे या क्षेत्रात काम करण्यासाठी..." गौरवने त्याचे वाक्य पूर्ण केले.
"अरे पण या क्षुल्लक भीतीने तुम्ही सरळ या क्षेत्राकडे पाठव फिरवायला तयार आहात? स्वतःच्या इच्छेचा सहज गळा घोटत आहात? स्वतःच्याच भविष्याशी इतकी मोठी तडजोड?" संपूर्ण सभागृहातील कानाकोपऱ्यात बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून मेजर अनिकेत चव्हाणने विचारले.
"भीती नाही सर, दररोज बातम्या वाचतो आम्ही. चित्रपट आणि मालिकांमध्येही आर्मी ऑफिसर्स सर्रास शहीद होताना दाखवतात; म्हणून घरी सगळ्यांची धारणा झाली आहे की फौजेत गेलेला व्यक्ती शहीद होऊनच परततो. मलाही आर्मी डॉक्टर व्हायचंय; पण कधीकधी आर्मी डॉक्टर्सचाही जीव संकटात सापडतो, असं बोलून घरून सरळ नकार मिळाला." अंजली उभी राहत निर्भीडपणे बोलली.
अंजलीचे शब्द ऐकून मेजर अनिकेत चव्हाण किंचित ओठांचा कोपरा उंचावत हसले आणि बोलले, "हो खरंय, होतात चकमकीत शहीद सैनिक आणि संकटात पडतात आर्मी डॉक्टर्सही; पण मरताना वा संकटाशी झुंज देताना त्यांच्या डोळ्यांत पश्चात्ताप कधीच नसतो. डोळ्यांत असते ती केवळ चमक आणि ओठांवर असतो एकच प्रण की भारत माते, तुझी सेवा करण्याचे भाग्य लाभू दे. आज मरण आले तरी परत तुझ्याच उदरात जन्म घेऊ दे."
"बघितलंत, तुम्हीही तेच तर सिद्ध करत आहात ज्या गोष्टींची आमच्या घरी धास्ती आहे. धास्ती— शहीद होण्याची... सैनिक शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश त्या रील्समधून, बातम्यांमधून, चित्रपटातील दृश्यांतून पाहिल्यावर मन हेलावून जातं आमचं... आम्ही तर एक वेळ शहीद होण्यासाठी पुढाकार घेऊ; पण आमच्यानंतर आमचं कुटुंब... त्यांच्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळेल, ही कल्पनाच नाही केली जात." अंजली तगमग व्यक्त करत म्हणाली.
"हो होतात अनेकजण शहीद सैन्यात भरती झाल्यावर आणि कोसळतो दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबियांवर; पण तुम्ही फक्त वर वर चित्रपटांतून, रील्समधून, बातम्यांमधून त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहिला. व्यक्ती गमावल्यावर दुःख प्रत्येकाला होतं; पण त्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू नसतात किंवा आम्ही का पाठवलं तिला/त्याला सैन्यात? असेही प्रश्नचिन्ह नसतात त्यांच्या मनात. असतात ते फक्त अभिमानाचे अश्रू! आणि तुम्हाला जगाचे तत्त्व सांगू? सर्वसाधारण व्यक्ती मेला ना तर कुटुंबियांखेरीज कोणीच चार दिवसांपेक्षा जास्त हळहळ व्यक्त करत नाही. व्यक्ती मरतो आणि आयुष्य थांबतं, असं नाही. व्यक्ती जातो, इतरांचं आयुष्य चक्र सुरूच राहतं, कारण कुणीही कुणासाठी तिथेच थांबत नाही. तुम्हाला तुमच्याच घरातील मरण पावलेल्या पूर्वजांची नावे माहिती नसतील तर हैदोस व्यक्त करणे तर दूरच राहिले; पण शहीद सैनिक अजरामर असतात आणि त्यांचे कुंटुंबियही त्याविषयी अभिमान व्यक्त करतात. तुम्हालाही बहुतांश शहीद सैनिकांची, लष्करी अधिकाऱ्यांची नावे तोंडपाठ असतील. तुम्हाला त्यांचा अभिमान आहे म्हणूनच ना!" अंजलीची कळकळ ऐकून घेत मेजर अनिकेतने त्यांचा मुद्दा मांडला.
