Login

चारित्र्य भाग 2

About Character

"वा! खूपच छान! मस्त नेसवून दिली साडी! तुझा अजून एक गुण कळाला आज. थॅंक्यू शालू ."

मीनाने आनंदाने शालूचे कौतुक करत तिचे आभार मानले.

"शालू, बिल्डिंगमधील तुझे काम झाल्यावर,घरी जाण्यापूर्वी इकडे येऊन जा. तुझ्या मुलांसाठी पावभाजी घेऊन जा."

मीना घरातून बाहेर जाणाऱ्या शालूला म्हणाली.

फक्त मानेनेच हो म्हणून शालू लिफ्टमध्ये गेली.

' या ..या ' असे म्हणत मीनाने लिफ्ट मधून आलेल्या सानपबाई,
शिंदेबाई,पाटीलबाई यांचे स्वागत केले.


बिल्डिंगमधील सर्वच लेडीज किट्टीत नव्हत्या. काही जाॅबला जात होत्या; तर काहींना 'किट्टी म्हणजे निव्वळ
टाईमपास' असे वाटत होते. म्हणून त्यांनी किट्टी जाॅइन केली नव्हती.
दहा जणी होत्या. त्यातही सर्वच असायच्या असे नाही. काही कारणाने एकदोन नसायच्याही.

या दहा जणींमध्ये काही मीनाच्या चांगल्या व जवळच्या मैत्रीणी होत्या;तर काही फक्त कामास काम
व किट्टीपुरताच संबंध असलेल्या होत्या.

एक एक करत सगळ्या येऊ लागल्या. मीनाने 'या..बसा' म्हणत, छानसे स्माईल देत,आनंदाने सर्वांचे स्वागत केले.

वेगवेगळ्या रंगाच्या आणि छानपैकी नेसलेल्या नऊवारी साड्या,त्यावर मॅचिंग दागदागिने,छानसा
मेकअप यामुळे सर्वजणी खूप सुंदर दिसत होत्या. एकमेकांच्या साडीचे,दागिन्यांचे,सौंदर्याचे कौतुक करत होत्या. एरवी पंजाबी ड्रेस, कुडता लेगीन,वेस्टर्न ड्रेस घालणाऱ्या आज मराठमोळ्या वेषात खूप सुंदर दिसत होत्या. आणि हे सौंदर्य आठवणीत राहण्यासाठी सर्वांचा आवडता कार्यक्रम फोटोशूटही झाले.
नंतर वन मिनिट गेम्स झाले. त्यात सर्वांनी खूप मजा केली.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या..

अशाच गप्पा सुरू असताना,

"बिल्डींगमध्ये काय झाले? माहित आहे का तुम्हांला?"

पाटीलबाई सर्वांना म्हणाल्या.

"काय झाले? "
सर्वांनीच उत्सुकतेने विचारले.

"आपल्या बिल्डींगमध्ये ती छाया काम करते ना ...साबळेबाई व मोरेबाई यांच्याकडे ."
पाटीलबाई सांगतच होत्या..त्या अगोदरच सर्वजणी म्हणाल्या,
"काय झाले मगं? छायाने काय केले? "

"आपल्या बिल्डींगमध्ये पाचव्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये दोन जेन्टस राहतात ना रेंटने . त्यांच्या येथे छाया लादी,भांडे व स्वयंपाकाचे काम करत होती. तिलाही कामाची गरज होती आणि त्या लोकांनाही घरकाम व स्वयंपाकाला बाई पाहिजे होती. तिला ते चांगले वाटले म्हणून ती कामाला तयार झाली. आता वर्ष होत आले . काहीच प्रॉब्लेम नव्हता; पण सोसायटी ऑफिसमध्ये कोणीतरी तक्रार केली आहे की, त्या दोन्ही जेन्टसपैंकी एका बरोबर छायाचे अफेअर आहे.
ही बातमी ऐकताच मोरेताईंनी छायाला कामावरून काढूनही टाकले. तिला काहीही न विचारता .खरे काय? खोटे काय? याची विचारपूस न करता. साबळे ताईंनी राहू दिले तिला कामाला."

पाटीलबाईंनी जे सांगितले... ते ऐकून सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. आश्चर्य,भीती, संशय असे अनेक भाव एकत्रित होऊन चेहऱ्यावर उमटत होते.

"बापरे! बिल्डींगमध्ये एवढे सारे झाले आणि आम्हांला काहीच माहित नाही."

मनातले विचार शब्दांतून काहींनी बोलून दाखवले तर काहींनी फक्त या बोलण्याला मानेनेच आणि हावभावांवरून दुजोरा दिला.

"आपल्या बिल्डींगमध्ये छाया वर्षभरापासून तर काम करते आहे. मोरेबाई नोकरीला जातात त्यामुळे त्या घरी नसतात आणि साबळेबाई बिल्डींगमध्ये कोणाशी जास्त बोलत नाही. त्यामुळे छायाबद्दल माहिती कोण सांगणार आपल्याला?"

सानपबाई म्हणाल्या.

"मी पण छायाला जास्त ओळखत नाही. एकदोनदाच लिफ्टमध्ये दिसली."

शिंदेबाई म्हणाल्या.

"छायाशी मी बोलली आहे. राहते किती चांगली? आणि बोलतेही चांगले.मला नाही वाटत ती तशी असेन असे."

एकीने आपले मत सांगितले.

"अहो, ताई, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ना?
चेहऱ्यावर थोडीच गुण,दोष लिहीलेले असतात? आणि तुम्ही एकदोनदाच भेटल्या ना तिला ..त्यावरून काय समजते? "

दुसरीने छायाविषयीचे आपले विचार ऐकवले.

"आजकाल कोणावर विश्वास ठेवू नये. अशी परिस्थिती झाली आहे.
जगात घडणाऱ्या घटना ऐकल्या की,कोणावर विश्वास ठेवावा? आणि कोणावर नाही? असे वाटते.
छायालाही कामाची,पैशांची गरज आहे. घरात नवरा चांगला नसेल म्हणून कदाचित..."

अजून एकीने बोलण्याचे धाडस केले.

"अहो,आपण फक्त छायालाच का दोष देत आहोत? तिच्याच चारित्र्यावर का संशय घेत आहोत?
सांगितले गेले त्यापेक्षाही काही वेगळेच असू शकते ना?"

छायाची बाजू मांडत एकजण म्हणाली.

"काहीही असू शकते. आपणही आता आपल्याकडे कामाला येणाऱ्या बाईंकडे लक्ष ठेवले पाहिजे. अजून कोणाकडे काम करतात? आणि आपल्या घरात काय करतात? मी तर ठरवले आहे, मी घरी नसताना,गावाला गेल्यानंतर त्यांना बोलवायचे नाही."

शिंदेबाई थोड्या टेंशन मध्येच म्हणाल्या.


या सर्वांचे बोलणे मीना फक्त ऐकतच होती. कारण तिला तिने बनवलेली पावभाजी,गुलाबजाम सर्वांना खाऊ घालायचे होते व ती त्या तयारीला लागली होती. आणि या बातमीविषयी काय प्रतिक्रिया द्यावी? हे ही तिला सुचले नाही.

गप्पागोष्टी करत सर्वांनी पावभाजी व गुलाबजामचा स्वाद घेतला व मीनाचे कौतुक करत तिला धन्यवाद देत आपआपल्या घरी गेल्या.

क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all