"हो सर आम्हालाही अभिमान आहे त्या सर्व सैनिकांचा! आमच्या घरीही सगळ्यांनाच अभिमान आहे त्यांचा; पण आमच्या आई-वडिलांसाठी खूप अवघड आहे असा निर्णय घेणं. ते हळवे आहेत आमच्या बाबतीत..." आश्विन म्हणाला.
"मला मान्य आहे सगळं, माझ्या घरूनही आधी नकारच होता; पण तो होकारात रूपांतरित करता आला, कारण मनात ती जिद्द हवी सैन्यात भरती होण्याची, लष्करी अधिकारी होण्याची, देशसेवा करण्याची! प्रत्येकाच्या आई-बाबांना भीती असते आपल्या कोवळ्या लेकराला अल्पवयात गमावण्याची; पण मला सांगा मरण कधी नाही येत? ते आमंत्रण देऊन येत नाही की मी येतोय वगैरे... घरबसल्याही मरण येतं आणि इतर क्षेत्रात कार्य करतानाही मरण येऊच शकतं. वयोवृद्ध मरतात, तरूण मरतात आणि कधीकधी तर व्यक्ती स्वतः मरण ओढवून घेतो. कधी वाहतुकीचे नियम मोडून तर कधी आत्महत्या करून... काहीच निदान नसणाऱ्या आजारांमुळे निष्पाप लहान बाळंही मरण पावतात, तर तुमच्या आमच्यासारखे काय काळाला हुलकावणी देणार? मरणाच्या भीतीने आयुष्य झुरत जगायचं नसतं. मरणाला भिडायचं असतं आणि खरं सांगतो, सैन्यात भरती होणारा प्रत्येक सैनिक, लष्करी अधिकारी शहीद होतोच, असं नाही. हा समज पुसून टाका. फक्त युद्धप्रसंगी, शेजारील शत्रू राष्ट्राच्या सैनिकांशी लढत देताना, अतिरेकी आणि घुसखोरांना पिटाळून लावताना शहीद होतात सैनिक; पण आपल्या आईच्या रक्षणासाठी तिची लेकरे शहीद होऊन तिच्याशी एकरूप होत आहेत, हीदेखील तेवढीच अभिमानाची गोष्ट नाही का?" मेजर अनिकेत चव्हाण बोलत होते आणि विद्यार्थी त्यावर विचार करत होते.
"सर्वसाधारण व्यक्तीला मरण आलं तर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं जातं; पण एकमेव शहिदांनाच भारतीय राष्ट्रध्वज—आपला तिरंगा शौर्याचं प्रतिक म्हणून अर्पण केला जातो. अर्थात सैनिक शहीद झाला असला तरी भारत माता त्याला आपल्या कुशीतून वेगळं करत नाही. बघा एकदा वर्णन करून, किती सुखद अनुभव असतो तो! तो क्षण खुद्द अनुभवल्याशिवाय नाही त्यातली गोडी उमगणार. खरं सांगायचं तर, या राष्ट्राला गरज आहे सळसळत्या रक्ताची, जबाबदार व्यक्तिमत्त्वाची, मरणाला घाबरणाऱ्यांची नाही; तरीही भविष्य तुमचे तर निर्णयही तुमचाच! पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्यासारखी पळवाट भारतीय क्रांतिकारक शोधत फिरले असते तर अजूनही भारत पारतंत्र्यात असता आणि तुमच्या वयाचे असताना तुमच्याप्रमाणेच ते सर्व सैनिक, लष्करी अधिकारी मरणाला घाबरले असते तर तुम्ही आज असे बिनधास्त वावरू शकले नसते." एवढे बोलून मेजर अनिकेत चव्हाणने संभाषणाला विराम दिला.
काहीसा हिरमोड झाला होता विद्यार्थ्यांचे विचार ऐकून; म्हणून पुढे संवाद न वाढवता त्यांनी विद्यार्थ्यांचा निर्णय विद्यार्थ्यांवर सोपवला. कालांतराने चर्चासत्राची सांगता झाली आणि मेजर अनिकेत चव्हाण माघारी परतले.
.....
.....
साधारण दोन दिवसानंतर प्राचार्यांचा मेजर अनिकेत चव्हाणला परत फोन आला.
लगेच फोन कानाला लावत मेजर अनिकेत चव्हाण अदबीने म्हणाले, "नमस्कार सर."
"नमस्कार अरे अनिकेत, एक आनंदाची बातमी सांगायला फोन केला. त्यादिवशी तू चर्चासत्र घेतले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये बरेच परिवर्तन घडले रे. अनेक विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आकडा तसा लहानच आहे पण नाहीच्या तुलनेत हे बरे आहे. परत कधी वेळ मिळाला तर आवर्जून ये, विद्यार्थ्यांचा तसा आग्रह आहे. त्यांना बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडून..." प्राचार्य आनंदात बोलत होते.
"हो नक्की सर." त्यांचे शब्द ऐकून मेजर अनिकेत चव्हाणचा चेहरा खुलला.
त्यानंतर जुजबी बोलून संभाषण आवरून फोन ठेवला.
"काम फत्ते?" फोन ठेवताच मेजर अनिकेत चव्हाणचे बालमित्र आणि सहकारी कॅप्टन वक्रतुंड पाटील म्हणाले.
"हो." मेजर अनिकेत चव्हाण मंद हसत म्हणाले.
"पण सगळेच विद्यार्थी या क्षेत्राकडे वळले नसतील ना?" मेजर अनिकेतचे हावभाव निरखून बघत कॅप्टन वक्रतुंड यांनी अंदाज बांधला.
"ह्म्म. सगळ्यांचाच नाही बदलला पूर्ण दृष्टीकोन या क्षेत्राविषयी; पण एक नक्की सांगू शकतो की, परिवर्तन घडत आहे. मी दोन वर्षांपूर्वी असे रजेदरम्यान शाळा, महाविद्यालयात जाऊन चर्चासत्र घ्यायला सुरुवात केलेली, तेव्हा एकही विद्यार्थी माझं ऐकून या क्षेत्राकडे आशेने पाहत नव्हता; पण गेल्या एक वर्षापासून आता मतपरिवर्तन होत आहे, दृष्टीकोन बदलत आहेत, बदल घडत आहेत, हेही नसे थोडके!" बोलताना मेजर अनिकेतच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अजूनही शाबूत होती.
"तर मग आता कोणत्या शाळेत जातोय ब्रेन वॉश करायला?" कॅप्टन वक्रतुंड मुद्दाम फिरकी घेत म्हणाले.
"ब्रेन वॉश नाही करतोय रे मी! फक्त सैन्य, लष्कर या क्षेत्राचं महत्त्व पटवून देतोय आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात असणारी शहीद होण्याची भीती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. बस एवढंच!" मेजर अनिकेत स्पष्टीकरण देत म्हणाले.
"ह्म्म... कळलं, मेजर साहेब! चला आता, या दहा दिवसांच्या रजेदरम्यान दररोज एक चर्चासत्र करायचंय बरं; म्हणून पटपट चला ब्रेन वॉश करायला... आय मीन चर्चासत्राला..." परत एकदा चालता चालता कॅप्टन वक्रतुंड यांनी मस्करी केलीच.
मेजर अनिकेत नकारार्थी मान हलवत फक्त गालातच हसले आणि कॅप्टन वक्रतुंडसह नवीन चर्चासत्राला निघून गेले.
समाप्त.
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा